# रंग माळियेला...(भाग २३ वा)
©® आर्या पाटील
सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे..
*******************************************
आपलं माणूस दूर जाणं काय असतं ते पुन्हा एकदा सुयश अनुभवत होता.. सप्तपदीची वाट एकाएकी काटेरी झाली होती.. त्यावरून चालतांना होणाऱ्या वेदना काळिज पिळवटून काढत होत्या.. प्रज्ञाचं असं आकस्मित वागणं त्याला अजूनही उलगडत नव्हतं..
प्रेमावर विश्वास नाही का तिचा..? ती असं कसं करू शकते..? मला माझी बाजू मांडायची एक संधी तरी द्यायला हवी होती.. कोण्या एका त्रयस्थ व्यक्तीमुळे प्राणाहूनही जपलेल्या प्रेमाला ती क्षणात विसरायला कसे सांगू शकते..? अश्या एक ना अनेक विचारांचे वादळ मनाच्या आभाळावर घोंघावत होते.. जोडीला तिच्या सहवासातील आठवणी नयनांतून अश्रू बनून ओघळत होत्या.. कसलच भान नव्हतं त्याला.. एव्हाना रात्रीचे अकरा वाजले होते..
फॉर्म हाऊसचा केयर टेकर आल्यावर तो भानावर आला. लक्ष मोबाईलवर गेले.. घरून जवळ जवळ वीस फोन येऊन गेले असतील.. आई बाबा काळजीत असतील या जाणिवेने तो बाहेर पडला..जवळचा बुके तिथेच टाकत त्याने गाडी काढली.. बैचेन झालेलं मन सैरभैर झालं होतं जणू.. काहीच सुचत नव्हतं.. आईबाबांना काय सांगणार मोठीच विवंचना होती..
भरल्या मनाने त्याने घरी कॉल केला..
" बाळा, कुठे आहेस..? ठिक आहेस ना..? फोन का उचलला नाहीस..?"फोन उचलत एका दमात सरलाताई म्हणाल्या..
आईचे शब्द काळजाला हात घालून गेले.. अश्रूंचा फुटलेला बांध दाबत त्याने आवंढा गिळला..
" आई मी पोहचतो तासाभरात.. तुम्ही झोपा.. मी व्यवस्थित आहे.." डोळे पुसत सुयश म्हणाला आणि फोन ठेवला..
सरलाताईंना मात्र चैन पडेना.. काहीही झालं तरी आई होत्या त्या.. लेकराच्या शब्दामागच्या वेदना ओळखण्याची शक्ती असते आईकडे. सुयशच्या बोलण्यातील आर्तता त्यांनी बरोबरी हेरली होती..
" अगं सरला आता तरी चार घास खाऊन घे.. तो म्हणाला ना येतो म्हणून.." समजावत रामराव म्हणाले.
" तुम्ही खाऊन घ्या.. मी थांबते त्याच्यासाठी.." विचारांत गढलेल्या सरलाताई म्हणाल्या.
" तु सुधारणार नाहीस.. फक्त सुन आल्यावर असं नको वागूस म्हणजे मिळवलं.. तुझ्या तब्येतीचा तरी विचार कर गं..? सुयश आल्यावर मला ओरडेल." म्हणत रामराव जेवायला निघून गेले..
सरलाताई मात्र सुयशच्या काळजीने त्रस्त तशाच बसून राहिल्या..
" तिला झाला असेल गैरसमज.. पण तो दूर करणे महत्त्वाचे आहे.. ती ही माझ्याशिवाय अपूर्ण आहे.. तिचही जीवापाड प्रेम आहे माझ्यावर..
तिच्या बाबांनाही काळजी असेल लेकीची.. स्वत: च्या बाबतीत जे घडलय ते लेकीच्या बाबतीत नको असा विचार करणाऱ्या बापाची भूमिका मलाही समजून घ्यावी लागेल.. त्यांना प्रज्ञावरील माझ्या निस्सिम प्रेमाची आणि तिला शेवटपर्यंत जपण्याची शाश्वती मला द्यावीच लागेल" स्वगत होत सुयशने आपला मोर्चा हॉस्पिटलकडे वळवला..
हॉस्पिटलमध्ये वर्दळ नव्हती.. विलासरावांकडे प्रज्ञा थांबली होती.. रिसेप्शनला चौकशी करून त्याने विलासरावांची रूम गाठली..विलासराव निद्राधीन होते.. आरक्तपणे प्रज्ञा बाजूला बसलेली होती..
