# रंग माळियेला.....(भाग २५ वा)
©® आर्या पाटील
सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे..
*******************************************
सुयश परदेशात निघून गेला ते प्रज्ञाच्या आयुष्यातील चैतन्य घेऊनच..
अडचणींनी भरलेलं तिच आयुष्य पूर्णपणे हिरमुसलं.
भरल्या घराला नजर लागली होती.. उत्साहाचं पार मातेरं झालं होतं..
कोणत्याच गोष्टीत रस नव्हता राहिला तिला.
तिने मायेने जपलेल्या बागेकडे पाठ फिरविली.. फुलझाडे पार निस्तेज झाली..
आताश्या सरु आजींना देवपूजेसाठी बागेतली ताजी फुलं आणून देण्याचा तिचा दिनक्रमही बंद झाला होता..
कामापुरतं जुजबी बोलणं एवढाच काय तो तिचा घरच्यांशी संबंध.. अगदिच अबोल झाली होती ती..
हाताची चवही तिच्या आयुष्यासारखी बेचव झाली होती..
तिला आवडणाऱ्या स्वयंपाकघरातही डोकावण बंद केलं होतं तिने.. सुयशच्या विचारात गढलेली ती ऑफिसमध्ये कामाच्या बाबतीतही वेंधळी झाली होती.. कधी नव्हे ते बॉसकडून चुका कमी करण्याची सूचना मिळाली.. सगळच गणित चुकत होतं.. आनंद वजा झाला होता आणि दु: खाने आयुष्याशी गुणाकार केला होता...
असा एकही दिवस गेला नाही की मावळतीचा संधिप्रकाश तिला रडवून गेला नसेल.. रात्रीचा अंधारही कातर करून जायचा.. घरच्या कोणालाही तिची अशी परिस्थिती पाहवत नव्हती.. विलासराव बोलायचा प्रयत्न करायचे पण आता तिने त्यांच्याशी बोलणेही सोडून दिले होते.. शालिनीताईंना लेकीची अशी अवस्था अगतिक करून जायची..
यात तिच्या लग्नाचा विषय काढणे म्हणजे ओल्या जखमेला आणखी चिघळणे..
सरु आजीच्या कुशीत मात्र ती मन मोकळं करायची.. तेवढाच काय तो मनावरचा भार कमी व्हायचा..
सगळच अगदि निरस झालं होतं..
पावसाळ्यातील चिंब सरीत भिजूनही ती कोरडीच होती..
हिवाळ्याचा बोचरा स्पर्श अगतिक करून जात होता अन् बाराही महिने दु: खाच्या झळा उन्हाळ्याची जाणिव करून देत होत्या.. बघता बघता वर्ष सरलं.. पण तिचं आयुष्य तिथेच थांबलं.. जिथे सुयशने तिच्याशी नातं तोडलं..
इकडे सुयश परदेशात गेला खरा.. पण मन मात्र सतत भूतकाळाच्या बोचऱ्या आठवणीत रुंजी घालत होते..
पण त्याने मात्र स्वत: ला सावरले आणि कामाच्या पसाऱ्यात स्वत: ला हरवून घेतले.. दिवस कामात जायचा पण सरती सांज मात्र त्याला अगतिक करायची.. बर्फाने आच्छादलेल्या त्या परिसरात त्याचे अश्रू मात्र गोठू शकले नाहीत.. ती होती अजूनही हृदयाच्या कप्प्यात तशीच जिवंत तिरस्काराच्या रुपात.. हृदयाचा कप्पाचं तो असा कसा काढून टाकता येईल.. आई आठवली की भावनाविवश व्हायचा तो.. रामरावांना दिवसातून दोन फोन ठरलेले असायचे.. बघता बघता त्यानेही वर्षभराचा काळ आठवणींना चुकवत चुकवत पार केला..
वर्षभरात खूप काही बदलले होते.. पण त्यांच्या मनातली ती जागा अजूनही तशीच होती.. आरक्षित..
प्रज्ञाची अवस्था आता विलासरावांना पाहवेना.. एक दिवशी प्रज्ञाला हट्टाने जवळ बसवून विलासराव गहिवरले..
