Login

रंग माळियेला...( भाग ३० वा)

Love story of Pradnya and Suyash... Exploring new horizon of love beyond the colour..

# रंग माळियेला..( भाग ३० वा)

©® आर्या पाटील

सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.

*******************************************

सकाळी विलासरावांशी खटका उडूनही आजचा दिवस तिला प्रफुल्लित वाटत होता.. सुयश आज स्वत:हून बोलला होता तिच्याशी, तिच्या जवळ बसत सांत्वन केलं होतं तिचं त्याने.. आज भर उन्हात त्याच्या गोड आठवणींच्या सरीत चिंब भिजत होती ती..

त्याच्या सहवासातल्या त्या गोड आठवणी मनाच्या आभाळावर रूंजी घालत होत्या.. त्याच्यासोबत घालवलेले गोव्यातले ते सोनेरी दिवस, त्यानंतर इकडे मुंबईतही त्याच्या सहवासात फुलत गेलेलं त्याचं नातं, दापोलीच्या समुद्र किनारी त्याने मिठीत घेतलेले ते चिंब क्षण, त्याने दिलेली प्रेमाची प्रांजळ कबुली, तिनं रंगाचं कारण पुढे करून नाकारलेली त्याची प्रीत, वैदेही चे अचानक येणं.. सुयशला वैदेही सोबत पाहून तिने दिलेली प्रेमाची कबुली.... सर सर करत त्यांचा प्रेमपट तिच्या डोळ्यासमोर तरळून गेला..

त्यानंतरच्या कटू आठवणीही मागेच आल्या पिच्छा पुरवित पण आता तिने त्यांचा प्रवेश निष्धिद केला आणि मनाची कवाडं कायमची बंद करून घेतली त्यांच्यासाठी. अपूर्ण राहिलेली प्रेमकहाणी पूर्ण करण्याची हिच वेळ होती.. तिने मनाला खंबिर केले ... आणि तिरस्कार आणि प्रेमाच्या द्वद्वांला तयार झाली..

आता खूप काही बदललं होतं.. पण त्या बदलाला स्विकारत, स्वत: ला बदलत सुयशला जिंकायचे होते..

रामरावांनी तिचं अर्ध काम पूर्ण केलं होतं.. वृद्धाश्रमात त्यांना सोडायची आणि पुन्हा घ्यायला येण्याची जबाबदारी सुयशवर टाकत त्यांनी सुयश आणि प्रज्ञाला रोजच भेटण्याचे प्रयोजन केले..

सुयशने प्रज्ञाला माफ केलं होतं असं नाही पण तिला त्रास होऊ नये म्हणून तो प्रयत्नशील होता..

आता रोजच ते भेटू लागले.. सुयश मात्र पूर्वीसारखा भरभरून नव्हता बोलत.. त्याची ही जबाबदारी प्रज्ञाने स्विकारली.. त्याला बोलतं करावं म्हणून प्रत्येक वेळीस ती पुढाकार घेऊ लागली.. ती बदलली होती पूर्णपणे..फक्त त्याच्यासाठी, त्याला परत मिळविण्यासाठी. त्यालाही तिची केविलवाणी धडपड कळत होती.. पण बुद्धिला पटत नव्हती.. बुद्धिने बंड पुकारला होता तिच्याविरुद्ध.. पण मात्र हळवं व्हायचं.. म्हणूनच तिला काहिही न सांगता त्याने विलासरावांची भेट घेतली आणि त्यांच्या तिरस्काराला आपल्या शब्दांनी जिंकून घेतले.. विलासरावांना स्वत: ची चूक उमगली.. आपल्या मुलीला आणि मुलासारख्या असलेल्या सुयशला समजून न घेण्याची...

बापाचं मन रात्रभर रडलं.. दुसऱ्या दिवशी सकाळीच वृद्धाश्रम गाठलं..

" प्रज्ञा, माफ कर गं मला.. खूप मोठी चूक केली तुम्हां दोघांना वेगळं करून.. सगळीच माणसं सारखी नसतात. माझ्या बाबतीत जे घडलं ते तुझ्याबाबतीत घडेल या भीतीमुळे मी खूप मोठा अपराध केला आहे.. नाही ओळखता आली मला मायेची माणसे.. खूप अपमान केला मी त्यांचा.." रडत विलासराव बोलत होते..

तोच सुयशही रामरावांना घेऊन वृद्धाश्रमात पोहचला.. त्यांना पाहून विलासरावांनी त्यांच्याकडे धाव घेतली..

" रामराव, बेटा सुयश.. तुमचा अपराधी आहे मी.. माझ्या लेकीची काहिच चुकी नाही यात.. शक्य झाल्यास मला माफ करा.." हात जोडत विलासराव म्हणाले.