" प्रज्ञा, काळजी नको करूस मी आहे तुझ्यासोबत.." आत येत दबक्या आवाजात सुयश म्हणाला.
" सुयश, एवढ्या रात्री तु इथे..? घरी गेलेलास की नाही..?" प्रज्ञा विस्मयाने म्हणाली..
" प्रज्ञा, आपण करू सगळं ठिक.. बाबांना फक्त बरं होऊ दे.. त्यांच्या सगळ्या शंकाचं निरसन करेन मी..तु नको काळजी करूस.." तिचा हात हातात घेत तो म्हणाला..
" सुयश, मी समजू शकते तुझ्या भावना पण हे शक्य नाही रे.. बाबांचा करारीपणा माहित आहे मला.. ते कधीच मान्यता देणार नाही.. तु विसरून जा मला कायमचा.. कठिण आहे पण अशक्य नाही.." ती अजूनही दबक्या आवाजातच बोलत होती..
" तु विसरु शकतेस मला..?" तो अगतिकतेने म्हणाला..
" नाही विसरू शकत.. हेच ऐकायचे आहे ना तुला.. तर ऐक.. मी तुला कधीच विसरू शकणार नाही.." ती आश्वासकपणे म्हणाली..
तिच्या बोलण्याने तो सुखावला जणू.. तिचं व्यापक प्रेम अजूनही जाणवत होतं त्याला.. तोच त्यांच्या आवाजाने विलासरावांना जाग आली.. समोर सुयशला बघताच निलमताईंचे शब्द न् शब्द त्यांच्या कानात पुन्हा घुमू लागले..
" बाबा, तुम्हांला बरं वाटतं ना." सुयशने मोर्चा विलासरावांकडे वळवला.
" प्रज्ञा, हा का आला आहे इथे..? माझं वचन मोडलस तु..?" म्हणत ते जास्तच हायपर झाले..
अचानक बोबडी वळली आणि बी. पी ही वाढला..
" बाबा, तुम्ही शांत व्हा पाहू.." प्रज्ञा जीवाच्या आकांताने समजवू पाहत होती पण विलासराव ऐकायच्या मनस्थितीत नव्हते... सारखं सारखं तेच बोलत ते मूर्च्छित पडले.. एव्हाना सुयश डॉक्टरांना बोलवायला धावलाच होता..
डॉक्टरही वेळेत पोहचले... त्यांना योग्य तो उपचार देत डॉक्टरांनी प्रज्ञाला बाहेर बोलावले..
" तुम्हांला मी आधीच सांगितले होते यांना धक्का बसेल असे काहीच बोलू नका पण तरीही तुम्ही...
मी वेळेवर पोहचलो म्हणून ठिक आहे पण प्रत्येक वेळेस असे होईलच असे नाही.. तुम्हांला त्यांना वाचवायचं असेल तर एवढी काळजी घ्यावीच लागेल.. अन्यथा आम्हीही काहीच करू शकणार नाहीत.." डॉक्टर म्हणाले..
प्रज्ञाने मान खाली घालून त्यांना होकार दिला.. आणि आत गेली.. सुयशच्या हाताला पकडत ती बाहेर घेऊन आली..
" सुयश, माझ्यावर जर खरच प्रेम केलं असशील तर आताच्या आता निघून जा येथून.. माझ्या बाबांच्या केसाला धक्का जरी लागला तर मी तुला आयुष्यात कधीच माफ करणार नाही.. आज त्यांची ही अवस्था फक्त तुझ्यामुळे आहे.. मी खरच का भेटले तुला..? तुझ्यावर प्रेम करण्याचा पश्चाताप होतोय आता.. तुला माझ्या आयुष्यात प्रवेश देणं ही सर्वात मोठी चुक होती माझी.. प्लिज अजून काही बोलायच्या आधी निघून जा इथून.. कायमचा." हात जोडत प्रज्ञा म्हणाली आणि आत निघून गेली..
आता काहीच तर शिल्लक नव्हतं ठेवलं तिने.. ज्या प्रेमाला तिने पश्चातापाचं नाव दिलं ते प्रेम आता पूर्णपणे कोलमडलं. तिचा प्रत्येक शब्द त्याच्या हृदयाला भेदून गेला.. तो तसाच बाहेर पडला आणि घराकडे निघाला..
