रंग प्रेमाचा. भाग -३

वाचा एक हलकीफुलकी प्रेमकथा
रंग प्रेमाचा.
भाग -३

तिच्या गालावरचा थेंब हातावर ओघळला तसे तारा भूतकाळातून परत फिरली. त्या गुलाबी साडीवरून एकवार हात फिरवून तिने ती नेसायला घेतली. मन मात्र परत वर्तमान भूतकाळाच्या हिंदोळ्यावर झुलू लागले होते.


तयार झालेल्या ताराने आरश्यात स्वतःचे रूप न्याहाळले. गुलाबी साडी, कानात गुलाबी डूल, हातातील बांगड्याही गुलाबीच.


‘प्रेमाचा रंग गुलाबी असतो.’ कानात विशु कुजबुजतोय असा भास तिला झाला आणि क्षणात तिच्या गालावर गुलाबपाकळ्या फुलल्या; पण क्षणभरच. लगेच ती वास्तवात परतली.


“अगंबाई! किती गं सुंदर दिसतेस? माझीच नजर लागायची.” आत आलेली सुमन थक्क होऊन तिच्याकडे पाहत राहिली.


“आई, काही काय गं? तुझी नजर मला का लागेल?” डोळ्यातील अश्रू शिताफिने लपवत तारा तिच्या मिठीत शिरली.


“पुरे, आता रडू नकोस. पाहुणे मंडळी आली आहेत. आपल्यावतीने बाईसाहेब त्यांच्यात बसल्यात. तू चल. आपण चहा नाश्ता घेऊन जाऊया.” तिला अलवारपणे मिठीतून दूर सारत सुमनने तिचे डोळे पुसले.


तारा खाली मान घालून एका मोठ्या ट्रे मध्ये चहा आणि पोहे घेऊन हॉलमध्ये आली. तिथे मंद मंद गुलाबाचा गंध पसरला होता. त्या गंधासरशी ती पुन्हा विशुच्या आठवणीत हरवली.


तब्बल दहा वर्षांपूर्वी ती त्याला पहिल्यांदा भेटली होती. कामिनी ताईंच्या घरी. अपघातामुळे कमरेखालचा भाग निकामी होऊन त्या अंथरुणात पडल्या होत्या तेव्हा त्यांच्याकडे स्वयंपाकपाण्याचे काम करणारी सुमन त्यांची देखभाल करण्यास रुजू झाली. एकदा अचानक तिचीच तब्येत खालावली म्हणून तिच्याऐवजी तारा त्यांच्या मदतीला गेली आणि त्याचवेळी विशु.. म्हणजे कामिनीताईंचा लाडका भाचा तिथे त्यांना भेटायला आला होता.


“अगं, मावशीला हे काय देते आहेस? याने तिचे पोट भरणार आहे का? त्यापेक्षा मी हे एनर्जी ड्रिंक आणलेय त्याने तिला बरं वाटेल.” कामिनीताईसाठी गरम पेज घेऊन आलेल्या ताराला त्याने धारेवर धरले होते.


“तुम्ही मोठ्या शहरात राहणारी माणसे, त्यामुळे तुम्हाला याची किंमत नाही कळणार; पण मला आईने बाईसाहेबांना हेच द्यायला सांगितलेय.” तिही ताठ्याने म्हणाली.

पहिल्याच भेटीत दोघांचे झालेले भांडण आणि मग त्यांच्यात कामिनीताईंनी काढलेली समजूत.


“तारा अगं हा विशु, माझा भाचा. डॉक्टर होतोय. दुसऱ्या वर्षाला आहे आणि विशु ही तारा. तिच्या वागण्याबोलण्यावर जाऊ नकोस. हुशार आणि गुणी पोर आहे. विशु अरे तुझ्या या ड्रिंकने मला बरे वाटेल; पण ही आणि हिची आई माझ्यासाठी जे करतेय ना त्यामुळेच मला लवकर गुण येतोय. तारा, तू आणलेली पेज दे बघू.”


खुद्द कामिनीताईंनी तिची स्तुती केल्यामुळे आनंदी झालेली तारा त्याला वाकूल्या दाखवत त्यांना पेज पिण्यास मदत करायला पुढे सरसावली.


