रंग प्रेमाचा. भाग -४(अंतिम भाग.)

वाचा एक हलकीफुलकी प्रेमकथा
रंग प्रेमाचा.
भाग -४(अंतिम भाग.)

“मग काय खरं असतं? कुठला रंग प्रेमाचा? हा पांढरा की हा काळा?” अचानक आरश्यामध्ये तिच्या मागून एका हातामध्ये पांढरा ऍप्रॉन आणि दुसऱ्या हातामध्ये तिचा काळा कोट घेऊन उभा असलेला नवरा मुलगा विचारत होता.


“एक्सक्युज मी मिस्टर, माझ्या रूममध्ये यायची तुम्ही हिंमत कशी केली?” चिडलेली ती मागे वळून म्हणाली.


“मग काय करणार? तुम्ही तिथे सरळ लग्नाला नकार दिलात. माझ्याकडे साधं पाहिलं देखील नाहीत.” चेहऱ्यासमोरचे दोन्ही हात बाजूला करून तो तिथेच बेडवर बसला.


“विशु, प्लीज का डोक्यात जातोहेस यार? का जिथेतिथे मला दिसतो आहेस? काय करू मी तुझं?” समोरच्या मुलात विशुचा चेहरा दिसताच ती त्रागाने म्हणाली.


“सिम्पल. माझ्याशी लग्न कर.” समोरचा तरुण मिश्किल हसत तिला म्हणाला.


तिने त्याच्याकडे नजर रोखून पाहिले. समोरच्या तरुणातील विशुचे रिफ्लेक्शन काही केल्या जात नव्हते. तिने डोळे चोळून पुन्हा एकदा त्याच्याकडे पाहिले. तो अजूनही तिच्याकडे पाहत हसत होता.


“विशु? तू खरंच इथे आहेस?” ती डोळे फाडून बघत म्हणाली.


“यस डिअर. मीच आहे. तो उठून तिच्याजवळ येत म्हणाला. तशी ती मागे सरत आरश्याला टेकून उभी राहिली.


“तारा, अगं खरंच मी आहे. विशु, तुझा विशु.” तिच्याभोवती हातांचे कुंपण करून तो म्हणाला.


“तू खरंच आलाहेस?” तिचे डोळे अजूनही विस्फारले होते.


“हो गं राणी. तुला आलेले पहिले स्थळ म्हणजे मीच आहे.”


“खोटं. भास आहे हा. तुला यायचं असतं तर तू तेव्हाच दोन वर्षांपूर्वी आला असतास.” त्याच्या छातीवर मारत ती म्हणाली.


“हो; पण तू म्हणाली होतीस ना की जो तुला पहिल्यांदा पाहायला येणार त्याच्याशीच तू लग्न करणार आहेस. म्हणून मग मी विचार केला की पुढे जाऊनही स्कोप आहेच की तर आत्ताच कशाला घाई करायची? म्हणून मी आता आलो.” तिच्या चेहऱ्यावर हळूच फुंकर मारत तो म्हणाला.

“मी कसा विश्वास ठेवू ना?” तिचा श्वास फुलला होता.


“तारा, बघ ना. इतकी वर्ष झालीत तरी तुझ्या चेहऱ्यावरचा प्रेमाचा रंग गुलाबीच दिसतोय अगं. म्हणजे इतक्या दिवसात अनेक रंग तुझ्या समोर आले असतील. कधी माझा राग, कधी माझ्यामुळे झालेली चिडचिड तर कधी दुःख. या सगळ्यांचे विविध रंग अनुभवले असले तरी मूळ रंग प्रेमाचाच होता म्हणून तर माझ्यावरचे प्रेम व्यक्त न करताही तू मला तुझ्या मनात जपत आलीस.” तिच्या गालावरून अलवार बोट फिरवत त्याने तिचा चेहरा आरश्याकडे वळवला.


“विशु खूप छळलंस रे तू मला.” आवेगाने त्याच्या मिठीत शिरत ती म्हणाली.


“सॉरी गं. पण तू जर पहिलेच माझ्या प्रपोजलला होकार दिला असता तर इतकी वर्ष वाट बघायला नसती ना राणी.”


“वा रे! तुझं प्रेम होतं तर तू माझे म्हणणे मान्य करायला हवे होते ना?”


