Login

रंग माळियेला...( भाग २४ वा)

Love story of Pradnya and Suyash... Exploring new horizon of love beyond the colour...

# रंग माळियेला...( भाग २४ वा)

©® आर्या पाटील

सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे..

******************************************

क्षणात सारच संपलं होतं.. सरलाताईंचा निपचित पडलेला देह, कोसळलेले रामराव आणि आईचा टाहो फोडत रडणारा सुयश... सगळच विदारक होतं..

सगळच कोण चूक कोण बरोबर याच्या पलिकडे गेलं होतं.. स्वप्नातही ज्या गोष्टीचा विचार केला नव्हता एवढं अघटित घडलं होतं..

सुखाच्या सरींनी ओथंबळलेल्या त्यांच्या जीवन आभाळी एकाएकी वादळ आलं आणि क्षणात सारच उद्धवस्त करून गेलं..

रामरावांना योग्य प्रथमोपचार दिल्यावर ते शुद्धीवर आले..

सरलाताईंचा मृतदेह आणि रडणारा सुयश दोघांना पाहून त्यांचा धीर पुन्हा सुटला..

सुयशला कुशीत घेवून तेही रडू लागले...

" बाबा, सांगाना आईला उठायला.. ती अशी नाही वागू शकत आपल्याबरोबर.." हुंदके देत सुयश बोलत होता..

" फसवलं रे आईने आपल्याला.. ती कायमची निघून गेली आपल्याला सोडून.." रामरावही रडत होते...

थोड्याच वेळात सुयशचे मामा मामी हॉस्पिटलमध्ये पोहचले..

बहिणीला या अवस्थेत पाहून तो भाऊही ढासळला...

पण आता कोणीतरी खंबीर होऊन परिस्थिती हाताळणे महत्त्वाचे होते.. 

हॉस्पिटलचे सोपस्कर पूर्ण करत सरलाताईंच मृतशरिर घरी आणण्यात आले..

सुयशचे आजी आजोबा आपल्या लेकीच्या अश्या जाण्याने अगतिक झाले होते..

आपल्या नातवाला कुशीत घेऊन रडत होते..

ज्या घरातून लग्नाची वरात निघणार होती आज त्याच घरातून सरलाताईंची तिरडी उठत होती..

साऱ्यांचे काळिज गलबलून येत होते..

रामरावांच्या कुशीत शिरत सुयशही हुंदके देऊन आईला निरोप देत होता..

आईचं जाणं घराचं घरपण आणि लेकाचं अल्लडपण दोन्ही घेऊन जातं..

सुयश तर त्यांच्या काळजाचा तुकडा.. त्याच्यावर त्यांची स्वत: पेक्षा जास्त माया.

आणि आज त्याच काळजाच्या तुकड्याला आयुष्यभर पुरेल एवढ दु: ख देऊन त्या चालल्या होत्या..

स्मशानभूमीत त्यांच्या मृतदेहाला अग्नी देण्याचं धाडस होत नव्हतं सुयशचं.. काळीज रडत होतं आणि हात थरथरत होते.. रामरावांनी मन घट्ट करून सुयशच्या थरथरत्या हाताला धीर दिला..

मान हलवत सुयशने नकार दिला..

त्याला आधार देत रामरावांनी आपल्या पत्नीच्या मृतशरिराला अग्नि दिली...

उरला सुरला त्राणही संपला.. उभ्या जागी बसत सुयश जोरजोरत रडत होता..

खूप कष्टांनी स्वकियांनी त्याला घरी आणले...

पण आता काहीच तर शिल्लक नव्हते घरात.. घराची लक्ष्मी कायमची पंचत्वात विलीन झाली होती..

सकाळी जिने हट्टाने खाऊ घालून ऑफिसला धाडले होते ती आता कायमची सोडून गेली होती मग रात्रीचं जेवण तरी कसे गोड लागणार होते...

सुयश जेवायला तयार होईना शेवटी रामराव पुढे आले आणि लेकाला घास भरवले..

जेवता जेवताच रामरावांच्या कुशीत शिरून रडण्याऱ्या सुयशला प्रत्येक क्षणी आई आठवत होती...

" माझ्या प्रेमाची शिक्षा माझ्या आईला का..? मलाच न्यायचे होतेस ना माझ्या आईला का..?" रडता रडता सुयश बोलत होता..

