रंग माळियेला...( भाग १६ वा)
@ आर्या पाटील
सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.
******************************************
गावाला निसर्गत: च लाभलेलं हिरवं सौंदर्य न्हाहाळत दोघेही हळूहळू समुद्रकिनारी पोहचले.. आपल्या बालपणीच्या आठवणी उलगडतांना सुयश इतका रमला की त्याला कळलेच नाही कधी समुद्र आला.. इथल्या लाटांनाही प्रचंड ध्वनीचं वरदान लाभलेलं.. तो आवाज सुयश कसा विसरेल..? लाटांचा ध्वनीनाद कानावर पडताच तो भानावर आला..
" प्रज्ञा, तिकडे समुद्र आहे.. तिकडे नको .., आपण माघारी फिरुया.." तिचा हात हातात घेत तो म्हणाला..
" मी आहे तुझ्यासोबत.. चल त्याच्या डोळ्यांत डोळे घालून धाडसी हो.. तु घाबरला नाहीस..दाखव त्याला.. त्या पाण्याच्या स्पर्शात निलय भेटेल तुला.. त्याला श्रद्धांजली द्यायला तरी चल.." आपला दुसरा हात त्याच्या हातावर ठेवत ती म्हणाली..
तिच्या शब्दांनी पाय आपोआप समुद्राच्या दिशेने वळले.. रस्ता तोच होता फक्त सोबत तेवढी बदलली होती.. त्या सोबतीचा आधार घेत तो किनारी पोहचला.. तो छोटेखानी खडक अजून तसाच होता अचल.. पण निलय मात्र कायमचा निघून गेला होता.. ओहोटी असल्यामुळे पाणी ओसरू लागले होते..
" प्रज्ञा त्या खडकाजवळ नको... प्लिज." किनाऱ्यावर थांबत तो म्हणाला..
" ठिक आहे.. तु थांब इथे मी आलेच.. " त्याच्या हातातून हात सोडवत ती म्हणाली..
तिचा सुटणारा हात पुन्हा हातात घेत त्याने तिला अडवले..
" सुयश, ही ओंजळभर फुले व्हायची आहेत... निलयला" पिशवीतील फुले दाखवत ती म्हणाली..
" पण सांभाळून जा.." म्हणत त्याने कष्टाने हात सोडला.
समुद्राचं वेड तिला सारं विसरायला लावयचं.. किनाऱ्यावरचा वारा केसांना छळत होता.. केसांच्या बटा मागे सारत ती खडकाच्या दिशेने निघाली..
" सांभाळून प्रज्ञा.." तिचा वेध घेत तो जाग्यावरूनच सांगत होता..
गुडघाभर पाण्यातून ती खडकावर पोहचली.. फुले ओंजळीत घेत समुद्रात सोडून दिली.. निलयला श्रद्धांजली देत.. डोळे उघडले आणि समुद्राच्या रुपापुढे ती नतमस्तक झाली.. निळंशार पाणी तिला जणू धन्यवाद देत होतं.. ती समुद्रात गुंतलेली पाहून सुयशने जाग्यावरूनच आवाज दिला..
" प्रज्ञा, बस झालं आता मागे ये..."
सुयशची अगतिकता तिला न सांगताही कळू शकत होती.. हृदयाच्या खोल कप्प्यात एकमेकांबद्दल मैत्रीपलीकडल्या जाणीवा निर्माण झाल्या होत्या.. पण कळत मात्र नव्हतं..
प्रज्ञा खडकावरून उतरत असतांना अचानक तोल जाऊन पाण्यात पडली.. अगदीच गुडघाभर.. पण तिला पडतांना पाहून निलयला भान राहिलं नाही कशाचच.. वायुवेगे धावत तो प्रज्ञाजवळ पोहोचला.. समुद्राच्या भीतीची जागा प्रज्ञाच्या काळजीने घेतली होती.. निलयला गमावलं होतं पण प्रज्ञा त्याला आयुष्यभरासाठी हवी होती.... ती उठून उभी रहायच्या आधी सुयश तिच्या जवळ जाऊन पोहचला.. आपल्या दोन्ही हाताने पकडत त्याने तिला पाण्यातच उभे केले.. पडल्यामुळे केसापासून पायाच्या नखापर्यंत ती पाण्याने भिजली होती.. काही कळायच्या आत त्याने तिला गच्च मिठी मारली.. तिचा चेहरा आपल्या छातीशी कवटाळत तिच्या कपाळावर आपल्या अधिराने स्पर्शखूण दिली.. तो इतका केविलवाणा तिने कधीच पाहिला नव्हता.. त्या गच्च मिठीतही त्याच्या हदयाची वाढलेली धडधड तिला स्पष्ट जाणवत होती.. त्याच्या कुशीत सुरक्षित असल्यासारखे वाटले तिला.. एवढ्या दिवस अल्लडपणे, अवखळपणे वागणारा सुयश तिला जबाबदार वाटला त्या क्षणी...
आपली मिठी सैल करत त्याने तिचा भिजलेला चेहरा ओंजळीत धरला..
" प्रज्ञा, असं नको ना गं करूस... जीव आहेस तु माझा.. आता तुला काही झालं तर मी ही जिवंत राहणार नाही.." तो अगतिकतेने बोलत असतांना तिने आपला हात त्याच्या ओंठावर ठेवला..
तिचा हात बाजूला करत त्याने पुन्हा तिला मिठीत घेतले..
" हो प्रज्ञा... आय लव्ह यु सो मच... तु श्वास आहेस माझा.."
त्याच्या शब्दांनी तिचं सर्वांग सळसळलं.. प्रेमाचा परिस स्पर्श होता तो.. तिला शहारून गेला.. प्रीतीची पालवी तिच्याही मनात फुटली होतीच.. फक्त ती प्रीती स्विकारायची हिंमत नव्हती तिच्यामध्ये.. गोव्याला असतांना पाण्याला घाबरणारा सुयश जो त्या लहानग्या मुलाला वाचवू शकला नव्हता तोच आज कशाचीही पर्वा न करता समुद्राकडे झेपावला होता.. फक्त अन् फक्त प् आपल्यासाठी.. हेच तर प्रेम होतं ना.. ही जाणीवच तिला सुखमय वाटत होती.. त्याच्या गच्च मिठीत असेच अडकून राहावे आयुष्यभर.. मन सारखं सांगत होतं..
" तुझ्याही प्रेमाची कबुली दे.. म्हण त्याला आय लव्ह यु.."
पण पुन्हा बुद्धीने डोकं वर काढलं..
" अगं तु कशी तो कसा.. काहीच तुलना नाही.. तु काळीकुट्ट धरणी आणि तो पांढरशुभ्र आकाश.. धरणी आकाश कधी एक होतात का..? क्षितिजावरची भेटही आभासीच असते.. शाश्वत फक्त एवढंच आहे की तु त्याला कधीच शोभणार नाहीस.. त्याला खूप देखणी बायको मिळेल.. तुझ्या काळ्या रंगाला त्याच्या निळ्या आभाळी नको सजवूस..."
ती पटकन भानावर आली.. त्याच्या मिठीतुन स्वत: ला सोडवत पाण्यातून बाहेर निघाली आणि थोड्या दुर जाऊन विसावली..
सुयशला ही अवघडल्या सारखे झाले.. पण त्याने मुद्दामहून काहीच नव्हतं केलं जे घडलं ते आपसूकच घडलं होतं.. तो ही तिच्याजवळ जाऊन बसला..
एव्हाना ऊन्हं उतरली होती.. सूर्यही मावळतीला समुद्राच्या डोहात विसावला होता.. ती पूर्ण भिजली होती.. समुद्राचा गार वारा तिला छळू लागला होता.. आपले दोन्ही हात छातीजवळ आणून शून्यात नजर लावून बसली होती.. तिला थंडीने शहारतांना पाहून सुयशने आपला जॅकेट काढत तिला पांघरला.. काही अंतर ठेवून तो तिच्या पुढ्यात बसला..
" प्रज्ञा, आय अॅम सो सॉरी.. माझं वागणं चुकलं असेल कदाचित पण भावना शुद्ध आहेत.. खूप प्रेम करतो तुझ्यावर.. गोव्यातल्या पहिल्या भेटीपासून ते आतापर्यंत माझ्या हृदयावर फक्त तुझच वर्चस्व आहे.. तुझं बोलणं मला बोलकं करतं, तुझ हसणं मला आनंदी करतं.. आणि तुझं माझ्यात असणं मला संपूर्ण करतं.. तु भेटल्यापासून माझं विश्व तुझ्याच विश्वात विरून गेलय गं.. प्रत्येक क्षण तुझ्यासोबत भरभरून जगावासा वाटतो .. जाणिव होती पण तुला सांगण्याची हिंमत मात्र होत नव्हती.. तु श्वास बनली आहेस या देहाचा.. मघाशी तु जेव्हा पाण्यात पडलीस तेव्हा पार कोलमडून गेलो होतो मी.. जीव कंठाशी आला होता माझा.. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.." तो मनमोकळेपणाने बोलून गेला..
त्याचा प्रत्येक शब्द तिच्या काळजाला हात घालित होता.. आता त्यालाही सुयशच्या प्रेमाची भरती आली.. आणि कधीच रडतांना न दिसलेली प्रज्ञा आज मात्र अश्रूंनी न्हाहून निघाली.. प्रेमाची अनुभूती होतीच तेवढी हृदयस्पर्शी.. तिला रडतांना पाहून तो पुन्हा अगतिक झाला.. नकळत त्याच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या.. तिच्या सावळ्या गालांवर ओघळणारे अश्रू आपल्या हातांनी टिपत तो तिच्या जवळ गेला..
" प्रज्ञा, नको ना रडू.. आय अॅम सो सॉरी गं.. पण तु अशी रडू नकोस..." रडवेला होत तो म्हणाला..
त्याचा रडका चेहरा पुन्हा एकदा प्रामाणिक प्रेमाची जाणिव करून गेला.. कसलाच विचार न करता प्रज्ञा त्याच्या कुशीत झेपावली.. तिच्या डोक्यावर हात फिरवीत तो तिला सांभाळत होता..
" सुयश, खूप चांगला आहेस तु... पण मी नाही करू शकत प्रेम तुझ्यावर.." क्षणात त्याच्या कुशीतून बाहेर येत ती म्हणाली..
" प्रज्ञा, तुझं प्रेम आहे माझ्यावर.. हे अश्रू निशाणी आहेत त्याचे.. माझी काळजी, माझं प्रेम डोळ्यांत दिसतं गं तुझ्या.. नको फसवूस स्वत: च्या मनाला.." तिचा चेहरा पकडत तो म्हणाला..
त्याचा स्पर्श तिला छळू लागला होता आता.. त्याचे हात बाजूला करित ती उठून उभी राहिली..
"सुयश, भलत्या मोहात नको पाडूस मनाला.. तुझी माझी कधीच बरोबरी होऊ शकत नाही.. आपण एकमेकांसाठी अजिबात बनलेलो नाही.. माझ्यापेक्षा खूप सुंदर मुली मिळतील तुला.." चेहरा फिरवीत ती म्हणाली..
तो ही उठून उभा राहिला.. आपला खाली पडलेला जॅकेट पुन्हा तिच्या अंगावर टाकत त्याने तिला आपल्या बाजूने वळविले..
" प्रज्ञा, तु या जगातील सर्वात सुंदर तरुणी आहेस.. तुझ्यापेक्षा आणखी सुंदर या जगात कोणीच नाही.." तो म्हणाला
" नको फसवूस स्वत:च्या मनाला.. जी शाश्वत दिसते तीच सुंदरता असते.." नजर खाली घेत ती म्हणाली..
" मग मनाच्या सौंदर्याला का काहीच महत्त्व नाही..? माझी सौंदर्याची व्याख्या वेगळी आहे.." तो आश्वासकपणे म्हणाला..
