रंगात तुझ्या रंगतांना भाग 4
©️®️शिल्पा सुतार
.........
अनघा किचन मधून सगळं ऐकत होती. ती बाहेर येवून बसली. ती आल्याबरोबर सगळे गप्प बसले.
"तुम्ही तिघांनी मला त्रास द्यायचा असच ठरवलं आहे का?"
" काय झालं आता? लग्न म्हटलं की थोडंफार भेटीगाठी सगळं होणारच. त्यात एवढे चिडण्यासारखं काय आहे? " प्रतिभा ताई.
अनघा उठली चप्पल घालून बाहेर निघून गेली. इकडे रेखाताईंनी डोळ्याला पदर लावला होता. प्रतिभाताई त्यांची समजूत काढत होत्या.
"एवढ्या लवकर देवाने माझ्या मुलाला नेल. तोही असा शिक्षणाच्या दृष्टीने आणि नंतर त्याच्या कामासाठी बाहेरच असायचा. त्याच्याबरोबर काही रहाता आलं नाही."
"तुम्ही त्रास नका करून घेऊ रेखाताई. अनघा आली तर तिला पण दुःख वाटेल."
"हो ना माझं तर जाऊद्या पण ती पोरगी कसं सहन करत असेल."
" म्हणूनच तर आपण तिला सांगतो आहे ना की लग्न करून घे. किती दिवस तशीच राहणार."
" कसा आहे तो मुलगा? चांगला आहे का. " रेखा ताई चौकशी करत होत्या.
"श्रीमंत आहेत ते लोक. डॉक्टर आहे. एकच मुलगी आहे त्यांना छोटीशी, काही वय नाही, चांगले शिकले सवरलेले लोक आहेत. आता तुम्हाला एक काम आहे रेखाताई तुम्ही अनघाला लग्नासाठी तयार करा." प्रतिभा ताई.
"हो मी नेहमीच बोलते तिला. "
" ठीक आहे आता सुमित, अनघा आणि सौरभ घरात आल्यानंतर परत हा विषय काढू नका." प्रभाकर राव.
"अहो पण त्या दोघांची भेट घालून द्यायची असेल तर त्या बाबतीत थोडंस बोलावच लागेल ना." प्रतिभा ताई.
"उद्या अनघा बँकेत गेली की मी तिला फोन करेल. तिथून ती व्यवस्थित बोलते. उगीच चिडचिड करत नाही." प्रभाकर राव.
"ठीक आहे. पण काय ठरवायचं ते लवकर ठरवा. मला तिची खूपच काळजी लागली आहे. "
सुमित, अनघा, सौरभ खेळून वापस आले. सुमित खूपच बोलत होता. काय काय झालं ते सगळं सांगत होता. बाकीचे गप्प होते.
"काय झालं?" सौरभ अनघाला विचारत होता.
" काही नाही."
"मग सगळे गप्प का आहात एवढे? "
"मी तुला सकाळी सांगितलं होतं ना सौरभ तेच." प्रतिभा ताई.
" ताई.. आई बाबा म्हणतात त्याचा विचार कर. ते म्हणतात तिथेच लग्न करायला पाहिजे असं नाही. तुला जर कोणी आवडत असेल तर तसं सांग. तुझ्या मनात काय आहे? "सौरभ तिच्या जवळ येवून बसला.
"खरं सांगू तर माझ्या मनात सध्या काही नाही." अनघा.
"असं करून कसं चालेल पण आई बाबा बोलत आहेत तसं तू तुझं जोडीदार निवडायला पाहिजे. "
"आयुष्यात सारखं सारखं प्रेम होतं का सौरभ? तू सांग. "
" हे बघ तुझ्या मनात रवी विषयी ज्या भावना आहेत त्या कुणीच नकारात नाहीये. पण तू एकटी पण राहू शकत नाही ना. एवढं दुःख करत बसू नको. आयुष्यात पुढे जायला पाहिजे. तुला ही सुखी रहायचा अधिकार आहे. " प्रतिभा ताई बोलायला आल्या.
"पण मला आता लग्नाचा विचारही सहन होत नाही काय करू मी? सासूबाईंचा विचार येतो. सुमितचा विचार येतो. पुढे काय होईल माहिती नाही. सुमित दिवसेंदिवस मोठा होतो आहे. तो हट्टी होत चालला आहे. त्याचं पटेल का नवीन वडिलांशी? त्या घरी सुद्धा काही मुलं असतील त्यांच्याशी सुमितच पटेल का? मेन म्हणजे मी आई म्हणून त्या मुलांना योग्य न्याय देईल का? माझ्याकडून नाही होणार हे सौरभ . मी माझ्या आयुष्यात सुखी आहे. सासुबाई आणि सुमित सोबत चांगलं वाटतं मला. व्यवस्थित घडी बसली आहे आमची आयुष्याची. नको वाटत आता त्यात कोणी यायला किंवा मलाही आता ते घर सोडून जायला नको वाटत आहे. "
" तू म्हणजे तुझ्या ऋदयाच दार बंदच करून घेतले आहे ताई. कशावरून एवढा त्रास होइल. कदाचित सुमितला वडिलांची गरज असेल. तो तुला काही बोलून दाखवत नसेल. आता बघितलं ना तो माझ्यासोबत किती खेळत होता. रेखाताईंच म्हणशील तर आई-बाबांसोबत त्या राहायला तयार आहे किंवा त्या तुझ्या जवळ राहू शकतात. कशावरून सगळे निगेटिव्ह होईल आणि तू इतकी चांगली आहे ना. तुझ्या आयुष्यात जो येईल त्याला तू भरभरून प्रेम देशील. "
"मी विचार करते. "
" लवकर विचार कर तुझ्या मनात आहे का कोणी?"