रामरावांनी मोठ्या मनाने त्यांना आलिंगन दिले.. एखाद्याला माफ करणारं मोठं मन होतं त्यांच.. त्याक्षणी विलासरावांना आपण काय गमावून बसलोच याची जाणिव झाली...

आज क्रित्येक वर्षांनी प्रज्ञाला बापाची माया परत मिळाली होती आणि ती ही सुयशमुळे..

प्रज्ञाने नजरेनेच त्याचे आभार मानले.. त्यानेही स्मितहास्याने त्याचा स्विकार केला.

प्रज्ञाच्या आनंदासाठीच तर केलं होतं त्याने सगळं.. प्रेमाचा वटवृक्ष जरी उन्मळून पडला होता तरी त्यातूनच नवी पालवी फुटू पाहत होती.. त्या नव्या प्रीतीला जोपासणे तेवढं दोघांच्या हातात होतं.. प्रज्ञा प्रत्यक्षरित्या प्रयत्नशील होती तर सुयशही अप्रत्यक्षपणे त्या नव्या पालवीला जपत होताच ना..

विलासराव आणि रामराव बोलत असतांना सुयश तिथून बाहेर पडला आणि बागेत पोहचला..

बाकड्यावर बसून सुयश आपल्याच विचारात गुंतला.

तोच आदित्य येऊन त्याच्या बाजूला बसला..

एवढ्या दिवसांत दोघांची ओळख अभिवादन आणि स्मितहास्य एवढ्या पुरतीच मर्यादित होती.. सुयश सोबत बोलणे आदित्य मुद्दामहून टाळायचा..

पण आज स्वत:हून तो काही सांगू पाहत होता..

" प्रज्ञाचं खूप प्रेम आहे तुझ्यावर.. आणि तुझंही तिच्यावर.." विषयाला हात घालत आदित्य म्हणाला.

सुयश फक्त आश्चर्य व्यक्त करत त्याच्याकडे पाहू लागला.

" सॉरी, तुला आमच्याबद्दल कसे माहित..?" सुयश त्याच्याकडे वळत म्हणाला.

" प्रज्ञा... प्रज्ञाच्या सहवासातून तुमचं प्रेम कळालं.. गेली पाच वर्षे आपण तिघांनी एकत्र काम केलं असच वाटतं मला.. कारण नसूनही तिच्या प्रत्येक विचारात, तिच्या प्रत्येक निर्णयात तु असायचास.. तिच्या प्रत्येक आनंदात, तिच्या प्रत्येक दु:खात तु असायचास.. तिच्या हसण्यात, तिच्या रडण्यात तु असायचास... आम्ही फक्त दोघं एकत्र भेटलो वा बोललो असे आठवत नाही कारण तु तिच्यातच असायचा.. एवढच काय पण मी जेव्हा माझं एकतर्फी प्रेम व्यक्त केलं..." बोलता बोलता आदित्य थांबला आणि अगतिक होऊन लांब उसासा घेतला.

" तुझं प्रेम होतं तिच्यावर...?" गहिर्‍या शब्दांत सुयश म्हणाला.

" होतं नाही अजूनही आहे.. पण फक्त एकतर्फी.. ती फक्त अन् फक्त तुझ्यावर प्रेम करते... जीवापाड.. मी त्या दिवशी जेव्हा व्यक्त झालो त्यावेळीही ती फक्त तुझ्या प्रेमाच्या हिंदोळ्यावर झुलत होती.. तिच्या भावना डोळ्यांत स्पष्ट दिसल्या.. खूप राग आला तुझा त्यावेळेस पण नंतर कीव वाटली.. तिच्या प्रेमाला ओळखू शकला नाहीस याची..

माझं अजूनही प्रेम आहे तिच्यावर म्हणून विनंती करतो तिच्या प्रेमाला योग्य तो सन्मान दे..खूप सहन केलय तिने पण आता तरी हक्काचा आधार दे.. प्लिज.." म्हणत आदित्य उठला आणि क्षणात निघून गेला..

त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहत सुयश नजरेनेच त्याला सलाम करत होता.. त्याने जणू त्याचं आयुष्य गमावून सुयशला जगण्याचा मंत्र दिला होता..

एक आश्वासक जाणिव निर्माण केली होती त्याच्या मनात..

त्याच्या प्रीतीच्या नव्या रोपट्याला शाश्वताचं खतपाणी दिलं होतं जणू..

थोडा वेळ तो तिथेच शांत बसला.. गोड आठवणींचा कित्ता गिरवीत.. कटू आठवणीही मागोवा घेत आल्याच पण तोच त्याने डोळे घट्ट मिटले.. आज त्यालाही नव्हतं आठवायचं ते शल्य..