" बेटा, मला माफ कर... मी तुझ्या आयुष्याची रांगोळी केली.. पण बापाचं काळीज.. काळजीपोटीच वागलो गं असा..माणसं मात्र ओळखता आली नाहीत.. त्याची एवढी मोठी शिक्षा नको गं देऊस.. एक वेळ मरण आलेलं चालेल पण तुझा हा अबोला नको वाटतो गं.." बोलता बोलता डोळ्यांतून अश्रू कोसळले..
बापाला अगतिक कोणत्या लेकीला पाहवेल..
" बाबा, शांत व्हा पाहू.. मी बोलते पण असे रडू नका.. माझ्यामुळे कोणालाही झालेला त्रास आता नाही सहन होत.." त्यांचे अश्रू टिपत ती म्हणाली..
" प्रज्ञा, या बापावर एक उपकार करशील.. प्लिज लग्नाला हो म्हण गं.. अजून किती वेळ असं एकट्याने जगणार.. सुयश.." ते पुढचं बोलणार तोच प्रज्ञाने त्यांना शांत केले..
" बाबा, सुयश हे सोनेरी पान आयुष्यातून निघून गेलं आहे.. कायमचं.. पण माझ्या प्रत्येक आठवणीत तो चिरकाल जिवंत राहील.. माझी चुक अक्षम्य आहे त्यासाठी आजन्म तो मला माफ करणार नाही.. का करावे त्याने माफ..? माझ्यामुळे जन्माची आई गेली त्याची.. आणि दुसऱ्या कोणाचा मी कधीच विचार करू शकणार नाही.. त्यापेक्षा मी आजन्म अविवाहित राहिन. माझ्या या निर्णयाचा तुम्ही स्विकार करावा एवढीच काय ती इच्छा.. यातच माझं सुख आहे.." हात जोडत ती म्हणाली..
" अगं असं कसं म्हणतेस..? लोकं शेण घालतिल तोंडात आमच्या तुला असे घरात बसवून ठेवले तर.. आणि हेमलचा विचार कर.. तिचं शिक्षण पूर्ण झालय आणि रुपाने उजवी असल्याने तिला स्थळं येऊ लागली आहेत.. निदान तिचा तरी विचार कर.." विलासराव अगदिच टोकाचे बोलले..
" तुम्ही काळजी करू नका.. तिच्या वाटेत नाही येणार मी. माझा वृद्धाश्रम सांभाळण्याचा विचार पक्का झाला आहे.. माझी मैत्रीण वैदेही.. तिच्या मिस्टरांचे NGO शी संलग्न एक वृद्धाश्रम आहे तोच सांभाळण्याचा विचार झालाय.." तिने आपलं भविष्य उलगडलं..
" तु ठिकाणावर आहेस ना..? असं वृद्धाश्रम चालवून काय सिद्ध करायचं आहे तुला..? अजून किती वाईट दिवस दाखवशील..?" विलासराव आता मात्र भडकले..
त्यांचा आवाज ऐकून शालिनीताई आणि सरुआजीही बाहेर आल्या..
" बाबा, मला काहिच सिद्ध करायचं नाही.. माझ्या हातून जे पाप घडलय त्याचं क्षालन करायचे आहे.. आणि निदान आता तरी मी काय करावे हे माझे मलाच ठरवू दया.. हात जोडून विनंती करते.." हात जोडत प्रज्ञा म्हणाली..
" बघितलस आई.. कशी बोलते ही..? आज हरलो मी.. मलाच चांगला बाप होता आले नाही.." डोक्याला हात लावत विलासराव म्हणाले..
" अरे चांगला नाही नशिबवान बाप आहेस तु.. तुझ्या एका इच्छेखातर तिनं तिचं आयुष्य उद्धवस्त केलं.. सुयशवर जीवापाड प्रेम करूनही स्वत: च्या सुखाला नाकारलं.. एक कर्तव्यदक्ष मुलगी बनून..उगा तिला दोष देण्यापेक्षा तिचा अभिमान बाळग..." आपल्या नातीची बाजू घेत सरु आजी म्हणाल्या..
त्यांच्या बोलण्याने विलासराव शांत झाले.. आणि सोफ्यावर बसले...
कसलासा निर्धार करून प्रज्ञा पुढे आलो..
" आई, आजी.. माझा निर्णय स्पष्टच सांगते तुम्हांला.. मला यापुढे कधीही आणि कुणाशीही लग्न करायचे नाही.. आणि वृद्धाश्रमात सहकार्य करण्याचे माझे फायनल आहे.. प्लिज तुम्ही तुमच्या लेकीला साथ द्यावी एवढीच इच्छा आहे.." हात जोडत प्रज्ञा म्हणाली..
