Login

रंग माळियेला...( भाग २० वा)

Love story of Pradnya and Suyash.... Exploring new horizon of love beyond the colour...

#रंग माळियेला..( भाग २० वा)

©® आर्या पाटील

सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे

*******************************************

वैदेही सोबत एका अनोळखी तरुणाला पाहून प्रज्ञा अवाक् झाली...

" प्रज्ञा, हा अभिनव वैदेहीचा होणारा नवरा..." प्रज्ञाचा हात घट्ट पकडत सुयश म्हणाला.

" काय...? पण हे कसं शक्य आहे..?" विस्मयाने प्रज्ञा म्हणाली.

" प्रेम अशक्य ही शक्य करतं गं... आता तुझं माझ्या सोबत असणं हे तरी कुठे शक्य होतं पण... पण आपण एकत्र आहोत.." तो म्हणाला आणि तिला वैदेहीजवळ घेऊन गेला.

" प्रज्ञा... आय अॅम सो सॉरी.. आम्ही खूप अंत बघितला तुझा.. काय करणार तु ही काही कमी नाहीस.. माझ्या मित्राला चांगलच छळलस.." वैदेही प्रज्ञाला आलिंगन देत म्हणाली.

" मीट माय लव्ह, माय लाइफ, माय वर्ल्ड.. अभिनव.. आणि अभिनव ही प्रज्ञा..लव्ह, लाइफ अॅण्ड वर्ल्ड ऑफ सुयश.." म्हणत वैदेहीने अभिनव आणि प्रज्ञाची ओळख करून दिली..

सारच स्वप्नाप्रमाणे वाटत होतं प्रज्ञाला.. अगदी काही क्षणापूर्वी सारं संपल असतांना पुन्हा नव्याने आयुष्य लाभल्यासारखे वाटले.. दूर दूर जातांना दिसणारा सुयश आता तिच्या सोबत होता.. ज्या प्रेमाशिवाय आपण अपूर्ण होतो ते प्रेम स्विकारायला आपण का हिंमत दाखवली नाही यासाठी स्वत: ला दोष देत राहायचं की आपलं प्रेम आपल्याला परत मिळालं म्हणून देवाचे आभार मानायचे काहीच कळत नव्हतं.. मात्र रंग आणि रुप यांना डावलून, बुद्धिच्या वलयातून बाहेर पडत तिने मनाच्या बाजूने कौल दिला आणि आपल्या मनाच्या आभाळावर सुयशच्या प्रेमाचं इंद्रधनु सजू दिलं. या साऱ्यात वैदेही लख्ख सूर्यप्रकाश बनून आली..

थोडा वेळ पार्टीत घालवल्यानंतर सुयश प्रज्ञाला घेऊन बाहेर पडला.. फॉर्म हाऊसच्या दुसऱ्या बाजूला स्विमिंग पूलच्या दिशेने घेऊन गेला.. तिथे कॅण्डेलाइट डेटची सोय त्याने आधीच केली होती..

" सुयश, तुला खात्री होती माझ्या होकाराची.." सारं न्हाहाळत प्रज्ञा म्हणाली.

" हो.. खात्री तर होती.. कारण माझा माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास होता..." तिला बसण्यासाठी खुर्ची बाजुला करत तो म्हणाला.

" तिथे खाली बसायचं का...?" स्विमिंग पूलकडे बोट करत ती म्हणाली.

" मी पाण्याला घाबरतो बुवा.. तुला सांभाळायला लागेल.." हसत तो म्हणाला.

" मग त्या दिवशी कुठे गेली तुझी भीती..?" त्याचा हात पकडत काठावर विसावत प्रज्ञा म्हणाली.

" त्या दिवशी पाण्यापेक्षा तु लांब जाशील याची भीती जास्त वाटली.." तिच्या बाजूला बसत तो म्हणाला.

" वैदेहीचं कोड अजून सुटलं नाही रे..?" त्याच्याकडे पाहत ती म्हणाली.