ती त्यांची पहिली भेट. सुमनला आजारातून उठायला आणखी आठवडा लागला आणि मग ओघाने विशु आणि ताराच्या भेटी वाढीला लागल्या. तिचे सुंदर रूप आणि हुशारी, समोरच्याला बोलण्यात हरवण्याची कला.. विशु तिच्यावर पार भाळला होता. तर त्याचे लाघवी बोलणे, तिला मदत करणे कधीतरी एकटक न्याहाळत बसणे यामुळे ती त्याच्याकडे नकळत खेचल्या जात होती.


त्या दिवशी मुद्दामच आपल्या मनातील भावना तिला सांगण्यासाठी म्हणून विशु तिला ड्रॉईंग रूमधल्या आरश्याजवळ घेऊन गेला होता आणि बोलण्याच्या ओघात तिचा हात पकडला असता ती तो झिडकारून निघून गेली होती.

प्रेम आहे तर दोन वर्षात त्याने तिच्याशी लग्न करावे हा तिचा धोशा आणि तसे काही करू शकणार नाही हे त्याच्या चेहऱ्यावर दिसणारे वास्तव वाचून ती धावतच त्या खोलीतून बाहेर पळाली. नुकताच गालावर उमटलेला प्रेमाचा गुलाबी रंग क्षणात नाहीसा झाला होता.

त्यानंतर बरी झालेली सुमन कामाला येऊ लागली आणि ताराने तिकडे फिरकणे बंदच करून टाकले. आयुष्यातून गुलाबी रंगाला पार हद्दपार केले असले तरी त्याच्याबद्दलच्या भावना तसुभरही कमी झाल्या नव्हत्या.

त्याच्या आठवणीत दहा वर्ष सरली. ना तो आला ना त्याचा काही निरोप. म्हणून मग तिने ठरवल्याप्रमाणे आलेल्या पहिल्याच स्थळाला होकार देऊन टाकला होता. मात्र आज जेव्हा खरोखरीच तिला बघायला पाहुणे मंडळी आली तर प्रत्येक क्षणाला विशुची आठवण छळत होती.


“आम्हाला मुलगी पसंत आहे. तशी मुलीकडून पसंती आहे हे कळल्यावरच आम्ही इथवर आलोय. कामिनीताई, आता आम्हालाही मुलगी पसंत आहे म्हटल्यावर आजच सुपारी फोडावी असे म्हणतोय. तुम्ही काय म्हणता?” एक पुरुषी आवाज ताराला ऐकू आला कदाचित ते मुलाचे वडील असावेत.


“आम्हाला काहीच हरकत नाही; उलट आनंदच होईल. सुमन अगं तोंड गोड करायला साखर घेऊन ये बघू.”कामिनीताई आनंदाने उद्गारल्या.


“साखर कशाला हो? आमच्या बागेतीला अस्सल गुलाबांचा मी गुलकंद करून आणलाय. त्यानेच तोंड गोड करूयात.” मुलाची आई म्हणाली.


“पुन्हा गुलाब? हा गुलकंद, हा गुलाबी रंग.. सगळं डोक्यात जातंय माझ्या. हा गुलकंद तुमच्याकडेच ठेवा आणि हो मी हे लग्न करणार नाहीये हे लक्षात घ्या.” गुलाबाचे नाव ऐकताच ताराच्या मस्तकात एक तिडीक गेली आणि रागाच्या भरात लग्न मोडल्याचे बोलून ती उठून तिच्या खोलीकडे पळत गेली.


“प्रेमाचा रंग गुलाबी असतो म्हणाला होतास ना? असा काही गुलाबी रंग बिंग नसतो. हे सगळं खोटं असतं.” ड्रेसिंग टेबलसमोर उभी असलेली ती स्वतःशी रडत रडत मोठ्याने बोलत होती.


“मग काय खरं असतं? कुठला रंग प्रेमाचा? हा पांढरा की हा काळा?” अचानक आरश्यामध्ये तिच्या मागून एका हातामध्ये पांढरा ऍप्रॉन आणि दुसऱ्या हातामध्ये तिचा काळा कोट घेऊन उभा असलेला नवरा मुलगा विचारत होता.

ताराला कळेल का तिच्या प्रेमाचा खरा रंग? वाचा अंतिम भागात.
:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
________


🎭 Series Post

View all