# रंग माळियेला...(भाग२२वा)
©® आर्या पाटील
सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक आहे..
*******************************************
दोन्ही घरातील वडिलधार्यांनी संमती दिली होती.. औपचारिकता म्हणून एकमेकांना भेटायचे तेवढे बाकी होते..तत्पूर्वी प्रज्ञाला आगळ्या पद्धतीने लग्नाची मागणी घालायचा घाट सुयशने घातला होता.. जवळच असलेल्या छोटेखानी फार्म हाऊसवर सरप्राइजची तयारी केली होती.. अगदीच फिल्मी स्टाइलमध्ये मागणी घालायची होती त्याला प्रज्ञाला.. शेवटी त्या राजकुमाराच्या स्वप्नात येणारी राजकन्या त्याला मिळाली होती.. प्रेम जिंकलं होतं त्याचं.. आयुष्यभर सोबत देणारी, प्रसंगी त्याची ताकद बनणारी, त्याच्या आईवडिलांना जीव लावणारी आणि सगळ्यात महत्त्वाचे उत्तम व्यक्ती असलेली प्रज्ञा त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनणार होती.. कधी एकदाची रात्र सरते आणि स्वप्नपूर्ती करणारा नवा दिवस उजाडतो असे काहिसे झाले होते त्याला..
प्रज्ञाही सुखावली होती.. आयुष्यभरातील सगळ्या वेदनांचा अंत घेऊन सुयश नवसंजिवनी बनून तिच्या आयुष्यात आला आणि तिचा होऊन गेला.. उपरी सौंदर्याच्या बाजारात त्याने प्रज्ञाला तिच्या मूळ रंगासह अन् रुपासह आनंदाने स्विकारले होते.. यातच सगळं आलं होतं.. प्रेम म्हणजे आणखीन वेगळं ते काय..? तिलाही प्रतिक्षा होतीच उद्याच्या नविन प्रहराची.. हा नविन प्रहर तिच्या सावळ्या आयुष्यात प्रेमाचा, सुखाचा सोनेरी बहर घेऊन येणार होता..
घरातही आनंदी आनंद होता..
" शेवटी,गणरायाला सगळं कळतं.. सुयश प्रज्ञाच्या आयुष्यात उत्साहाचा झरा घेऊन आला आहे.." शालिनीताई विलासरावांना म्हणाल्या..
" खरच, प्रज्ञा नशिबवान आहे.. खूप चांगला मुलगा जोडीदार म्हणून मिळणार आहे तिला.." विलासरावांनीही होकार भरला..
इकडे सरु आजीही आनंदात होत्या.
" गजानना, हे लग्न तेवढं निर्विघ्न पार पडू दे.. अष्टविनायकांचं दर्शन घेईन.." साकडं घालत आजी म्हणाल्या.
सुयशच्या घरीही सगळेच खुश होते..
" सरला, प्रज्ञा लक्ष्मीच्या पावलांनी येईल बघ घरी.. मायेने घराला नव्याने घरपण देईल.." रामराव म्हणाले.
" तिला न पाहता, न भेटता एवढ्या विश्वासाने कसे बोलता हो..?" शंका काढत सरलाताई म्हणाल्या.
" तुझ्या लेकाच्या वागण्यातील बदलच सगळं सांगून जातो.. एरवी आपला वाढदिवस आणि तो ही आपल्या लग्नाचा लक्षात तरी असायचा का पठ्ठयाच्या.. पण यावेळेस केक, दोघांसाठी कपडे सगळं आणलं त्याने.. हे का त्यांन केलं?... नाही गं या सगळ्याच्या मागे नक्की प्रज्ञा असेल.." हसत रामराव म्हणाले.
" खरं आहे हो.. मला पण क्रित्येक दिवस तो बदललेला जाणवायचा.. या मागचं कारण प्रज्ञा होती हे मात्र नव्हतं कळलं.. कधी एकदाचं दोघांच लग्न होतं आणि सुखी संसाराला सुरवात होते असं झालं आहे...." सरलाताई म्हणाल्या..
