रंग प्रेमाचा. भाग -१

वाचा एक हलकीफुलकी प्रेमकथा
रंग प्रेमाचा.
भाग-१.


“..हे कोर्ट श्रीयुत नार्वेकर यांच्या बाजूने निकाल देत सौ. नार्वेकर यांच्यावर नुकसानभरपाईचा निकाल पारित करत आहे. नाऊ ऑल मॅटर्स आर ॲडजर्न्ड फॉर टुडे.”

निकालासोबतच आजचे कामकाज पूर्ण झाल्याचे सांगत
न्यायाधिश महाशय टेबलाला नमस्कार करून उठले आणि त्यासरशी कोर्टात उपस्थित असलेले विरुद्ध पक्षाचे नाडकर्णी वकील ताराला शुभेच्छा द्यायला वळले.


“काँग्रॅच्यूलेशन्स तारा. पुन्हा तुझ्या नावावर एक विजयी केस नोंद झालीय.”


“थँक्यू सो मच सर. तुमच्याच तालमीत मी तयार झालेय त्यामुळे माझी जिंकलेली प्रत्येक केस ही तुमची गुरुदक्षिणा असेल.” आपले कागदपत्रे आवरत तारा म्हणाली.


“माय डिअर, माझ्या तालमीत तयार झाली असलीस तरी आता तू मला जी टक्कर देते आहेस ना ते बघून मला तुझा शिष्य व्हावं वाटतंय.”

“सर..”

“खरंच अगं. आपला शिष्य आपल्याला हरवतो यात जे सुख असते ते फार आनंददायी असते. तुला आत्ताच नाही कळणार आणि आजची केस म्हणजे तर अगदी सगळा कस पणाला लावणारी होती. नवऱ्याच्या विरोधात त्याच्या बायकोची केस जिंकणे फारसे कठीण काम नाहीये, मात्र एका स्त्री विरोधात पुरुषाला न्याय मिळवून देणे खरंच कसबेचे काम आहे.


तू त्या नार्वेकरला न्याय मिळवून दिलास आणि त्याच्या बायकोला नुकसानभरपाई देखील द्यायला लावलेस.
ग्रेट! अशीच प्रगती करत रहा.”


“सर, प्रश्न मुळात स्त्री विरुद्ध पुरुष असा नसून सत्य आणि असत्याबद्दल होता आणि ही ॲडव्होकेट तारा असत्याच्या बाजूने कधीच लढणार नाही. मग तिचा अशील स्त्री असो किंवा पुरुष.” तारा.


“तेच तर हवं असतं गं. पैश्यांसाठी असत्याच्या बाजूने लढायला भरपूर असतात; पण तू सत्याची बाजू घेऊन लढतेस यातच तुझं यश आहे.” दोघे बोलत बोलत कोर्टाच्या बाहेर आले.


“पुरुषाच्या बाजूने लढणारी पहिली महिला वकील पाहिलीय. काही म्हणा पण दम आहे हिच्यात.” तिथल्या बायकांची कुजबुज ऐकून तारा पुढे निघाली.


‘पुरुषाच्या बाजूने लढणारी..’ तिच्या केबिनमध्ये बसून ती फिक्कट हसली.


‘पुरुषाची बाजू. मला तर पुरुष जातीचाच भयंकर राग येतो. विश्वास म्हणून उरला नाहीये; पण या केसमध्ये सत्य वेगळे होते म्हणून मला नार्वेकरांची केस घ्यावी वाटली.’ अंगातील काळा कोट काढून खुर्चीवर ठेवत ती स्वतःशी म्हणाली.


ठाऊक नाही का पण आज कुणीतरी सारखे तिला आठवत होते. तसे कोर्टात देखील त्याचे अस्तिव जाणवतेय असे वाटले होते. त्या आठवणीने मुद्दामच कोणीतरी दुखऱ्या नसेवर पाय ठेवतोय असे तिला वाटून गेले. खुर्चीला डोके टेकून ती डोळे मिटून बसली आणि नेमके त्याच वेळी तिच्या मोबाईलची ओळखीची रिंगटोन वाजायला लागली.


“हॅलो आई, बोल अगं.” डोळे न उघडताच फोन आईचा आहे हे तिने ओळखले होते.


“तारा अगं कुठे आहेस?”


“कुठे म्हणजे काय? मी कोर्टातच असणार ना गं?” त्रासिक आवाजात तारा उत्तरली.


“तू कोर्टातून अजून निघाली नाहीयेस? तारा अगं आज तरी घरी लवकर ये असं तुला सांगितलं होतं ना?”


“कशाला गं?”


“तारा, उगाच वेड पांघरूण पेडगावला जाऊ नकोस. आज मुलाकडचे तुला बघायला येणार आहेत हे कालपासून किमान दहादा तरी सांगून झाले होते आणि तरीही तू अजून यायला निघाली नाहीस.”


“आई..”


