# रंग माळियेला...( भाग २१ वा)
©® आर्या पाटील
सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.
*******************************************
वैदेही गेली आणि सोबत सरलाताईंच्या स्वप्नांचा बंगलाही जमिनदोस्त झाला..खिन्नपणे त्या बागेतील झोपाळ्यावर बसून राहिल्या सुयशच्या सुखी संसाराचा हिंदोळा झुलवत.. रामरावांच्या नजरेतून त्यांच दु:ख सुटलं नाही.. त्यांच्या शेजारी बसत रामरावांनी धीर दिला...
" सरला, उगा उदास नको होऊस.. माझ्या मते तु धीराने घ्यावे.. आजची पिढी ही आपल्या पिढीपेक्षा जास्त समजुतदार आहे.. त्यांना त्यांचे निर्णय घेऊ दे.. त्यातच त्यांच सुख आहे.." हातात हात घेत रामराव म्हणाले..
सरलाताईंनी होकारार्थी मान हलवली.. तोच सुयशही समोर येऊन उभा राहिला..
" आईबाबा मला बोलायचं होतं तुम्हां दोघांशी..." दबक्या आवाजात सुयश म्हणाला..
" आम्हांलाही जाणून घ्यायचं आहे.. तुझ्याही मनात नक्की काय आहे.." रामराव उठले आणि सुयशच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले.
" आई बाबा..प्रेम ही भावना आहे जी आपसुकच जडते.. प्रेम म्हणजे आपल्या मनाचा खराखुरा आरसा.. आपण जसे आहोत तसे स्विकारलो जातो.. समोरच्या व्यक्तीला आपण आहे तसे स्विकारतो..अगदी वैदेही आणि अभिनवच्या नात्यासारखे.. प्रेम हे रंग, रुप, पैसा, जात, धर्म साऱ्या साऱ्याच्या पलिकडचं असतं..प्रेमाला फक्त हृदयाची भाषा कळते.. बुद्धी जोडीला असते पण निर्णय सर्वस्वी मनाचा असतो..नेहमीच निर्णय बरोबर असतोच असे नाही.. पण नेहमीच चुकीचाही नसतो.." सुयश सारच कोड्यात बोलत होता..
" सुयश, जे आहे ते स्पष्ट सांग.. उगा जीव टांगणीला लावू नकोस.." सरलाताई म्हणाल्या.
" आई, माझं प्रेम आहे एका मुलीवर.. प्रज्ञावर.." जवळ बसत त्याने प्रज्ञाविषयी, तिच्या घरच्यांविषयी माहिती दिली..
थोडावेळ शांततेत गेला..
" मग हे तु आम्हांला आधीच का नाही सांगितलस..?" रामरावांनी शंका काढली..
" कारण, याआधी प्रज्ञाकडून काहीच प्रतिक्रिया नव्हती.. तिचही प्रेम होतं माझ्यावर. पण तिला कळत नव्हतं.. स्वत: चा गुंता स्वत: चं वाढवून ठेवला होता तिने.." सुयशने उत्तर दिले..
" का.. तु आवडला नव्हतास का तिला..? की आणखी दुसरं कारण.." सरलाताई म्हणाल्या.
" नाही गं.. तिच्यामते मी तिच्यापेक्षा सुंदर आहे.. मला माझ्यासारखी गोरीगोमटी साथीदार मिळावी.." सुयशने सगळेच खरे सांगितले.
" म्हणजे...? ती सुंदर नाही.. गोरीगोमटी साथीदार हवी याचा अर्थ ती.." सरलाताई म्हणाल्या.
" हो आई ती रंगाने डावी आहे पण रुपाने उजवी गं.. हो आहे ती सावळी पण नाकी डोळा रुबाबदार आहे.. माझ्या मते दिसणं महत्त्वाचं नाही.. प्रसंगात तिचं आपल्या सोबत खंबीरपणे असणं महत्त्वाचं.. मला काहीच प्रॉब्लेम नाही तिच्या रंगाचा.. मी तिच्यावर प्रेम केलय.. तिच्या त्याच रंगावर प्रेम केलय..आयुष्यात ती असेल तर रंगांची उधळण होईल गं रोजच.. ती तुमची सुन नाही लेक बनूनच या घरात येईल.. आई, तुझ्या डोक्यातून सौंदर्य म्हणजे फक्त गोरा रंग ही व्याख्या काढून टाक.. आणि प्रज्ञाला आहे त्या रंगासह स्विकार.. यातच माझं सुख आहे.." सरलाताईंचे हात हातात घेत सुयश म्हणाला.