सुयशलाही आपल्याच घरात करमेना..
पण नियम म्हणजे नियम.. घरी असल्यावर वेळ घरच्यांसोबत घालवायचा.. कॉल, व्हॉट्सअप मेसेजेस फक्त अत्यावश्यक वेळी..त्यामुळे सध्यातरी तिला स्वप्नातच भेटावं लागणार होतं..
गोड आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत भविष्यातील स्वप्नांचा उंच झोका घेत तो निद्राधीन झाला..
सकाळ झाली ती भेटीच्या आतुरतेने.. रविवार असल्याने सगळचं उशीरा सुरु होतं.. बराच वेळ अंथरुणात पडूनही डोक्यातून प्रज्ञा काही जात नव्हती..
इकडे प्रज्ञाला मात्र कधीच जाग आली होती..
आजी उठायच्या आत देवपूजा करत तिने देवघर उजळून काढलं होतं.. रांगोळीची आरास मनाला प्रसन्न करत होती.. प्रज्ञासोबतच तुलशी वृंदावनालाही आज रुपडं आलं होतं जणू..
देवघर पाहून आजी भलत्याच खुश झाल्या.. सकाळचा नाश्ताही प्रज्ञानेच बनवला होता.. एव्हाना विलासरावही मार्निंग वॉकवरून परतले.. आवरून झाल्यावर छोटेखानी बागेत झोपाळ्यावर बसत दोघा बापलेकीने चहाचा आस्वाद घेतला .. सोबत गप्पांची मेजवानी होतीच..प्रज्ञाचा खुललेला चेहरा बापाला सुखावून जात होता..
चहा, नाश्ता झाल्यावर दुपारच्या जेवणाची धुराही प्रज्ञाने सांभाळायची ठरवली होती.. अर्थात शालिनीताईंच्या मदतीने..
अगदीच अकरा वाजले असतील. तोच दारावरची बेल वाजली.. पेपर वाचत बसलेले विलासराव दरवाजा उघडण्यासाठी सरसावले..
" येऊ का आत..? शालिनीताई आहेत का..?" आत प्रवेश करत निलमताई म्हणाल्या..
" हो या ना निलमताई.. आज कसं येणं केलं..?" दरवाजा बंद करत विलासराव म्हणाले.
" तुम्ही आधी शालिनीताईंना बोलवा.. खूप चांगलं स्थळ घेवून आली आहे आपल्या प्रज्ञासाठी.." सोफ्यावर बसत निलमताई म्हणाल्या..
एव्हाना त्यांचा आवाज शालिनीताईंपर्यंत पोहचला होता..
बाहेर येत त्यांनी निलमताईंचे स्वागत केले..
" त्याची काही गरज नाही ताई. प्रज्ञाचं लग्न जवळजवळ ठरल्यातच जमा आहे." शालिनीताई म्हणाल्या.
" अरे वा..! गोड बातमी द्यायला आले आणि मलाच गोड बातमी दिली तुम्ही.. कुठे जमतय प्रज्ञाचं?..." आडगावला जात निलमताई म्हणाल्या..
भाबड्या मनाच्या शालिनीताईंनी सुयशविषयी सांगायला सुरवात केली..
" काय..? कोण म्हणालीस..? सुयश... सुयश माने का..?" निलमताई म्हणाल्या.
" हो, तुम्ही ओळखता का..?" विलासराव म्हणाले.