" वैदेही.. शी इज एन्जल.. तिच्यामुळे तु माझ्याजवळ आहेस.. अगं त्या दिवशी रात्री तिचा कॉल आला आणि तिने अभिनव विषयी सगळं सांगितलं.. उच्च शिक्षित असूनही पार्ट टाइम जॉब करून NGO चालविणारा, समाजसेवेचा वसा घेतलेला अभिनव तिच्या घरच्यांना पसंद नव्हता.. समाजसेवेचा नाद सोड आणि चांगली नोकरी कर तरच वैदेही सोबत लग्न लावून देऊ या तिच्या आईवडिलांच्या मागणीला त्याने समाजसेवा आधी...माझं NGO आधी मग माझा संसार म्हणत त्याने चपराक मारली. मग काय तिच्या आईवडिलांना तिच्या लग्नाचा घाट घातला..पण तिचं पक्क ठरलं होतं लग्न करणार तर अभिनव सोबतच.. आईवडिलांच्या रोजच्या तगाद्याला कंटाळून तिने मला भेटायला होकार दिला.. मग मी ही माझी व्यथा मांडली.. मग तिनेच कल्पना दिली तुझ्या तोंडून प्रेम कबूल करून घेण्याची.. अगदी एयर पोर्टपासून ते पार्टीपर्यंत सगळं प्री प्लॅन होतं.. एवढंच काय पण आजीलाही मी कल्पना दिली याची.. कॅफेमध्ये तुला ताटकळत ठेवून आम्ही अभिनवलाच भेटायला गेलो होतो.. तुला आतून असह्य पाहून त्रास होत होता पण प्रेम मिळविण्यासाठी हे करावच लागणार होतं ना... सॉरी प्रज्ञा.. बट आम्ही जे केलं ते फक्त आणि फक्त प्रेमासाठी.." तिचा हात हातात घेत तो म्हणाला.

" पण मग तुझ्या आणि तिच्या आईवडिलांच्या भावनांच काय..? त्यांच्या भावना दुखावल्या जातील असे नाही का वाटले तुम्हांला..?" तिने प्रश्न केला.

" आईवडिलांना आपल्या मुलांच सुख हवं असतं.. पण कधीकधी ते कशात आहे हे नाही कळत त्यांना.. मग अश्या वेळेस बंड करण्यापेक्षा त्यांच्या कलेने ते समजून घेणे आणि आपलं सुख कशात आहे हे पटवून देणे जास्त योग्य असे मला वाटते.. उद्याच आम्ही वैदेहीच्या आईवडिलांना भेटायचे ठरवले आहे.. उज्वल भविष्यापेक्षा सुखी भविष्य जास्त महत्त्वाचे आहे हे पटवून द्यायला.. उद्या संध्याकाळी ते येणार आहेत इकडे.. म्हणजे वैदेहीनेच बोलावून घेतलय.." पटवून देत सुयश म्हणाला.

" तुझ्या आईवडिलांच काय..?" ती म्हणाली.

" त्यांना मी त्यादिवशीच तुझ्याविषयी सांगणार होतो पण तुच कबुल नव्हती करत तुझ्या मनातल्या भावना.. मग कसला आधार घेऊन मी सांगू त्यांना..? पण आता शुअर आहे.. वैदेहीच्या आईबाबांना समजवल्यावर आईबाबांना सांगणार आपल्या नात्याविषयी.. आणि मला खात्री आहे ते समजून घेतील.."

" सॉरी सुयश, मी खूप त्रास दिला तुला.. मन आणि बुद्धीचा गुंता घालत ना स्वत: खुश राहिले ना तुला ठेवले.. पण जेव्हा वैदेहीच्या जोडीला तुला पाहिले तुटले आतून.. तुझ्याशिवाय अर्थशून्य बनलय माझं जग..." ती म्हणाली.

" मी तरी कुठे माझा राहिलोय.. तुझं जग हेच आता माझं आयुष्य झालय.. तुझ्यासाठी चंद्र तारे नाही आणून देऊ शकत पण पौर्णिमेचा चंद्र बनून नेहमीच तुझ्या सोबत राहिन... तुझ्यासाठी मरायची तयारी नसेल किंबहुना तुझ्यासोबत भरभरून जगेन... सात जन्माचं माहित नाही पण या जन्मी तुझी अखंड सावली होईन.. कविता नाही करता येत मला पण माझ्या प्रत्येक श्वासांच्या ओळीत तुला लिहेन.. मी खूप मोठा प्रेमवीर नाही आहे पण तुझा सखा, सोबती, वाटाड्या बनून नेहमीच तुझ्यासोबत असेन..." बोलता बोलता त्या निळ्याशार पाण्याच्या काठावर तो तिच्या मांडीवर विसावला... तिचा चेहरा न्हाहाळत..

