# रंग माळियेला....( भाग २७ वा)
©® आर्या पाटील
सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.
*******************************************
तिरस्काराच्या रुपात का होईना पण रोजच तिला आठवित त्याचे आणि पश्चातापाच्या अश्रूंनी रोज त्याची माफी मागत तिचे आयुष्य सरत होते... मनाची अवस्था नाजूक असूनही संयम ढळू दिला नाही.. तिने आदित्यला आणि त्याने सुमेधाला मैत्रीच्या बंधनात बांधत स्वत: च्या हृदयाला एकमेकांच्या प्रेमाची लक्ष्मणरेषा घालून दिली होती.. आपल्या काळजावर दगड ठेवून त्या दोघांनीही त्यांच्या निर्णयाचा सत्कार केला.. आदित्य मित्र बनून प्रज्ञाच्या समस्या सोडविण्याचा, तिला मदत करण्याचा प्रयत्न करत असे तर सुमेधाही मैत्रीण बनून सुयशच काहिसं सिरियस जीवन हलकं फुलकं बनविण्याचा प्रयत्न करे.. सुयशनेही मैत्री निभावत तिच्या आईवडिलांना एकत्र आणण्यासाठी मदत केली.. आणि सुमेधाच्या एकाकी आयुष्यात माता पित्यांच्या प्रेमाचे एकत्रित रंग भरले.. प्रज्ञानेही आदित्यच्या साथीने वृद्धाश्रमाचा वटवृक्ष चांगलाच भरभक्कम केला होता.. समाजसेवेचं व्रत निष्ठेने करत तिने मनाला नव्याने उभारी दिली होती.. सगळ्यात महत्त्वाचं सुयशच्या पश्चात तिने निलयच्या आईवडिलांप्रती त्याचं कर्तव्यही पार पाडलं होतं.. वर्षातून निदान एक फेरी मारून ती त्यांना भेटायची सुद्धा.... कधीतरी रामरावांना जाऊन भेटावे असेही मनात यायचे पण पुन्हा त्या वाटेने नको म्हणून मनाला आवर घालायची.. अलिकडे घरी ती फक्त आईसाठीच जायची.. विलासरावांनी तर तिला मुलगी माननेच सोडून दिले होते.... पण ती तिच्या कर्तव्यात कुठेच मागे पडत नव्हती.. विलासरावांची एकच इच्छा होती तिने लग्न करावे आणि मग समाजकार्य.. परंतु तिने लग्नाला ठाम विरोध करत समाजकार्यात वाहून घेतलं..
इकडे सुयशच्या बाबांनी रामरावांनी स्वत: ला सावरलं होतं.. पत्नी गेली आणि त्यानंतर सुयशही परदेशात निघून गेला.. सुरवातीच्या काळात त्यांना खूप जड गेले.. परिस्थितीशी समायोजन साधत त्यांनी पहाडाएवढ्या
दु:खातुन स्वत: ला सावरलं.. सरलाताईच्या आठवणी, मित्र परिवाराचा सहवास, घरापुढील बागायत यात गढून घेत स्वत: ला गुंग ठेवलं..
दु:खापासून दूर राहायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टीत सुख शोधा या उक्तीप्रमाणे त्यांनी स्वत: ला सावरले होते..
जवळजवळ चार वर्षांच्या कालावधीत ते खूपच सकारात्मक बनले होते.. दरम्यानच्या काळात सकाळी मॉर्निंग वॉकला जातांना त्यांना मिस्टर पाटील यांच्या रुपात एक नवा मित्र भेटला होता.. अगदिच जीवाभावाचा मित्र...
जीवनाच्या प्रवासात मित्र आणि मैत्रिणी दिपस्तंभासारख्या असतात... आपल्या भरकटलेल्या जीवनरूपी जहाजाला किनार्यापर्यंत पोहचवायला दिशादर्शक ठरतात..
मिस्टर पाटीलही रामरावांसाठी दिशादर्शक ठरले..