" नुसती ओळखत नाही तर खूप चांगली ओळखते.. आहो शालिनीताई तीन महिन्यापूर्वी मी प्रज्ञाचं स्थळ घेऊन यांच्याच कडे गेले होते.. सरलाताईंनी म्हणजेच सुयशच्या आईने किती पान उतारा केला माझा.. म्हणे अशी काळी मुलगी माझ्या गोर्यागोमट्या मुलाला दाखवता.. किती बोलत होत्या त्या प्रज्ञाच्या रंगावरून. एवढच कशाला पण तेव्हा सुयश ही मला नको नको ते बोलला.. आताच्या आता फोटो घेऊन चालत्या व्हा.. अश्या शब्दात माझा अपमान केला.. त्याचे वडिलही मूग गिळून गप्प होते.. आणि आज त्याच घरी प्रज्ञाचं लग्न ठरलयं.. लग्न जमलय म्हणून सद्भाग्य मानायचे की या घरात लग्न जमलय म्हणून दुर्भाग्य बोलायचं कळत नाही.. पण एक गोष्ट मात्र खरी ती बाई खूप आतल्या गाठीची आहे.. प्रज्ञाला तिच्या रंगासह स्विकारेल ही शाश्वती कमीच आहे.." दुधात मीठाचा खडा टाकत निलमताई म्हणाल्या.
" तुमचा काही गैरसमज झाला असेल.. सुयश चांगला मुलगा आहे." शालिनीताई म्हणाल्या.
" हे केस काय नुसतेच पिकलेत?.. एकवेळ सोनार सोन्याची पारख करायला चुकेल पण ही निलम माणसांची पारख बरोबर करते.. एवढा सुंदर पोरगा आणि तुमच्या सावळ्या पोरीला होकार देतो.. शंका नाही आली का तुम्हांला..? त्याला एकशे एक अप्सरा मिळतील मग प्रज्ञाच का..? मला तर वाटतय तिची गडगंज पगाराची नोकरी बघून पाणी सुटलं असेल तोंडाला.. सरला हिचा मनापासून स्विकार करणे शक्यच नाही..लग्न करेल आणि देईल सोडून वाऱ्यावर.." निलमताई म्हणाल्या.
" निलमताई शब्द आवरा.. सोडून द्यायला आमची पोरगी रस्त्यावर पडली नाही.." ओरडत विलासराव म्हणाले.
" शांत व्हा भाऊ, आपले घरचे संबंध आहेत.. तुमच्या पदरी जे पडलं ते पोरीच्या आयुष्यात नको.. त्यावेळीस माझ्याच आईने शालिनीताईंसोबत दुसरं लग्न लावून दिल तुमच.." विलासरावांच्या जखमेवरची खपली काढत निलमताई म्हणाल्या.
" निलमताई, आता नको त्या जुन्या आठवणी.." विलासरावांना सावरत शालिनीताई म्हणाल्या.
" आहो, आठवणी कितीही कटू असतील तरी त्यातील वास्तव थोडच नाकारता येतं.. फक्त जे भाऊंच्या बाबतीत घडलं ते प्रज्ञाच्या बाबतीत नको एवढीच भाबड्या मनाची इच्छा.. बाकी योग्य तो निर्णय घ्यायला तुम्ही समर्थ आहात.." म्हणत निलमताई उठल्या आणि शंकेचं बी विलासरावांच्या घायाळ मनावर पेरून निघून गेल्य..
विलासराव पुरते अस्वस्थ झाले.. रुमकडे जात त्यांनी स्वत: ला आत बंद करून घेतले... भूतकाळाची बोचरी आठवण मनाच्या हिंदोळ्यावर झुलू लागली..
" आई, काय झालं बाबांना.." मघापासून स्वयंपाकघरात असलेली प्रज्ञा बाहेर येत म्हणाली..
शालिनीताईंनी बाहेर घडलेलं रामायण सविस्तरपणे प्रज्ञासमोर मांडलं.
" प्रज्ञा, तुझ्या बाबांची मी दुसरी पत्नी. पहिली पत्नी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना सोडून कायमची माहेरी निघून गेली.. तिला तुझे सावळ्या वर्णाचे बाबा पसंद नव्हते.. चांगली नोकरी आणि पिढीजात श्रीमंती म्हणून घरच्यांनी जबरदस्तीने लग्न लावून दिले सांगत तिने घटस्फोट घेतला... अगदी रितीरिवाजात, खाणदानी पद्धतीने लग्न करून घरात आणलेली सुन आपल्या लेकाला सोडून जाते हा धक्का तुझे आजोबा पचवू शकले नाहीत.. हृदयविकाराच्या झटक्याने ते गेले.. तुझे बाबा मानसिकरित्या पूर्णपणे कोलमडले..आई फार धीराच्या म्हणून यांना वेळीच यातून बाहेर काढले.. पण गेलेली इज्जत त्यांना स्वस्थ बसू देईना..