दुसऱ्या दिवशी सुयशचा वाढदिवस होता..

मनाशी पक्का निश्चय करून प्रज्ञा सकाळीच सुयशच्या घरी पोहचली.. खूप वाईट घडून गेलं होतं.. त्याच घरात तर सुयशने तिचं त्याच्या जीवनातील अस्तित्व नाकारलं होतं.. आणि तिथेच तिला ते परत मिळवायचे होते..

आणि आजचा दिवस म्हणजे तिला सर्वात प्रिय असणारा दिवस..

त्याच्या सोबत खरं तर एकच वाढदिवसाचा आनंद अनुभवला पण पाच वर्षे तो नसुनही तिने तो आनंद मनात जपला होता.. साजरा केला होता..

अर्धवट राहिलेली प्रेमकहाणी पूर्ण करून आज हा आनंद द्विगुणित करायचा होता तिला..

आज पाच वर्षांनंतर पुन्हा प्रीतीचा सोहळा सजू पाहत होता फक्त भूमिकांची अदलाबदल झाली होती.

झोपेशी वाकडं असल्याने सुयश रात्री बराच वेळ जागा होता.. त्यामुळे त्याला सकाळी उशीरा जाग आली..

रामराव नाश्ता आणि चहाचं पाहत होते.. पण आज प्रज्ञाने हट्टाने आणि लेकीच्या हक्काने त्यांना बाहेर बसवत किचनचा ताबा घेतला..

" सुयशला त्याच्या आईचे हातचे कांदेपोहे खूप आवडायचे.." रामरावांनी इशारा दिला..

तिनेही मग कांद्यापोह्यांचा बेत आखला.. आज क्रित्येक वर्षांनी किचन दरवळून निघाला होता सुवासाने.. रामरावांना सरलाताईच्या आठवणींनी भरून आले.. तोच फ्रेश होऊन सुयशही खाली आला..

आईच्या प्रतिमेला नमस्कार करून त्याने रामरावांना नमस्कार केला..

" वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा सुयश.. खूप यशस्वी हो.." रामरावांनी आशिर्वाद दिला..

" बाबा, आज घर भलतच दरवळत आहे.. हा भास नाही ना..?" लांब श्वास घेत तो म्हणाला.

" तुच किचनमध्ये बघ.. भास आहे की सत्य.." रामराव म्हणाले आणि उठून बाहेर गेले..

तसा सुयश किचनकडे वळला.. प्रज्ञाला आत पाहून पहिल्यांदा डोळ्यांवर विश्वास बसला नाही.. पण तेच खरं होतं.. प्लेटमध्ये पोहे आणि चहा घेऊन ती त्याच्यापुढे आली.. तसा तो भावनिक झाला.. आईची आठवण त्याला अगतिक करून गेली...

" वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा सुयश.." स्मितहास्य करत ती म्हणाली.

" प्रज्ञा... आज आई असती तर तिला खूप आनंद झाला असता.." तो भावनिक होत तिच्याकडे पाहत म्हणाला.

"आईंचा आनंद तु आनंदी राहण्यात आहे.. तु खुश रहा त्या नेहमीच आनंदी राहतील.." प्लेट डायनिंग टेबलवर ठेवत तिने त्याला खुर्चीवर बसवले..

देव्हार्‍यातून दिवा आणत तिने तो आरतीच्या ताटात सजवला.. सुयशच्या जवळ जात त्याचे औक्षण केले..

कपाळावर कुंकवाचा टिळा लावताच तो गहिवरला..

आवंढा गिळत त्याने डोळे गच्च मिटले..

" थँक यू सुयश... तुझ्यामुळे बाबांच प्रेम पुन्हा लाभलं.." आरती बाजूला ठेवत ती म्हणाली.

" आई नसण्याचं दु: ख भोगत आहे मी.. त्यामुळे बाबा असूनही तुझ्या आयुष्यात त्यांच नसणं पटलं नाही मनाला.. आणि.." बोलता बोलता तो थांबला.

" आणि मला दु:खी नव्हतं पाहवत तुला.. माझ्या आनंदासाठी केलस ना हे सर्व.." त्याच्या नजरेला नजर देत ती म्हणाली..

तिची ती नजर काळजात विज बनून रुतली...अन् हृदयाचा तिला जपून ठेवलेला कप्पा पुन्हा उजळून निघाला..

काही कळायच्या आत बाजूला ठेवलेला लालगर्द गुलाबाच्या फुलांचा बुके त्याच्या समोर धरत ती गुडघ्यावर बसली.. अगदी तो बसला होता तशीच.

"वळणे घेत वाहून थकलेल्या या नदीचा तु सागर होशील का..?