पण गेल्या आठ दिवसांपासून मिस्टर पाटील यांच मॉर्निंग वॉकला येणं बंद झालं होतं.. रामरावांना चैन पडेना.. मित्र ठिक असेल ना हा विचार करत त्यांनी त्यांच्या घरी जायचे ठरवले.. त्यांनी सांगितलेल्या पत्त्याप्रमाणे रामरावांनी त्यांचे घर गाठले..
दारात त्यांच्या सुनबाई उभ्या...
" मिस्टर पाटील यांना भेटायचे होते.." रामराव म्हणाले.
" ते नाही राहत आता इथे.. त्यांना वृद्धाश्रमात ठेवलय.. आमच्यासोबत नाही जुळत त्यांच.. रोज रोज भांडण्यापेक्षा वेगळे राहिलेलं सुखाचं.." सुनेने निर्लज्जपणे उत्तर दिले..
तिच्या उत्तराने रामराव क्षणभर हादरले..
" पण बेटा.. जुळत नाही म्हणून आईवडिलांना वृद्धाश्रमात कोणी ठेवतं का..?" रामराव समज देत म्हणाले..
" ओ काका.. ते माझे सासू सासरे आहेत आई वडिल नाहीत.. आणि तुम्ही सांगणारे कोण..? आम्ही कुठेही ठेवू.. नुसता त्रास होता दोघांचा.. सततची लुडबूड. कसलं स्वातंत्र्य नाही की आराम नाही.. संसारातून काढता पाय घ्यायची इच्छा होत नव्हती त्यांना.." ती रागातच म्हणाली..
" स्वत: च्या स्वातंत्र्यासाठी असं स्वैराचाराने वागतांना तुमच्या भविष्याचा ही विचार करा.. तुम्हीही म्हातारे होणार आहात.." म्हणत रामरावांनी काहिही न ऐकता तेथून काढता पाय घेतला..
आईवडिलांना ओझं मानणाऱ्या त्या नवरा बायकोचा त्यांना रागही आला आणि कीवही.. खरं तर मिस्टर पाटील यांनी घरच्या रामायणाची कल्पना आधीच दिल्याने रामरावांनी त्यांच्या सुनेला खडेबोल सुनावत योग्य तो इशारा केला..
इकडे वृद्धाश्रमाचा पत्ता शोधून ते तिथे पोहचले..
योगायोगाने प्रज्ञा सांभाळत असलेल्याच वृद्धाश्रमात ते होते..
प्रज्ञा लॅपटॉपवर काम करत ऑफिसमध्ये बसली होती..
" नमस्कार, मी रामराव माने.. मला मिस्टर पाटील यांना भेटायचे आहे.." रामराव म्हणाले..
रामराव माने या शब्दांसरशी ती त्यांच्याकडे पाहू लागली..त्यांच्या रुपात जणू गतकाळच समोर उभा होता..
" परक्या माणसांना पुन्हा आत घेवू नका.." सुयशचे त्या दिवशीचे शब्द आठवले आणि ती पटकन भानावर आली..
" बाबा तुम्ही..?हो आहेत मिस्टर पाटील... तुम्ही बसा ना... मला ओळखलत..?" अगदिच हळवी होत ती म्हणाली..
रामरावांनीही तिला ओळखले..
" बेटा, तु इथे..? म्हणजे या वृद्धाश्रमाचा कारभार तु सांभाळतेस..?" बसत रामराव म्हणाले..
" हो बाबा.. गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न करते आहे.. तुम्ही ठिक आहात ना..?" प्रज्ञा म्हणाली..
" हो ठिक आहे.. ठिकच रहावे लागेल.. नाहीतर परदेशवारीची भीती घातली आहे चिरंजीवाने.." रामराव म्हणाले..
त्यांच्या बोलण्याने सुयश जसाच्या तसा मनात साकारला तिच्या.. थोडावेळ शांततेत गेला..
" प्रज्ञा, बेटा... लग्न नाही केलस..?" रामराव म्हणाले.
प्रज्ञाने फक्त नकारार्थी मान हलवली.. कुठेतरी रामरावांच्या मनात पुन्हा एकदा पालवी फुटली..
" सुयशबद्दल नाही विचारणार..?" ते म्हणाले..
तिची नजर पुन्हा भरून आली.. दुसऱ्याच क्षणी तिने डोळे पुसले..