" हा काळा मग गोरी पोरगी कसा संसार करणार याच्यासोबत..? पायरी ओळखून वागावं माणसाने.." म्हणत लोकं हिणवू लागली..
त्यांनी आत्महत्तेचा निश्चय पक्का केला होता पण फक्त आईसाठी म्हणून अस्तित्ववजा जीवन जगू लागले. एका वधूवर मंडळातून आमचं लग्न जमलं.. खर तर माझं नशिबच म्हणून हे मला मिळाले.. तिने फक्त रंग बघितला पण लाखमोलाच्या माणसाची पारख नाही करू शकली ती.." डोळ्यांना पदर लावत शालिनीताई म्हणाल्या..
बाबांच्या हास्यामागे एवढ्या वेदना दडल्या आहेत हे आज पहिल्यांदाच प्रज्ञाला कळत होतं.. ती पुरती हादरली.. आपसुकच पाय त्यांच्या रुमकडे वळले..
" बाबा, दरवाजा उघडा पाहू..तुम्हांला माझी शपथ आहे." प्रज्ञा म्हणाली..
अगदी क्षणभरात विलासरावांनी दरवाजा उघडला..
" बाबा, तुम्ही ठिक आहात ना..?" गळ्यात पडत प्रज्ञा म्हणाली..
मघापासून दाबून धरलेला आवंढा सुटला.. आणि एक खंबीर बाप ओक्साबोक्सी रडू लागला..
" प्रज्ञा, माझ्याबाबतीत जे घडून गेलय तेच तुझ्या नशिबी वाढून ठेवलेलं नसेल ना..? नाही अजिबात नाही.. मी हे होऊ देणार नाही. बेटा.. मला एक वचन हवं आहे.. घे माझी शपथ आणि मला वचन दे.." विलासराव रडून म्हणत होते..
त्यांना एवढं अगतिक तिने आज पहिल्यांदाच पाहिलं होतं.. बापाच्या अश्रूंसमोर तिला सगळच नगण्य वाटत होतं..
" हो बाबा बोला.. तुम्ही सांगाल ते आणि तसच होईल.." त्यांचा हात हातात घेत प्रज्ञा म्हणाली.
" बेटा, सुयशला विसरून जा.. ती माणसं तुला कधीच स्विकारणार नाहीत.. आज तुला न भेटता ते लग्नाला तयार झालेत उद्या लग्न मोडायलाही तयार असतील.. माझा भूतकाळ तुझा भविष्यकाळ नको ठरायला.. या बापाची हात जोडून विनंती आहे तुला.. विसर सुयशला.. तीन महिन्यांचा सहवास विसरता येईल गं पण आयुष्यभराचं दु: ख नाही विसरता येणार.. मला वचन दे.. तु त्याला विसरशील.. मला वचन दे पाहू.." म्हणत त्यांनी छातीला हात लावला..
" बाबा, तुम्ही ठिक आहात ना..? काय होतय तुम्हाला..? मी वचन देते.. सुयशला कायमचं आयुष्यातून काढून टाकेन.. नाही लग्न करणार त्याच्यासोबत.." हृदयावर दगड ठेवत ती म्हणाली..
पण ते ऐकण्याआधीच विलासराव बेशुद्धावस्थेत गेले.. तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.. सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे कळताच प्रज्ञा पूर्णपणे कोसळली.. संबंध दिवस हास्पिटलमध्येच गेला..
एव्हाना संध्याकाळचे चार वाजले असतील.. विलासराव शुद्धीवर आले..