त्यांचं असं वागणं, तिला पाहणं अगदिच स्वप्नातीत होतं.. हवहवस आणि तेवढंच स्त्रीत्व खुलवणारं.. लाज म्हणजे स्त्रीचा दागिना.. आणि तोच दागिना तिला खुलवित होता..

" तुला लाजताही येतं... प्रज्ञा खूप सुंदर दिसत आहेस... अगदी पावसाच्या पहिल्या वर्षावात भिजलेल्या धरेसारखी.. आणि हे तुझं अस लाजणं घायाळ करतय गं.." तिच्याकडे एकटक पाहत तो म्हणाला.

" सुयश, मी स्वप्नात तर नाही ना..?" अलगद त्याच्या केसांवर हात फिरवीत प्रज्ञा म्हणाली.

" मलाही असेच वाटते गं....." डोळे मिटत तो म्हणाला..

" येऊ का आम्ही..? डिस्टर्ब नाही ना होणार तुम्हांला..?" मागून येत वैदेही म्हणाली.. सोबत अभिनव ही होता..

दोघं उठून उभे राहिले..

" थँक यु मित्रा.. तुझ्यामुळे वैदेही माझ्या सोबत आहे..." सुयशला आलिंगन देत अभिनव म्हणाला.

" प्रज्ञा मॅडम, तुमच्या विषयी खूप काही सांगितलं सुयशने.. काय नाव सांगितलं त्या मुलीचं.. कमला.. बरोबर ना.. तिला आमच्या NGO मार्फत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देऊयात.. आणि तुमची इच्छा असल्यास तुम्ही ही आम्हांला जॉईन होऊ शकता.." अभिनव म्हणाला.

" नक्कीच.. आवडेल मला तुमच्यासोबत काम करायला.. आणि कमलासाठी मनपूर्वक धन्यवाद.." प्रज्ञा म्हणाली..

तोच प्रज्ञाचा फोन वाजला.. बॅगेतून काढत तिने रिसिव्ह केला..

" हॅलो प्रज्ञा, कुठे आहेस बेटा..? रात्रीचे आठ वाजले.. घरी किती वाजेपर्यंत पोहचशील..?" प्रज्ञाचे बाबा फोनवर बोलत होते.

" हा बाबा.. आता निघतोच आम्ही.. पोहचू तासाभरात.." ती बाजूला जात म्हणाली.

" ठीक आहे मी वाट पाहतो..." म्हणत त्यांनी फोन ठेवला..

पुन्हा त्यांच्या जवळ जात प्रज्ञाने निघायची तयारी केली..

" खूप उशीर झालाय.. बाबा काळजी करत आहेत.. निघावं लागेल.." सुयशकडे पाहत ती म्हणाली.

" हो हो निघूया लगेच.. अभिनव भेटू उद्या.. तोपर्यंत तुझी अमानत आम्ही सांभाळतो.." सुयश म्हणाला.

" अच्छा ठिक आहे.. सांभाळून जा.." म्हणत त्यानेही वैदेहीला निरोप दिला.

गाडीजवळ पोहचल्यावर वैदेही स्वत:हून मागे बसली आणि प्रज्ञाला पुढे बसू दिले..

अगदी तासाभरातच ते प्रज्ञाच्या घराजवळ पोहचले. विश्वासराव अंगणात येरझाऱ्या घालत जागेच होते..

"प्रज्ञा थांब मी येतो जोडीला.." सीट बेल्ट काढत सुयश म्हणाला.

" वेडा आहेस का..? बाबांना तु सोबत होता हे नसेल सांगितले आजीने.." बॅग घेत ती म्हणाली.

" मग थांब मी येते.." म्हणत वैदेही गाडीबाहेर आली..

प्रज्ञाला येतांना पाहून विश्वासरावांचा जीव भांड्यात पडला..

" काका, मी वैदेही.. प्रज्ञाची मैत्रीण.. उशीर झाला त्याबद्दल सॉरी.." वैदेही म्हणाली.

" बेटा सॉरी नको म्हणू.. रात्र खूप झाली आहे म्हणून काळजी वाटली.. दुसरं काही नाही.." विश्वासराव म्हणाले.