" ठिक आहे तो.. निदान असच म्हणतो रोज फोन केल्यावर.. पण त्याच्या आवाजातली आर्तता जाणवते.." रामराव म्हणाले..
प्रज्ञा मात्र अजूनही शांतच होती.. काय बोलणार आणि विचारणार होती ती..? तिच्यामते त्यांच्या आयुष्यात वादळ बनून खूप काही उद्धवस्त केलं होतं तिने..त्याचं व्यवस्थापन करण्याची हिंमत नव्हती तिच्यात..
तिची हतबलता रामरावांनी ओळखली..
" कामाचं राहूनच गेलं बघ.. मिस्टर पाटील यांना भेटायचं होतं.. भेटू शकतो का..?" विषय बदलत ते म्हणाले..
" हो हो.. या मीच घेवून जाते तुम्हांला.. खूप गुणी जोडपं आहे. मला तर मुलीसारखी माया करतात.... तुम्ही कसे ओळखता त्यांना..?" त्यांच्या रुमकडे रामरावांना घेऊन जातांना प्रज्ञा म्हणाली..
रामरावांनी त्यांच्या मैत्रीची गोड कहानी सांगत रूमपर्यंतचे अंतर पार केले...
समोर दोघेही दांम्पत्य कामात व्यस्त बसले होते.. मिस्टर पाटील पेपर वाचण्यात आणि मिसेस पाटील वीणकाम करण्यात..
रामरावांना पाहून त्यांना खूप आनंद झाला.. आपला मित्र आपल्याला इथपर्यंत भेटायला आला या विचाराने त्यांना भरून आले..
यालाच तर मैत्री म्हणतात सुख दु:खात सोबत असलेली..
दहा दिवसांपासून न भेटलेले ते जणू काही वर्षानंतरच्या भेटीचा आनंद लुटत होते.. मिसेस पाटील आणि प्रज्ञाही दोघांना आनंदात पाहून भारावून गेल्या होत्या..
" बाबा, तुम्ही बोला.. मग भेटूया आपण. मी आहे ऑफिसमध्ये.." त्यांना निरोप देत प्रज्ञा ऑफिसमध्ये निघून गेली...
" खूप गुणाची पोरगी आहे ही..? जेवढं प्रेम, माया आमच्या मुलाने नाही दिली तेवढा जीव या परक्या मुलीने लावला.. असं वाटतं बरं झालं आमच्या सुनेला सुबुद्धी सुटली आणि आम्हांला इथे पाठवलं.. वृद्धाश्रम फक्त नावाला हे आमचं घरच आहे.. आम्हांला आम्ही आहोत तसं स्विकारणारं.." मिसेस पाटील म्हणाल्या..
" प्रज्ञा, आहेच गुणाची.. तिच्या मायेला तोड नाही.." रामराव अनाहूतपणे बोलून गेले..
" पण, तु कसा ओळखतोस तिला..? नातेवाईक आहे का..?" मिस्टर पाटील म्हणाले.
" माझ्या मुलीसारखीच आहे ती.. आमच्या सुयशची मैत्रीण आणि.." रामराव बोलता बोलता थांबले..
" का रे..? का थांबलास..?" मिस्टर पाटील म्हणाले.
" ती माझी मुलगीच आहे असं समज.." रामराव म्हणाले..
" आदित्यही खूप चांगला मुलगा आहे बरं.. तो ही जीवापाड जपतो सगळ्यांना.." आदित्यची ओळख करून देत मिस्टर पाटील म्हणाले.
" हा आदित्य कोण..?" रामरावांनी प्रश्न केला.
" प्रज्ञा आणि आदित्य दोघेही मिळून वृद्धाश्रमाचा कारभार सांभाळतात.. आम्ही तर आताच आलो आहोत पण इथे आधीपासून राहणारे त्यांना लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणतात.. सगळ्यांची म्हणजे आमचीही इच्छा आहे दोघांनी लग्न करावं.. पण पोरं मनावर घेत नाहीत.." हसत मिस्टर पाटील म्हणाले..