" एकावेळी एकाच जणाने भेटा.. त्यांना त्रास होईल असं काही बोलू नका.." डॉक्टरांनी घरच्यांना समज दिली..
होकारार्थी मान हलवत प्रज्ञा आत गेली.. प्रज्ञाला पाहून विलासरावांना अश्रू अनावर झाले..
" बाबा, शांत व्हा पाहू. सुयश हा विषय माझ्यासाठी कायमचा संपला.. मला फक्त तुम्ही हवे आहात.. अगदी हसते खेळते.." म्हणत तिने विलासरावांना शाश्वती दिली..
त्यांनीही होकारार्थी मान हलवली..
एव्हाना सुयशची भेटीची वेळ टळून गेली होती. त्याचे पन्नास मिस्ड कॉल झाले असतील..
शेवटी प्रज्ञाने निर्धार केला.. तासाभरात येते सांगून ती हॉस्पिटल बाहेर पडली आणि त्या फॉर्महाऊसकडे निघाली..
डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते.. आज नशिबाने पुन्हा एकदा तिच्याकडे पाठ फिरवली होती.. सुख पुन्हा एकदा हुलकावणी देऊन रुसून बसले होते. सुयश शिवाय ती अपूर्ण होती आणि विलासरावांशिवाय अस्तित्वशून्य.. शेवटी प्रेमाला हरवत तिने कर्तव्याला स्विकारले.. आतून तुटलेली ती चेहर्याने मात्र खंबीर होती.. काय सांगणार होती ती..? काय बोलणार होती ती..? मनात भावनांचे वादळ झेलत ती नाव सागरापासून कायमचं विभक्त व्हायला निघाली होती..
फॉर्महाऊसवर पोहचताच स्वर्गात आल्याचा भास झाला जणू.. तिला पाहताच काळ्या कोटातील रुबाबदार सुयश तिच्या दिशेने सरसावला..
" आय लव्ह यु प्रज्ञा..
"तु माझा आभाळ आहेस..
माझ्या भावनांची सुंदर माळ आहेस
तु माझा श्वास आहेस
मनाच्या कोंदणाची तुच आस आहेस
माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात
माझी बनून राहशील का..?
लडिवाळ हट्ट हा माझा प्रिये
सातजन्म माझी होशील का..?'
हातातला गुलाबाचा बुके पुढ्यात धरत सुयश म्हणाला..
मघापासून लपवलेली अगतिकता खंबीर मनाला हळवी करून गेली आणि ती पुन्हा एकदा हरली..
बसल्या जागी त्याच्या कुशीत शिरत ती आसवांनी चिंब झाली.. तिचे असे वागणे त्याला संभ्रमात टाकत होते..
" प्रज्ञा, काय झालं.." तो बोलणार तेवढ्यात तिने त्याच्या तोंडावर हात ठेवत त्याला गप्प केले..
त्याचा चेहरा आपल्या ओंजळीत पकडत कपाळावर स्पर्शखूण दिली..
" सुयश, यापुढे आपले मार्ग वेगळे.. तुला माझी शपथ आहे.. मला कायमचं विसरून जायचं.. आपण कधी भेटलोच नव्हतो एवढच लक्षात ठेवायचं.. अगदी आठवणीतही एकमेकांना जागा द्यायची नाही.." डोळे पुसत ती म्हणाली..
" प्रज्ञा तु ठिक आहेस ना.. अगं काय बोलतेस तु.." तिला उठवत तो म्हणाला..
" मी एकदम ठिक आहे.." म्हणत तिने घडलेली सारी हकिगत इतंभूतपणे त्याला सांगितली..
" हे शक्यच नाही.. माझी आई अजिबात असं वागणार नाही.. हो तिला गोरी सून हवी होती पण म्हणून लग्नानंतर ती तुला मुळीच नाकारणार नाही.." सुयश म्हणाला..
" म्हणजे तुला हे सगळं माहित होतं..? माझा फोटो बघून तेव्हा मला नाकारलसं मग माझ्याचं प्रेमात पडत तुला काय साध्य करायचे होते..?" प्रज्ञा विस्मयाने म्हणाली..
विषयाला वेगळं वळण मिळायला सुरवात झाली होती..
" हे साफ चुकीचं आहे प्रज्ञा.. मी तुझा फोटो नव्हता पाहिला.." तो म्हणाला.
" म्हणजे मी काळी आहे म्हणून फोटो पाहावासाही नाही वाटला तुला..? न पाहताच नकार कळवलास.." प्रज्ञा म्हणाली.
" असं अजिबात नाही गं. आईचा पारा चढला होता.. त्याक्षणी ती मला जास्त महत्त्वाची वाटली.." उत्तर देत सुयश म्हणाला.
" आणि आता मला माझे बाबा जास्त महत्त्वाचे वाटतात.. यापुढे तुझा माझा संबंध संपला.. माझ्याशी, माझ्या घरच्यांशी तुझा काहीच संबंध नाही.." मान वळवत ती म्हणाली..
" प्रज्ञा, ऐकलेल्या सगळ्याच गोष्टी सत्य नसतात.. माणसं पारखायला देवही चुकतो मग आपण कोण पामर.. प्लिज समजून घे.. एवढ्या तीन महिन्यांच्या सहवासात मला एवढच ओळखलस का..?" तिला आपल्याकडे वळवत तो म्हणाला..
" मी एका सुंदर मनाच्या मुलाशी प्रेम केलं होतं.. बाकी मला काहीच माहित नाही रे.. पण परिस्थितीपुढे मी हतबल आहे.. मला नाही कळत काय चांगलं? काय वाईट..? तुर्तास माझे बाबा हिच माझी प्रायोरिटी.." प्रज्ञा हळवी होत म्हणाली..
" मी कुठे सांगतोय तुझी प्रायोरिटी बदल म्हणून.. आपण दोघे समजावू त्यांना.. मला खात्री आहे ते ऐकतील.." तिचा चेहरा ओंजळीत पकडत तो म्हणाला.
" मी त्यांना वचन दिलय. त्यांचे शब्द हे माझ्यासाठी अंतिम सत्य.. तुला भेटून त्यांना मरणाच्या दारात नाही लोटायचं मला.." आपला चेहरा त्याच्या ओंजळीतून सोडवत ती म्हणाली.
" आणि माझं मरण..त्याचं काय करशील..? तुझ्याशिवाय मी जगूच शकणार नाही.. तु हवी आहेस मला माझ्यासोबत कायमची.." तिला मिठी मारत तो म्हणाला..
" राजा, तुझ्या प्रेमाने नको बांधूस मला.. तुला जगावचं लागेल.. माझ्यासाठी.... माझी शपथ आहे तुला जर कोणताही भलता विचार केलास तर.." त्याच्या मिठीत विसावत ती म्हणाली..
" ही कसली भलती शपथ.. जिवंत राहून रोज मरण्याची ही कसली भलती शिक्षा.." तो रडत म्हणाला.
" हे आपल्या नात्याचं नशिब.. एवढीच काय ती सोबत होती प्रारब्धात.. आता तुझा मार्ग मोकळा आणि माझाही.. पुन्हा कोणत्याच वळणावर कधीच भेटायचे नाही.. शपथ आहे माझी तुला.." म्हणत ती क्षणात त्याच्या मिठीतून बाहेर पडली.. आणि निघूनही गेली..
सुयश उभ्या जागी कोसळला.. त्याचं प्रेम नव्हे नव्हे त्याचं आयुष्य त्याला कायमचं सोडून गेलं होतं.. भरल्या नजरेत तिच्या पाठमोर्या आकृतीला साठवत सबंध रात्र तो तिथेच अश्रू गाळत राहिला ती परत येईल या आशेत..
क्रमश:
©® आर्या पाटील
*******************************************
लिखाणात चुका आढळल्यास क्षमस्व..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा