रंग प्रेमाचा. भाग -२

वाचा एक हलकीफुलकी प्रेमकथा
रंग प्रेमाचा.
भाग -२

‘..काय गं? काही प्रेमप्रकरण वगैरे होते का? की ब्रेकअप झालंय?’ ऍक्टिव्हा सुरु करत असताना नुकतेच नाडकर्णी सरांनी विचारलेले प्रश्न तिला आठवले आणि तिच्या डोळ्यांच्या लांबसडक पापणीवर एक टपोरा थेंब येऊन विसावला.


त्या प्रश्नासरशी तिच्या काळजात चर्र झाले.

‘तारा, कम ऑन यार. जे आपल्या नशिबात नाही, त्याचा जास्त विचार न केलेलाच बरे. आजवर आईने माझ्यासाठी खस्ता खाल्ल्या. मी म्हणजे तिचे जग होते. आता ती माझे जग आहे. केवळ तिच्या इच्छेखातर मला हे लग्न करायचे आहे, बाकी काही. ती खुश तर मी ही खुश.’

स्वतःला समजावत ती रस्ताने निघाली होती. विचारांच्या गर्तेत असताना एक नवी कोरी कार तिला क्रॉस झाली आणि त्यातून एक ओझरता चेहरा तिला दिसला. काहीसा ओळखीचा चेहरा, हृदयात कुठेतरी दडवून ठेवलेला तो चेहरा.


‘तारा, भूतकाळ जीवघेणा असतो गं. बघ, सरांच्या एका प्रश्नाने आता तो मला कुठेही दिसू लागलाय. एकदा सोडून गेल्यावर कशाला येईल ना? नुसते मनाचे खेळ आहेत हे. तो इथे नाहीये आणि येणारही नाहीये. फोकस तारा, आता त्याला विसरून या नवीन स्थळावर फोकस कर. तो गेला उडत.’ स्वतःला समजावत तिने मनातीला विचार झटकून बाजूला केले आणि ऍक्टिव्हाची स्पीड वाढवत तिने घराकडे धूम ठोकली.


“आलात? या. या. मुलांकडचे येण्यापूर्वी घरी पोहचलात हे भाग्यच म्हणायचे.” तारा घरात प्रवेशताच सुमन तिला म्हणाली.


“आई, आता आले ना गं मी? तरीही ओरडतेस?”


“ओरडणार नाही तर काय करणार? मुलीकडची बाजू आपली. त्यात तू तिच्याशी तुझ्या मनातील धड काही बोलत नाहीस. मग तिची चिडचिड होणारच ना?” सोफ्यावरून एक ओळखीचा आवाज कानी पडला तसे चमकून ताराने त्या दिशेकडे पाहिले.


“बाईसाहेब? तुम्ही? नमस्कार करते हं.” सोफ्यावर बसलेल्या कामिनीताईंना बघून आश्चर्य आणि आनंदाने ती त्यांच्याजवळ गेली.

“हो. आता आले बाई मी. सुमनने तुझ्याबद्दल तक्रारवजा फोन केला मग काय करणार? आले मी धावतपळत. इतकी वर्ष तुझ्या आईने मला साथ दिली आता तिला गरज पडल्यावर मला यावेच लागेल ना?” तिच्या डोक्यावरून हात फिरवत कामिनीताई म्हणाल्या.


“तुम्ही एकट्याच आल्यात?”


“हो. का गं? तुला कोणी अपेक्षित होतं का?” त्यांनी तिलाच उलट विचारले.

“नाही, तसं नव्हे.”


“जा मग. तू तुझं आवरून घे. छानशी साडी नेस आणि आजकालच्या मुलीप्रमाणे थोडी पावडर लाली देखील लाव. चांगलं तालेवार घराणं आहे म्हणे मुलाचं. हे स्थळ हातचं जायला नको. जा आवर.”


“हो.” म्हणत तारा आतल्या खोलीत गेली.

कामिनीताईंना बघून तिच्या मनात उफाळून आलेल्या भावना काही क्षणातच विरून गेल्या होत्या.


‘विशू, मी तुझी वाट बघत होते रे. वाटलं किमान या वर्षी तरी तू मला मागणी घालायला येशील; पण तू आलाच नाहीस. गरिबांनी श्रीमंताशी प्रेम करू नये हे खरंच असतं का रे? माझ्याशी लग्न करण्यात तुला कमीपणा वाटला ना? मी कधी बोलू शकले नाही पण मनात कायम तुलाच जपत आले होते रे. नटायचे ते केवळ तुझ्यासाठी म्हणून आजवर इतकी साधी राहत होते; पण आता मला दुसऱ्या कुणासाठी साजशृंगार करायला लागतोय हे सहन होत नाहीये रे.’