रामरावांनी त्याला शांत केले..

रामरावही खचले होते.. ज्या वृद्धापकाळात आपल्या जोडीदाराची सर्वात जास्त गरज असते त्याच काळात जोडीदार सोडून गेल्याचं दु: ख सहन करत होते ते..

तिकडे प्रज्ञा घरी आल्यावर शालिनीताईनी घरात घडलेला सारा प्रकार तिला सांगितला...

"बाबांनी असं नव्हतं वागायला पाहिजे... आज बाबा पूर्णपणे चुकले.. सुयशची आई व्यवस्थित असो हीच प्रार्थना.." प्रज्ञा अगतिक होऊन म्हणाली..

" खरं आहे.. कधी कधी हे कोणाचच ऐकतं नाहीत.. ते म्हणतील तीच पूर्वदिशा.. आईही खूप रागावल्या यांच्यावर तसे शांत झाले.." शालिनीताई म्हणाल्या..

प्रज्ञाने आजींची खोली गाठली..

" आजी, बाबा चुकले गं.. सुयशची आई ठिक असेल ना..?" त्यांच्या कुशीत शिरत ती म्हणाली.

" हो.. शंभर टक्के तोच चुकीचा होता.. सुयशच्या आईच्या मनात खोट असती तर अशी अगतिक होऊन आपल्या दाराशी आली नसती.. मला काहिच माहित नव्हतं गं.. ते गेल्यावर शालिनी म्हणाली.. नाही तर मी हे होऊच दिले नसते.." तिला शांत करित आजी म्हणाल्या..

" हे काय होऊन बसले गं आजी..? माझ्या नशिबात सुख लिहिलेलच नाही.. पण मी सुयशच्या नशिबातही दु: खच भरलं गं.." ती रडत म्हणाली..

" प्रज्ञा, माझं ऐकशील तर सुयश सोबत बोलून बघ.. आईची चौकशी कर.." आजी म्हणाल्या.

" पण बाबा... त्यांना वचन दिलय मी.." प्रज्ञा म्हणाली..

" प्रसंगी देवानेपण वचनं मोडली आहेत मग आपण पामर काय वचनं पाळणार... काहीतरी चांगलं होत असेल तर कसली वचनं अन् कसलं काय..?" आजी समजावत म्हणाल्या..

तिने होकारार्थी मान हलवली आणि आजीच्या कुशीतून उठत रूमबाहेर पडली..

आपल्या रुममध्ये शिरत तिने डोळे पुसले.. पंधरा मिनिटे मनाशी निश्चय करण्यातच गेला.. शेवटी मोबाईल उचलत सुयशला कॉल लावला..

एकदा,दोनदा, तिनदा खूप कॉल झाले पण सुयशने फोन उचलला नाही..

" का उचलू फोन मी..? फक्त अन् फक्त आपलं प्रेम कारणीभूत आहे माझ्या घराच्या वाताहतीला..

माझ्या आईचं मन कळलच नाही गं तुला...

खूप प्रेमाने जपलं असतं तिने तुझ्यासोबतचं नातं..

तिच्या एका चुकीची एवढी मोठी शिक्षा नव्हती द्यायला पाहिजे तु.." स्वगत होत सुयशने फोन बाजूला फेकून दिला...

त्यानंतर रोजच प्रज्ञा त्याला कॉल करायची, रोजच्या स्टॉपवर थांबत त्याची वाट बघायची.. पण तो ही आला नाही आणि तिचा कॉलही उचलला नाही..

इकडे तेरा दिवसांचा दुखवटा पाळून सारे विधी आटोपून सुयशचे नातेवाईक आपआपल्या घरी परतले...

एवढ मोठं घर सरलाताईंशिवाय त्यांना खायला उठत होतं..

घरी तरी किती दिवस राहणार ऑफिसला परतणे गरजेचं होतं पण रामरावांना एकटं कसं सोडणार.

त्यांच दु: ख ही आभाळाएवढं होतं.. आई गमावली होती पण बाबांना नव्हतं गमावायचं..

या विचारात सुयशने सुट्टी आणखी लांबवली...

इकडे प्रज्ञाला चैन पडत नव्हतं.. सुयश फोन उचलत नसायचा पण रोजचा कॉल ठरलेला असायचा.. घरीही ती बुजल्यासारखी राहू लागली.. विलासरावांना शक्य तितकं टाळू लागली..