"नाही रे माझ्या मनात रवी शिवाय कोणीच नाही ."
जेवण झाल्यानंतर कोणीच तो विषय काढला नाही. तिघेजण निघाले. आता सौरभ त्यांना कारने सोडून देणार होता. त्यामुळे सुमित खूप उत्साही होता. तो मामाच्या मागे मागेच होता.
"मम्मी मी पुढे बसणार आहे. "
" नाही सुमित मागे यायचं."अनघा बोलली.
" नाही.. मला मामा कार कशी चालवतो ते बघायचं आहे."
"बसू दे ग ताई त्याला पुढे .अगदी पंधरा मिनिटांचा तर रस्ता आहे. फक्त हात बेल्टच्या बाहेर घ्यायचे नाही. नाहीतर तुला मागे पाठवून देईल मी. "
सुमित खूपच कौतुकाने सौरभ कडे बघत होता. तो कार कशी चालवतो त्याबद्दल सगळी माहिती विचारत होता. पहिल्यांदा अनघाला खरंच वाटलं की ह्याला वडिलांच्या प्रेमाची गरज आहे. पण जो कोणी माझ्या आयुष्यात येईल तो खरंच इतक्या प्रेमाने वागेल का माझ्या सुमितशी. परत लग्न करायचं या विचाराने तिच्या अंगावर काटा आला होता.
घर आल. सौरभ बाहेरूनच वापस गेला. अनघाने सुमितला झोपवलं. रेखाताई समोर बसून टीव्ही बघत होत्या.
"आई मी झोपते." ती सुमित जवळ येऊन झोपली. आता तिला खूपच रडू येत होतं. तिने तोंडावरनं पांघरून घेऊन घेतलं. ती गुपचूप रडत होती .
तिला रवीची खूप आठवण येत होती. मी रवी सोबत कम्फर्टेबल होते. बाकी कोणी नको आयुष्यात.
सुमितची शाळा व्यवस्थित सुरू होती. तिच नोकरीत आता छान रुटीन सेट झालं होतं. बँकेत लोक चांगले होते. ती रेखाताईंकडे व्यवस्थित लक्ष देत होती आणि आता हे मध्येच लग्नाचं काढल्यामुळे तिचा मूड गेला होता. किती समजवाव आई-बाबांना आणि सासूबाईंनाही मला नाही करायचं लग्न. काही होत नाही. आता हे जे दोन-चार वर्षे गेले आहेत. असं पुढचं आयुष्य पण चालली जाईल. विचार करता करता... रडता रडता तिला झोप लागली.
दिवसाची नेहमीप्रमाणे सुरुवात झाली. अनघाने डब्यासाठी पोळी भाजी केली नाश्ता बनवला. मग सुमितला उठवलं. नेहमीप्रमाणे त्याची धावपळ झाली. शाळेची रिक्षा आली तो शाळेत गेला.
अनघा रेखा ताईंशी जास्त बोलत नव्हती. तिला माहिती होतं त्यांच्याशी बोललो की त्या लग्नाचा विषय काढतील कारण ते जे स्थळ सांगून आला आहे त्याला भेटायला जायचं ठरतं आहे आणि आईने ही जबाबदारी सासूबाईंवर दिली असेल. ती तयार होऊन बाहेर आली. त्या तिची वाट बघत होत्या.
"अनघा अग मी काय म्हणते आहे."
"आई तुमचा स्वयंपाक झालेला आहे किचनमध्ये झाकलेला आहे. वेळेवर जेवून घ्या आणि व्यवस्थित औषध घ्या. मला आज खूप उशीर झाला आहे." ती पटकन घरातन निघून गेली.
बँकेत आली. रोजचे काम सुरू झाले. लंच ब्रेक मध्ये तिच्या फोनवर फोन आला. कोणाचा आहे नाव आलं नाही त्यामुळे तिने फोन उचलला नाही. परत जरा वेळाने फोन आला. तिने उचलला.
" मी दिपूचे पप्पा बोलतो आहे. तुम्हाला तो डान्सचा व्हिडिओ हवा होता ना?"
"हो सॉरी मी तुमचा नंबर सेव केला नव्हता. गडबड झाली माझी."
" काही हरकत नाही."
"तुम्ही मला पाठवाल का व्हिडिओ."