डोळ्यातील पाणी वाट धूसर बनवत होते.. खूप कष्टाने गाडी चालवत तो घरी पोहचला.. एव्हाना रात्रीचा एक वाजला असावा.. सरलाताई अजूनही जाग्याच होत्या.. जड पावलांनी तो घरात आला.. नव्या आयुष्याची उमेद घेवून जिला सप्तपदीच्या रेशमी धाग्याने बांधायला गेला होता आज तिनेच त्याला जिवघेण्या वचनाने बांधले होते..
" सुयश, बेटा ठिक आहेस ना..?" सरलाताई उठून त्याच्याकडे गेल्या..
आईला पुढ्यात पाहताच त्याचा स्वत: वरचा ताबा सुटला.. आईच्या कुशीत शिरून तिचा धिप्पाड लेक आज लहानपोराप्रमाणे रडू लागला..... आईच्या कुशीत सुरक्षित असल्याचं तेवढचं समाधान..
कितीतरी वर्षे झाली असतील सरलाताईंनी त्याला रडलेले पाहून.. म्हणजे अगदिच लहान असतांना पहिल्यांदा शाळेत जायला तो रडला होता तेवढाच.. त्यानंतर त्याच्या हसऱ्या आणि बोलक्या डोळ्यांत कधीच पाणी नव्हते पाहिले त्यांनी.. ती आई अगतिक होत होती.. सरलाताईंच्या डोळ्यांनाही धारा लागल्या..
" ये राजा, असा का रडतोस..? बोल ना रे काय झालं..? प्रज्ञा बरी आहे ना..?" रडत रडत त्या म्हणाल्या..
" आई संपलं गं सगळच.. जिच्या सोबत आयुष्य घालवायचं होतं तिने क्षणात प्रेमाची आहुती दिली कर्तव्याच्या अग्निकुंडात.." म्हणत त्याने घडलेली सारी हकिगत सांगितली..
" विलासराव असे कसे म्हणू शकतात..? त्या धूर्त बाईच्या बोलण्यात येऊन ते दोन प्रेम करणाऱ्या हृदयांना कसे तोडू शकतात..? तु शांत हो सुयश.. मी उद्याच जाऊन त्यांची माफी मागते.. आणि त्यांच्या मनातला संभ्रम दूर करते.." त्याचे डोळे पुसत सरलाताई म्हणाल्या..
" आई, अजिबात नाही.. तु कोठेच चुकीची नाहीस मग का माफी मागायची..? आणि प्रज्ञाला तिच्या प्रेमावर विश्वासच नसेल तर सगळच संपलं गं..? माझ्यासाठी तु तुझा अपमान नाही करून घ्यायचास. मी माझ्या प्रेमाला एवढ्या सहजासहजी नाही जाऊ देणार.. तिच्या बाबांची प्रकृती स्थिरस्थावर होऊ दे मग मी जाऊन बोलेन.." सरलाताईंचे डोळे पुसत सुयश म्हणाला..
" सुयश, थोडं खाऊन घे.. उपाशीपोटी झोप लागायची नाही.." त्याच्या डोक्यावर हात फिरवीत त्या म्हणाल्या..
" आई, खरच काहीच खायची इच्छा नाही गं.. तु जेवलीस का..?" सुयश म्हणाला.
सरलाताईंनी नकारार्थी मान हलवली..
" आई, तु तुझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष कसं करू शकतेस..? जेवली नाहीस म्हणजे औषधं पण घेतली नसतील..?" सुयश म्हणाला.
त्यांनी पुन्हा नकारार्थी मान हलवली..
सुयशने ताट वाढून आणले आणि सरलाताईंना घास भरवला..
ताटातला घास उचलत त्यांनीही जबरदस्तीने सुयशला भरवले..
डोळ्यांतून पाणी अजूनही थांबत नव्हते.
" सुयश, होईल रे ठिक.. तु नको काळजी करूस.." सरलाताईंनी सुयशला शाश्वती दिली..
त्याने होकारार्थी मान हलवली.
सरलाताईंना औषधे देऊन तो झोपायला निघून गेला..
पण डोळेही शत्रू झाले होते त्याचे.. आयुष्यभर जेवढा हसला होता आज तेवढेच अश्रू नयनांतून ओघळत होते..
