# रंग माळियेला...(भाग २६ वा)
©® आर्या पाटील
सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.
******************"***********************
सुयशने ऑफिसच्या गदारोळात स्वत: ला पूर्ण झोकून दिलं होतं..वर्षभराचा त्याचा प्रवासही भावनिक होता.. आयुष्यातील दोन महत्त्वाच्या व्यक्ती गमावल्या होत्या त्याने.. आणि त्या सोबतच स्वत: चा मुक्तपणाही.. चाकोरीबद्ध आयुष्य जगत स्वत: ला सीमित केले होते. ऑफिसमध्येही एकदीच मोजक्या सहकाऱ्यांसोबत तो मिसळायचा..ऑफिसकडून राहण्यासाठी दिलेल्या प्लॉटमध्येही त्याने शेजाऱ्यांचा सहवास टाळला होता.. पांढरी शाल ल्यालेला तो परिसर मात्र जगण्याची इच्छा मेलेल्या त्याला जगण्यासाठी उत्साह द्यायचा.. ऑफिसनंतर घराच्या जवळ असलेल्या तलावाकाठी बसायला आवडायचे त्याला.. आताशा पाण्याचीही भीती वाटत नव्हती.. नियतीने असं काही परिपक्व केलं होतं की काहीही कमावण्याची आणि गमावण्याचीही इच्छा नव्हती उरली.. प्रारब्धाचा आघात उरावर झेलत तो स्थितप्रज्ञ बनला होता.. प्रेमाच्या बाबतीत हळवा असलेला तो आता अरसिक बनला होता.. रामरावांशी बोलायला मात्र तो विसरायचा नाही.. आता बापाचं आभाळ सांभाळता सांभाळता रामराव मायेची आईही बनले होते.. आता तेवढाच तर मानसिक आधार उरला होता...
कितीही तिरस्कार केला तरी हृदयाच्या चोर कप्यातून प्रज्ञा त्याच्या मनाच्या आभाळावर रोजच डोकावायची.. अगतिक व्हायचा त्या क्षणी तो.. सागराला येणाऱ्या भरतीप्रती त्याच्या भावनांच्या सागरालाही तिच्या आठवणींची भरती यायची पण ती बोचरी आठवण उचंबळून येता पुन्हा तिरस्काराची ओहोटी लागायची..
भरती ओहोटीचा हा जीवघेणा खेळ त्या हळव्या सागराला मात्र सहन होत नव्हता.. पण आई गेल्यावर अचानक आलेलं शहाणपण त्याला या खेळात लढण्यासाठी पाठबळ द्यायचे.. रोजचा तोच दिनक्रम, रोजचा तोच पाठशिवणीचा खेळ.. आता सुयशलाही याची सवय झाली होती.. परिस्थितीची सवय झाली की वेगळी अशी तडजोड करावी लागत नाही कारण आयुष्यच तडजोड बनून जातं.. असं काहीसं झालं होतं.. सुयशच्या बाबतीतही..
आणि ती आली त्याच्या आयुष्यात... सुमेधा...त्याच्या आठवणींच्या काळ्या ढगांनी आच्छादलेल्या जीवनात सप्तरंगी इंद्रधनुष्य बनून आली.. जेवढं नाव गोड तेवढीच ती देखणी होती.. बर्फासारखा शुभ्र वर्ण, गुलाबी गाल, चाफेकळी नाक, मधाळ डोळे, सोनेरी रंगाच्या छटा ल्यालेले केस.. जणू त्या बर्फाळ प्रदेशाची राजकन्याच होती ती.. कोणीही पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडावं इतकी सुंदर होती ती.. एका परदेशस्थ भारतीय कुटुंबातील.. वडिल महाराष्ट्रीयन आणि आई गुजराती कुटुंबातील होती.. तिचा जन्म, शिक्षण सारं तिथच झालं.. आणि आता नोकरी सुयशच्या ऑफिसमध्ये मिळाली होती..