माझ्या रुसलेल्या प्रेमगीताचा सांग तु बेधुंद स्वर होशील का..? 

थकलेल्या माझ्या जीवन प्रवासाचा तु सातजन्मीचा सोबती होशील का..?

प्रेम करते खूप तुझ्यावर सोडून साऱ्या आशंका सांग मला साथ देशील का..?

आय लव्ह यू सुयश... आय लव्ह यू सो मच.." त्याच्या डोळ्यांत पाहत आज तिने प्रेमाची कबुली दिली..

तो दिवस जसाच्या तसा आठवला त्याला.. 

जेव्हा त्यानेही असेच प्रपोज केले होते तिला.. आणि ती आत्मसन्मानाचं कारण सांगून क्षणात सोडून गेली होती त्याला.. ती तिच्या जागी योग्य असेलही पण त्या दिवशी किती रडलं मन.. त्याची भरपाई होईल का आज..? किती गयावया केली मी.. लहान मुलाप्रमाणे हट्ट केला तिच्याकडे.. त्या हट्टाची उणीव भरून निघेल का आज..?

मला दु:खी पाहून आईने पुढाकार घेतला पण तिला देह सोडावा लागला त्याबदल्यात... माझी आई परत मिळेल का मला आज..?

मनाच्या आभाळावर आठवणींचे ढग दाटून आले.. क्षणात त्या आठवणी डोळ्यांतून घळाघळा बरसून गेल्या..

त्याने स्वत: च्या ओंजळीत चेहरा लपविला.. पण हुंदका नाही लपवू शकला.. आजपर्यंत ज्याला मनमुराद हसतांना पाहिले होते त्या आपल्या जीवाला रडतांना पाहणे अशक्य होत होतं तिला..

हातातला बुके बाजूला ठेवत.. ती त्याच्याजवळ उठून उभी राहिली.. त्याचा ओंजळीत लपविलेला चेहरा उघडत तिने अगतिकतेने त्याचे डोळे टिपले..

" सुयश, असा नको ना रडूस.? तुला रडतांना नाही पाहू शकत..?" ती रडवेली होऊन म्हणाली..

तिच्या बोलण्याने त्याचं मन आणखी हळवं झालं.. मागच्या पुढच्या विचार न करता त्याने बसल्या जागी स्वत: ला तिच्याभोवती लपेटून घेतले.. त्याच्या डोक्यावर हात फिरवित तिनेही त्याला मायेने पांघरले.

" तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नाही आहे माझ्याकडे.. पण यापुढे तुझ्या आयुष्यात कधीच कोणताच अगदिक प्रश्न पडू देणार नाही मी.. मी माझ्या आत्मसन्मानासाठी तुझं प्रेम नाकारलं होतं पण आज तुझं प्रेम हाच माझा आत्मसन्मान आहे.. आईंना पुन्हा आणू शकत नाही पण तुला सुखी ठेवून त्या जिथे कुठे असतील त्यांना आनंदी, समाधानी ठेवण्याचा प्रयत्न नक्की करेन.. त्यांच्या स्वर्गाहूनही सुंदर असलेल्या या घराला आणि गोड लेकालाही जीवापाड जपेन.." ती आश्वासक शब्दांत म्हणाली.

त्याच्या हृदयाचं तिच्या हृदयाला न सांगताही कळाले होते..

जे सुटलं होतं पाच वर्षांपूर्वी आज ते नव्याने मिळाले होते..

खुर्चीवरून उठत त्याने तिला मिठीत बंदिस्त केले. ती ही सुखावली त्याच्या मिठीत.. त्याच्या हृदयाची स्पंदने जणू ओरडून सांगत होती माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर..

" प्रज्ञा, आय अॅम सो सॉरी.. खूप वाईट वागलो तुझ्याशी..

तु ही तुझ्या बाबांसाठीच..." तो पुढचं बोलणार तोच तिने त्याच्या ओठांवर हात ठेवत त्याला गप्प केलं..

" मला नाही आठवायचं मागचं काहीच.. मला हा आज जगायचा आहे.. तुझ्या सहवासाला, तुझ्या स्पर्शाला, तुझ्या प्रेमाला न बोलता अनुभवायचं आहे.." म्हणत ती कितीतरी वेळ तशीच बंदिस्त होती त्याच्या मिठीत..

आजचा त्याचा वाढदिवस पूर्नमिलनाचा दिवस ठरला होता त्यांच्या प्रेमाचा.. अन् साक्षीला होता आरतीच्या ताटातला तो मिणमिणता दिवा..

क्रमश:

( पुढचा अंतिम भाग लवकरच) 

****************************************

सदर लिखाणात चुका असल्यास क्षमस्व.

    

🎭 Series Post

View all