त्यादिवशी तिने मनाशी पक्का निर्धार केला आणि सुयशला ऑफिसमध्ये जाऊन भेटायचे ठरवले..

ऑफिसमधून लवकर निघत तिने सुयशचे ऑफिस गाठले..

तिथे तिला जे कळाले त्याने ती पूर्णपणे हादरली..

" सुयश सरांच्या आईचं दहा बारा दिवसांपूर्वी देहावसान झालं त्यामुळे सर कामावर येत नाही.." रिस्पेशनिस्ट म्हणाली आणि प्रज्ञा कोलमडली.. क्षणभर दिला भोवळ आल्यासारखी वाटली..

" मॅडम तुम्ही ठिक आहात ना..?" म्हणत रिस्पेशनिस्टने तिला पाणी दिले..

" मॅडम, मला त्यांच्या घरचा पत्ता मिळेल का..?" घामाने दरदरलेला चेहरा पुसत प्रज्ञा म्हणाली..

होकारार्थी मान हलवत रिस्पेशनिस्टने सुयशच्या घराचा पत्ता दिला..

थोडं ठिक वाटल्यावर प्रज्ञा ऑफिसबाहेर निघाली..

पायात चालायचे त्राण नव्हते की मनात विचार करायची हिंमत नव्हती..

डोळ्यांत भरून आलेले अश्रू रुमालाने पुसत ती निघाली..

ऑफिसपासून घरचा प्रवास सुयश आणि त्याच्या आईच्या आठवणीने पार करत तिने घर गाठले..

फाटकातून आत प्रवेश करताच त्यादिवशीचा न पाहिलेला क्षण डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहिला.

" या इथेच कोलमडल्या सुयशच्या आई... मीच कारणीभूत आहे त्यांच्या जाण्याला.. माझी काळी छाया त्या हसत्या खेळत्या कुटुंबावर शोककळा पसरवून गेली.. देवा मलाच न्यायचे होतेस ना.. सुयशचा किती जीव होता आईमध्ये.. तो कोलमडला असेल.. कसं पेललं असेल त्याने हे आभाळाएवढं दु: ख... त्याला सर्वात जास्त गरज असतांना मी दूर लोटलं त्याला.. पण कोणत्या तोंडाने जाऊ त्याच्याजवळ.. त्याच्या दु:खाला सर्वस्वी मीच जबाबदार आहे.." दारात अडखळलेल्या मनात विचारांचे वादळ उठले..

ती तशीच मागे वळली आणि बागेतल्या कोपऱ्यात बसून अश्रू ढाळू लागली...

आज तिचं स्वत: चं घर तिला जीवघेणं वाटत होतं...

थोड्यावेळात विलासराव बाहेर आले.. प्रज्ञाला कोपऱ्यात रडतांना पाहून शालिनीताईंना आवाज देत ते प्रज्ञाकडे धावले..

त्यांच्या आवाजाने शालिनीताईही बाहेर आल्या..

" बाळा, काय झालं..? अशी बाहेर बसून काय रडतेस.." तिच्या जवळ जात विलासराव म्हणाले..

" प्रज्ञा, काय झालं गं...?" शालिनीताई डोळे पुसत म्हणाल्या..

शालिनाताईंना जवळ पाहताच तिने त्यांच्या कुशीत आसरा घेतला...

" आई, मी खरच अपशकुनी आहे का गं..? माझ्यामुळे सुयशच्या हसत्या खेळत्या घराला नजर लागली.. माझा स्वाभिमान सुयशच्या आईचा जीव घेऊन गेला गं... सुयशची आई गेली... त्यादिवशीचा मानसिक त्रास जीवघेणा ठरला.." रडत रडत प्रज्ञा म्हणाली...

प्रज्ञाचे शब्द ऐकून विलासरावही गहिवरले.. पण आता त्याचा काहिच उपयोग नव्हता.. माणूस निघून गेल्यावरच त्याची किंमत कळते.. त्या दिवशीच्या आपल्या आडमुठेपणामुळे एखाद्याचा जीव गेला हा विचार विलासरावांनाही कातर करून गेला... तिथेच खुर्चीचा आधार घेत ते बसून राहिले..

