Login

रंग माळियेला...( भाग १७ वा)

Love story of Pradnya and Suyash.... Exploring new horizon of love beyond the colour..

रंग माळियेला...( भाग १७)

@ आर्या पाटील

सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे..

******************************************

दमलेली असल्याने प्रज्ञाला रात्री पटकन झोप लागली आणि सकाळीही लवकरच जाग आली.. झुंजुमुंजु पहाट काय असते ते खऱ्या अर्थाने ती अनुभवत होती.. काळाच्या ओघात लुब्ध झालेला कोंबडा आरवण्याचा आवाज कानावर पडताच ती एकदम खुश झाली.. अंधाराच्या कुशीतून अलगद डोकी उचलणारी घरं चुलीतुन निघणाऱ्या धुराच्या धुक्यात न्हाहून निघत होती.. चिमण्यांचा चिवचिवाट अन् त्यात लांब तान छेडणाऱ्या कोकिळेचा आवाज.. अहाहा.! मनाला उत्साहाची भरती आली होती जणू.. निलयच्या आई एव्हाना उठल्या होत्या.. मागच्या दारी चुल पेटवून आंघोळीसाठी पाणी गरम करत ठेवले होते.. बिछान्यावरून उठत ती ही मागच्या अंगणात गेली..

" झोपायचं ना गं प्रज्ञा.. एवढ्या लवकर उठलीस..

आम्ही दोघे आंब्याच्या वाडीत जाऊन येतो.. तोपर्यंत तु आवरून घे.. आल्यावर मी गरम भाकरी आणि वांग्याची चटणी करेन.. तोपर्यंत सुयशही उठेल.." म्हणत दोघेही निघून गेले..

प्रज्ञाने आंघोळ आवरून स्वत: भाकरी बनवायचा घाट घातला.. भाकरी दिला जमत होत्या पण चुलीवरच्या भाकरी, पाट्यावर वाटलेली चटणी या गोष्टी तिने फक्त ऐकल्या होत्या.. पण आज गावाकडच्या गावरान वातावरणानं तिला प्रत्यक्ष अनुभव घ्यायची इच्छा झाली.. आणि दुसरं कारण सुयश. त्यालाही तिच्या हातचं रुचकर खायला विशेष आवडे.. कालचा स्वप्नवत वाटणारा अनुभव, त्याने दिलेली प्रेमाची कबुली, त्याच्या कुशीत हृदयाची जाणवलेली धडधड, त्याची तिच्याबद्दलची काळजी सारं सारं पुन्हा डोळ्यासमोर उभ ठाकलं.. सुयशला पाहण्याचा मोह आवरला नाही.. निरागस मनाचा तो झोपेतही तेवढाच निरागस दिसत होता.. त्यालाही कालचं आठवलं असणार स्वप्नात.. त्यामुळे झोपेतही तो खळीदार गालात खुदकन हसला.. तशी ती भानावर आली.. आणि दबक्या पावलांनी तिथून निघून गेली..

भाकरीच्या पीठाची उकड काढून घेतली.. ती थंड होईस्तोवर परसातील ताजी ताजी वांगी खुडली.. चुल पेटलेलीच होती.. कोळश्यावर छान भाजून त्यात मसाल्याचे जिन्नस टाकून पाट्यावर वाटून घेतली.. उकडलेलं पीठ चांगलं मळून भाकरी भाजायची तयारी केली... चुलीची सवय नव्हती त्यामुळे थोडी तारांबळ उडाली होती... केसांचा भार आपल्या डोक्यावर सांभाळत तिने चुलीतील लाकड्यांवर फुकणीने फुंकर मारली.. पण प्रयत्न तोकडे पडले.. चांगलाच धुर झाला.. डोळ्यांनाही झोंबू लागल्या.. डोळ्यातील पाणी टिपत पुन्हा प्रयत्न सुरु झाला..

" मॅडम, गावाकडची चुल आहे ही शहरातली शेगडी नव्हे.." मागून येत सुयश म्हणाला.. तिच्या बाजूला बसत त्याने फुंकणीने जोरात फुंकर मारली आणि चुल पेटवली...

" वा! रे सुयश.. तुला हे ही जमतं.. ऑलराऊण्डर आहेस.." डोळ्यातले पाणी टिपत ती म्हणाली..

" विसरलीस मामाचं गाव आहे माझ्या.. लहानपणी गमतीने करायचो सगळं.." चुलीत लाकडं ढकलत तो म्हणाला..