योगायोगाने सुयशच्या प्रोजेक्टमध्येच तिची ज्युनियर इंजिनियर म्हणून निवड झाली होती.. वडिलांची स्वत:ची मोठी कंपनी होती.. पण आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करावं म्हणून तिने तिथली मालकी कायमची सोडली आणि दुसऱ्या कंपनीत जॉईन झाली..
तिची निवड झाल्यानंतर आज पहिल्यांदाच ती ऑफिस जॉईन होत होती..
नेहमीप्रमाणे सुयश आपल्या सहकाऱ्यांसोबत कामात गर्क होता.. ती वाऱ्याची मंद झुळूक बनून आली.. तरुणांच्या विकेट घेत.. पण सुयशने मात्र तिच्याकडे पाहिलेही नाही.. असाही तरुण आहे ज्याने आपल्याला दुर्लक्षित केले हे पाहून सुमेधाही अचंबित झाली..
" हे हाय ऑल ऑफ यु..आय अॅम सुमेधा.. न्युली अपाइन्टेड.. कॅन आय जॉइन यु.." तिच्या शब्दांनीही साऱ्यांना भूरळ घातली..
"येस यु कॅन.. बट रुल्स अॅण्ड रेग्युलेशन्स आर कम्पलसरी फॉर एव्हरीवन.. नो एक्सेपशन फॉर विमेन्स.." लॅपटॉपमध्येच पाहत सुयश म्हणाला..
"येस सर, शुअर फ्रॉम ऑनवर्ड्स आय विल जॉइन अॅट राइट टाइम.." सुमेधा म्हणाली..
" दॅट्स गुड.. नो निड टु से सर.. वी ऑल आर हॅण्डलिंग धिज प्रोजेक्ट फॉर कंपनी.. सो जस्ट कॉल मी सुयश.." अगदिच तिरसटपणे बोलत तो तिच्याकडे न पाहता केबीनमध्ये निघून गेला..
" कसला खडूस आहे हा.. अप्सरा समोर असतांना लॅपटॉपमधल्या पसार्याकडेच लक्ष.. असो आय अॅम ब्रॅण्डेड क्वीन.." स्वगत होत ती कामाला लागली..
परदेशात राहूनही अस्खलित मराठी आणि गुजराती बोलणं तिने जपलं होतं.. लहानपणापासून घरात तसा नियमच होता बोलीभाषेत बोलण्याचा..
ती अगदिच बिनधास्त आणि बोल्ड होती.. अल्लडपणा हा तिच्या सौंदर्याला खुलविणारा दागिना होता जणू.. कामाच्या बाबतीतही खूप हुशार होती ती.. चेहर्यावरचं हसू आणि मुखातील वाणी तिला स्वस्थ बसू द्यायची नाही.. तिच्या येण्याने ऑफिसमध्ये नविन चैतन्य आले होते जणू.. आपल्यावर टाकलेली प्रोजेक्टची जबाबदारीही ती काटेकोरपणे पार पाडायची..
" कसं होणार या प्रोजेक्टचं.." तिला पाहून प्रोजेक्टचं टेन्शन घेतलेल्या सुयशच्या अनेक समस्यांचे समाधानही होते तिच्याकडे.. अगदी काही महिन्यातच ती प्रोजेक्टचा महत्त्वाचा भाग बनली.. ती आली नाही की ऑफिसचं हसू हरवायचं... आणि तिच्या असण्याने गंभीर वातावरणही हलकं फुलकं व्हायचं...
एके दिवशी काही कामानिमित्त सुमेधा सुयशच्या केबीनमध्ये आली.. सुयश रामरावांशी कॉलवर बोलत होता..
" बाबा, खाण्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. औषधं वेळच्या वेळी घेत जा.. आणि हे करणार नसाल तर मग मी जबरदस्तीने तुम्हांला इकडे घेऊन येईल.. ही लास्ट हव तर वॉर्निंग समजा.." सुयश फोनवर बोलत होता..
समोरून रामरावांनी होकारार्थी उत्तर दिलं आणि फोन ठेवला..