झोप सोडा पण प्रज्ञाचा विचारही सरत नव्हता.. कुस बदलत सबंध रात्र जागूनच गेली.. पहाटे पहाटे झोप लागली असेल.. सकाळी ऑफिसला जायची इच्छा नव्हती.. त्याने मेसेज करून तसे कळवलेही.. सरलाताईंनीही रात्री उशीरा झोपला म्हणून उठवलं नाही त्याला..
रामरावांना जेव्हा हकिगत कळली तेव्हा ते ही हादरले.. सरलाताई त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागल्या..
" शांत हो सरला.. प्रज्ञाच्या बाबांना घरी येऊ दे मग आपण जाऊन भेटू त्यांना.. मला खात्री आहे आपली शाश्वती ते टाळू शकणार नाहीत." आश्वासकपणे रामराव म्हणाले..
पुढचे दोन दिवस सुयशने ऑफिसला जाणे टाळले.. किती फोन केले प्रज्ञाला पण तिने प्रतिउत्तर दिले नाही.. मेसेजही रिसिव्ह केले नाहीत. आजीला जाऊन भेटावे असे सतत वाटत होते पण त्यामुळे दुसरे संकट नको म्हणून त्याने ते टाळले.. मन कशातच रमत नव्हते.. पण घरात राहिलो तर त्याच विचारांनी ग्रस्त राहू म्हणून तो ऑफिसला निघाला.. नेहमीच्या थांब्यावर गाडी आपोआप थांबली.. नजर प्रज्ञाला शोधू लागली.. एवढ्या दोन महिन्यांत पहिल्यांदाच तो एकट्याने प्रवास करत होता.. तिच्या घरी जाण्याचा मोह आवरत त्याने गाडी काढली आणि ऑफिस गाठले..
प्रज्ञाने कर्तव्याप्रती स्वत: ला वाहून घेतले. त्या रात्री सुयश निघून गेला आणि ती तुटली..
" आपण किती बोललो त्याला.. आधी काय घडलय माहित नाही पण त्याचं आपल्यावरील प्रेम खोटं नाही.. आणि तरीही मी त्या प्रेमाचा अपमान केला.. खूप वाईट वागले मी.." स्वगत होत रात्रभर ती ही त्याच्या आठवणीत बैचेन झाली होती.. एका बाजूला तिचं कर्तव्य आणि दुसऱ्या बाजूला प्रेम होतं.. तिची घुसमट फक्त तिलाच माहित होती..
विलासराव शुद्धीवर आले ते प्रज्ञाला तेथून निघून जाण्याचे संकेत देत..
" तु इथून निघून जा.. माझी मुलगी हरवली आहे.." मान फिरवित ते म्हणाले..
सुयशला गमावले होते पण बाबांना नव्हते गमावायचे तिला..
" बाबा, मी वचन देते यापुढे सुयश माझ्या आयुष्यात कधीच नसेल.." त्यांचा हात हातात घेत प्रज्ञा म्हणाली..
प्रज्ञावरचा राग क्षणात मातीमोल झाला.. बापाची माया ती..लेकीवर फार काळ नव्हती रुसू शकत..
आठ दिवस हॉस्पिटलमध्येच गेले.. प्रज्ञाने एकही दिवस विलासरावांना एकटे सोडले नाही.. मुलगा बनून सारी कर्तव्ये पार पाडली.. रडणाऱ्या हृदयातील अश्रू लपवून ती हसत होती. आपल्या वडिलांच्या समाधानासाठी..
पण असा एकही दिवस सरला नसेल जेव्हा डोळ्यांना अश्रुंची भरती आली नसेल.. वेळ सरत होता पण ती अजूनही तिथेच होती जिथे तिने सुयशचं निरागस मन मोडलं होतं...
आठ दिवसांनी सक्तीच्या विश्रांतीची ताकिद देत डॉक्टरांनी विलासरावांना घरी सोडले.. घरी आल्यावरही प्रज्ञा जातीने सारं पाहायची..
" प्रज्ञा, मी ठिक आहे आता.. तु जा ऑफिसला.. बराच वेळ वाया घालवलास माझ्यासाठी.." म्हणत विलासरावांनी तिला ऑफिसला जाण्याची गळ घातली..
प्रज्ञानेही ऑफिसला जाण्याचा निर्णय घेतला..
दुसऱ्या दिवशी सारं काही आवरून ती ऑफिसला निघाली..