तिने हसून प्रतिउत्तर दिले आणि गोलाकार भाकरी गरम तव्यावर टाकली.. एका बाजूने चांगली भाजल्यावर दुसऱ्या बाजूने पलटली.. भाकरी मस्त टम्म फुगली..

" अरे वा! तुला सुद्धा जमतं की राव.. तु पण ऑलराऊण्डरच आहेस.. मला वाटलं की डब्ब्यातलं सगळं आई बनवते आणि तु मात्र स्वत: बनवल्याचे सांगतेस..." तिच्याकडे पाहत तो म्हणाला..

" शहाण्या तुझ्यासाठी सकाळी लवकर उठून मी बनवते आणि माझ्यावरच संशय.." भाकरी टोपलीत टाकत ती म्हणाली.

" माझ्यासाठी का करतेस गं एवढं...?" तो म्हणाला.

" रोज मला ऑफिसला सोडतोस.. माझ्यासाठी ड्रायव्हरचं काम करतोस मग एवढं तर करूच शकते ना मी ड्रायव्हरसाठी.." ती म्हणाली.

" खूप आतल्या गाठीची आहेस.. कधीच मनातलं सांगणार नाहीस.." म्हणत तो उठला आणि निघून जाऊ लागला.

" ए थांब ना सुयश.. रागावलास का..? सॉरी.." ती म्हणाली.

" ओहो म्हणजे बोलायची इच्छा आहे तर..आता तु सांगतेस म्हणून थांबतो.. बोल." बसत तो म्हणाला.

" अरे चुल विझेल म्हणून थांब.. बाकी काही नाही.." म्हणत ती हसली..

त्याने रागातच तिच्यावर कटाक्ष टाकला.. तोवर निलयचे आई बाबाही आले.. खूप सारे आंबे घेऊन..

" हे काय रे पोरांनो... भाकरी भाजताय का..? प्रज्ञा अगं मी बनविल्या असत्या तु का त्रास करून घेतलास.. चुलीचा धुर एवढा.. तुला सवय नाही ना.." आंब्याच्या पिशव्या बाजूला ठेवत सुयशच्या आई म्हणाल्या.

" नाही हो मावशी.. त्यात कसला त्रास.. मलाच आवडतं स्वयंपाक करायला म्हणून बनवलं.. आणि रोज तुम्हीच तर बनवता आज माझ्या हातचं खा.. आणि चुलीचं बोलाल तर सुयशनेच पेटवून दिली.. खूप कामाचा आहे पोरगा तुमचा.." त्याच्याकडे पाहून हसत ती म्हणाली..

" सुयश तु उठ पाहू.. आवरून घे.. मग गरम गरम न्हाहारी करुया.." त्याला उठवत निलयची आई म्हणाल्या..

सुयशही आवरायला आत निघून गेला.. भाकरी झाल्यानंतर सगळ्यांनी नाश्ता केला..

तिच्या हाताची चव त्यांनाही भुरळ घालून गेली.. तिचे तोंडभर कौतुक करत त्यांनी पोटभर न्हाहारी केली.. आता निघणं गरजेचं होतं.. सुयशने निलयच्या आईबाबांना कल्पना दिली.. जड अंत:करणाने त्यांनी मान्यता दिली.. निलयच्या आईने दोघांसाठी घरचे पापड, कुरडया, आंब्याचं लोणचं, मुरांबा आणि भरपूर आंबे दिले.. गोड भेट म्हणून.. 'पुन्हा लवकर या' ही गळ घालत भरल्या नेत्रांनी दोघांना निरोप दिला.. शेवटी परतीच प्रवास सुरु झाला.. तिच नागमोडी वळणं घेत... येतांना अगतिक झालेलं सुयशचं मन आता शांत झालं होत.. एवढ्या वर्षांचा भावनिक त्रास मुलाचं नातं जोडत त्याने कायमचा संपवला होता आणि त्याचबरोबर मैत्रीच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या त्याच्या मनाने प्रेमाची कबुली देत नव्या नात्याची नांदी केली होती...

प्रज्ञाही नि:शब्द होती.. निलयच्या आईवडिलांनी तिलाही मुलीची माया दिली होती.. आयुष्याच्या वळणावर एक सुंदर नातं तिलाही मिळालं होतं.. माया लावणारं.. आणि सुयशच्या प्रेमाची कबुली तिच्या अंतरंगीही प्रीतीच्या तारा छेडून गेली होती.. फक्त बुद्धी आणि मनाचा वाद तेवढा छळत होता तिला..