क्षणात ते हात बाजूला झटकत सरलाताई आवेगात उभ्या राहिल्या.
" सुयश, काय बोलतोस कळतय का..? दोन महिन्यांपूर्वी याच गोष्टीवरून मी किती सुनावले त्या वधुवर मंडळवालीला आणि आज तुच माझ्या मनाविरुद्ध वागतोस.. नाही मी हे कदापी शक्य होऊ देणार नाही.. अरे किती सुंदर आहेस तु.. मला तुझ्यापेक्षा सुंदर सुन हवी आहे. आहो तुम्ही तर समजावा याला.. काय बोलतोय हा..? रामरावांजवळ जात सरलाताई म्हणाल्या.
" आई, मी सावळा असतो तर काय केलं असतं गं.. गोरीच सुन शोधली असतीस का..?" प्रतिप्रश्न करत सुयश म्हणाला.
" म्हणजे काय... प्रश्नच नाही..जरी सावळा असतास तरी रूबाबदार असतास तु.. आणि सावळा मुलगा चालतो..कोणतीही सुंदर मुलगी तुझ्यासोबत लग्नासाठी तयार झाली असती.." सरलाताई म्हणाल्या.
" मुलगा सावळा चालतो.. मग मुलगी का नाही..? प्रज्ञाही सावळी आहे पण रुबाबदार आहे.." पेचात पकडत सुयश म्हणाला.
" मुलगा मुलगी फरक आहे सुयश.. पूर्वापार चालत आलेला.." आवाज वाढवत त्या म्हणाल्या.
" पण आपण नाही करायचा हा फरक.. आई तु खूप हळवी आहेस, माझ्या लग्नाच्या बाबतीत तुझ्या खूप अपेक्षा आहेत.. पण माझं सुख प्रज्ञासोबत लग्न करण्यातच आहे.. तिच्याशिवाय मी कधीच सुखी नसेन.. बाकी निर्णय तुमचा.." निरवानिरवीची भाषा बोलून सुयश रुममध्ये निघून गेला.
सरलाताई पुरत्या कोलमडल्या.. मघाशी जमिनदोस्त झालेल्या त्यांच्या अपेक्षांच्या बंगल्याला सुयशने त्याच्या मनातल्या इच्छेने आग लावली जणू... रामराव मात्र शांत होते..
" आहो, असा का बोलतोय हा..? याला माझ्या इच्छा अपेक्षा समजत नाहीत का.? त्या दिवशी निलमताईंना नको नको ते बोलली मी.. ती बाई तोंडात शेण घालेल माझ्या.." डोक्याला हात लावत सरलाताई म्हणाल्या.
" तु शांत हो आधी.. आणि सरला लग्न तुला नाही सुयशला करायचे आहे.. विचार त्याच्या अपेक्षांचा करायला हवा.. एका परक्या बाईसाठी आपण आपल्या मुलाच्या सुखाआड येणे चुकीचे आहे.. माझ्यापेक्षा तु जास्त ओळखतेस आपल्या लेकाला.. किती हळवा आहे तो.. आपण नकार दिला तर मन मारून जगेल पण आपल्याविरुद्ध जाणार नाही.. आणि माझ्या मतेही रंगापेक्षा गुण जास्त महत्वाचे.. लेकासाठी, त्याच्या सुखासाठी आपल्याला हे मान्य करावं लागेल गं.." समजावत रामराव म्हणाले..
कितीही झालं तरी आईचं मन होतं ते..मुलाच्या सुखापेक्षा आणखी काहीच महत्त्वाचे नव्हते..रंगाचा मोह आवरत त्यांनी सुयशच्या बाजूने कौल दिला..
सुयशचा आनंद गगनात मावत नव्हता..
" सुयश, प्रज्ञाला घरी घेऊन ये.. खूप ऐकलं वैदेहीकडून तिच्याविषयी.. आणि लग्नाविषयी काय निर्णय घेतलाय तुम्ही..? तिच्या आईवडिलांशी बोलायला तसं.." सुयशची आई म्हणाली.
" आई, आज तिच्या बाबांनी भेटायला बोलावले आहे.. आधी मी भेटून घेतो मग बोलूया लग्नाविषयी.." तयारी करत सुयश म्हणाला..
" आम्ही पण येऊ का..? एका दगडात दोन पक्षी.." सरलाताई म्हणाल्या.
" अगं, सरला त्याला भेटून येऊ दे.. मग आपण भेटूया त्यांना.." रामराव विषय सांभाळत म्हणाले..