" बेटा, पुन्हा त्या राज्यात मनाला गुंतवू नकोस.. तुला तुटतांना नाही पाहवणार या बापाला.." विलासरावांनी अस्पष्ट भाषेत स्पष्ट संकेत दिले..
" बाबा, तुम्ही निश्चिंत रहा.. मी माझे वचन मोडणार नाही.." म्हणत ती बाहेर पडली..
विलासराव तुटायची भाषा बोलत होते आणि प्रज्ञा आतून तुटणं अनुभवत होती.. स्टॉपवर पोहचल्या पोहचल्या प्रज्ञाला गहिवरून आलं.. सुयश येईल या भीतीने ती गाडी मिळविण्यासाठी धडपड करू लागले..
तो जवळ नव्हता म्हणून ठिक पण त्याला पाहिल्यावर ती स्वत: ला नव्हती सांभाळू शकत..
तिच ती वेळ आणि तिच ती गाडी.. हो सुयशच आहे.. तिने लांबून येणाऱ्या गाडीचा वेध घेतला. सुयशची नजरही प्रज्ञावर पडली.. आठ दिवसांत अगदिच मलूल झाली होती ती.. चैतन्य हरवले होते चेहर्यावरचे.. हरवणारच ना.. वेदना सहन करायची सवय होती तिला.. तिला पाहताच त्याने गाडीचा वेग वाढवला.. पण तोच ती रिक्षात बसली.. गाडी बाजूला लावून 'प्रज्ञा' म्हणून आवाज देत तो रिक्षाच्या मागे गेला पण त्याच्यावर रोखलेल्या नजरांखेरीज त्याला काहिच मिळाले नाही.. तो अगतिक होत गाडीपाशी पोहचला..
" आपल्याला कोणताच अधिकार नाही त्याच्या भावनांशी खेळायचा.." स्वत: ला दोष देत प्रज्ञा डोळ्यांतील अश्रू पुसत होती..
संध्याकाळी ऑफिस सुटायच्या आत तो स्टॉपवर पोहचला.. प्रज्ञाला पाहताच तो तिच्याकडे धावला..
त्याला आपल्या जवळ येतांना पाहून प्रज्ञा जाग्यावरच थांबली...
" सुयश, आहे तिथेच थांब.. बाबांना वचन दिलय मी तुला न भेटण्याचे.. आणि ते वचन जर मी मोडले तर स्वत:च्या नजरेत कायमची पडेन... माझा आत्मसन्मान तुझ्या हातात आहे.." ती पावसासारखी बरसली आणि क्षणात निघून गेली..
माझा आत्मसन्मान हा एक शब्द कानात साठवत तो तिथेच खिळला तिचा पाठलाग न करता..
तिचा करारीपणा त्याला चांगलाच माहित होता..
आता सगळच संपलय ही जाणिव त्याला जिवंत मारत होती. तो कसाबसा घरी पोहचला.. बाथरूममध्ये शिरत त्याने पाण्याचा शॉवर सुरु केला. जरी पाण्यामध्ये मिसळले तरी अश्रू हे अश्रूच होते.. थकला होता तो आता रोजच्या विवंचनेने.. त्याला तुटतांना पाहून सरलाताई आतून खंगत चालल्या होत्या.. आधीच बी. पी चा त्रास त्यात धापही लागू लागली होती.. पण आपला त्रास लपवत त्या सुयशला जपत होत्या..
" आता फार झालं.. उद्या विलासरावांना भेटू आणि त्यांची माफी मागूया.. माझ्या लेकाच्या सुखासाठी मी काहीही करायला तयार आहे.." सरलाताई रामरावांना म्हणाल्या.
त्यांनीही होकारार्थी मान हलवली..
दुसऱ्या दिवशी सकाळी सुयश ऑफिसला गेल्यावर त्याला न सांगता दोघेही प्रज्ञाच्या घरी पोहचले..
प्रज्ञाही ऑफिसला निघून गेली होती..
" आम्ही सुयशचे आईवडिल विलासरावांशी बोलायचे होते.." घरात प्रवेश करत ते शालिनीताईंना म्हणाले..
" ताई, यांना आताचा हृदयविकाराचा झटका येऊन गेलाय.. जरा बेताने." हात जोडत शालिनीताई म्हणाल्या..