" प्रज्ञा, घरी काही प्रॉब्लेम होणार नाही ना..? बाबा काही बोलणार नाहीत ना..?" शांततेचा भंग करित तो म्हणाला.

" नाही.. बाबा समजुतदार आहेत.. आजीला सांगितलं होतं मी.. आणि बाबा समजुन घेत असल्याने आईचा प्रॉब्लेम नाही.. फक्त वाईट याचचं वाटतं की मी त्यांच्याशी खोटं बोलली..." सीटवर डोकं टेकवत ती म्हणाली..

" आणि ते ही माझ्यासाठी... का केलस असं..? ज्या बाबांपासून तु काहीच लपवित नाहीस त्यांच्याशी खोटं बोललीस.." तो म्हणाला.

" तुझ्यासाठी नाही केलं काहीच मी माझ्यासाठीच केलं..." ती कोड्यात बोलली.

" काय..?" न उलगडलेल्या कोड्याचं उत्तर विचारत तो म्हणाला..

" तुला नाही कळणार ते... आणि काय रे तुझ्या आईबाबांना कळलं की मी तुझ्यासोबत होती तर..?" ती म्हणाली.

" मग तर बरच होईल.. मला सांगायचं आहे तुझ्याविषयी घरी.." तो म्हणाला.

" सुयश, मी फक्त मैत्रीण आहे तुझी.. आपलं फक्त मैत्रीचं नातं आहे.." ती म्हणाली.

" हे तु कोणाला समजवत आहेस तुझ्याच मनाला ना..? खोटा समज काढायची चांगली कला अवगद आहे तुला.. आणि हो मी मैत्रीण म्हणूनच तुझी ओळख करून देणार आहे.." तिच्याकडे पाहत तो म्हणाला..

तशी ती पुन्हा शांत झाली.. कारण तिच्याकडे उत्तर नव्हतच ना... खरच तिची बुद्धी तिच्या मनाची समजुतच तर काढत होती.. तिच्या रंगाची शाश्वती देत..

विचारांच्या तंद्रीने ती थकली आणि डोळे मिटून स्वप्नाच्या जगात रमली.. या जगात रंगाला महत्त्व नव्हते फक्त मनाचा आनंद मोठा होता..

बघता बघता तिचा डोळा लागला.. एवढी कणखर अन् खंबीर ती झोपेत निरागस लेकरासारखी दिसत होती.. तिला सारखं पाहत राहण्याचा मोह आवरत नव्हता त्याचा.. प्रेमाची कबुली दिल्यानंतर तर ती त्याच्या हृदयाचा अविभाज्य भाग बनली होती...

पाच सहा तासांचा प्रवास दोघांनीही स्वप्नातच पार केला.. एकमेकांसोबत राहण्याचं स्वप्न.. फरक एवढाच की प्रज्ञा डोळे मिटून स्वप्न पाहत होती तर सुयश डोळे उघडे ठेवून..

जवळ जवळ दोन वाजले असतील.. ते मुंबईच्या जवळच होते.. दुपारचं जेवण बाहेरच करत त्यांनी पुन्हा घरचा रस्ता धरला.. जवळजवळ चार वाजले असतील घरी पोहचायला.. प्रज्ञाला तिच्या स्टॉपवर ड्रॉप करत सुयश घराकडे निघाला.. दोघांच्याही घरी कुणी काहीच आक्षेप घेतला नाही त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्यावर असलेला विश्वास.. घरी पोहचल्यावर प्रज्ञा फ्रेश झाली.. मैत्रिणीच्या आईने दिलय असं सांगत तिने सारा कोकणमेवा किचनमध्ये ठेवला.. तोवर संध्याकाळच्या चहाची वेळ झाली होती.. आईबाबांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देत तिने सुयशला पुन्हा झाकलं.. आजीला सगळं खरं सांगायला ती विसरली नाही.. पण सुयशची प्रेमाची कबुली हातच्याला राखत...

इकडे घरी आल्यावर सुयशही फ्रेश झाला.. प्रवासाचा थकवा असल्याने त्याने झोपेला प्राधान्य दिले.. जवळजवळ तासा दोन तासांनी तो उठला.. तो उठला आहे हा कानोसा घेत सरलाताईंनी कॉफी बनवली.. सुयशही खाली आला... आणि रामरावांच्या बाजूला जाऊन बसला..