शालिनी ताईही गहिवरल्या... प्रज्ञाचं सांत्वन करत तिला घरात घेऊन आल्या..

घरात आल्यावर प्रज्ञाने आजीची रूम गाठली...

आजींना सारं सांगतांना तिच्या अश्रूंना भरती आली...

" गप गं पोरी... तुच अशी कोलमडलीस तर सुयशला कोण सांभाळणार... काय झालं..? कसं झालं..? हे सोडून दे... जाऊन त्याला भेट... त्याची माफी माग.. त्याला आधार दे... खूप केलय त्यानं तुझ्यासाठी आता तुझी वेळ... सावर स्वत: ला.." समजावत आजी म्हणाल्या...

" पण कोणत्या तोंडाने समजावू त्याला... माझ्यामुळेच जीव गेलाय त्यांचा... माझी तर हिंमतच होत नाही त्याच्या समोर जायची.. हसता खेळता माझा सुयश त्याला दु:खी नाही पाहू शकत मी... आणि ते दु:खही एवढं मोठ..." रडत प्रज्ञा म्हणाली...

" त्याला या दु:खातून तुलाच बाहेर काढावे लागेल... त्याला गरज आहे तुझी.." आजी म्हणाल्या..

प्रज्ञाने होकारार्थी मान हलवली.. मन मात्र नकारार्थी विचारांनी ओथंबून वाहत होते...

विचारांच काहूर तिची हिंमत तोडत होतं...

दोन तीन दिवस असेच गेले पण त्याला भेटण्याची हिंमत झाली नाही तिची..

घरातलं वातावरणही अगदिच गढूळ झालं होतं..

प्रज्ञाच्या हास्यासोबत घराचेही चैतन्य हरवले होते जणू..

विलासरावांशी मोकळं बोलणं आता बंदच झालं होतं..

पुन्हा साऱ्या प्रयत्नानिशी तिने हिंमत जमवली आणि त्याला भेटायला जायचे ठरवले...

इकडे सुयशला त्याच्या ऑफिसमधून एका महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी पाच वर्षांसाठी परदेशात जाण्याची ऑफर मिळाली..

ऑफिसला जात नसल्याने त्याला घरीच कॉल आला.. पुढच्या आठ दिवसांनी त्याला निघावे लागणार होते..

मोठा पेचप्रसंग उभा राहिला समोर...

खर तर आयुष्यात आलेल्या वादळापासून कायमचं निभावण्याची संधी होती ती त्याच्यासाठी... त्याला नव्हतं राहायचं त्या जगात... जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिच आता त्याला नकोशी झाली होती... प्रेमाची जागा तिरस्काराने घेतली होती... आणि त्याच तिरस्कारापासून लांब पळायचे होते त्याला.. पण रामरावांना असं एकटं सोडून जाणं मनाला पटत नव्हतं..

" बाबा, तुम्हीपण चला सोबत. तुम्ही माझ्याजवळ असाल तर कसलीच चिंता नसेल.. तसंही इथे काहिच राहिलं नाही शिल्लक मग कशाला थांबायचं... आई गेली आणि सगळच संपलं..." सुयश म्हणाला..

" बाळा, तुझं पूर्ण आयुष्य आहे रे... ते असं का एकट्याने जगशील.. जोडीदाराची सोबत किती महत्त्वाची आहे हे माझ्यापेक्षा चांगलं कोणाला माहित... बघूया काही मार्ग निघतो का...? प्रज्ञा.." रामराव बोलत होतेच की सुयशने त्यांना थांबवलं..

" बाबा, हे नाव मला कधीच ऐकायचं नाही.. त्यामुळे तिच्याविषयी बोलणं नकोच.. आणि प्रेम,लग्न या गोष्टींवरून विश्वास उडालाय माझा.. मला नाही वाटत मी आयुष्यात कधी लग्न करेन..." सुयशने आपला निर्णय सांगितला.

" तुझं सुख हेच आईचं समाधान होतं.. तुझ्या सुखासाठी तिने सगळं केलं.. आणि त्याच सुखापायी आज..." बोलता बोलता ते थांबले.

त्यांच्या खांद्यावर हात ठेवत सुयशने धीर दिला..