" काय प्रेमळ जबरदस्ती आहे ही..? आईलाही असेच दम भरता का..?" लडिवाळपणे सुमेधा म्हणाली..
तिच्या 'आई' या एका शब्दाने मन पुन्हा भरून आलं.. पण जागेचं आणि वेळेचं भान राखत त्याने स्वत: ला सावरलं..
" आई नाही माझी या जगात.. दोन वर्षांपूर्वी तिचे देहावसान झाले.. आता बाबाच माझे आई.." गंभीर होत सुयश म्हणाला..
" आय अॅम सो सॉरी सुयश.. मला माहित नव्हतं.." तिच्याही जीवाला लागलं.. ती अगतिक होत म्हणाली..
"इट्स ओके.. तुम्हांला तरी कसे कळणार..? पण खूप छान मराठी बोलता तुम्ही.. वाटलं नव्हतं.." लॅपटॉपमध्ये काम करत सुयश म्हणाला.
" अस्सल महाराष्ट्रीयन आहे मी.. पण परदेशस्थ.. मराठी भाषेची गोडी अविट.. तिला सर नाही कशाचीच.. म्हणून मराठी चांगली येते बोलता.." सुमेधा उत्साहाने बोलत होती..
सुयशने स्मितहास्य देत फक्त होकारार्थी मान हलवली.
" सुयश, तुम्हांला बोलायला आवडत नाही का..? माणसांचा त्रास होतो का..? फार कमी मिसळत्या साऱ्यांमध्ये.. माणसाने कसे अल्लड असावे.. मनाच्या कक्षा प्रत्येकाला सामावून घेता येतील एवढ्या रुंद हव्यात.. हे असं डबकं होऊन जगण्यापेक्षा प्रवाही नदीसारखं वहावं.. आपल्या आनंदाच्या प्रवाहात इतरांनाही घेऊन पुढे जावं.. पंख असूनही कंटाळा आल्यामुळे सुंदर आभाळी भरारी न घेण्याऱ्या पक्ष्यासारखे वाटता तुम्ही.. कसला त्रास आहे का..?" ती स्पष्टपणे म्हणाली..
आपल्या जुन्या मनाचा नवा आरसा समोर बसलाय असेच काहीसे वाटत होते त्याला.. ती त्याच्यासारखीच होती.. मुक्त आणि आनंदी.. जीवनात इंद्रधनुष्याचे सातही रंग ल्यालेली.. सळसळत्या उत्साहाची.. त्याच्या जगणाच्या वाटेवरची वाटसरू जणू... पण तोच तो भानावर आला.. जगण्याची ती मुक्त वाट आपण कधीच मागे सोडली आहे. आयुष्याचा रस्ताच बदलला आहे.. आता त्या वाटेवर परत नको.. मुक्तपणे जगणाऱ्या या पाखराचे पंख नियतीने क्षणात कापून टाकले आता कृत्रिम पंख लावून नाही भरारी घ्यायची.. डबकं तर डबकं.. पण प्रवाहाच्या सोबत नाही जायचं आता.. तो मनाला समजावत विचारांच्या शृंखलेत गुंतला..
" सुयश, आर यु ओके..?" त्याला भानावर आणत सुमेधा म्हणाली..
"येस.. ती फाइल आणली का तुम्ही..?" विषय बदलत तो म्हणाला..
"येस.." म्हणत तिनेही फाइल त्याच्याकडे दिली..
" यु कॅन लिव्ह.." फाइल चाळत चाळत तो म्हणाला..
" कसला आहे हा..? अनाकलनीय..?" त्याच्याकडे एकटक पाहत ती स्वगत झाली..
" मिस सुमेधा.. यु कॅन लिव्ह.." नजर तिच्यावर रोखत तो पुन्हा म्हणाला..
ती पटकन भानावर आली.. त्याच्या आडमुठेपणाला मनातल्या मनात लाखोली वाहत ती बाहेर पडली..