" पण जगाला ती कधीच पडणार नाही.. जग वेड्यात काढेल तुला.." प्रतिउत्तर देत ती म्हणाली..
" मला नाही पर्वा जगाची.. तुच माझं खरं जग आहेस.. तुला काय वाटतं याने फरक पडतो.." तो म्हणाला.
" सुयश, थांबव आता हे सगळं.. बाहेर पड यातून.. तुला फक्त त्रास होईल.." ती म्हणाली.
" त्रास तर आता होतोय.. मला नाही पडायचं बाहेर यातून.. मन खुश असतं तुझ्या राज्यात.." तो म्हणाला..
" पण माझ्या राज्यात मी तुला स्थान नाही देऊ शकत.. माझं नाही प्रेम तुझ्यावर.. ऐकलस.. माझं नाही प्रेम तुझ्यावर.." बोलता बोलता तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले..
" तु कितीही नाही म्हणालीस तरी प्रेम लपत नाही.." तिचे डोळे टिपत तो म्हणाला..
" सुयश, जर तु थांबला नाहीस तर आपली मैत्रीही तोडावी लागेल मला.." त्याचा हात बाजूला सारत ती म्हणाली..
" प्रज्ञा, का त्रास देतेस स्वत: ला.. वेदना मला होतात गं.. आपली मैत्री भावनातित आहे तिला मोडण्याची भाषा नको करूस.. तुला नाही ऐकायचं ना तुझ्या मनाचं तर नको ऐकूस.. पण माझ्या मैत्रीच्या मागे नको लागूस.. मला खात्री आहे माझं प्रेम कधीच हरणार नाही.. ते सोज्वळ आणि पवित्र आहे.. या हृदयाची कवाडं तुझीसाठी नेहमीच मोकळी असतील.." तो म्हणाला..
" इतका आशावादी नको राहूस.." ती म्हणाली.
" ते मला ठरवू दे.. माझं हृदय आहे.. त्याच्यावर राज्य तुझं असलं तरी राजा मीच आहे.. मी वाट बघेन.." म्हणत त्याने किनार्यावरून काढता पाय घेतला..
" चल, आईबाबा वाट पाहत असतील. " मागे पाहत तो म्हणाला..
" तु चल मी आलेच.." डोळ्यांच्या कडा टिपत ती म्हणाली.
तो पुन्हा मागे तिच्याजवळ आला.
" प्रज्ञा, एवढा विचार नको करूस.. खूप सोपं आहे सगळं. चल निघुया.." तिचा हात पकडत त्याने तेथून काढता पाय घेतला..
पंधरा वीस मिनिटांचा घरापर्यंतचा रस्ता त्यांच्या अबोल सोबतीने पार झाला.. ती शांतता तिला अगतिक करित होती.. दहा वेळा त्याच्याकडे पाहून झाले असेल तिचे पण तो नजरेला नजर देत नव्हता.. तिचा हसरा, बोलका मित्र अचानक अबोल बनला होता..
वाड्याच्या दाराशी निलयची आई दोघांची वाट बघत थांबली होती.. त्यांना डोळ्यांत पाहिले आणि त्यांना हायसे वाटले..
" काय गं हे प्रज्ञा, भिजलीस का..? सर्दी होईल ना.. चल आत कपडे बदलून घे.." म्हणत त्यांनी तिला आत नेले.
" ही साडी घाल. छान दिसेल तुला.." म्हणत त्यांनी गुलाबी रंगाची साडी तिच्या पुढ्यात धरली..
" दुसरा रंग नाही का मावशी..?" साडी न्हाहाळत ती म्हणाली.
" रंग आवडत नाही का..?" त्या म्हणाल्या.
" आवडतो पण शोभत नाही.." ती म्हणाली.
" बेटा तु खूप सुंदर आहेस.. रंगांच काय घेवून बसलीस.. रुपाने तु देखणी आहेस.. नाकीडोळी अगदीच रुबाबदार.. हा तर देवाचा रंग त्याला सगळच शोभून दिसतं.. हिच साडी घाल.." म्हणत त्या बाहेर आल्या..
आंघोळ करून प्रज्ञाने ती गुलाबी साडी चापून चोपून नेसली.. केसं धुतली होती.. सुकण्यासाठी तिने ते लांबसडक केस मोकळेच सोडले होते..
" प्रज्ञा आवरलं का..?" निलयच्या आईने बाहेरूनच आवाज दिला..
बाथरूममध्ये जाण्याचा रस्ता त्याच रुममधून जात होता..
" आपला चेहरा आरशात न्हाहाळत तिने आवरल्याचे सांगितले..
टॉवेलने केस पुसत बाहेर जाण्यासाठी तिने दरवाजा उघडला.. तोच समोर सुयश उभा.. साडीत, मोकळ्या केसांत प्रज्ञा त्याला आणखीन सुंदर दिसली.. क्षणभर तिला पाहत तो तिच्या डोळ्यांत हरवला..
" सुयश , गरम पाणी हवं असेल तर सांग रे.." निलयच्या आईच्या आवजाने दोघे भानावर आले..
काहीही न बोलता सुयश रस्तातून बाजूला झाला आणि खुणेनेच तिला बाहेर यायला सांगितले.. ती रुममधून बाहेर आली.. आणि तो आत शिरला.. रुमची कडी लावत क्षणभर थांबला..
" कसली सुंदर दिसतेस प्रज्ञा तु... किती वेळा प्रेमात पाडशील.. पण मी ही हाडाचा प्रेमी आहे तुझं माझ्यावरचं प्रेम तुझ्या तोंडूनच कबूल करून घेईन.." स्वगत होत त्याने पुन्हा त्याच फिल्मी स्टाईलने आपल्या केसांवरून हात फिरवला आणि बाथरूममध्ये गेला..
इकडे प्रज्ञा वेगळ्याच विचारात होती." हा मला टाळतोय का..? जीवघेणी वाटते दोघांमधील शांतता..."
प्रज्ञाला पाहून निलयच्या आईने तिची द्रिष्ट काढली..
" किती सुंदर दिसतेस गं.. माझीच नजर लागेल माझ्या लेकीला.." त्या म्हणाल्या..
सुयश बाहेर आल्यावर दोघांसाठी फक्कड चहा बनवून दिला.. चहा पीत असतांना सुयशची नजर चोरून प्रज्ञाला पाहायला विसरत नव्हती.. प्रज्ञाही मधेच फेरफटका मारून यायची त्याच्या चेहर्यावरून.. पण नेमकी चुकामुक व्हायची दोन नजरांची.. अचानक सारच बदललं होतं त्यांच्या नात्यात.. प्रेमाची चाहूल वागणं बदलून गेली होती..
" सुयश, मामाच्या घरी जाऊन ये.. काम करणाऱ्या गडीने चावी आणून दिली आहे.. मी फोन करून सांगितलं तुझ्या मामाला तु आल्याबद्दल.." निलयचे बाबा म्हणाले..
" ठिक आहे.. मी येतो जाऊन.." चहा संपवत तो म्हणाला.
" प्रज्ञालाही घेऊन जा.. तिलाही दाखव की घर.." आई म्हणाल्या..
" नको.. प्रज्ञाला थांबू दे इथे.. अंधारही झालाय.. मी येतो जाऊन.." निघत तो म्हणाला.
" अंधार मला खाणार नाही.. आणि माझी रक्षा करायला मी समर्थ आहे.. मी येते.. मावशी आलोच आम्ही जाऊन.." साडी सावरत ती ही मागून निघाली..
बाहेर येताच प्रज्ञाने सुयशकडे मोर्चा वळवला..
" तुझ्यासाठी आले मी इथे.. आणि मलाच न घेता जात होतास.." ती म्हणाली.
" उगा तुला काही भलतच वाटायचं म्हणून सांगितलं नाही.. सांभाळून चल.. साडी घातली आहेस.." म्हणत त्याने तिला आधार दिला..
साडी घालून चालतांना तिची उडालेली तारांबळ त्याच्या नजरेतून सुटली नाही..
दार उघडून ते घरात गेले.. लाइट चालू करत सुयश मामाचं घर न्हाहाळू लागला.. लहानपणीच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या.. प्रज्ञासमोर त्या उलगडतांना त्याला शब्द कमी पडत होते.. किती गोड आठवणी होत्या त्या.. प्रज्ञा मात्र स्मितहास्य करून त्याला प्रतिउत्तर देत होती.. खरं तर तिचा मघापासून हरवलेला मित्र तिला पुन्हा भेटला होता..
तोच अचानक लाइट गेली... त्याने पटकन मोबाईल बाहेर काढला आणि टॉर्च ऑन केली..
" काय रे अशी कशी लाइट गेली..?" ती म्हणाली.
" आता मी काही नाही केले.." तो म्हणाला..
कॅण्डल भेटते का म्हणून ती मागे फिरली.. तिचे मोकळे केस त्याच्या चेहर्याला स्पर्शुन गेले..
" प्रज्ञा राहू दे.. कधी कधी अंधारही हवाहवासा वाटतो.. छान दिसतेस साडीत.. आणि हे मोकळे केस अलवार छेडतात मनाच्या तारा.." तिचे लांब केस हातात घेत तो म्हणाला.
" सुयश, पुरे ना आता.. थांबव ना सगळं.. मला माझा मित्र हवा आहे जुनाच.. अल्लड, अवखळ अगदीच मनमुराद जगणारा.. तु नको बदलूस असा.." ती अगतिकतेने म्हणाली..
तिची अगतिकता त्याला छळून गेली..
तो क्षणभर थांबला..
" ठिक आहे.. माझं प्रेम मी तुझ्यावर लादणार नाही.. मला खात्री आहे तुझं माझ्यावरचं प्रेम जास्त काळ लपून राहणार नाही.. आता मी वाट बघेन तुझ्या प्रेमाची.. तुझ्या प्रेमळ कबुलीची.. तोपर्यंत आपण आपली मैत्री जपूया.." तो म्हणाला..
" उगा खोट्या आशा बाळगू नकोस.. त्रास होईल तुला.. आणि माझ्या मित्राला झालेला त्रास मला सहन होणार नाही.." त्याच्या नजरेला नजर देत ती म्हणाली.. आणि तोच लाईटही आली..
" ओहो.. म्हणजे माझा त्रास तुला छळतो तर.. आहे राव प्रगती आहे.. ते जाऊदे पण खरच खूप छान दिसतेस तु साडीत.. खूप नशीबवान असेल तुझा नवरा.." आपल्या टी शर्टची नसलेली कॉलर पकडत तो म्हणाला..
" पुन्हा नको ना सुरु होऊस.." ती चिडून म्हणाली.
" ये बाई मी तुझा मित्र म्हणूनच बोलतोय.. आणि माझ्याबद्दल नाही तुझ्या भावी नवऱ्याबद्दल बोलतोय.." तो म्हणाला आणि गालात हसला..
तिनेही हसूनच त्याला प्रतिउत्तर दिले.. घर पाहून झाल्यानंतर ते पुन्हा निलयच्या घरी पोहचले.. निलयच्या आईने स्पेशल कोकणी बेत केला होता.. जेवणाचा मनमुराद आस्वाद घेत गप्पागोष्टींच्या मैफिलीत चौघांनी जेवण पूर्ण केलं.. जेवणानंतर अंगणात चांदप्रकाशात एकत्रित वेळ घालवला.. पूर्ण दिवस खूप मोठा वाटला त्यांना. दिवसभराचा शीण असल्याने थोड्याच वेळात ते झोपायला निघून गेले.. निलयच्या आईसोबत प्रज्ञाला अंथरुण घातले होते.. सुयश बाबांसोबत दुसऱ्या खोलीत झोपला.. सुयश, प्रज्ञा थकलेले असल्याने लगेच झोपले आणि निलयचे आईबाबाही लेक पुन्हा भेटला या आनंदात इतक्या वर्षात पहिल्यांदाच स्वस्थ झोपले..
क्रमश:
****************************************** लिखाणात चुका आढळल्यास क्षमस्व.