स्वतःला आरश्यात बघून तिने डोळ्यातील पाणी टिपले आणि कपाटातील एक साडी काढून तिने ती नेसायला घेतली.

“तारा, आवरलंय का गं?” सुमनच्या दार ठोठवण्याने ती भानावर आली.


“हो आई, थोडाच वेळ.”


“अगं, ही साडी द्यायला आलेय.”


“माझ्याकडे साडया आहेत की गं.”


“ही साडी खास बाईसाहेब घेऊन आल्यात. म्हणाल्या आजची साडी त्यांच्याकडून.” सुमन आत येत म्हणाली.

“का पण?”


“जर मला मुलगी असती तर मी तिची हौसमौज भागवली असती ना? आज इकडे येताना उगाच वाटलं देवाने मला एखादी मुलगी द्यायला हवी होती. मग काय घेतली हो साडी. म्हटलं, मला स्वतःची लेक नसली तरी काय झालं? तारा लेकीसारखीच आहे की.” सुमन पाठोपाठ कामिनीताई आत आल्या.


“बाईसाहेब पण..”

“आता पण बीन काही नाही. ही साडी आणि यावरची ही मॅचिंग ज्वेलरी. अर्ध्या तासात आवरून बाहेर ये. मुलाकडची इतक्यात पोहचतीलच.” त्यांनी जणू आदेश सोडला आणि सुमनला घेऊन बाहेर गेल्या.


“.. तारा, तुला माहिती आहे? प्रेमाचा रंग कोणता तो?” त्या गुलाबी साडीला बघून काही वर्षांपूर्वीचे विशालचे बोलणे तिला आपसूकच आठवले.


“नाही.”

“हा बघ.” तिला हलकेच स्पर्श करत आरशासमोर उभे करत तो म्हणाला.

त्याच्या त्या हलक्या स्पर्शाने सुद्धा ती मोहरली होती आणि त्याचे गुलाबी प्रतिबिंब तिच्या चेहऱ्यावर उमटले होते.


“प्रेमाचा रंग गुलाबी असतो. कळलं का? जेव्हा मी तुला लग्नाची मागणी घालायला येईल ना तेव्हा तुला याच रंगाने माझ्यासाठी नटलेली मला बघायचे आहे.” तो तिच्या कानात हलकेच कुजबुजला तसे ती झटकन त्याच्यापासून दूर झाली.


“एका गरीब मुलीला असे स्वप्न दाखवून तुम्हाला काय मिळतं? आणि मला हात लावायची तू हिंमत तरी कशी केली? मी गरीब आहे म्हणून अव्हायलेबल आहे असे वाटते का तुला?


“तारा, काही काय बोलतेस? माझं प्रेम आहे गं तुझ्यावर आणि हे श्रीमंत गरीब काय लावलं आहेस? प्रेमात हे मॅटर करत नसतं. लहान आहेस गं तू. तुला काहीच कळत नाही.” तो उद्वेगाने म्हणाला होता.


“लहान आहे पण खुळी नाहीये. तुझं खरंच प्रेम आहे म्हणतोस ना? मग या दोन वर्षात मला लग्नाला मागणी घाल नि रीतसर बायको करून घेऊन जा. मात्र तू नाही आलास ना तर मग मला जे पहिले स्थळ येईल त्याच्याशी लग्न करेन. आहे कबूल?”


“वेडी आहेस तू. दोन वर्षात कसं शक्य होईल?”


“प्रेम आहे म्हणतोस ना? मग होईल शक्य. येशील ना विशु?” तिने पहिल्यांदा त्याला विशु म्हणून हाक मारली होती.

तो मात्र काहीच न बोलता उभा होता.. स्थितप्रज्ञ. त्याचा नकार उमजून डोळ्यात पाणी घेऊन तारा तशीच धावत खोलीतून बाहेर पळाली.


..तिच्या गालावरचा थेंब हातावर ओघळला तसे तारा भूतकाळातून परत फिरली. त्या गुलाबी साडीवरून एकवार हात फिरवून तिने ती नेसायला घेतली. मन मात्र परत वर्तमान भूतकाळाच्या हिंदोळ्यावर झुलू लागले होते.


कोण होता हा विशु? आणि प्रेम असूनही त्याने ताराला मागणी का घातली नाही? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
________


🎭 Series Post

View all