रामरावांचा चेहरा पडला.. दुधात मीठाचा खडा पडावा तसा आदित्य त्यांना वाटू लागला..
" असं कोणी लग्न करतं का..? आणि तुमचं आपलं काहीही.. त्यांच्या मनात असं काहीच नसेल आणि तुम्ही मनातल्या मनात त्यांना लग्नाच्या बोहल्यावर चढवलेही.." रामराव गंभीरपणे म्हणाले..
" अरे पण तु का रागावतोस..? असेल नशिबात तर होईल त्यांच लग्न. पण आपण का भांडतोय..?" म्हणत मिस्टर पाटील यांनी विषय बदलला.. पण रामरावांच्या डोक्यातून आदित्य काही बाहेर पडत नव्हता..
" उद्या, पुन्हा भेटूया.." निरोप घेत रामराव निघाले आणि ऑफिसमध्ये पोहचले.. एव्हाना आदित्यही ऑफिसमध्ये पोहचला होता.. त्यांना एकत्र काम करतांना पाहून रामरावांना वाईट वाटलं..
" खरच, यांनी लग्न केलं तर..?" मनातल्या प्रश्नाला मनातच नकार देत ते ऑफिसमध्ये पोहचले..
प्रज्ञाने रामरावांना आदित्यची ओळख करून दिली.. मनात नसूनही रामराव उसणं अवसान आणून त्याच्याशी बोलत होते.. पण मनात त्याच्याविषयी कुठेतरी अडी मात्र निर्माण झाली होती..
" प्रज्ञा, मी इथे मिस्टर पाटील यांना भेटायला रोज आलो तर चालेल का..? घरात एकटेपणा खायला धावतो.. तेवढाच मनाला आधार.." अगतिक होत रामराव म्हणाले.
" बाबा, मी ही आहे.. फक्त त्यांनाच का मलाही भेटायला या रोज.. घरच समजा तुमचं.. हो की नाही आदित्य..?" आदित्यकडे पाहत प्रज्ञा म्हणाली.
" हो हो.. नक्कीच.. तुम्ही खरच येत जा रोज.." लॅपटॉप पाहतच आदित्य म्हणाला..
त्याच्याकडे पाहून रामराव उगाचच हसले आणि निरोप घेत तिथून निघाले..
घरी पोहचल्यावरही आदित्य त्यांच्या डोक्यातून निघत नव्हता..
" प्रज्ञा अजूनही सुयशची वाट पाहत असेल का..? म्हणून तिने अजून लग्न केले नसेल का..? मग आदित्यचं काय..? मला तिच्याशी बोलावं लागेल.. सुयशचं भविष्य, त्याचं सुख फक्त तिच्या सहवासात आहे आणि माझ्या लेकासाठी आदित्यरूपी वादळ मला थोपवावं लागेलच.. त्याच्याशी स्पष्टपणे बोलून वा अस्पष्टपणे.." मनाशी ठरवत आता रामराव रोजच वृद्धाश्रमात जाऊ लागले. अगदी कमी दिवसातच तिथल्या वातावरणाचा लळा लागला त्यांना.. आदित्य विषयी असलेला गैरसमजही हळूहळू दूर होत होता.. आपण उगाचच याला वाईट समजलो.. शल्य बाळगत रामरावांनी आदित्यशीही चांगली गट्टी केली. हक्काचा आधार दोघांनाही मिळाला होता जणू..
विलासरावांचे प्रज्ञाशी वागणे समजल्यावर तर रामराव आणखी हळवे झाले..
" प्रज्ञा, बाकी मला काही माहित नाही.. या क्षणापासून तु माझी मुलगीच आहेस.. हा बाप हक्काने तुझ्या पाठीशी उभा असेल.." खंबीरपणे रामराव मिळाले..