" सुयश, असा अचानक का गेलास दापोलीला आणि ते ही इतक्या वर्षांनी.." रामराव म्हणाले.

" हो इतक्या वर्षांनी मैत्रीतील कर्तव्याची जाणीव झाली.." म्हणत त्याने सगळी हकिगत सांगितली.. त्याक्षणी त्याच्या आईबाबांना आपल्या लेकाचा अभिमान वाटला..

" सुयश खरी मैत्री निभावलीस बेटा.. आता न चुकता त्यांना भेट.. गरज आहे त्यांना तुझ्या सोबतीची... Proud of you beta.." रामराव म्हणाले.

" माझा लेक आता खरच मोठा झाला..." म्हणत सरलाताईंनीही मायेने त्याच्या डोक्यावर हात फिरवला..

" सुयश, परवा वैदेही येतेय... चार दिवस थांबणार आहे.. तशी हॉटेलवर बुकींग केली होती तिने पण मीच म्हंटल एवढं मोठं घर असतांना बाहेर कशाला.. चार दिवस बाबा तुझ्या रुममध्ये शिफ्ट होतील आणि वैदेही राहिल माझ्यासोबत.. एकमेकांना जाणून घ्या मग पुढचं ठरवू.. मला तर असं झालय कधी येतेय ती.." उत्साहीपणे सरलाताई म्हणत होत्या..

सरलाताईंच्या बोलण्याने सुयशचा चेहरा मात्र पार पडला.. अचानक डोळ्यासमोर प्रज्ञा येऊ लागली..

" सांगू का आईबाबांना प्रज्ञाविषयी..? पण काय सांगू..? ती तर हे नातच स्विकारायला तयार नाही.." सुयशची विचारांची तंद्री लागली..

" सुयश, तुझ्या मनात दुसरं कोणी आहे का..? तु खुश नाही दिसत.." रामराव म्हणाले..

बाबांच्या बोलण्याने सुयश भानावर आला..

" असं काही नाही बाबा पण.." तो म्हणाला.

" आता पण नाही आणि बिन नाही.. तुला माझी शप्पथ.. परवा किती वाजता येईल ते कळवेल ती.. तुझा नंबर घेतलाय कॉल करेल तुला.." सरलाताई म्हणाल्या..

नवं संकट त्यांच्या डगमगत्या नात्यासमोर दत्त म्हणून उभं होतं.. या संकटाशी दोन हात कसे करायचे हिच काय ती विवंचना कारण त्याची हिंमत असलेली प्रज्ञा त्याच्यासोबत असूनही नव्हती..

पूर्ण रात्र बैचेन अवस्थेत गेली.. एका बाजूला आईची शप्पथ तर दुसऱ्या बाजूला त्याचं प्रेम होतं... सकाळीही लवकरच आवरून तो स्टॉपवर पोहोचला.. प्रज्ञाला कॉल करून लवकर येण्याबाबत सांगितले.. प्रज्ञाचही लवकर आवरल्यामुळे तीही ऐरवी पेक्षा जरा लवकर निघाली..

" का रे काय झालं..? बरा आहेस ना.. लवकर का बोलवलस..?" गाडीत बसत ती म्हणाली..

" मंदिरात जायचं आहे.. चालेल ना.." तिला विचारत तो म्हणाला..

" हो नक्की... चालेल ना.." तिनेही होकार दिला..

मेन रस्तापासून अर्धा किलोमीटरवर असलेल्या गणपती मंदिरात ते पोहचले.. दर्शन घेऊन मंदिराबाहेर झाडाच्या चौथऱ्यावर येऊन बसले..

" प्रज्ञा, आईने एक स्थळ आणलय माझ्यासाठी... उद्या येतेय ती घरी चार दिवस राहण्यासाठी.. आई खूप उत्सुक आहे पण मला नाही करायचं लग्न तिच्यासोबत.."

त्याच्या बोलण्याने प्रज्ञाचं काळीज गलबललं... काल ज्याच्या स्वप्नात आपण हरवलो होतो ते खरचं स्वप्न होतं सत्य नाही.. मनाला समज देत ती थोडावेळ शांत बसली..

" मग कर ना लग्न... आईला पसंद आहे म्हणजे मुलगी चांगलीच असेल.." नजर चोरत प्रज्ञा म्हणाली..

" प्रज्ञा जे बोलायचं आहे ते नजरेला नजर देऊन बोल.. आणि लग्न मला करायचं आहे आईला नाही.. मला तु पसंद आहेस.. तुझ्यासोबत लग्न करायचं आहे मला.. प्रज्ञा हिच वेळ आहे .. आपल्या प्रेमाचा अंत नको पाहूस.. खूप सुंदर संवेदना आहे प्रेम तिला वेदनेचं रुप नको देऊस.. प्रेम म्हणजे श्रृंगार आहे जीवनाचा त्याला बंधन म्हणून नको स्विकारूस.. प्रेम जाणीव आहे मनाची गं त्या मनाला नको मारुस... रंगाच्या विश्वातुन बाहेर ये माझ्यासाठी तु सर्वात रुपवान आहेस... मला काय वाटतं हे सर्वात महत्त्वाचं आहे.. आणि मला तुच पसंद आहेस.. बाकी जगाशी मला काहीच करायचे नाही.. प्लिज या नात्याचा स्विकार कर.. एक चांगला मित्र आहे की नाही माहित नाही पण चांगला नवरा नक्की होऊन... मला हवी आहेस तु माझा अल्लडपणा सांभाळण्यासाठी, माझा अवखळपणा जपण्यासाठी, मला डोळ्यांत साठवण्यासाठी, म्हातारपणात माझी सोबत होण्यासाठी... विल यु मॅरी मी माय लव्ह..."

तिचा चेहरा आपल्याकडे वळवत सुयश म्हणाला..

पुन्हा मनाच्या भावना तिच्या डोळ्यात दाटल्या.. थोडा वेळ निरव शांततेत गेला..

" सुयश, माझं उत्तर कालही नाही होतं आणि आजही नाहीच आहे.. हो आहेस तु स्पेशल माझ्यासाठी.. पण लग्न... नाही.. मी नाही करू शकत लग्न तुझ्यासोबत.. आपली जोडी कधीच परफेक्ट नसेल.. माझ्या या राजकुमाराला एखादी राजकुमारीच शोभून दिसेल.. इंद्रधनुच्या सप्तरंगात काळा रंग नाही शोभत.. तुझं आयुष्यही असच सप्तरंगानी न्हाहून निघू दे...." मान मागे वळवत तिने डोळ्यातले अश्रू टिपले.. 

त्याचा हात हातात घेत ती त्याच्या जवळ सरकली आणि म्हणाली.

" सुयश मी तुझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि शेवटपर्यंत राहीन.. पण जोडीदाराचा भार नको टाकूस.. भेट त्या मुलीला.. जाणून घे तिला.. खूप नशीबवान असेल ती की तिला तुझ्यासारखा समजुतदार नवरा मिळेल.."

" प्रज्ञा, तुला अजून कळत नाहीये.. माझं सुख फक्त तुझ्यासोबत आहे.." तो अगतिकपणे म्हणाला..

" आणि माझं सुख तुझ्यापासून लांब राहण्यात आहे. माझी शप्पथ आहे तुला त्या मुलीला भेट.. घरी आपल्याविषयी काहीच सांगू नको." ती म्हणाली.

" किती विचार करशील माझा.. पण तुझ्या या विचारात माझं सुख मुळातच नाही.. तुझ्यासाठी भेटेन मी तिला.. तिच्याशी लग्नही करेन पण कधीच सुखात राहणार नाही.." म्हणत तो उठला आणि बाहेर पडत गाडीत जाऊन बसला..

त्याचे शब्द पुन्हा एकदा तिच्या जिव्हारी लागले.. तिने फक्त सुयशला दुखावले नव्हते तर त्याच्यामध्ये जिवंत असलेल्या प्रज्ञालाही संपवण्याचा प्रयत्न केला होता.. थोड्यावेळात ती ही बाहेर पडली.. आणि गाडीत येऊन बसली... आता दोघांमध्ये जिवंत होती ती अबोल शांतता.. सुयश काही बोलण्याच्या, ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.. प्रज्ञालाही पुन्हा त्याला अडकवायचे नव्हते.. ती तशीच शांत बसली.. रोजचा बोलका रस्ता आज अचानक अबोल झाला होता.. सुखात न्हाहून निघणाऱ्या त्यांच्या मैत्रीला त्यांच्याच प्रेमाची नजर लागली होती..

ऑफिसमधील पूर्ण दिवस एकमेकांच्या विचारातच गेला. ऑफिस सुटल्यावर प्रज्ञाने रेल्वेने जायचे ठरवले.. कंपनीच्या बसमधून रल्वेस्टेशनचा रस्ता धरला.. तोवर सुयश ही नेहमीच्या स्टॉपवर येऊन पोहचला.. थोडावेळ वाट पाहून त्याने प्रज्ञाला कॉल केला..