" अगं.. पण.." शालिनीताई काही बोलणार तोच सरु आजींनी त्यांना शांत राहण्याची खूण केली..
" प्रज्ञा.. माझ्या खोलीत ये.. बोलायचं आहे तुझ्याशी.." म्हणत सरु आजी रुममध्ये निघून गेल्या..
त्यापाठोपाठ प्रज्ञाही आत गेली..
" प्रज्ञा, तुझा निर्णय खरच खूप चांगला आहे.. समाजकार्याचा हा वसा तुला नक्कीच आजोबांकडून मिळाला असेल.. ते ही असेच होते गं.. आज ते असते तर त्यांना अभिमान वाटला असता नातीचा.. पण खूप लवकर गेले गं ते.. विलास जेमतेम आठवीत असेल.. ते गेले आणि माझातला अल्लडपणाही हरवला.. जबाबदारीच्या ओझ्याने तारांबळ उडाली माझी. पण परिस्थिती माणसाला सगळं शिकवते.. रडत, पडत, अडखळत एकाहाती मी संसाराचा शिवधनुष्य पेलला पण जगण्यातला आनंद मात्र कायमचा हरवला.. एकाकी पडले या भरल्या जगात.. आजही यांची आठवण मनाला कातर करते.. एकट्याने जगणं सोपं नसतं गं.. म्हणून लग्नाच्या निर्णयाचा तु फेरविचार करावास एवढच या आजीला वाटतं.." अगतिक होत सरु आजी म्हणाल्या..
प्रज्ञाने आजींचा हात हाती घेतला..
" आजी, जगण्याचा मूलमंत्र दिलास आज.. परिस्थिती माणसाला जगायला शिकवते.. आणि मी ही जगणार आहे.. जबाबदारी असतांना एकटी कशी असेन. आणि तु ही आहेसच की सोबतीला.. पण लग्नाचं नको सांगूस.. तुझ्याही मनात तरी कुठे आला दुसऱ्या लग्नाचा विचार.. कारण तुझं प्रेम होतं आजोबांवर आणि ते गेल्यावर त्या प्रेमाला जपलस तु.. मग मलाही जपायचं आहे माझ्या प्रेमाला.. आजन्म.." प्रज्ञा म्हणाली.
सरु आजींनी डोळ्यांना पदर लावून आपल्या लाडक्या नातीला कुशीत घेतले..
ठरल्याप्रमाणे प्रज्ञाने अभिनवच्या मदतीने वृद्धाश्रमाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.. समाजसेवेची आवड असल्याने ती लवकरच रुळली.. अभिनवला मात्र आणखी NGO ही सांभाळायच्या असल्याने त्याने तिच्या मदतीची जबाबदारी आपल्या जवळच्या मित्रावर आदित्यवर सोपवली...
'आदित्य' एक नवं पर्व बनून तिच्या आयुष्यात आला.. सावळ्या वर्णाचा, उंच, राकट शरिरयष्टीचा आदित्य अगदी तिच्यासारखाच होता.. कमी आणि स्पष्ट बोलणारा, आश्वासक निर्णय घेणारा, धीरगंभीर असा..
प्रज्ञा नवखी असल्याने त्याच्याकडून जेवढे धडे गिरवता येतील तेवढे गिरवू लागली.. तो ही अगदी समर्पक भाषेत तिला मार्गदर्शन करायचा.. दोघांनी मिळून त्या वृद्धाश्रमाचे नंदनवनच केले.. वृद्धाश्रमातील वृद्धांना एकाकीपणा जाणवू नये म्हणून दोघेही आग्रही असायचे.. त्यांच्यासाठी गायन, कथाकथन, कविता सादरीकरण अश्या वेगवेगळ्या स्पर्धांचेही आयोजन करायचे, कधीतरी निसर्गाच्या कुशीत पिकनिकला घेऊन जायचे, कधी रात्रीच्या चांदण्यात शेकोटीचा आनंद द्यायचे... त्यांच्या खाण्याच्या, औषधांच्या वेळा ते लक्ष देऊन पाळायचे.. वृद्धाश्रम कसले दोघांनी जपलेलं घरच होतं ते.. वृद्धाश्रमातील सारेच उत्साही बनायचे त्यांच्या सानिध्यात.. त्यांना पाहून प्रज्ञाला जगायच बळ मिळायचं.. नोकरीकडे दुर्लक्ष होऊ लागलं होतं.. पण तिच्या समाजकार्यात मोलाचा वाटा म्हणून बॉसनेही सुट दिली होती.. अगदी वृद्धाश्रमातून काम करण्याची..