प्रज्ञाला आभाळ ठेंगणं झालं जणू.. बापाच्या रुपात एक हक्काचा आधार मिळाला होता तिला.. या साऱ्यांत बापलेकीचं हे सुंदर नातं परिपक्व बनत होतं.. रामरावही प्रसन्न राहत होते.. वृद्धाश्रमाविषयी सुयशला त्यांनी सगळं सांगितलं पण प्रज्ञाविषयी सांगण्याचे टाळले.. कदाचित तो विरोध करेल या हेतूने त्यांनी ते लपविले.. तो लवकर परतावा आणि पुन्हा सगळं सुरळित व्हावं ही आशा त्यांना जगण्याची नवी दिशा देत होती.. रामरावांची प्रसन्नता सुयशला बोलण्यातून जाणवत होती.. बाबा खुश आहेत यातच त्याला आनंद मिळत होता...
पाच वर्षांचा कालावधी हळूहळू संपत होता... सरत्या काळासोबत देशात परतण्याची, घरट्यात परतण्याची ओढ सुयशला अगतिक करून जायची..
बघता बघता पंधरा दिवस उरले.. पंधरा दिवसांत तो देशात परतणार होता..
सुमेधाला मात्र वाईट वाटत होतं.. मनात वेडी आशा होती की सहवासाने मैत्रीचं रुपांतर प्रेमात होईल पण ती आशाही खोटी ठरली होती.. त्याच्यासोबत घालवलेले सुंदर क्षण आठवणींच्या रुपात जपायचे असे मनाशी ठरवून ती उरलेल्या सहवासाचा आनंद घेत होती..
तिच्या घरच्यांसोबतही सुयशचं बोलणं होत होतं.. तो जाणार म्हणून तिच्या आईवडिलांनी त्याला जेवण्यासाठी बोलावलं.. खर तर त्याची मनापासून इच्छा नव्हती पण त्यांच्या आग्रहाला त्याला टाळता आले नाही..
दुसऱ्या दिवशी तो त्यांच्या घरी गेला.. ओळख होतीच त्यामुळे त्यांच्यात मिसळणं सोपं गेलं.. जेवणं आटोपल्यावर एकत्र निवांत वेळ घालवत बागेत बसले असतांना सुयशने विषय काढला..
" सर, खरं तर मी तुमच्या मुलासारखा आहे पण एक विनंती करतो.. सुमेधा जरी बिनधास्त असली तरी खूप हळवी आहे.. तिचं हळवेपण तुमच्या प्रेमात आहे.. तुमचं एकत्र असणं तिचं स्वर्गसुख आहे.. आणि प्रेम ही सुंदर भावना आहे.. आपल्या जोडीदाराच्या आवडी निवडी, आचार विचार यासोबतच आत्मसन्मान जपणं ही महत्त्वाचं आहे.. जिथे प्रेम आहे तिथे तडजोड ही आलीच. आणि आपल्या माणसांसाठी ती करावी. कारण एकदा नातं तुटलं की सर्वात जास्त त्रास आपल्याच माणसांना होतो.. हे सुंदर नातं जपा.." तो भावनिकतेने म्हणाला..
साऱ्यांचेच डोळे पाणावले.. तोंड वळवत सुमेधानेही अश्रू टिपले.. भावनांची आदानप्रदान झाल्यावर सुयशने त्यांचा निरोप घेतला.. सुमेधा त्याला गाडीपर्यंत सोडण्यासाठी त्याच्यासोबत बाहेर गेली..
" सुयश, थँक यू सो मच... माझा एवढा विचार केल्याबद्दल ... आणि जे मम्मा पप्पांना सांगितल ते तुलाही लागू होतं.. नातं तुटण्याचं दु: ख रोज पाहिलय मी तुझ्या डोळ्यांत.. एकमेकांचा आत्मसन्मान जपत शक्य असल्यास जोडण्याचा पर्यंत कर ते.. कारण नितळ प्रेम पुन्हा पुन्हा मिळत नाही.." त्याचा हात पकडत ती म्हणाली आणि दुसऱ्याच क्षणी त्याची कुशीत विसावली.
त्या दिवशी सारखचं त्याने दुसऱ्याच क्षणी तिला दूर लोटलं.. आणि मागे झाला..
" मी तुझ्या जीवनात आले पण तुझ्या हृदयापर्यंत नाही पोहचू शकले.. कारण अजूनही तु प्रज्ञावर खूप प्रेम करतोस.. आणि करत राहशील.." त्याचा हात हातात घेत ती म्हणाली..