रोजचा दिवस असाच काहिसा उत्साहात आणि एकमेकांकडून नविन काही शिकण्यात जात होता.. सुमेधाही सुयशकडून खूप काही शिकत होते.. त्याच्या अनुभवाचा फायदा करून घेत ती आपलं ज्ञानही प्रगल्भ करीत होती.. या साऱ्यांत एक गोष्ट मात्र सकारात्मक घडली होती.. नकारात्मक विचारांनी भरलेल्या सुयशच्या मनाला ती रोजच उत्साहाची फुंकर घालायची.. सुरवातीला सुयशला तिच्या वागण्याचा राग यायचा पण आता तिचा भाबडेपणा त्याला चांगलाच कळला होता.. तिच्याशी तुटक वागणं काही प्रमाणात कमी होत होतं.. या वागण्याचा सुमेधा वेगळा अर्थ लावू लागली होती.. दोन परस्पर विरुद्ध ध्रुव आकर्षिले जातात तशीच काहीशी ती ही आकर्षिली जात होती त्याच्याकडे.. त्याचं तिच्यापेक्षा वेगळं असणच तिला आवडू लागलं होतं...
जीवनाचा भरभरून आनंद घेणाऱ्या अल्लड पाखरालाही काही दु: ख असेल असे कोणालाही वाटलं नसेल.. सुमेधाचं दु: ख तिने उत्साहाच्या, सुखाच्या कोषाखाली अलवार लपवलं होतं.. मनाच्या गाभाऱ्यात साचलेलं तेच दु: ख आज ज्वालामुखी बनून बाहेर पडलं..
एके दिवशी ऑफिसमध्ये असतांना आलेला फोन हसऱ्या सुमेधाला अगतिक करून गेला.. डोळ्यांच्या कडा टिपत ती कॅफेट एरियात जाऊन बसली..
तिचा बदलेला रंग सगळ्यांसाठीच नविन होता.. तिला या अवस्थेत पाहून सुयशलाही चुकल्यासारखे वाटले..
खर तर इच्छा नव्हती पण एखाद्याचं दु: ख त्यालाही पाहवत नसल्याने तो तिच्याजवळ गेला..
" सुमेधा, ठिक आहात ना..? काही त्रास होतोय का..?" तिच्याजवळ जात सुयश म्हणाला..
आपुलकीने भरलेले त्याचे शब्द तिच्या हृदयाला अलगद जाऊन भिडले. ती आवेशाने त्याच्या कुशीत झेपावली.. तिच्या वागण्याने तो दचकून गेला.. अन् डोळयाची पापणी लवते न लवते तोच त्याने तिला मागे ढकळले.. आणि तो मागे सरसावला..
त्याचं असं वागणं जिवाला लागलं.. पण परिस्थितीचं भान राखत तिने डोळे पुसले.. पुढच्याच क्षणी भानावर घेत सुयश तिच्या जवळ गेला..
" आय अॅम सो सॉरी.. तुम्ही बसा.." टेबलावरचं पाणी तिला देत तो म्हणाला..
त्याच्या सॉरीने ती थोडी सुखावली..
" शांत व्हा.. आणि सांगा पाहू काय झाले..?" हातातला ग्लास घेत तो म्हणाला..
" खर तर आपलं दु: ख कमी करण्यासाठी कोणाचे सल्ले घ्यायचे मला पटत नाही.. पण तुम्हांला सांगायची मनापासून इच्छा आहे.. वरवर हसरी, अल्लड दिसणाऱ्या या मनावर दुभंगलेल्या पालकत्वाचे खूप आघात झालेत.. आईवडिलांचे एकमेकांवर प्रचंड प्रेम होते पण लग्नानंतर या प्रेमाची जागा कधी तिरस्काराने घेतली कळलं नाही.. रोजची भांडणं... वाद विवाद यात माझं बालपण हरवून गेलं.. घटस्फोट न घेता वेगळे राहून माझ्या तरुणपणात एकट्या पालकत्वाचं दु: ख डोक्यावर मारलं.. आणि आता तर अतीच झालय.. मी जणू बाहुली आहे यांच्या संसाराच्या खेळातली.. आणि मला मिळविण्यासाठी नको नको ते डाव खेळत आहेत दोघेही.. कंटाळले आता मी.. मला विभक्त राहायचे आहे.. दोघेही नकोत मला.." ती अगतिक होत म्हणाली..