सुयशने सुटकेचा नि:श्वास टाकला.. मनात धाकधुक होतीच.. काय विचारतील प्रज्ञाचे बाबा..? समजून घेतील ना..? असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या जीवाची अगतिकता वाढवत होते..
नाश्तापाणी आवरून सुयश प्रज्ञाकडे निघाला. सकाळचे ११ वाजले असतील.. विलासरावांना आधीच कल्पना दिली होती प्रज्ञाने त्यामुळे ते ही तयारीनिशी वाट पाहत होते.. शालिनीताईंना कल्पना असल्याने त्याही काळजीत होत्या. सरु आजींनी सकाळीच गणरायाला साकडं घातलं होतं.. प्रज्ञा तशी खंबीर होती पण तिच्याही आयुष्याचा प्रश्न होता.. तोच बाहेर गाडी पार्क करून सुयश आत आला.. विलासरावांनी स्मितहास्याने त्याचे स्वागत केले.. शालिनीताईही पाणी घेऊन बाहेर आल्या..
सुयशची ओळख करून देत प्रज्ञा आईसोबत आत स्वयंपाकघरात निघून गेली.. इशाऱ्यानेच त्याला गुड लक देत.. सुयशनेही इशाऱ्यानेच तिला थांबण्यासाठी सांगितले..
" मिस्टर. सुयश घाबरू नका..मी खाणार नाही तुम्हांला.." ते म्हणाले..
सुयशने स्मितहास्य देत त्यांना प्रतिउत्तर दिले जणू..
" शालिनी, आम्हीं आहोत बाहेर..." कोणीही न येण्याचे संकेत देत विलासराव सुयशला घेऊन बाहेर गेले..
" सुयश, प्रज्ञा वेगळी आहे सगळ्यांपेक्षा.. लहानपणापासून रंगाच्या शाळेत तिला रोजच शिक्षा व्हायची.. लहानपणापासून ते लग्नाच्या वयापर्यंत तिच्या मनाचं सौंदर्य नेहमीच दुर्लक्षित राहिलं आहे.. लग्न जमवतांना जवळजवळ दहा स्थळांनी तिला रंगावरून नाकारले आहे.. अशावेळेस तिला तुटतांना जवळून पाहिलं आहे.. माझ्याकडून रंगाचा वारसा घेऊन जन्मलेल्या माझ्या लेकीचा हा रंग अभिशाप बनून नेहमीच तिला छळत राहिला.. तुमच्या प्रेमाविषयी तिने कल्पना दिली.. पण बाप म्हणून मला खात्री हवी आहे.." विलासराव म्हणाले.
" बाबा, रंगरूपापेक्षा मनाचं सौंदर्य श्रेष्ठ असतं असं म्हणतात..मनाचं सौंदर्य श्रेष्ठ असतच पण त्याचबरोबर रंगरूपही महत्त्वाचे आहे..आणि मी तुमच्या लेकीच्या या वेगळ्या रंगावर, या सावळ्या रुपावर प्रेम केलं आहे.. त्यामुळे ते कधीच संपणार नाही..मनाने ती सौंदर्यवती आहेच पण माझ्या नजरेत ती रुपवतीही आहे.तिला आयुष्यभर कधीच एकटं पडू देणार नाही ही शाश्वती नक्कीच देईन.." अगदी मोजक्या शब्दांत त्याने आपले विचार मांडले..
विलासराव त्याच्याकडे पाहतच राहिले.
" सुयश, आता याच्या पुढे काय ठरवलं आहे तुम्ही.. स्पष्टच बोलतो.. लग्नाविषयी घरी सांगितलं आहे का..?" विलासराव म्हणाले.
" बाबा, माझ्या आईबाबांना सगळी कल्पना दिली आहे मी.. ते लवकरच तुमच्याशी बोलतील...." सुयश म्हणाला.
" तुम्ही दोघं बोलला आहात ना लग्नाविषयी..?" विलासराव म्हणाले.
" अजून तरी नाही.. पण लवकरच बोलू.. तुमची परवानगी असेल तर उदया संध्याकाळी आम्ही भेटलो तर चालेल का..?" सुयश हळूच म्हणाला.
विलासराव थोडा वेळ शांत राहिले..
" ठिक आहे मिस्टर सुयश.. तुम्ही घ्या बोलून.. मग आम्ही भेटतो.." विलासराव म्हणाले.
" बाबा, अजून एक रिक्वेस्ट होती..मला फक्त सुयश म्हणाल तर जास्त आनंद होईल.. तुमचा मुलगा बनण्याचा प्रयत्न नक्कीच करेन.." सुयश मनापासून म्हणाला.
" शालिनी, आपल्या लेकासाठी चहा नाश्ता आणणार आहेस की नाही..?" विलासराव जोर्यात म्हणाले..
सुयशचा आनंद गगनात मावत नव्हता.. खुर्चीवरून उठत सुयशने विलासरावांना नमस्कार केला.. तेवढ्यात शालिनीताईही आल्या.. सुयशने त्यांनाही नमस्कार केला..
नविन नात्याची सुंदर नांदी शालिनीताईंना सुखावून गेली.. एका आईला आणखी काय हवे..?
पहिल्याच भेटीत सुयशने दोघांनाही जिंकले.. तिघेही मनमुराद गप्पा मारू लागले..
" प्रज्ञाला पाठवून दे.. म्हणावं सुयशला घर दाखव.." विलासराव चहाचा घोट घेत म्हणाले..
प्रज्ञा दाराआडून सगळ्याचा मागमूस घेत तिथेच उभी होती.. विलासरावांच्या तोंडून नाव घेण्याची खोटी की ती समोर हजर झाली..
" प्रज्ञा, सुयशला घर दाखव.. आईला सुद्धा भेटायचं आहे त्याला.." विलासराव म्हणाले.
प्रज्ञाने होकारार्थी मान हलवली आणि सुयशला इशारा केला.
सारच कसं स्वप्नातीत वाटत होतं.. प्रज्ञाची प्रेमाची कबुली, दोघांच्या आईवडिलांचा होकार सारं सारं मिळालं होतं.. मनाने तर ते बांधले गेलेच होते आता वेळ होती सप्तपदीने सात जन्म एकमेकांना सोबत द्यायची.. त्या दिशेने प्रवासही सुरु झाला होता..
रोज एकमेकांशी भरभरून बोलणारे ते दोघे आज शांत होते.. प्रज्ञाने पहिला मोर्चा देवघराकडे वळवला..
डोळे मिटून देवदर्शन घेणाऱ्या सुयशकडे कितीतरी वेळ पाहत होती ती.. अगदीच नजर ओवाळून टाकत.. समईतील तेजाचा अंश त्याच्या चेहऱ्यावर चकाकत होता जणू..
" खूप छान देवघर आहे गं प्रज्ञा.. आजीने सजवलय का..?" डोळे उघडत सुयश म्हणाला.
प्रज्ञा मात्र अजूनही त्याच्याकडेच पाहत होती.. भाळलेल्या नजरेने..
" प्रज्ञा..." तिला स्पर्शत तो म्हणाला.
त्याच्या स्पर्शाने ती पटकन भानावर आली..
" प्रज्ञा, मी स्वप्नात नाही ना गं.. किती सोनेरी क्षण आहेत हे.. तुझं माझ्या सोबत असणं.." तिचा हात हातात घेत तो म्हणाला.
" स्वप्न नाही सत्यच आहे.. आपण माझ्या घरी आहोत.." त्याच्या हातातला आपला हात सोडवत प्रज्ञा म्हणाली..
आजीच्या खोलीत जात त्यांनी त्यांची भेट घेतली. सुयशच्या सहवासात खुललेला प्रज्ञाचा चेहरा पाहून आजींना समाधान होत होते... सुख म्हणजे हेच असतं.. याची अनुभूती साऱ्यांनाच येत होती..सगळ्यांच मन जपणाऱ्या प्रज्ञाला तिचं मन जपणारा जोडीदार मिळाला होता.. सुखाची,आनंदाची उधळण झाली होती जणू..
" ही माझी रुम.." म्हणत प्रज्ञाने त्याला तिच्या रुममध्ये नेले..
" छान आहे गं.. खूपच सुंदर सजवली आहेस.."
रुममध्ये सजवलेल्या साऱ्या वस्तू न्हाहाळत सुयश म्हणाला..
" ही माझी आवडती जागा.. हिरवं निसर्ग न्हाहाळायला आवडतो या खिडकीतून.." खिडकीचा पडदा सरकावत प्रज्ञा म्हणाली.
"आणि ही माझी आवडती जागा.. या चेहर्यावरचं सौंदर्य न्हाहाळायला मलाही आवडतं.." तिच्या अगदिच जवळ जात तो म्हणाला..
त्याच्या जवळ येण्याने तिच्या हृदयाची स्पंदने वाढली..
" सुयश... आपण माझ्या घरात आहोत.." डोळे मिटत ती म्हणाली..
" हे माझंही घर होणार आहे आता.." म्हणत त्याने तिच्या कपाळावर स्पर्शखूण दिली..
त्याच्या शब्दांनी तिच्या हृदयाला भावनेची भरती आली तर त्याच्या स्पर्शाने तिच्या बंद डोळ्यातून भावना अश्रू बनून वाहून गेल्या.. डोळ्यातला थेंब आपल्या बोटांनी टिपत त्याने तिचे डोळे पुसले..
" खूप नशिबवान आहे मी सुयश.." त्याच्या कुशीत शिरत ती म्हणाली..
" आणि मी ही.." म्हणत त्याने त्याच्या बाहुपाशात तिला समावून घेतले..
प्रेमाचा, भावनांचा, आनंदाचा सुंदर मिलाप होता तो..
तोच सुयशचा फोन वाजला. फोनच्या आवाजाने भानावर येत दोघे बाजूला झाले.. रामरावांचा फोन होता..
" हा बाबा.. सगळं व्यवस्थित पार पडलं.. निघतोच आता. पोहचेन अर्धा तासात.." म्हणत त्याने फोन ठेवला.
" प्रज्ञा, मला निघावं लागेल.. उद्या भेटतोय आपण.. बाबांची परवानगी काढली आहे मी..पत्ता पाठवेन उद्या चार वाजेपर्यत पोहच.." सुयश म्हणाला.
" आणि ते कशाला..?" प्रज्ञा म्हणाली.
" हाव अ पेशन्स्.. सरप्राइज आहे.. उद्यापासून आपल्या आयुष्यात फक्त आनंदी आनंदच असेल.." सुयश म्हणाला.
प्रज्ञाही हसली.. आणि दोघेही रूमबाहेर पडले.
प्रज्ञाच्या आईवडिलांचा निरोप घेऊन सुयश घराबाहेर निघाला.. तो घराबाहेर पडायला आणि निलमताईंनी त्याला पहायला एकच वेळ झाली.. वधुवर मंडळ चालविणाऱ्या त्याच त्या निलमताई ज्यांनी प्रज्ञाचं स्थळ सुयशच्या आईला सुचविलं होतं.. आणि सुयशच्या आईने प्रज्ञाच्या रंगावरून निलमताईंचा चांगलाच पानउतारा केला होता.. सुयशला त्यांनी एका नजरेत ओळखलं.. त्याच्या आईने केलेला अपमान कानात गुंजू लागला.. भानगड नक्की काय आहे या विचारातच त्या वधूवर मंडळाच्या ऑफिसमध्ये पोहचल्या.. बराचवेळ विचार केल्यानंतर त्यांनी सुयशच्या आईला फोन लावला..
" हॅलो, सरलाताई मी निलम बोलतेय.. अभिनंदन सुयशचं लग्न जमल्याच कळलं.." निलमताई म्हणाल्या.
" धन्यवाद..शेवटी मुलाच्या आनंदापुढे सगळच गोड मानावं लागतं.." सरलाताई म्हणाल्या.
" प्रज्ञा चांगली मुलगी आहे.. घरात लक्ष्मीच्या पावलांनी येईल.." अंदाज बांधत निलमताई म्हणाल्या.
" तुम्हांला सगळी माहिती कळाली वाटतं.." सरलाताईंनी विचारणा केली.
" कळणारच ना.. वधुवरमंडळ चालवतो आम्ही.. पण ज्या स्थळाला नाकारत माझा एवढा अपमान केला त्याच स्थळाला होकार कसा दिला तुम्ही..?" दुधात मीठाचा खडा टाकत निलमताई म्हणाल्या.
" काय सांगता..? आहो ताई मला काहीच कल्पना नाही की ती हीच मुलगी होती.. पण माझ्या मुलासाठी तयार झाले मी लग्नाला.. तुम्हांला फार बोलले मी त्यादिवशी.. खरच मला माफ करा." माफी मागत सरलाताई म्हणाल्या.
" ठिक आहे ताई.. अभिनंदन.." म्हणत निलमताईनी फोन ठेवला..
सरलाताईंचे अभिनंदन केले खरे पण मन मात्र अपमानाच्या राज्यात रमलं होतं..
" ज्या स्थळासाठी माझा एवढा अपमान केला आज तिथेच लग्न जमवता.. किती त्रास झाला मला.. माझ्या वधुवर मंडळाची किती बदनामी केली चारचौघांत.. एक सॉरी बोलून माझी इज्जत मला परत मिळणार नाही.. आता मी ही बघते यांच कसं लग्न होतं ते.." मनाशी पक्का निर्धार करत निलमताई म्हणाल्या.
क्रमश:
©® आर्या पाटील
******************************************
लिखाणात चुका आढळल्यास क्षमस्व..