" आय अॅम सॉरी सुमेधा.. निघतो. खूप उशीर झालाय.." तिच्या डोक्यावर हात ठेवत त्याने विषय बदलला.. आणि दुसऱ्याच क्षणी तिचा निरोप घेत गाडीत बसला..
त्याची दूर दूर जाणारी गाडी कितीतरी वेळ पाहत सुमेधा तिथेच थांबली होती..
इकडे गाडीत बसलेला सुयश सुमेधा कडून जगण्याचा मूलमंत्र घेऊन जात होता...
घरी पोहचल्यावर रामरावांशी बोलून झोपावे या हेतूने त्याने कॉल लावला.. खरं तर खूप रात्र झाली होती पण भारतात सकाळचे अकरा वाजले असतील या हेतूने त्याने कॉल केला..
रामराव वृद्धाश्रमात आले होते. आपल्या नव्या मित्रांसोबत कॅरम खेळण्यात गुंग असलेल्या रामरावांनी फोन ऑफिसमध्येच ठेवला होता..
फोन वाजताच प्रज्ञाचे लक्ष गेले..
सुयशचे नाव वाचून मनाला आठवणींची पुन्हा भरती आली.. पाच वर्षांपासून न पाहिलेला,परदेशात असलेला सुयश एक फोनआड दूर होता.. मनाची घालमेळ तिला स्वस्थ बसू देत नव्हती..
त्याचा आवाज ऐकून मनाची तृषा क्षमवावी अशी प्रबळ इच्छा झाली आणि तोच फोन बंद झाला..
अगदी पाच मिनिटे तशीच शांततेत गेली..
पुन्हा एकदा कॉल आला.. आपल्या चारी बाजूंना पाहत प्रज्ञाने थरथरत्या हातांनी फोन रिसिव्ह केला...
" हॅलो, बाबा.. बरे आहात का..? एवढा उशीर का लागला फोन उचलायला..? कामात होता का..?" सुयश म्हणाला..
त्याचा प्रत्येक शब्द तिच्या मनाच्या धरतीवर पाऊस बनून कोसळत होता जणू.. शुष्क झालेल्या तिच्या मनाला सहवासाचा दरवळ सुटला.. पहिल्या पावसात दरवळलेल्या मातीसारखा.मनाची तृप्ती अनुभवत होती ती. त्याच्या शब्दसरींनी तृप्त होत होती.
" बाबा.. हॅलो बाबा.. ऐकता ना..? माझा आवाज येतोय ना..?" सुयशच्या शब्दांनी ती भानावर आली..
काहीच प्रतिउत्तर नाही म्हणून त्याने फोन ठेवला..
बेमोसमी पावसासारखा तो बरसला आणि शांत झाला जणू..क्षणभर ती सुखावली पण दुसऱ्याच क्षणी आठवणींनी तिच्या मनाची लाही लाही होऊ लागली..
तोच फोन पुन्हा आला..
ती तशीच धावली आणि फोन रामरावांना नेवून दिला.. आणि ती ऑफिसमध्ये परतली.
सुयशचा फोन पाहून रामरावांनी लगेच उचलला.
" बाबा, आता येतो का आवाज..? मघाशी फोन उचलला तुम्ही पण आवाजाच येत नव्हता.." सुयश म्हणाला.
फोन नक्कीच प्रज्ञाने उचलला ही गोष्ट रामरावांना सुखावून गेली.. एक आशेचा किरणच दिसला जणू.
" अरे, नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्यामुळे..तु बोल." रामराव आनंदाने म्हणाले..
" बाबा, मी पुढच्या सोमवारी येतोय.. आजच तिकिट बुक केलं आहे.." म्हणत त्याने रामरावांच्या आनंदाला आणखी उधाण आणले..
त्याच्याशी बोलून रामरावांनी फोन ठेवला..
पाच वर्षांत पहिल्यांदाच रामराव एवढे खुश झाले होते.. दुग्धशर्करा योग होत जणू तो त्यांच्यासाठी.
क्रमश:
©® आर्या पाटील
*******************************************
लिखाणात चुका आढळल्यास क्षमस्व.