" सॉरी, सुयश घाईघाईत तुला सांगायचे विसरली.. आज ट्रेनने जातेय.. ट्रेनमधल्या मैत्रिणींनी हट्ट धरला आहे.." फोन उचलत ती म्हणाली.. खोटं बोलतांना शब्द काही सुचत नव्हते.

" आता कुठे आहेस..?" त्याने प्रश्न केला..

" स्टेशनला पोहचेन आता.." ती म्हणाली

" मग तिथेच स्टेशनबाहेर थांब..मी आलो लगेच.." तो म्हणाला आणि गाडी वळवली.

" अरे नको मी जाईन.." तिने प्रतिउत्तर दिले..

" आता आपल्या मैत्रीची शप्पथ आहे तुला बाहेर थांब मी आलोच.." थोड्या रागातच तो म्हणाला.

अगदीच अर्ध्या तासात त्याने स्टेशन गाठलं.. प्रज्ञा एका कोपऱ्यात उभी होती.. तो गाडीतून उतरला.. तिचा हात पकडत तिला गाडीपाशी घेऊन आला..

" अरे सुयश.. लोकं बघत आहेत.. येते मी.." ती सांगत होती पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता..

गाडीत बसवत त्याने गाडीचा वेग धरला.. मनात उठलेल्या रागाच्या वादळाला शांत करत तो थोडा शांत झाला.. त्याला एवढं रागावलेलं ती पहिल्यांदाच पाहत होती.. वर्दळीच्या भागातून बाहेर पडल्यावर एका शांत ठिकाणी त्याने गाडी थांबवली..

" प्रज्ञा, कोण समजतेस तु स्वत: ला..? का पाहतेस माझ्या प्रेमाचा अंत..? तुला नसेल वाटत माझ्याविषयी काही पण माझ्या भावना प्रांजल आहेत.. निदान त्याचा तरी आदर करावास. माझ्यापासून लांब पळून स्वत: ला सोडवशील पण माझं काय... प्रज्ञा प्लिज तु श्वास आहेस माझा.. जीव गुदमरतो तुझ्या अश्या वागण्याने.. तुला शब्द दिलाय मी त्या मुलीबरोबर लग्न करण्याचा पण जर तु सोबत असशील तर.. ही माझी गळ आहे.. तिला भेटतांना तु मला माझ्या सोबत हवीस.. मी एकटा का म्हणून सगळ्या वेदना स्विकारु.. मान्य असेल तर बोल नाहीतर मी आता येतो तुझ्या घरी बाबांकडे तुझा हात मागायला.." एका दमात तो सांगून मोकळा झाला.

" सुयश, ही कसली भलती अट.. सॉरी मला नाही जमणार.." ती म्हणाली.

" ठिक आहे मग मी आईला जाऊन सगळं खरं सांगतो.. आयुष्यभर असाच राहिन आणि असाच मरेन तुझ्यावर शेवटपर्यंत प्रेम करत.." तो म्हणाला.

" शांत हो आधी.. मरणाची भाषा पुन्हा बोलू नकोस.. ठिक आहे.. मी होईन तुझ्या आनंदात सहभागी.." ती म्हणाली.

" मग ठिक आहे.. उद्या संध्याकाळी ४ वाजता पोहचणार आहे ती.. सोबत रिसिव्ह करायला जाऊ तिला.." गाडी स्टार्ट करत तो म्हणाला.

" सुयश.. प्लिज माझं ऐक तरी.." ती अगतिकपणे म्हणाली.

" आता काहिच बोलू नकोस.. तुला मला सुखात पाहायचे आहे ना मग तु सोबत हवीस.." म्हणत त्याने म्युझिक सिस्टम ऑन केली..

प्रज्ञा भरल्या नजरेने त्याच्याकडे बघण्याशिवाय काहीच करू शकत नव्हती..

( रोज लिहिणे शक्य होत नाही त्यामुळे प्रत्येक भाग दोन भागांच्या बरोबरीचा ठरेल एवढा लिहिण्याचा नक्की प्रयत्न करते.. प्रिय वाचकवर्गाने कृपया ही बाब समजून घ्यावी..)

क्रमश:

******************************************

लिखाणात चुका आढळल्यास क्षमस्व