# रंग माळियेला...( भाग ३१ वा अंतिम)
©® आर्या पाटील
सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.
******************************************
आजचा संबंध दिवस त्यांनी एकमेकांच्या सहवासात घालवला.. पाच वर्षांचा दुरावा एका दिवसात संपवायचा अयशस्वी प्रयत्न केला.. खूप काही सुटलं होतं या काळात.. पण आज तेच पुन्हा नव्याने मिळत होतं..
नात्याची नवी नांदी त्यांच्या आयुष्यात पुन्हा हरवलेलं चैतन्य घेऊन आली होती.. क्षणात सारच बदललं होतं.. नात्यावर आलेलं गैरसमजुतीचं जळमट दूर झालं होतं.. शेवटी बुद्धी हरली होती आणि मनाचा विजय झाला होता.
संध्याकाळी वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा करून सुयशने थोरा मोठ्यांचे आशिर्वाद मिळविले.. आदित्यला स्पेशल थँक यू बोलायला तो विसरला नाही.. प्रेम तर होतच पण त्याची जाणिव करून देणारा 'आदित्य' जणू एक हळवा माध्यम ठरला.
सुयश आणि प्रज्ञाला एकत्र पाहून आदित्य मधील एक मित्र जिंकला होता पण कुठेतरी एक प्रियकर भावनिक झाला होता.. विलासरावही सपत्निक उपस्थित होते वाढदिवसाला.. रामरावांनी विलासरावांना एकांतात घेत दोघांच्या लग्नाचा विषय काढलाच. विलासरावांना आता मात्र अश्रू अनावर झाले..
" माफ करा रामराव.. देवमाणसांना नाही ओळखता आले.. प्रज्ञा तुमचीच आहे.." विलासरावांनी आश्वासक होकार दिला..
प्रज्ञा आणि सुयशनेही नात्याला सात जन्माच्या पवित्र बंधनात बांधण्याचा निश्चय पक्का केला होता.. खूप सहन केलं होतं पण आता एकमेकांचा सहवास हाच त्याच्यावर रामबाण उपचार ठरणार होता..
दुसऱ्याच दिवशी भटजीकडे जाऊन दोघांच्या लग्नाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला.. खरं तर दोघांनाही लग्न साधेपणात वृद्धाश्रमातच करायचे होते.. पण आईवडिलांच्या आग्रहाखातर त्यांनी लग्नविधी करण्यासाठी मान्यता दिली. अगदी महिनाभरानंतर साखरपुडा, हळदी समारंभ आणि त्यानंतर लग्नसोहळा असा तीन दिवसांचा कार्यक्रम ठरवला गेला.
सुयशचा हरवलेला उत्साह पुन्हा नव्याने सापडत होता पण आईची आठवण त्याला हळवं करित होती..
प्रज्ञा मात्र त्याला या कठिण क्षणात आश्वासक साथ देत होती..
बघता बघता साखरपुड्याचा दिवस येऊन ठेपला.. वृद्धाश्रमात अगदिच मोजक्या हक्काच्या लोकांत त्यांनी एकमेकांना अंगठी घातली.. हळदी समारंभही त्याच आवारात सजला.. वृद्धाश्रमात सारेच खुश होते.. कुटुंबाचा एक भाग म्हणून प्रत्येकाचा उत्साह वाखाणण्याजोगा होता..
शेवटी लग्नाचा दिवस उजाडला.. मनातल्या साऱ्या शंका, आशंका बाजूला सारत दोघेही एका पवित्र बंधनात कायमचे बांधले जाण्यासाठी तयार झाले.. तिने त्याच्या आवडीचा गुलाबी रंगाचा पोशाख केला होता.. नवरीच्या रुपात तिच्या सावळ्या वर्णाला सोनेरी लकाकी चढली होती.. हातभर बांगड्या, नाकात नथ, कानात असलेले मोत्याचे डुल, गळ्यात परिधान केलेली आभूषणे सारेच आज तिच्या रुपावर भाळले होते.. राजबिंडा सुयश आज राजकुमारासारखाच भासत होता. सरलाताईंना या दिवसाची किती आतुरता होती. सुयशने त्यांच्या प्रतिमेला नमस्कार करून त्यांचे दर्शन घेतले..
लग्नाचा सोहळा साऱ्यांच्या आशिर्वादाने मोहरून निघाला.. सात वचने देते, सप्तपदी चालत सात जन्मासाठी दोघे एक झाले.. मांगल्याचा लाल रंग कुंकू बनून तिच्या कपाळी सजला..सौभाग्याचं मंगळसूत्र विधिवत त्याने तिच्या गळ्यात घातले.... फुलांच्या अक्षदा उधळत वृद्धाश्रमातील साऱ्यांनी त्यांच्या नविन आयुष्याला शुभेच्छा दिल्या..
कन्यादान करून विलासरावांनी वडिलांच कर्तव्य पार पाडलं.. ते एकच तर मोठं स्वप्न असतं प्रत्येक बापाचं..
लेकीचा संसार डोळ्यापुढे सजतांना पाहिला की सारच सुख मिळतं..
शेवटी पाठवणीचा क्षण येऊन ठेपला..
पाठवणीचा क्षण म्हणजे क्षितिज जणू सुख दु:खाचं.. हवहवसं वाटणारं सुख अन् सोबत विरहाचं दु:खही. आईच्या मिठीत प्रज्ञा आज मोकळी होत होती. बाबांच्या अश्रूंनी ती आज चिंब भिजत होती. तोच सुयशने तिचा हात घट्ट पकडत ' मी आहे घाबरू नकोस..' डोळ्यांनी शाश्वती दिली जणू.
" सून नाही लेक घेऊन जात आहोत.. नि:शंक रहा.." विलासरावांच्या खांद्यावर हात ठेवत रामरावांनी बापाला दिलासा दिला.. माहेरच्या आठवणी जपत तिने आपले सुरेख सासर जवळ केले..
घरी पोहचल्यावर रामरावांनी सरलाताईची उणीव भरून काढत दोघांचे औक्षण केले..
माप ओलांडून प्रज्ञा घरात आली.. सरलाताईंच्या प्रतिमेला दोघांनी जोडीने नमस्कार केला.. एक आई समाधानी अंत:करणाने आशिर्वाद देत होती जणू दोघांना त्या प्रतिमेतून..
समर्पणाचा क्षण म्हणजे वादळ जणू संदिग्ध भावनांच..
मनाची चलबिचल सावरत प्रज्ञा रुममध्ये गेली.. पाच वर्षांपूर्वी या रुममधून आणि मनातूनही सुयशने परकेपणाचं शीर्षक लावून बेदखल केल्याचे आठवले तिला.. डोळ्यांच्या कडा चटकन पाणावल्या.. तोच खिडकीपाशी उभ्या सुयशची नजर त्या अश्रूंवर पडली. त्याने हातांची ओंजळ करत अश्रूंचे ते थेंब वरचेवर टिपले.. तशी ती आणखी अगतिक झाली.. आणि क्षणातच त्याच्या मिठीत सामावली.. आज त्या मिठीत तिला सर्वात सुरक्षित वाटत होतं.. आयुष्यभराचा ऊन पावसाचा खेळ मिलनाच्या इंद्रधनुष्यावर येऊन स्थिरावला होता.. आता जीवनात फक्त आनंद, उत्साह, सहवास, प्रेम, आपुलकी, काळजी अन् शेवटपर्यंतची शाश्वत सोबत या सात रंगांची उधळण होणार होती.. त्या इंद्रधनुष्याच्या कवेत आज ती सावळी धरा सामावली होती..
" प्रज्ञा, याआधी काय झालं ..? का झालं..? कोणामुळे झालं..? मला माहित नाही.. पण तुझ्याबाबतीत मी खूप कठोर वागलो.. मला खरच माफ कर.." तिचा चेहरा ओंजळीत पकडत तो म्हणाला.
तोच तिने त्याच्या ओंठावर हात ठेवत त्याला चुप्प बसण्याचे संकेत दिले..
" कोणीच चुक नव्हतं आणि कोणीच बरोबरही.. सरला तो वाईट काळ होता.. आता नाही आठवायचं त्या क्षणांना.." पुन्हा त्याच्या कुशीत शिरत ती म्हणाली..
एकमेकांच्या उबदार मिठीत नव्या नात्याची नविन नांदी झाली.. ती रात्र रंग माळून प्रेमाने न्हाहून निघाली जणू..
समाप्त.
©® आर्या पाटील
******************************************
ईरावर लिहिण्याचा आणि त्यातही कथामालिका लिहिण्याचा हा पहिलाच अनुभव.. तुम्हां वाचकांमुळे माझा हा अनुभव जिवंत झाला.. प्रत्येक भागाला तुम्ही दिलेली कमेंट आणि लाइकच्या रुपातील दाद पुढील भाग लिहिण्यासाठी प्रेरणा ठरली.. काही वैयक्तिक कारणांमुळे भाग पोस्ट करतांना विलंबही झाला..कौंटुबिक जबाबदारी नाही टाळता येत ना. काही कमेंटमुळे वाईटही वाटले.. पण बऱ्याच कमेंट सकारात्मकता वाढवून गेल्या.. पुन्हा एकदा सर्व वाचक वर्गाचे मनापासून धन्यवाद.. तुमची दाद हेच एकमेव लेखकाच्या लिखाणाचे प्रेरणास्थान आहे. असेच वाचत रहा आणि प्रेरणा देत रहा... धन्यवाद.