" तुम्ही ज्या परिस्थितीतून गेल्या आहात त्या परिस्थितीचं दु: ख तुम्हांलाच जास्त माहित पण माणूस म्हणून फार वाईट वाटलं.. परंतु तुम्ही जो विभक्त राहण्याचा निर्णय घेतलाय तो मात्र पटला नाही.. दोन भावंड जेव्हा भांडतात तेव्हा आईवडिल त्यांना समजवतात त्यांना सोडून जात नाही.. आणि एवढे वादविवाद असूनही तुमचे आईवडिल वेगळे झाले नाहीत.. याचा अर्थ दोघांच्या मनात प्रेमाचा ओलावा अजून जिवंत आहे.. तुमच्या रुपात.. तुम्ही त्याच ओलाव्यातून त्यांच्या कोमेजलेल्या प्रेमाच्या झाडाला पालवी फोडावी अस वाटतं मला.. तुमच्यावर खूप जीव आहे त्यांचा.. तुम्ही मागितलं तर ते देतील त्यांचा एकत्र सहवास तुम्हांला.. आणि नाहीच तर हट्ट धरा तसा.. आईवडिलांकडे हट्ट नाही करायचा तर कुणाकडे करायचा... पण विभक्त व्हायची भाषा बोलू नका.. आयुष्यात आईचं नसणं अनुभवलय मी.. म्हणून सांगतो.." बोलता बोलता त्याने डोळ्यात आलेला अश्रू वरचेवर टिपला..
त्याचं बोलणं बोलणं नव्हतच.. ती प्रेमळ समज होती नाराज मनाला.. त्याचं बोलणं तिला पटलं.. डोळे पुसत काहीश्या निर्धाराने तिने त्याच्याकडे पाहिले..
" ठरलं तर.. आता मिशन 'मिलन'.. मी नक्की प्रयत्न करेन. हाच या समस्येवरचा प्रभावी इलाज आहे.. थँक यु सो मच सुयश..." त्याच्या हातावर हात ठेवत ती म्हणाली..
त्याने क्षणार्धात हात मागे खेचले..
" इट्स माय प्लेजर... चला आता कामाला लागा.." म्हणत तो उठला आणि केबीनमध्ये निघून गेला..
" साचलेलं 'डबकं' नाही.. हा तर भावनांचा सागर आहे.. मी प्रेमात पडतीये या सागराच्या.." त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत ती स्वगत झाली..
इकडे तिला समज देऊन तो केबिनमध्ये गेला.. पण कामात लक्ष लागेना.. सुमेधाचं त्याच्या कुशीत डोकावणं त्याला प्रज्ञाची आठवण करून गेले...
" ति ही अशीच शिरली होती कुशीत निरवानिरवीच्या क्षणी.. पण मी तिला नाकारले.. किती दुखावली असेल ती... पण मग माझ्या वेदनेचं काय..? तिनं नव्हतं वागायला पाहिजे असं.. खूप प्रेम केलं होतं तिच्यावर.. तिनेही केलं होतंच.. मग प्रेमाच्या मिलनाला तिने आभासी क्षितिज बनवलं एका क्षणात.. रंगाचं नाव देत माझं आणि स्वत: चं आयुष्यही बेरंगी करून ठेवलं.. मला माहित आहे आज ही तु स्वत: ला दूषण देत बसली असशील... सगळ्यांच्या गर्दीत तु ही माझ्यासारखीच हरवली असशील.. तुझ्या प्रत्येक आठवणीत मला जपत असशील.. पण त्या आठवणी आणि तो नकोसा एकांतवास हिच तुझी शिक्षा.. आणि माझीही.. तुझ्यावर प्रेम केल्याची शिक्षा.." भावूक मनाला सडेतोडपणे समजावत तो पुन्हा कामाला लागला.. मनाला समजावण्याची सवय झाली होती त्याला..