" तुम्ही नका काळजी करू. आम्ही मुलांच्या भल्याचाच विचार करत आहोत.." शालिनीताईंचे हात पकडत सरलाताई म्हणाल्या..
तोच त्यांचा कानोसा घेत विलासरावही बाहेर आले..
शालिनीताईंनी त्यांची ओळख करून दिली..
" हे बघा.. आमचा निर्णय पक्का आहे.. तुमच्या घरी मी प्रज्ञाला नाही देऊ शकत.." विलासराव तटस्थपणे म्हणाले.
" मी तुमची हात जोडून माफी मागते.. मी तिच्या रंगावरून नव्हते बोलयला पाहिजे.." हात जोडत सरलाताई म्हणाल्या..
" तुमच्या सारख्या गौरवर्णीयांना स्वत: च्या रंगाचा एवढा काही माज असतो की सावळ्या लोकांनाही मन आहे हे विसरताच तुम्ही.." विलासराव रागाने म्हणाले.
" विलासराव तोंड सांभाळून बोला.. माझ्या पत्नीचा अपमान मी सहन करणार नाही.." रामराव म्हणाले.
" तसाच माझ्या मुलीचा अपमानही मी सहन करणार नाही.. याच जन्मी काय पण पुढच्या सात जन्मातही मी तुमच्या घरी लेकीला देणार नाही.." उठत विलासराव म्हणाले..
" शालिनीताई, लागल्यास मी प्रज्ञाचीही माफी मागते.. पण मुलांच मन असं मोडू नका.." गयावया करत सरलाताई म्हणाल्या..
" आमच्या प्रज्ञाने सुयशला कधीच मनातून काढून टाकले आहे.. तुमच्या राजकुमाराला ते काही जड नाही.. त्याला कोणतीही राजकुमारी मिळेल.." विलासराव रोषात बोलत होते..
" आहो, पण त्यांच ऐका तरी.." शालिनाताई पुढचं काही बोलणार तोच विलासराव पुन्हा बरसले..
" तु आत जा पाहू.." विलासराव म्हणाले..
" सरला, चल इथून.. एका बापाशी नाही तर सारखा तोच विचार करणाऱ्या विचारांनी बुरसटलेल्या माणसाशी बोलतोय आपण.. आपल्या लेकीचं सुख कशात आहे हेच कळत नाही त्या माणसाशी बोलून काय फायदा.." सरलाताईंचा हात पकडत रामराव म्हणाले..
" बापाच्या दृष्टीनेच पाहतोय म्हणूनच तर तुमच्या सारख्या लोकांना ओळखू शकलो.." शब्द वाढवत विलासराव म्हणाले..
रामरावांनीही त्यावर चोख उत्तर दिले..
शब्दाला शब्द लागत होता आणि विषय आणखीनच किचकट होत होता..
सरलाताईंच्या डोळ्यांपुढे एकाएकी अंधारी येऊ लागली.. त्यांचा तोल जाणार तेवढ्यात रामरावांनी त्यांना पकडले..
" शालिनी, पाणी घेऊन ये पटकन.." सरलाताईंना पाहून विलासराव किंचाळले..
" तुमच्या घरचं पाणी पिलं तरी पाप लागेल.." म्हणत सरलाताईंना घेऊन रामराव घराबाहेर पडले...
सरलाताईंची ही अवस्था जिव्हारी लागली विलासरावांच्या..
गाडीत बसताच सरलाताईंची अवस्था आणखी बैचेन झाली त्यांच्या सर्वांगाला घाम फुटला..
तोच शालिनीताईही गाडीजवळ धावल्या. ग्लासातील पाणी त्यांच्या चेहर्यावर शिंपडत पदराने त्यांचा चेहरा पुसला.. उरलेलं पाणी प्यायला देत त्यांनी रामरावांना आधार दिला..
" यांच्या बदल्यात मी माफी मागते भाऊ.." हात जोडत त्या म्हणाल्या..
रामरावांनी होकारार्थी मान हलवली आणि गाडी काढली.. वेगातच ते हॉस्पिटलला पोहचले.. बी. पी चांगलाच वाढला होता सरलाताईंचा.. डॉक्टरांनी तातडीने त्यांना अॅडमिट करायला सांगितले.. रामरावही गर्भगळित झाले.. काहीच सुचेना.. सुयशला फोन करून त्यांनी त्याला सगळी माहिती दिली..सुयश लागलिच हॉस्पिटलमध्ये पोहचला..
आईला या अवस्थेत पाहून सुयशला स्वत: चा राग येत होता...
" आई, बरी आहेस ना..?" आवाज देत सुयश म्हणाला.
सुयशच्या आवाजाने सरलाताईंनी डोळे उघडले..
त्याला पाहताच डोळ्यांतून अश्रू वाहू लागले..
सारच संपलं होतं.. काय सांगणार होत्या त्या..? विलासरावांनी केलेला अपमान कोणत्या शब्दांनी सांगणार होत्या..?
त्यांनी हात जोडत सुयशची माफी मागितली..
" ये आई, हे काय करतेस..? तु आराम कर पाहू.. मी डॉक्टरांशी बोलतो.." सांगून बाहेर पडला..
रामरावांना खोदून खोदून विचारल्यावर प्रज्ञाच्या घरी काय घडलय याची माहिती त्यांनी सुयशला दिली..
आता मात्र सुयशच्या तळपायाची आग मस्तकाला गेली..
" माझ्यापर्यंत ठिक आहे पण माझ्या आईवडिलांचा अपमान करण्याचा कोणताच अधिकार नाही त्यांना.. त्यांना जाब विचारणारच.." सुयश रागातच म्हणाला.
" सुयश शांत हो पाहू.. झाला तेवढा तमाशा पुरे झाला. सध्या आईला बरं वाटणं महत्त्वाचं.. खूप धसका घेतलाय तिने.. तिच्या जवळ थांब.." समजावत रामराव म्हणाले.
सुयशने स्वत: चा राग आवरला.. आणि आत गेला..
" सुयश, माझ्या जवळ ये बाळा...
मी खूप चुकीची वागले.. मी प्रज्ञाला नाव ठेवायला नको होतं.. माझ्यामुळे तुझं सुख दुरावलं. तुला असा अगतिक नाही पाहू शकत रे.. नेहमी हसरा माझा सुयश रडतांना नाही पाहवत.." बोलता बोलता सरलाताईंना हुंदका भरून आला.. श्वास गुदमरला. छातीला हात लावत त्यांनी डोळे गच्च मिटले.. मिटलेल्या डोळ्यांतून उरले सुरले अश्रू ओघळून गेले.. मघापासून चाललेली धडपड अचानक मंदावू लागली.. सुयशचा हात तेवढा घट्ट पकडलेला होता..
सरलाताईना या अवस्थेत पाहून सुयश गर्भगळित झाला..
" बाबा, डॉक्टर लवकर या.. आई कसतरीच करितीये.." तो ओरडून म्हणाला..
त्याच्या ओरडण्याने रामराव आणि डॉक्टर धावतच रुममध्ये आले..
पण तोपर्यत तडफड थांबली होती.. देह निपचित झाला होता.. डोळे मिटलेल्या अवस्थेत आणि हातात सुयशचा हात..
डॉक्टरांनी चेक केलं. शक्य असतील तेवढे सारे प्रयत्न केले पण सगळेच व्यर्थ ठरले..
" अॅम सॉरी.. शी इज नो मोअर.." रामरावांच्या खांद्यावर हात ठेवत डॉक्टर म्हणाले..
रामराव जागच्या जागी कोसळले.. सुयश अजूनही आई उठेल ही आशा लावत त्यांना गदागदा हलवत होता..
पण अनपेक्षितपणे सारच संपलं होतं..
हृदयाने अगदिच हळव्या असलेल्या सरलाताईंना लेकांच दु: ख अगतिक झालं.. आपल्या चुकीमुळे सारं घडलं हा भार मनावर ठेवत त्यांनी देह ठेवला.. रामराव आणि सुयशला कायमचं पोरकं करून निघून गेल्या.. अगदी पंधरा दिवसांपूर्वी भविष्याच्या स्वप्नांत रंगलेल्या सरलाताई नियतीपुढे हरल्या आणि कायमच्या पंचत्वात विलीन झाल्या...
क्रमश:
©® आर्या पाटील
******************************************
सदर लिखाणात चुका आढळल्यास क्षमस्व..
कथेचा हा भाग भावनिक करून जाणारा आहे.. तरी एक लेखिका म्हणून माझ्या प्रिय वाचकांना नम्र विनंती आहे की कथेचा भाग म्हणून याकडे पाहावे. आपल्या भावना दुखावण्याचा हा प्रयत्न नाही.