“काही बोलू नकोस. तू तुझ्या कोर्टातील मोठी वकिलीण असशील; पण या घरात माझाही काही कायदा पाळला जायला हवा की नाही? अगं आता अठ्ठाविशीची होत आलीहेस गं. आता तरी लग्नाला होकार दे की गं राणी.” सुरुवातीला काहीसा चिडका स्वर असलेल्या सुमनने आता हळूवारपणे बोलायला सुरुवात केली.


“आई, मी कुठे लग्नाला नाही म्हणतेय? उलट जो मुलगा मला पहिल्यांदा पहायला येईल त्याच्याशी कुठल्याही अटीविना लग्नाला तयार आहे हे मी तुला केव्हाच स्पष्ट केलंय.” तारा मंद हसत म्हणाली.


“तू लग्नाला लाख होकार दे गं; पण त्या स्थळाचं काय? त्यांनी तुला पसंत करायला हवी की नको? आणि पसंत करायला तू इथे हजर रहायला हवी की नकोस?” सुमन पुन्हा चिडायला लागली.


“आई, अगं तू त्यांना माझा फोटो दाखव ना. मी खरंच कामात आहे गं. मला यायला नाही जमणार.”


“तारे, मला आता कुठलाही बहाणा नको आहे. मी आत्ताच नाडकर्णी सरांशी बोललेय. तू केस जिंकलीस हे कळलंय मला आणि कोर्टाचं कामगाज संपलंय हेही ठाऊक आहे. तेव्हा आता बऱ्या बोलाने घरी यायला निघ. तू वकील असशील तरी मी तुझी आई आहे हे विसरू नकोस.” सुमनने तिला तंबी देत कॉल बंद केला.


‘आई गं. एवढ्या मोठाल्या केसेस मी जिंकते पण तुला जिंकणं खरंच कठीण आहे हं. शेवटी मला घरी यायला तू भाग पाडतेच आहेस. चल तारा, निघ बाई. एकदा का डोक्यावर अक्षता पडल्या की आई तिच्या कर्तव्यातून मोकळी होईल.’ स्वतःची बॅग आवरत ती बाहेर जायला निघाली.


“तारा, ऑल द बेस्ट डिअर.” ती केबिनच्या दारात पोहचत नाही तोच नाडकर्णी वकील तिच्या समोर आले.


“सर? तुम्ही माझ्याबद्दल आईशी बोललात ना?”


“तारा, अगं मी तुझ्या आईशी खोटं बोलू शकत नाही, तुला ठाऊक आहे ना? आणि प्रत्येकाला एक ना एक दिवस लग्न करावेच लागते तेव्हा कल करें सो आज कर.” ते हसत म्हणाले.


“हम्म आणि ते ऑल द बेस्ट कशासाठी?”


“अगं, आज इथे कोर्ट गाजवलेस आता घरी जाऊन तिथले मैदान गजव. लक्षात ठेव, मुलगा आवडला नाही तर थेट नाही म्हणायला घाबरू नकोस. शेवटी आयुष्याचा प्रश्न असतो गं.”


“हम्म.” ती उगाच हसली.


“बाय द वे, मुलगा काय करतो?”


“नो आयडिया. मी तर आधीच होकार कळवलाय.”


“काय? अगं ज्याच्याशी लग्न करणार आहेस तो काय करतो हेही तुला ठाऊक नाहीये? मग लग्नाला होकार का दिलाहेस तू?”


“सर, तुम्हीच आत्ता बोललात ना प्रत्येकाला एक ना एक दिवस लग्न करावेच लागते तेव्हा कल करें सो आज कर या हिशोबाने होकार दिलाय.” ती स्मित करत म्हणाली.


“म्हणजे काय गं? आधी काही प्रेमप्रकरण वगैरे होते का? की ब्रेकअप झालंय?” त्यांची तीक्ष्ण नजर तिच्यावर खिळली.


“नो सर, माझ्यासारख्या नाकासमोर चालणाऱ्या मुलीशी कशाला कोणाशी प्रेमप्रकरण असेल? बरं निघते मी. उशीर होईल तर आई परत ओरडेल.” त्यांच्या अश्या अचानक प्रश्नाने बावरलेल्या तिने तिथून काढता पाय घेतला.


‘..काय गं? काही प्रेमप्रकरण वगैरे होते का? की ब्रेकअप झालंय?’ ऍक्टिव्हा सुरु करत असताना नुकतेच नाडकर्णी सरांनी विचारलेले प्रश्न तिला आठवले आणि तिच्या डोळ्यांच्या लांबसडक पापणीवर एक टपोरा थेंब येऊन विसावला.


सरांना आलेली शंका खरी असावी का? ताराच्या आयुष्यात खरंच कुणी होते का? तसे असेल तर ती या लग्नाला का होकार देतेय? कळण्यासाठी वाचा पुढील भाग.
:
क्रमश:
©®Vrunda F.(वसुंधरा..)
_______


🎭 Series Post

View all