पण इकडे सुमेधा मात्र हरवली होती त्याच्या प्रेमात.. प्रेम असच तर असतं ना.. सहवासातून फूलत जाणारं.. फुलता फुलता त्याच्या सवयी, त्याचे विचार मनात आनंदाचा बहर घेवून येतात.. आणि मनावरचा ताबा सुटतो.. ते गुंतत जाते.. त्याचे कायमचे होऊन राहते.. सुमेधा सध्या हेच अनुभवत होती.. त्याच्या बोलण्याप्रमाणे तिने आईवडिलांमधील दुरावा दूर करायला सुरवात केली होती.. त्यात यशस्वीही होत होती.. मन आनंदाच्या पावसात चिंब भिजत होतं.. त्या अधीर सरितेला आता निळ्या सागराची ओढ लागली होती.. प्रेमाची कबुली देऊन सुयशला कायमचं आपलं करून घेण्याची घाई झाली होती..
वर्षभराच्या त्या काळात त्यांनी केलेल्या प्रोजेक्टला घवघवीत यश मिळाला.. हाच आनंद आपल्या सहकाऱ्यांसोबत वाटण्यासाठी त्याने फ्लॅटवर छोटेखानी पार्टीचं आयोजन केलं.. म्हणजे प्रोजेक्ट हेड म्हणून ते गरजेचं होतं.. नाहीतर इच्छा अजिबात नव्हती..
हिच योग्य वेळ आहे त्याला आपल्या प्रेमाची कबुली देण्याची.. सुमेधाने ठरवले..
खर तर ती बिनधास्त होती.. तेवढ्याच बिनधास्तपणे बोलू शकली असती पण तिने सुयशच्या कलेने घ्यायचे ठरवले.. लालगर्द गुलाबाच्या फुलांच्या बुके मध्ये प्रेमाची कबुली दिलेली चिठ्ठी ठेवून तिने सरप्राइज देण्याचे ठरवले..
ठरल्याप्रमाणे सरत्या संध्याकाळी सगळे सहकारी त्याच्या घरी जमले.. खाण्यापिण्याची सगळीच सोय केली होती.. लाल रंगाच्या साडीमध्ये सुमेधा गुलाबाचं फुलच वाटत होती.. तिला पाहताच साऱ्यांचे भान हरपले. पण ज्याच्यासाठी सजली होती तो मात्र तिच्याकडे पाहतही नव्हता... शेवटी तिनेच पुढाकार घेतला.. त्याच्या जवळ जात बुके दिला..
" थँक यु.." एवढच बोलून त्याने तो बाजूला ठेवूनही दिला..
सुमेधा हिरमुसली. पुन्हा मनाला धीर देत पार्टीत सामील झाली. पार्टी अगदिच रंगात आली असतांना सगळ्यांसमोर एका सहकार्याने त्याच्या महिल्या सहकाऱ्याला प्रपोज केले.. तिनेही हसत हसत प्रपोजल स्विकारले.. टाळ्यांचा कडकडाट आणि शॅम्पेनच्या पावसाने दोघेही भिजले.. क्षणभर सुमेधालाही वाटले आपण पण बोलावे सगळं.. पण सुयशचं वेगळेपण जपत तिने स्वत: च्या भावना आवरल्या..
सुयशला मात्र त्या क्षणी प्रज्ञाची आठवण झाली..
"आपण पण असेच प्रपोज केले होते तिला.. किती सुखावलो होतो आपण तिच्या होकाराने..पण..."