हल्ली ती घरी कमी आणि वृद्धाश्रमात जास्त असायची..
जवळजवळ वर्षभराच्या त्या कालावधीत प्रज्ञा काही प्रमाणात का होईना पण सावरली होती.. पण नियती तिला सावरू देईना.. नियतीचे एक एक घाव तिला कातर करित होते..
दरम्यानच्या काळात सरु आजी वृद्धपकाळाने आणि प्रज्ञाच्या विचारानेही थकल्या.. आपली थकलेली कुडी कायमची सोडत त्यांनी देह ठेवला..
त्या एकच तर होत्या प्रज्ञाचा शेवटचा आधार पण त्याही तिला सोडून गेल्या.. जन्म देणाऱ्या आईसोबतच जीव लावणारी आजीही आईच असते.. आणि ही मानस आई गेल्यानंतरचं दु: ख अगदिच हृदयद्रावक असतं.. आज तोच भावनिक क्षण तिला कातर करून जात होता.
खूप खचली प्रज्ञा.... पंखाना जेमतेम बळ आलं होतं उडण्याचं पण आजीच्या रुपात प्रोत्साहन सुटलं आणि ती पुन्हा कोलमडली.. वर्षभराच्या सहवासात आदित्यला मात्र तिच्याविषयी एक वेगळीच ओढ निर्माण झाली होती.. आणि ही ओढ प्रेमच आहे ही खात्री त्याला तेव्हा पटली जेव्हा कधीही न रडणाऱ्या त्याच्या डोळ्यांत प्रज्ञाच्या दु:खाने पाणी आलं.. त्याने खूप आधार दिला तिला त्या काळात.. कोलमडलेल्या तिच्या पंखांचं प्रोत्साहन झाला तो.. आणि तिच्या अस्तित्वाचा आभाळ.... आदित्य खूप चांगला माणूस आहे हे मनापासून स्विकारलं होतं.. पण त्याची मैत्री नको होती तिला.. त्याच्यापासून जेवढं अलिप्त राहता येईल तेवढं अलिप्त राहण्याचा प्रयत्न ती करित होती.. पण पोहतांना पाण्यापासून अलिप्त कसे राहणार..? एक चांगला मित्र म्हणून तिला त्याचा स्विकार करावाच लागला..
दरम्यानच्या काळात तिच्या छोट्या बहिणीचं हेमलचही लग्न झालं.. आता घरी जाणंही नकोसं वाटायचं तिला.. पण मुलगा बनून आईवडिलांना सांभाळायची जबाबदारी ती निष्ठेने पार पाडत होती....
एक दिवस आदित्यने आपल्या मनातील भावना प्रज्ञाला सांगायची ठरवली... वृद्धाश्रमाच्या आवारात प्राजक्ताच्या झाडाखाली शुन्यात नजर लावून बसलेल्या प्रज्ञाची ओंजळ फुलांनी भरत तो तिच्या बाजूला बसला..
" प्रज्ञा, या फुलांपरी तुझ्या ओंजळीत सुख भरायचे आहे.. तु त्या सुखाचा दरवळ बनून माझ्या आयुष्यात येशील का..? खूप प्रेम आहे तुझ्यावर.. मला साथ देशील का..? सातजन्मासाठी माझी होशील का..?" आदित्य म्हणाला..
त्याचा प्रत्येक शब्द तिला सुयशची आठवण देऊन गेला.. सुयश तिच्या हृदयाचा महत्त्वाचा कप्पा होता आणि आज आदित्यने तो कप्पा उघडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला..
ओंजळीतील सारी फुलं क्षणात रीती झाली.. ती देहभान विसरली..त्याच मखमाली फुलांना नकळत पायतळी तुडवित तिने वृद्धाश्रमातील आपली रूम गाठली.. स्वत:ला आत कोंडून घेत ती पुन्हा सुयशच्या आठवणीत बंदिस्त झाली..