" ठिक आहे मग येते मी.. गुड नाइट प्रज्ञा, गुड नाइट काका.." म्हणत तिने निरोप घेतला..

" बाबा, सॉरी.. एवढा उशीर नव्हता करायला पाहिजे.." मान खाली घालत प्रज्ञा म्हणाली.

" ठिक आहे गं.. कधीतरी चालतं.. मित्रमैत्रिणींसोबत पार्टी करायला माझा विरोध नाही.. फक्त वेळेचं बंधन पाळावस एवढच.." विश्वासराव म्हणाले.

" तुझ्याशी बोलायचं होतं.. थकली नसशील तर थोडा वेळ बस.." खुर्चीवर बसत विश्वासराव म्हणाले.

" बाबा बोलाना.. नाही झोप आली मला.." म्हणत ती बाजूच्या खुर्चीत बसली.

" गाडीत सुयश होताना..?" करडी नजर टाकत विश्वासराव म्हणाले.

तशी ती चाचपली.. पण सत्याला सोबत घेत तिने सगळं सांगून टाकलं.

" हो बाबा.. सुयश होता.." ती दबक्या स्वरात म्हणाली.

" प्रज्ञा, मी फक्त तुझा बाबा नाही.. वेळोवेळी तुझा चांगला मित्र बनण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच मैत्रीच्या नात्याने विचारतो.. तुमच्यामध्ये मैत्री आहे की त्यापलिकडलं काही..?" विश्वासराव स्पष्टपणे म्हणाले.

प्रज्ञा काहीवेळ तशीच बसून राहिली.. पण निर्धार पक्का होता..

" बाबा.. जीवनात अनेक चढ उतार पाहिले.. माझा रंग नेहमीच सावली बनून माझ्या पाठीशी असायचा.. लहानपणी मैत्री करण्यापासून ते आता लग्न जमवतांनाही.. रंगाचा विळखा एवढा काही घट्ट होऊन बसला होता की माझी बुद्धीही बदल स्विकारायला तयार नव्हती.. मनाचं सौंदर्य फक्त बोलायला चांगलं वाटतं पण चेहर्‍याचं सौंदर्य जगण्यासाठी आवश्यक असतं अशीच काही मनोधारणा झालेली असतांना सुयश बदल बनून आला आयुष्यात.. मैत्रीपासून सुरु झालेला आमचा प्रवास प्रेमाच्या थांब्यावर कधी येऊन पोहचला कळलेच नाही.. मला रंगाच्या गुंत्यातुन सोडवत माझा रंग वेगळा आहे याची जाणिव करून दिली.. आनंदाची नांदी ठरत तो आयुष्यात आला आणि आयुष्यच होऊन गेला.." म्हणत तिने प्रेमाची कबुली दिली.

" ठिक आहे.. जाऊन झोप.. उद्या बोलू या विषयावर." म्हणत विश्वासरावांनी मोर्चा घरात वळवला..

फ्रेश होऊन प्रज्ञाही झोपायला निघून गेली.. पण झोपही लागत नव्हती.. सुयश बरोबर घालवलेल्या गोड आठवणी मनाच्या आसमंतात उधळल्या गेल्या होत्या.. सुयशचंही हेच झालं होतं.. प्रज्ञाने दिलेली प्रेमाची कबुली त्याला सुखावून जात होती.. तिच्या सोबत सुखी संसाराची स्वप्ने रंगवण्यात त्याच मन गुंतलं होतं.. आता कोणाचीच आणि कशाचीच पर्वा नव्हती..

सकाळी झाली.. बागेतली ताजी फुलं देवघरात आणून देत तिने आजीला मिठी मारली.. न सांगता आजीलाही सारं काही कळलं.. आज फक्त बागेतील फुलांच्याच नव्हे तर फुलाप्रमाणे खुललेल्या प्रज्ञाच्या साक्षीने आजीने देवपूजा केली..

"वक्रतुंडा.. सगळं निर्वघ्न पार पाड रे.." आजीने मनोभावे विनवणी केली.

आवरून प्रज्ञा ऑफिससाठी निघाली..

" प्रज्ञा, सुयशला भेटायचं आहे मला.. त्याला वेळ असेल तेव्हा बोलव घरी.." बाहेर पेपर वाचत बसलेले विश्वासराव म्हणाले.