“तू जर मला म्हणाली असती ना की दोन वर्षांनी आला नाहीस तर मी जीव बिव देईन तर मी तेव्हाच तुझ्याशी लग्न केलं असतं; पण तू तसं काही न म्हणता तुला बघायला येणाऱ्या पहिल्या स्थळाला होकार देशील म्हणून सांगितलेस म्हणून मग मी ते पहिले स्थळ बनायचा प्रयत्न करत राहिलो.” तो.


“म्हणजे तू माझ्या मरणाची वाट बघत होतास तर ?”


“नाही गं वेडाबाई. मी तेव्हा शिकत होतो अगं. जेमतेम सेकंड इअरला. दोन वर्षात माझं ग्रॅज्युएशन देखील पूर्ण झालं नसतं तर मग मी तुझी कंडिशन कशी एक्सेप्ट करणार होतो? त्यात तुझे गरीब श्रीमंतीबद्दलचे मत. त्यामुळे मी आधी काही एक यशस्वी डॉक्टर व्हायचा विचार केला. त्यात तूही तुझी वकिली टॉपपणे सुरु केली होतीस म्हणून मग मला तुझा प्रवास खुंटवायचा नव्हता. उगाच मध्ये मागणी घालायला येईल आणि तुझे गैरसमज वाढतील ही भीती होती गं.”


“तुला माझ्याबद्दल माहिती होतं?”


“ऑफकोर्स. तुझ्यावरचं प्रेम मला कायम तुझ्या मागे घेऊन येत होतं.”


“बाईसाहेब आणि आईला तुझ्याबद्दल ठाऊक होतं?”


“ऍक्च्युली हो. त्यांना ठाऊक होतं म्हणून तर तुला हे आजचं गुलाबी सरप्राईज देता आलं.”


“किती रे दुष्ट तू? सगळ्यांना सगळं माहिती होतं. फक्त मला सोडून. विशु कळतंय का? मी जवळजवळ लग्नाला नकार दिलाय. आता घरच्यांनी आपलं लग्न मोडलं तर?”


“तर काय? मी माझी फिर्याद घेऊन तुमच्याकडेच येईन. शेवटी पुरुषमंडळींना देखील तुम्ही न्याय मिळवून देता हे आज प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय की.”

“व्हॉट?”

“ॲक्च्युली नाडकर्णी सरांची परमिशन घेऊनच मी आजच्या हिअरिंगला आलो होतो.”


“म्हणजे त्यांनाही ठाऊक होतं?” तिने डोक्याला हात मारला.

“तर? आपली लव्हस्टोरीच निराळी आहे. तुझ्यापर्यत पोहचणे सोपे थोडीच होते? सगळ्यांना मला विश्वासात घ्यावे लागले तेव्हा कुठे आजचा दिवस उगवला.” विशु हसायला लागला.


“म्हणजे ही साडी तूच आणली होतीस होय ना?”


“हो गं बाई हो. त्यानेच सगळं माझ्याकडे दिलं बरं. मी आपली निमित्तमात्र. आता फिर्यादीकडून सगळा कबुलीजबाब नोंदवून झाला असेल तर पुढची बोलणी करूया?” कामिनीताई दारातून म्हणाल्या.


“बाईसाहेब.” विशुचे हात बाजूला सारत ती लाजून समोर आली.


“बाईसाहेब नाही गं. सासूबाई म्हण. विशूची मावशी आहे मी. त्या नात्याने तुझी सासू झाले बरं का.” त्या म्हणाल्या.


“मग आता लग्न न करण्याचा विचार बदलला असला तर गुलाबाच्या गुलकंदाने तोंड गोड केलेले चालेल ना?” कामिनीताईंच्या मागे असलेल्या विश्वासच्या आई म्हणाल्या तसे तिने लाजून चेहरा लपवला.


“विशु, तारा.. प्रेम अनेक रंगाने नटले असले तरी मूळ रंग हा गुलाबीच असतो बरं का. तुम्ही तोंड गोड करून घ्या आम्ही बाहेर आहोत.” कामिनीताईंनी गुलकंदाचा डबा टेबलवर ठेवला नी साऱ्यांना घेऊन त्या बाहेर गेल्या.

इकडे लाजून गुलाबी झालेली तारा विशूच्या मिठीत केव्हा विसावली तिलाही कळले नाही.
-समाप्त.
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
_______

🎭 Series Post

View all