" मी कशी विसरू रे तुला.. श्वास कधी वेगळा होतो का देहातून.. मन कधी अलिप्त राहतं का शरिरापासून.. तु माझा श्वास आहेस.. माझं मन आहेस रे तु.. कुठे असशील..? कसा असशील..? काहीच माहित नाही.. तुला प्रत्येक गोष्टीसाठी मी लागायचे.. आता कसं निभावत असेल तुझं माझ्यावाचून..? तुझ्या वेडेपणात, अल्लडपणात मीच होते...तुझ्या काळजीत मी होते... तुझ्या आनंदात मी होते.. पण तुझ्या दु:खात...
तुला माझी आठवण येत असेल का..? की विसरला असशील मला..? नाही.. माझं धडधडणारं हृदय सांगतय तु मला विसरला नाहीस.. त्या दिवशी तु तिरस्काराने बोललास असे तुला वाटत असेल पण मी त्यातही तुझं प्रेम अनुभवलं रे... माफ करशील ना मला...?" अभ्या एक ना अनेक विचारांच्या लाट्यांची भरती नयनांतून भराभर ओघळू लागली..
तोच दारावरची कडी वाजली.. आपल्या विचारांतून बाहेर येत तिने डोळे पुसले....
स्वत: ला सावरत तिने दरवाजा उघडला..
आदित्यला पाहून ती पटकन भानावर आली..
त्याने प्रेमाची दिलेली कबुली तिला त्याच्या नजरेत जाणवली.. परंतु लाल झालेल्या तिच्या डोळ्यांना पाहून आदित्यने तिच्या मनाच्या गाभाऱ्याचा ठाव घेतला..
" प्रज्ञा, आय अॅम सॉरी.. मी अश्याप्रकारे अनाहुतपणे, तुझा विचार न करता माझ्या प्रेमाची कबुली नव्हती द्यायला हवी... पण खरच माझं प्रेम आहे तुझ्यावर.. कधी झालं..? कसं झालं..? नाही माहित पण प्रेम झालं... पण म्हणून तुझंही माझ्यावर प्रेम असलेच या अंधविश्वासात मी नव्हतो.. आणि आज तुझ्या डोळ्यांनी मला तुझा निर्णय सांगितला आहे.. तुझ्या भूतकाळाविषयी मला काहिच माहित नाही.. तुझ्या बोचऱ्या दु:खाविषयी मला माहित नाही.. पण एवढं मात्र निश्चित आहे की खूप मोठी वेदना घेऊन तु जगते आहेस.. या वेदनेचं औषधं नाही बनता येणार.. पण विश्वासाने मन मोकळं केलस तर मैत्रीची फुंकर नक्कीच घालेन... आणि आपलं नातं मैत्रीच्या पलिकडे जाणार नाही.. याची काळजी घेईन.." तो आश्वासकपणे म्हणाला..
त्याच्या शब्दांनी तिच्या काळजाचा ठाव घेतला.. आज खरच कुणीतरी आपलं.. जीवाभावाचं भेटलय ही जाणीव तिला अगतिक करून गेली..
मनात साठवून ठेवलेलं सारच दु: खं क्षणात तिनं त्याच्यासमोर निर्धास्तपणे रीतं केलं... सरु आजीनंतर आज पहिल्यांदा ती मोकळेपणाने बोलली आणि शांत झाली...
" होईल सर्व ठिक.. तु नको काळजी करूस. कोणतीही अडचण असू दे.. हा मित्र तुझ्यासोबत असेल.. जमल्यास आनंदी रहा.. सुयशलाही हेच हवं असेल.." तिच्या डोक्यावर हात ठेवत तो म्हणाला..
तिने होकारार्थी मान हलवली आणि रूमबाहेर पडली..
तिच्या भूतकाळाचा तो हळवा कोपरा आदित्यमधील प्रियकराला मात्र अगतिक करून गेला..मघापासून रोखून ठेवलेले अश्रू शेवटी ओघळलेच...
" एखाद्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो म्हणून हे गरजेचं नाही की तिनेही आपल्यावर प्रेम करावं...प्रेम ही सुंदर भावना आहे तिला तुझं माझं करून मोजता येत नाही.." मनाला समजावत आदित्यही रूमबाहेर पडला...
क्रमश:
©® आर्या पाटील
*******************************************
लिखाणात चुका आढळल्यास क्षमस्व..