तिने मानेनेच होकार दिला आणि शंका आशंकांचे जाळे विणत ती गाडीपाशी पोहचली.. तिच्या चेहर्‍यावरचे भाव सुयशने बरोबर हेरले..

" बाबांनी तुला भेटायला बोलावले आहे." ती म्हणाली.

" खूप छान प्रज्ञा..तुझ्या याच गोष्टीवर तर मी मनापासून प्रेम करतो. आपल्या माणसांपासून तु कोणतीच गोष्ट लपवित नाहीस.. चांगल केलंस.. उद्या सुट्टी आहे.. सकाळी येतो मी.." सुयश म्हणाला.

" मला भीती वाटते रे.. बाबा काय बोलतील..?" ती म्हणाली.

" भीती मला वाटायला हवी.. लेक एवढी भयानक आहे मग तिचे बाबा कसे असतील...?" तो हसत म्हणाला.

" अजूनही तुला मस्करीच सुचते.. इथे विचार करून माझा जीव बेजार झाला आहे.." त्याला मारत प्रज्ञा म्हणाली..

" मी आहे ना.. काळजी नको करूस.. होईल सगळं व्यवस्थित.." म्हणत त्याने तिला धीर दिला.

" वैदेहीचं काय..? तिचे आईबाबा कधी येत आहेत..?" तिने विचारले.

" पोहचतील चार पर्यंत फॉर्मवर.. मी येतो चार वाजता तुला रिसीव्ह करायला.. मग निघुया.." तो म्हणाला.

" आय थिंग माझं तिथे असणं योग्य होणार नाही.. अफ्टरऑल मी एक परकी व्यक्ती आहे.." विचार करत तिने मत मांडले.

" त्यांच्यासाठी तु परकी असशील.. माझ्यासाठी माझी हिंमत आहेस.. आणि मला तुझी गरज आहे.." त्यानेही समर्पक उत्तर दिले.

" बरं बाबा.. ये चार वाजता.. माझी नोकरी घालवूनच चैन पडेल तुला.." ती म्हणाली.

थोड्याच वेळात ऑफिसही आले आणि ती निघून गेली..

जेमतेम दिवस भरून चार वाजता सुयश ऑफिसमधून निघाला.. प्रज्ञाला सोबत घेत तो फॉर्म हाऊसवर पोहचला. वैदेहीचे आईबाबा एव्हाना तिथे आले होते..

अभिनव आणि वैदेही त्यांची मनधरणी करण्यात गुंतले होते..

" नमस्कार, काका काकू मी सुयश.. मला जास्त काही कळत नाही पण मी हे खात्रीपूर्वक सांगू शकतो की अभिनव हा वैदेही साठी सुयोग्य आहे.. तो तिला सुखात ठेवेल.." सुयश हात जोडत म्हणाला.

" वा..! म्हणजे ज्याच्यासोबत वैदेहीचं लग्न व्हावं अशी आमची इच्छा होती तोच हे सांगतो.." वैदेहीचे बाबा म्हणाले.

" आणि फक्त प्रेम करून भागत नाही.. उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक बाजूही मजबूत असावी लागते.. लोकांनी विचारलं जावई काय करतो..? किती कमावतो..? मग काय उत्तर द्यायचं.. आमचा जावई समाजसेवा करतो म्हणून..आणि संसार काय माझी लेक चालवेल का..? तिचा पगार अभिनव पेक्षा दुप्पट आहे.. कोणीही वेलसेटल मुलगा मिळेल तिला.." तिची आई रोषातच म्हणाली.

त्यांच बोलणं ऐकून प्रज्ञा पुढे आली..