स्वगत होत कधी नव्हे तर त्याने मद्यपान केले.. दु: खाचा विसर पडतो म्हणे त्याने.. पीत नसल्याने थोडीशी मदिराही जास्तच झाली होती..जेवणखाण झाल्यावर हळूहळू सारेजण निघाले.. सुमेधा एकटीच काय ती थांबली होती.. निदान आता तरी आपल्या मनातलं सांगावं या हेतुने ती त्याच्या जवळ आली..
" सुयश...." ती बोलणार तोच तिला खुर्चीत बसवून तिच्या पुढत बसत त्याने तिचा हात घट्ट पकडला..
" आय अॅम सॉरी गं.. मी असं नव्हतं वागायला पाहिजे.. किती बोललो मी तुला.. तुझा फक्त तिरस्कार केला.. माझ्या कुशीत विसावलेलं तुझं प्रेम मी नजरेने नाकारलं.. पण आतून मी ही तुटत होतो.. किती कठोर वागलो तुझ्याशी.. पण तु गेल्यावर स्वत: ला दोष देत खूप रडलो गं... स्टिल आय लव्ह यु प्रज्ञा.. आय लव्ह यु सो मच.. पण तुझ्यामुळे माझी आई गेली त्याचं काय करू मी...? तुझ्या स्वाभिमानाची शिक्षा तिला का....?" तिच्या ओंजळीत तोंड लपवून तो रडू लागला..
भान हरपलं होतं.. मद्यपानही झेपत नव्हतं.. सुमेधाला प्रज्ञा समजून तो मन मोकळं करत होता..
त्याचा भूतकाळ ऐकून सुमेधा अवाक् झाली.. त्याच्या बेरंग दुनियेचं कारण तिला कळलं होतं.. प्रज्ञा या एका नावासरशी तिचंही काळीज गलबललं.. या आधी ही अफेयर आणि ब्रेक अपही झालं होतं तिच..पण सुयशच्या बाबतीत तिच्या भावना खूपच शुद्ध होत्या त्यामुळे प्रेम गमावण्याचं दु:ख काय असते हे आज तिला कळत होतं..
आपला हात सुयशच्या हातातून काढून घेत ती खुर्चीवरून उठली..
" सुयश, सावर स्वत: ला.. मी सुमेधा आहे.. प्रज्ञा नाही.." ती म्हणाली.
तसा सुयश पटकन भानावर आला..
" आय अॅम सो सॉरी सुमेधा.. आय अॅम सॉरी.." म्हणत तो पटकन मागे वळला.
" इट्स ओके.. मी येते.. भेटू उद्या.." म्हणत भरल्या मनाने ती बाहेर पडली..
मदिरेची नशा क्षणात उतरली..
"मी सांभाळायला हवे होते स्वत: ला....." तोंडावर पाणी मारत तो स्वगत झाला..
बिछान्यावर पडला. पण झोप येत नव्हती..
आपलच वागणं छळत होतं त्याला...
"काय वाटलं असेल सुमेधाला..? मी एवढं वाहत नव्हतं जायला पाहिजे.."
मनात फक्त त्याच विचारांची गर्दी झाली होती.. झोप तर लागणं शक्यच नव्हती.. कधी एकदा सकाळ होते आणि सुमेधाची माफी मागतो असे झाले होते त्याला.. तो तसाच उठला आणि बाल्कनीत जाऊन बसला.. विचारांच्या तंद्रीत असतांना लक्ष टेबलावरच्या बुकेवर गेलं.. त्यातील चिठ्ठीने त्याची नजर वेधली.. तो तसाच उठला आणि चिठ्ठी उघडत वाचता झाला...
" मी झंझावाती वादळ तु वाऱ्याची मंद झुळूक होशील का..?
मी वळणे घेत वाहणारी नदी तु मला सामावून घेणारा सागर होशील का...?
मी सौंदर्याची शाल ल्यालेली धरा तु मला पांघरणारा आभाळ होशील का....?
मी सगळ्यांना उरून पुरणारी धारदार तलवार तु कुशीत घेणारी म्यान होशील का...?
मी तळपतं ऊन्ह तु गुलमोहरापरी माझ्या उन्हात बहरशील का..?
