Login

रंग माझा वेगळा...

तृतीयपंथी माधव अर्थातच माधवीची कथा...
ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
लघुकथा फेरी (संघ कामिनी )
शीर्षक - रंग माझा वेगळा...


"लते... अगं काय हाय हे? काय ह्या पोराचं काय करायचं? वेड बिड लागलंय का काय?" रामू डोकं गच्च पकडून खाली बसला.

बाजूला लता उभी होती आणि तिच्या पदराआड माधव तोंड लपवून उभा होता. त्याच्या दोन्ही मनगटांवर ओरखडे उमटले होते, त्यातून बाहेर आलेलं रक्त सुकून गेलं होतं. तोंड लालभडक दिसत होतं. कपाळावर आईची म्हणजेच लताची टिकली चिकटली होती. काचेच्या बांगड्या फुटून पायाशी विखुरल्या होत्या. माधव तोंड लपवून रडत उभा होता. आज तर खूप मार दिला होता रामूने...

           "लय झालं आता... इथून पुढं हा पोरगा या घरात दिसता कामा नये. जन्माला आला तवाच का नाही मेलास... निदान ह्यो दिवस तरी बघायला मिळाला नसता." असं बोलून रामू रागातच घराबाहेर निघून गेला.

           "अवं... असं काय म्हणताय, आपलंच लेकरू हाय नव्हं ते?" लता तोंडाला पदर लावून रडू लागली.

        "आजपास्न तो आपला पोरगा नाही म्हणजे नाही... जाऊन कुठंतर तोंड काळं कर म्हणावं." बाहेरून रामूचा संतापलेला आवाज आला. स्वयंपाकघरात चुलीसमोर बसलेली मालू पण तोंड दाबून रडू लागली. रामूच बोलणं माधवच्या जिव्हारी लागलं होतं. धावतच आतल्या खोलीत जाऊन तो ओक्साबोक्शी रडू लागला.
 
             रामनाथ, त्याची बायको लता, मुलगी मालती आणि मुलगा माधव असं चौकोनी कुटुंब शेतमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत असत. माधव आणि मालती दोघा जुळ्या भावंडांनी नुकतंच वयाचं सतरावं वर्ष पार केलं होतं. दोघांचंही दहावीपर्यंतचं शिक्षण गावातल्याच प्राथमिक शाळेत झालं होतं; पण पुढे शिक्षण घेण्याची ऐपत नसल्याने दोन्ही भावंडे आईवडिलांना शेतीत हातभार लावायची. मालती शांत, कष्टाळू, गुणी मुलगी होती; पण माधव मात्र लहानपणापासून वेगळाच होता. त्याला नेहमी मुलींसारखं नटणं-मुरडणं आवडायचं. आईच्या बांगड्या, साड्या याचं त्याला आकर्षण वाटायचं आणि याच कारणास्तव रामू त्याला खूप मारायचा. तरीही त्याची सवय मात्र काही केल्या जात नव्हती. लता आणि रामूला कळून चुकलं होतं आपला मुलगा सामान्य नाही आहे. आईने त्याला बऱ्याच वेळा प्रेमाने समज दिली होती; पण रामू मात्र त्याचा तिरस्कार करू लागला होता. त्या दिवशी माधव उपाशीच झोपला. आईने समजूत घालूनही त्यानं ऐकलं नाही.

              रात्रीचे एक वाजले होते. सगळा गाव सामसूम पडला होता. घरातले सगळे गाढ झोपेत होते. कानोसा घेत माधव उठून बसला. आवाज न करता त्याने एक जुनी वही आणि पेन हातात घेतला.

"बाबा... तुम्हाला मी नकोय ना? आता मी तुम्हाला कधीच दिसणार नाही. आई, माधवी काळजी घ्या... मला माफ करा..." इतकं लिहून त्यानं चिठ्ठी उशीखाली ठेवून दिली.

दबक्या पावलांनी तो हळूच बाहेर आला. आवाज न करता कडी सरकवून तो घराबाहेर पडला. मागोमाग दरवाजा ओढून घेतला. त्याच्या डोक्यात सतत जीव द्यायचा विचार घोळत होता. नको होता त्याला जीव! लोकांचे टोमणे, सतत त्याच्यावर हसणाऱ्या लोकांचा त्याला कंटाळा आला होता. त्याला कळून चुकलं होतं आपणं सामान्य नाही आहोत. आपण एक ट्रान्सजेंडर आहोत... आईचं रडणं, बाबांचा तिरस्कार त्याला असह्य झाला होता आणि म्हणूनच जीव देण्यासाठी माधव घराबाहेर पडला होता.

विचारांच्या ओघात गावापासून तो बराच दूर आला होता. पोटात भुकेपोटी कावळे ओरडत होते. चालता चालता कधी उजाडलं कळालंच नाही. असाच दोन दिवस तो भटकत होता. फूटपाथावर निजला होता. पोटात भुकेचा डोंब उसळला होता. जवळच्या एका ठेल्यावर त्यानं खायला मागितलं पण त्या मालकाने शिवीगाळ करत त्याला धुडकावून लावलं. रात्र झाली होती. माधव डांबरी रस्त्यावरून अनवाणी पायांनी चालत होता. रस्त्याच्या कडेला उभ्या खांबावरचा दिवा त्याचं अस्तित्व उजळवू पाहत होता. अधूनमधून एखादा ट्रक वा चारचाकी वाऱ्याचा जोर देऊन निघून जात होती. तो बराच वेळ चालत राहिला... अचानक त्याचा तोल जाऊ लागला, डोकं गरगर फिरू लागलं, डोळ्यांपुढे अंधारी येऊ लागली. समोरून येणाऱ्या वाहनाचा कर्णकर्कश आवाज कानावर पडू लागला. त्या वाहनाच्या भल्या मोठ्या हेडलाइट्स डोळ्यांवर पडताच त्याने दोन्ही हात डोळ्यासमोर धरले. त्याने डोळे मिटले.... ब्रेक लावल्याचा आवाज कानावर पडला आणि तो तिथेच बेशुद्ध झाला.

              समोरच ट्रक येऊन थांबला होता. त्यातून एक इसम खाली उतरला, बहुतेक तो ट्रक ड्रायव्हर असावा.

"कोण आहे रे? मरायचं आहे का? कुठून कुठून येतात देव जाणे!"

तो इसम धावत आला आणि त्याने माधवला उठवायचा प्रयत्न केला; पण माधवची काहीच प्रतिक्रिया नव्हती. त्याचे अंग गरम लागत होते. त्या ट्रक ड्रायव्हरने त्याला दोन्ही हातांवर उचलले आणि ट्रकमधे नेऊन झोपवले.

त्यानं एक नंबर डायल केला.

     "हॅलो... अम्मा... एक मुलगा रस्त्यावर सापडलाय. बहुतेक बेशुद्ध आहे. तिकडे आणू का त्याला? मरायला निघाला होता वाटतं."

    ".........." पलीकडून काहीतरी बोलणं झालं आणि कॉल कट झाला.
***
           हळूहळू माधवने डोळे उघडले. तो एका बेडवर निजला होता. त्याच्या नजरेला छताचा भिरभिरता पंखा दिसला. दवा, गोळ्या, सलाईनचा वास नाकात घुमत होता. त्यानं उठून बसायचा प्रयत्न केला; पण डोक्यात गरगर जाणवली, शिवाय एका हाताला सलाईन लावलेली होती.

      "पडून रहा." नर्स हातानेच इशारा करत म्हणाली.

      "अम्मा... पेशंट शुद्धीवर आलाय." नर्स सांगून गेली.

डॉक्टरांसोबत चर्चा करणारी अम्मा माधवच्या बेडजवळ आली. गडद तपकिरी रंगाची साडी, त्यावर हातभरून असलेला ब्लाऊज, केसांचा मधोमध भांग पाडत मागे बांधलेला अंबाडा, रेखीव भुवया, टपोऱ्या डोळ्यांत घातलेलं गडद काजळ, गडद चॉकलेटी रंगाची लिपस्टिक आणि या सगळ्यांत उठून दिसणारं तिच्या कपाळावरचं भलं मोठं कुंकू... पुरुषाला लाजवेल अशी धडधाकट शरीरयष्टी, करारी नजर...

अम्मा माधवच्या जवळ आली. माधव अनोळखी नजरेने तिच्याकडे पाहत होता. तो जरासा घाबरलाही होता.

अम्माने त्याच्या डोक्यावर हात ठेवून विचारलं, "कोण आहेस तू बाळ? आता ठीक आहेस ना?"

माधवने होकारार्थी मान हलवली. कोण कुठली अनोळखी बाई; आईच्या मायेने विचारत होती हे पाहून माधवच्या डोळ्यांत पाणी आले. निदान सलाईनच्या जोरावर तरी त्याच्या भुकेल्या पोटाला आधार मिळाला होता त्यामुळं तो जरा धीरावला होता.

    "तुला तुझ्या घरी जायचं आहे का?" अम्माने विचारले आणि हे ऐकून माधव कितीतरी मोठ्याने ओरडला...

    "नाहीऽऽऽ"

सगळेजण त्याच्या दिशेने पाहू लागले. अम्मा चकित झाल्या;पण यावेळी त्यांनी गप्प राहणंच पसंत केलं.

थोड्या दिवसांनी माधवला डिस्चार्ज मिळाला तेव्हा स्वतः अम्मा त्याला न्यायला आली होती. माधव आता चांगला ठणठणीत झाला होता. हॉस्पिटलच्या आवारात चारचाकी उभी होती. अम्माने हात करताच तो आत बसला. अम्मा स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसली आणि गाडी गेटच्या दिशेने वळली. माधवने सहज हॉस्पिटलकडे नजर टाकली. 'अम्मा जनरल हॉस्पिटल'चा बोर्ड त्याचं लक्ष वेधून गेला.

         "तुला घरी का जायचं नाही?" अम्मानी प्रश्न विचारला; पण उत्तरादाखल माधवचा अबोलाच होता.

खरंतर तो घाबरत होता म्हणूनच तो गप्प राहिला. गाडी एका प्रशस्त इमारतीसमोर येऊन उभी राहिली. ती इमारत एक बहुउद्देशीय संस्था होती. लहान मुलं, वृध्द, माधवच्या वयाची देखील मुलं-मुली तिथं आपलं जीवन व्यतीत करत होती. त्या ठिकाणी कोणीच रिकामं दिसतं नव्हतं. प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या कामात व्यस्त होता. या सगळ्यांचा कैवारी म्हणजे अम्मा... आजपासून तोच माधवचा परिवार होता.

              एक दिवस माधव लपून छपून एका खोलीत शिरला, ती खोली होती अम्माची! जवळपास कोणी नाही बघता माधवने दरवाजा लावून घेतला. जवळच टेबलवर ठेवलेली नवी कोरी साडी त्यानं अंगावर चढवली. आरशासमोर उभं राहून तो सजू लागला. त्याच्याच तंद्रीत असताना दरवाजा उघडला आणि अम्मा आत आल्या. त्यांना पाहून माधव गर्भगळीत झाला. त्याच्या हातापायांना कंप सुटला. घाबरत तो मागे मागे सरकू लागला आणि चुकून त्याचा हात टेबलवर ठेवलेल्या त्या भल्या मोठ्या आरशाला लागला. आरसा खाली पडून खळ्ळकन फुटला तशा काचा विखुरल्या गेल्या...
    
         "पाहिलंस? पाहिल्यास या काचा... हा एक एक तुकडा तुझं प्रतिबिंब दर्शवतोय. तू अनंत आहेस. चराचरात आहेस तू! तू शिवाचा अंश आहेस... अर्ध नारी नटेश्वर आहेस तू... स्वतःला कधीचं कमी लेखू नकोस. तुझं अस्तित्व तुलाच जपायच आहे. तुझा रंग वेगळा असला तरी फिका नाही हे लक्षात ठेव. जगाचा विचार करू नकोस आणि मनसोक्त जगून घे..." अम्माचे रौद्ररूपी शब्द माधवच्या नसानसांत भिनले होते. अम्मा स्वतः एक ट्रान्सजेंडर होती; पण लाखो गोरगरिबांचा वाली होती.
***

पुढे जाऊन माधवची माधवी झाली. अम्माच्या संस्थेतून शिक्षण घेऊन माधवी आज डॉक्टर झाली होती. समाजाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. तिने अनेक ट्रान्सजेंडर लोकांचं अस्तित्व ठाम करण्यासाठी लढा दिला. आज तिचं नाव अम्माच्या बरोबरीने घेतलं जात होतं. शेवटी आईवडिलांच्याही म्हातारपणात त्यांची सेवा करणारा माधव अर्थातच माधवी जगासाठी एक प्रेरणाच ठरली होती.

समाप्त!
©® प्रणाली निलेश चंदनशिवे.    
               

        
0