" काकु, लहान तोंडी मोठा घास घेते माफ करा.. तसं आपलं काहिच नातं नाही पण वैदेही माझी चांगली मैत्रीण आहे त्याच नात्याने बोलते.. स्त्री पुरुष समानता हा बडेजाव मिरवतांना आपण स्त्रिया किती समाधानी असतो नाही..सगळ्याच ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीने चालायचा मानस असतो आपला आणि तो योग्यही आहे.. मग लग्न करतांना ही बरोबरी का विसरतो आपण.. मुलगा मुलीपेक्षा जास्त शिकलेलाच हवा.. त्याचा पगार मुलीपेक्षा जास्तच हवा.. तो वेलसेटल हवा.. संसाराचा गाढा एकट्याने पेलणारा हवा.. लग्नानंतर मुली त्यांच्या आवडी जोपासू शकतात पण मुलांनी मात्र जबाबदारीनेच वागायचं.. आहे अभिनवला समाजसेवेची आवड.. ती प्रत्येक सामान्य व्यक्तीत नसते.. NGO चालवणं म्हणजे कमीपणा नाही ना.. आणि संसाराचा आर्थिक कारभार वैदेही उचलू शकतेच.. फक्त मुलानेच तो उचलावा असे काही आहे का..? काकू, ते एकमेकांची हिंमत आहेत..त्या हिंमतीला नका तोडू.. एकमेंकाशिवाय ते कधीच आनंदी राहणार नाहीत.. वेल सेटल मुलासोबत लग्न करून वैदेहीला काही कमी पडणार नाही पण ती समाधानी कधीच नसेल.. प्लिज तुमच्या लेकीच्या सुखाला नका नाकारू.. मुलगी म्हणून विनंती करते.." प्रज्ञा तिच्या आईच्या जवळ जात म्हणाली.

वैदेहीचे आईवडिल शांत झाले.. प्रज्ञाचा प्रत्येक शब्द त्यांच्या आभाळाएवढ्या अपेक्षांना क्षणात जमिनदोस्त करून गेले.. आपली चूक त्यांना कळली.. अभिनवची माफी मागत त्यांनी त्यांच्या लग्नाला होकार दिला..

" सुयश, तुझ्या आईची कशी माफी मागू कळत नाही.." वैदेहीची आई म्हणाली.

" त्याची काही गरज नाही काकू..तुम्ही कोणताच गुन्हा केलेला नाही.." सुयशने त्यांची समजूत काढली.

" तरी पण त्यांना आमच्याकडून सॉरी सांग.." त्या म्हणाल्या.

" आता मात्र आई मला माफ करणार नाही.. तुम्हांला घरी नेलं नाही तर.. माझी विनंती आहे.. घरी चला.. आणि बोलून एकमेकांतील समज, गैरसमज दूर करा.. प्लिज." सुयशने त्यांना विनंती केली..

त्यांचा नाइलाज झाला.. शेवटी अभिनवला निरोप देऊन ते सुयशच्या घरी निघाले.. प्रज्ञाला तिच्या स्टॉपला उतरवत त्यांनी पुढचा रस्ता धरला..

वैदेहीच्या आईवडिलांना असे अचानक पाहून सुयशचे आईवडिल आश्चर्यचकित झाले.. फ्रेश झाल्यानंतर त्यांनी घडलेली सारी हकिगत सुयशच्या आईवडिलांना सांगितली.. सुयशच्या आईची तर पार रयाच गेली.. त्यांच्या स्वप्नांचे इमले क्षणात जमिनदोस्त झाले. ज्या मुलीला मनोमन सुन मानले होते ती क्षणात परकी झाली.. पण त्या समंजस होत्या.. घडलेली घटना त्यांनी सबुरीने घेतली.. आपल्या मैत्रीणीचा योग्य पाहुणचार करत त्यांचे आदरातिथ्य केले.. सकाळी परतीच्या मार्गावर निघतांना वैदेही भावनिक झाली..

" काकु, खूप प्रेम दिलं तुम्ही दोन दिवसांत.. तुम्हांला भावनिक त्रास दिला त्याबद्दल सॉरी.." गळ्यात पडत वैदेही म्हणाली.

" नाही गं बेटा.. लेकीचा आईला त्रास होतो का कधी..? सुन नाही पण मुलगी तर मिळाली की गोड.. येत जा अधूनमधून.." म्हणत सरलाताईंनी तिला गोड निरोप दिला..

जाणाऱ्या त्यांच्या गाडीकडे पाहून सरलाताईंनी डोळे टिपले..

" ये आई, अशी कशी गं तु..." त्यांना जवळ घेत सुयश म्हणाला. आणि घरात आला..

वैदेहीच्या नव्या आयुष्याची घडी बसविण्यात त्यांना यश आले होते पण स्वत: च्या प्रेमाची पूर्ती अजून बाकी होते.

क्रमश:

*******************************************

लिखाणात चुका आढळल्यास क्षमस्व..

🎭 Series Post

View all