" जर तु लग्न केलं नाहीस तर तिच्या आत्म्याला शांती मिळणार नाही.. निदान तिच्यासाठी तरी.." बोलता बोलता रामराव अगतिक झाले...

" बाबा, शांत व्हा... मी करेन लग्न आईच्या सुखासाठी पण तुर्तास मला वेळ हवा आहे त्यामुळे परदेशात जाण्याची ही ऑफर मी नाही नाकारू शकत.." सुयश म्हणाला..

" ठिक आहे.. तु जा. मी नाही अडवणार.. पण मला नाही येता येणार.. सरला तर गेली अर्ध्यावर डाव सोडून पण तिच्या आठवणी नाही सोडायच्या मला.. या घरात तिचं अस्तित्व जाणवतं मला.. मी रमेन तिच्यात.. पाच वर्षांनी तु परत येणारच आहेस.. आणि काळजी करू नकोस मी नाही सोडून जाणार तुला अर्ध्यावर... नाहीतर सरला मला कधीच माफ करणार नाही.. तु निश्चिंत जा.. मी घेईन माझी काळजी.." रामराव म्हणाले...

रामरावांच्या शब्दांनी तो पुन्हा हळहळला... त्यांच्या कुशीत शिरत आईची ऊब अनुभवली...

त्याच संध्याकाळी पाचच्या सुमारास प्रज्ञा पत्ता शोधत त्याच्या घरापर्यंत येऊन पोहचली...

सर्व हिंमतीनिशी तिने दरवाज्याची बेल वाजवली..

सुयश कागदपत्रे न्हाहाळत रुममध्ये बसला होता..

रामरावांनी पुढे येऊन दरवाजा उघडला....

" नमस्कार बाबा... मी..." ती थोडावेळ थांबली..

" मी प्रज्ञा... आत येऊ का..." पुन्हा हिंमत एकवटून ती म्हणाली..

" ये बाळा...." म्हणत रामरावांनी तिला आत घेतले आणि मनाचा मोठेपणा दाखवला...

" बाबा.... घरच माझ्या बाबांच चुकलं. त्यादिवशी तुम्हांला एवढं बोलायला नको होतं.. आज तुमच्या घराची वाताहात माझ्यामुळे झाली आहे.. आई माझ्यामुळे हे जग सोडून गेल्या... माझी चुक अक्षम्य आहे पण शक्य झाल्यास मला माफ करा.." अगतिकतेने हात जोडत प्रज्ञा म्हणाली...

" बेटा, तुझी काहिच चुक नाही गं.. चुक असेल तर परिस्थितीची आहे... तु नको स्वत: ला दोष देवूस... सुयश वर रुममध्ये आहे.. जा त्याच्याशी बोलून घे..." रामराव म्हणाले..

क्षणाचाही विलंब न करता तिने वर धाव घेतली..

निस्तेज आणि मलूल सुयशला समोर पाहताच तिचा स्वत: वरचा ताबा सुटला.. ती त्याच्या दिशेने सरसावली..

तिला पाहून सुयश उठून उभा राहिला..

जवळ येणाऱ्या तिला लांब लोटत तो मागे सरकला..

" कोण आहात तुम्ही..? मी नाही ओळखत.. अश्या डायरेक्ट रुममध्ये कश्या येऊ शकता..?" रागात सुयश म्हणाला..

" आय अॅम सॉरी सुयश.. मला नव्हतं माहित आईबद्दल.." काकुळतीला येत प्रज्ञा म्हणाली आणि त्याच्या जवळ जाऊ लागली..

" एक मिनिट.. ती फक्त माझी आई आहे.. तु तिला आई म्हणण्याचा अधिकार केव्हाच गमावून बसली आहेस.." निरवानिरवीच्या शब्दात सुयश म्हणाला.

" हो.. माझा अपराध मोठा आहे.. माझ्यामुळेच सगळं घडलय.. मी तुझ्या आयुष्यात आली आणि तुझं सुखच हिरावून घेतलं.. माफ कर मला सुयश.. त्या दिवशी बाबांनी एवढी टोकाची भूमिका नको घ्यायला पाहिजे होती.. त्यांच्यावतीने मी माफी मागते..." हात जोडत प्रज्ञा म्हणाली..

" तुझ्या हात जोडण्याने माझी आई परत येणार नाही.. किती स्वप्ने होती तिची.. तुला सुन करून घेण्यासाठी आतुर झाली होती ती... लेकीप्रमाणे सांभाळले असते तुला.. पण तु..." रागात सुयश म्हणाला.

" माणसं नाही ओळखता आली मला.. मी चुकले रे." प्रज्ञा रडत म्हणाली..

" तु नाही.. चुकलो मी.. तुझ्यावर जीवापाड प्रेम करणं ही माझी सर्वात मोठी चुकी... सर्वात मोठी चुकी.." बोलता बोलता त्याने तिचे दोन्ही हात घट्ट पकडले आणि भिंतीच्या दिशेने तिला बंदिस्त केले..

तिने डोळे घट्ट मिटले..

मिटलेल्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले..

तो तिच्या खूप जवळ होता पण मनाने खूप दूर गेला होता..

त्याचा वेदनादायी स्पर्श तिला छळत होता...

" तु बरोबर बोलत होतीस.. तु ज्याच्या आयुष्यात असशील त्याला फक्त अन् फक्त त्रासच होईल...

तुला कधीच माफ करू शकणार नाही मी..

एकेकाळी वेड्यासारखं प्रेम केलं होतं तुझ्यावर... आज तेवढाच तिरस्कार करतो तुझा... निघून जा इथून.. आणि पुन्हा कधीच माझ्या आयुष्यात येऊ नकोस.. कधीच नको.." तिचा हात तेवढ्याच तिरस्काराने सोडत तो म्हणाला..

त्याच्या प्रत्येक शब्दाने ती कोलमडत होती... त्याचा रागाने ओथंबलेला श्वास बंद डोळ्यानिशी ती अनुभवत होती...

जेवढ्या आवेशाने त्याने तिचा हात सोडला तेवढ्याच आवेशाने क्षणभरासाठी ती त्याच्या मिठीत विसावली शेवटची.. त्याने तोंड फिरवत तिरस्कार दर्शवला.. आजही त्याचं धडधडणारं हृदय तिला जाणवलं फरक एवढाच होता की ते तिरस्काराने धडधडत होतं..

दुसऱ्याच क्षणी त्याच्या कुशीतून बाहेर येत ती रूमबाहेर पडली...

भरल्या डोळ्यांनी सरलाताईंच्या तसबिरीचे दर्शन घेत तिने रामरावांची रजा घेतली आणि बाहेर पडली..

" बाबा, अश्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीला घरात घेत जाऊ नका.. घात करतात त्या.." सुयशचे शब्द बाणासारखे तिच्या काळजात रुतले...

त्याच्या तिरस्काराचा घाव हृदयावर झेलत भरल्या डोळ्यांनी तिने घर सोडले...

ती गेली आणि सुयशने स्वत: ला रुममध्ये बंद करून घेतले होते.. त्याच्या अल्लडपणाला सांभाळणारी ती त्याची दुसरी आईच तर होती.. तिलाही कायमच गमावलं आज...

आज पुन्हा तो रांगडा देह ढसाढसा रडला.... प्रज्ञाला दिलेला त्रास त्याच्याच डोळ्यातून वाहत होता.. पण मनाचा निर्धार मात्र ढळू दिला नाही...

प्रज्ञासाठी आता सारच संपलं होतं.. वेदनेची निशाणी घेऊन ती घरी परतली.. त्या दिवशी आजीच्या कुशीत शिरून तीही खूप रडली...

पण आता कशाचा काहीही उपयोग नव्हता.. सुयशच्या बाबांनी तो परदेशात जात असल्याची माहिती दिली होती.

तो तिच्यापासून दूर जाणार होता पण तिच्या आठवणीतून कसा दूर जाईल...

अचानक आलेल्या झंझावाती वादळाने सारचं उद्धवस्त झालं होतं...

सावरायलाही हिंमत नव्हती...

रामरावांची योग्य ती सोय करून ठरल्याप्रमाणे भूतकाळाच्या बोचऱ्या आठवणींपासून कायमची सुटका करून घेत सुयशने देश सोडला आणि परदेशात निघून गेला...

क्रमश:

©® आर्या पाटील

*******************************************

सदर लिखाणात चुका असल्यास क्षमस्व..

प्रतिक्रिया आवर्जून कळवा.. लेखणाला प्रोत्साहन देणाऱ्या ठरतात..