सांग माझा होशील का..?
आय लव्ह यु सुयश....
सुमेधा❤️
त्या चिठ्ठीतील प्रत्येक शब्द अश्रू बनून कागदावर ओघळला.. "
अशीच होतीस तु प्रज्ञा.. मला सांभाळून घेणारी.. माझा अल्लडपणा जपणारी, स्वत: मायेचा सागर बनून मला सामावून घेणारी.. तु माझं अस्तित्व होतीस गं.. पण क्षणात सगळच संपलं.. हा क्षण का आला आयुष्यात..? हे सारं भयानक स्वप्न असावं आणि सुखाची पहाट होऊन सगळं पूर्ववत व्हावं.."
तो स्वगत होत कितीतरी वेळ त्या चिठ्ठीकडे पाहत होता.. पत्र सुमेधाचं होतं.. पण त्याच्या विचारात सुमेधा कुठेच नव्हती.. प्रज्ञाला जपलेल्या त्याच्या हृदयात अजूनही तिच होत.... अगदी विचारातही..
विचारांच्या धुंदीतच तो थकला आणि तिथेच खुर्चीवर झोपेच्या आधीन झाला....
सकाळी उशीरा जाग आली.. सुट्टी असल्याने तो निवांत होता..
घराची स्वच्छता करत असताना पुन्हा ती चिठ्ठी त्याच्या हाती लागली.. सुमेधाचं नाव वाचून शुद्धीत असतांनाही त्याची शुद्ध हरवली..
तिच्या भावना बुद्धीवर आरूढ व्हायच्या आधी तिच्या मनातून आपल्याला काढून टाकावे. अन्यथा विरहाचा जो त्रास आपण सहन करत आहोत तोच तिच्या वाट्याला येईल... वेळीच तिला सावरायला हवे या विचारात त्याने तिला भेटण्याचा निर्णय घेतला... कालची गिल्ट मनात होतीच.. फोन करून त्याने तिला कॅफे मध्ये भेटायला बोलावले.. ठरल्याप्रमाणे ती आलीही.. तिला कसे सांगायचे या दुविधेत असतांनाच तिने स्वत:हून विषयाला हात घातला..
" सुयश, मला माहित आहे तुमचं माझ्यावर प्रेम नाही आणि तुम्ही ते करावं ही जबरदस्तीही नाही.. खरं तर प्रज्ञा खुप नशिबवान आहे.. काल खूप राग येत होता तिचा.. मग विचार आला.. तुमच्या सारख्या सुंदर हृदयात वसलेली ती अतिव सुंदर असेल मनाने.. राग गळून पडला त्याक्षणी.. तुमच्यामध्ये काय घडलं..? का घडलं..? माहित नाही..पण कदाचित देव परिक्षा पाहत असेल तुमच्या प्रेमाची...निरापेक्ष प्रेम असं सहज मिळत नाही.. शक्य असल्यास सावरून घ्या विस्कटलेला तुमचा प्रेमाचा डाव.. आणि असं एकट्याने नका सहन करू सगळं.. एक मैत्रिण म्हणून...मन मोकळं करायला नक्कीच माझी आठवण ठेवा..यापुढे आपल्यात फक्त निरपेक्ष मैत्री असेल.. माझ्या प्रेमाचं ओझं मनावर लादून घेऊ नका.. कारण प्रेम जेव्हा ओझं वाटतं तेव्हा सहवासही नकोसा होतो. तुमचा सहवास मैत्रीच्या रुपात जपायचा आहे.. येते.. भेटूया उद्या ऑफिसमध्ये.." म्हणत ती उठली आणि निघून गेली..
ती भावनांनी भरलेल्या पावसासारखी आली... आणि सहज बरसून गेली...
तिच्या सरींनी तो सुखावला... प्रेमाला नवा अर्थ देणारी सखी, मैत्रीण भेटली होती त्याला..
क्रमश:
©® आर्या पाटील
*******************************************
लिखाणात चुका असल्यास क्षमस्व..