" व्हिडिओ जरा मोठा आहे तो असा मेसेज द्वारे पाठवता येणार नाही. मी तो पेन ड्राईव्ह मध्ये टाकला आहे तुम्हाला जमलं तर येऊन घेऊन जा तो पेन ड्राईव्ह. "
" मेसेज पाठवता येणार नाही का? "
नाही.
" मी आता बँकेत आहे. "
" ठीक आहे मग बँकेचं काम झाल्यावर आलात तरी चालेल. "
"नाही म्हणजे मी बँकेत जॉब करते. माझी साडेपाचला सुट्टी होईल. "
" तेव्हा तर शक्य नाही तेव्हा मी बिझी असतो. "
" मग केव्हा भेटता येईल तुम्हाला? "
" एक काम करा ना माझ्या हॉस्पिटलला येता का? तुम्ही राहतात कुठे आणि बँक कुठे आहे? "
अनघाने डिटेल्स दिले. तुम्ही घरी जातांना येऊ शकता माझ्या हॉस्पिटलमध्ये."
"ठीक आहे येते मी संध्याकाळी."
अनघा संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये गेली. मोठ हॉस्पिटल होतं. तिने बाहेरून फोन केला. प्रदीपने फोन उचलला.
" तुम्ही आला आहात का हॉस्पिटल बाहेर?"
"हो सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं. पण तुमचं नाव माहिती नव्हतं त्यामुळे रिसेप्शन मध्ये काय सांगणार? "
" या आत. "
पाच मिनिटात ती प्रदीपच्या केबिन मधे होती. केबिन स्वच्छ आणि मोठी होती. प्रदीप खूप बिझी होते. आत्ताही ते एका मुलाशी बोलत होते. पेपर वर सह्या करत होते. तो मुलगा गेला.
"डॉक्टर पेशंटला आत पाठवू का? " नर्स आत आली.
" दहा मिनिट थांबा. "
अनघा रोज प्रमाणे साधी छान दिसत होती. आज तिने साडी नेसलेली होती. परफेक्ट फिगर. साडीचा लाइट कलर तिला छान दिसत होता. केसांची वेणी. त्यात तिचे स्ट्रेट केस रहात नव्हते. बर्याच बटा चेहर्यावर रूळल्या होत्या. ती थोडी थकली होती.
प्रदीपने तिला पाणी दिल.
थँक्स, ती छान हसली.
प्रदीपच तिच्या गालावरच्या खळीकडे एकदम लक्ष गेल. दोन मिनिट तो विचलित झाला. मी रोज किती लोकांना भेटतो. अस इतक छान कोणी कधी वाटल नाही. कोणी तरी बोलायला सुरुवात करायला हव म्हणून प्रदीप म्हणाले. "दिवस भर बँकेत धावपळ असते ना?"
"हो खूप गर्दी असते. खूप काम असत. सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं. मला माहिती नव्हतं तुम्ही एवढे मोठे डॉक्टर आहात. उगीच तुम्हाला व्हिडिओ द्यायला सांगितला. तुमचे पेशंट वाट बघत असतिल. मी निघते."
अनघा अस म्हणताच प्रदीप छान हसले. "आमचे काम सुरू असतात. पाच मिनिट वेळ नसतो. काही हरकत नाही. आता काही इमर्जन्सी नाही. "
" तुमचं हॉस्पिटल आहे का हे? "
"हो मी डॉक्टर प्रदीप इनामदार हार्ट स्पेशलिस्ट. "
" तुमचं नाव ऐकून आहे. मी अनघा दातार मी बँकेत काम करते. "
कॉफी?
" नाही मी निघते. "
"कॉफी घेतल्या शिवाय व्हिडिओ मिळणार नाही." दोघ छान हसले.
प्रदीपने फोन करून कॉफी सांगितली. अनघाला काय बोलावं ते समजत नव्हतं.
"तुमच्या सुमित बद्दल दिपू नेहमी घरी बोलत असते. दोघ एकाच वर्गात आहेत वाटतं. "
" हो दिपू पण एकदम गोड मुलगी आहे."
" सॉरी ते त्या दिवशी दिपूला समजलं नाही तुम्हाला काय म्हणावं."
"काही हरकत नाही. दिपू किती लहान आहे."
"तुम्ही जॉब करतात तर मध्ये सुमित कुठे असतो? पाळणा घरात राहतो का तो? "
" नाही माझ्या सासूबाई आहेत घरी. त्यांचा खूप आधार आहे. "
" हो खर आहे घरात कोणी असणं गरजेचं आहे. दिपूला पण खूपच सांभाळावं लागतं. मी असा बिझी असतो . रात्रीच घरी जातो. बऱ्याच वेळा दिपू झोपलेली असते. कधीकधी चिडते ती माझ्यावर. "
यांच्या घरात बाकीचे मेंबर नाही का? यांची बायको कुठे आहे? असा विचार अनघाच्या मनात आला. जाऊदे पण आपल्याला काय? कॉफी पिऊन झाली.
" थँक्यू व्हिडिओ बद्दल आणि सॉरी तुम्हाला उगीच त्रास दिला. "
" काही हरकत नाही. "
अनघा निघाली.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा