राणी मी राजाची भाग १४
मागील भागाचा सारांश: कंपनीतील वातावरणा बद्दल आलेले फ्रस्टेशन श्रीने आईआजीकडे व्यक्त केले. तसेच लक्ष्मण काका श्री सोबत बोलायला गेल्यावर त्याने त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. जान्हवी व श्रीने ग्राहकांकडे फिरुन देसाई व पवार विरोधात पुरावे गोळा केले.
आता बघूया पुढे….
संध्याकाळी सगळ्या ग्राहकांकडे फिरुन माहिती गोळा केल्यावर श्री व जान्हवी घरी परतणार होते, त्यासाठी ते आपल्या घराकडे जाणाऱ्या बसमध्ये बसले. बसमध्ये एकाच सीटवर दोघेजण बसले होते. श्री आपल्याच विचारात दंग दिसला, म्हणून त्याला जान्हवी म्हणाली,
"श्री तुम्ही एवढा कसला विचार करत आहात? मी सकाळपासून बघतेय की, तुम्ही खूप डिस्टर्ब आहात. कंपनीतील काम प्रामाणिकपणे करावे, असंच माझं म्हणणं आहे, पण तुम्ही त्या कामामध्ये भावनिक रित्या खूप गुंतले आहात, दिसताना तरी असंच दिसतंय. कदाचित काही महिन्यांनी किंवा वर्षांनी यापेक्षा चांगली नोकरी मिळाल्यावर तुम्ही ही कंपनी सोडून तिकडे जाल, त्यामुळे इतकं भावनिक होऊन काम करु नका."
"तुम्हीपण ही कंपनी सोडून जाण्याचा विचार करत आहात का?" श्रीने विचारले.
जान्हवी म्हणाली,
"सध्या तरी नाही, पण जर यापेक्षा चांगली संधी माझ्याकडे आली, तर मी नक्कीच त्यावर विचार करेल. मी नोकरी सोडल्यावर यशोमती मॅडमची कंपनी लगेच बंद पडणार नाही. आपल्याला आयुष्यात सगळेच निर्णय भावनिक होऊन घ्यावे लागत नाहीत. काहीवेळेस प्रॅक्टिकल होऊन निर्णय घ्यावे लागतात. नोकरी ही एक प्रॅक्टिकल गरज आहे. तसंही माझं लग्न झाल्यावर मी कुठे नोकरी करेल, हे त्यावर डिपेंड असेल."
श्री मनातल्या मनात म्हणाला,
"तुम्हाला माझ्या मनातील भावना समजणार नाही. ही कंपनी उभारताना माझ्या आईआजीने तिचं जीवाचं रान केलं आहे. अश्या कंपनी बाबत कोणी चुकीचं बोललेलं मला सहन होणार नाही."
श्री काहीच बोलत नाहीये हे बघून जान्हवी म्हणाली,
"तुमच्या घरी काही प्रॉब्लेम झाला आहे का? तुम्ही खूप दुखावले गेल्यासारखे दिसत आहात."
"नाही खरंच तसं काही नाहीये. मी विचार करत होतो की, यशोमती मॅडमने किती कष्टाने ही कंपनी उभारली असेल. देसाई व पवार सारख्या लोकांमुळे त्यांच्या कंपनीचं नाव खराब होत आहे. लोकं असे कसे वागू शकतात?" श्री म्हणाला.
यावर जान्हवी म्हणाली,
"श्री या विषयाचा अतिविचार तुम्ही करु नका. देसाई व पवार सारखे लोकं तुम्हाला प्रत्येक वाटेवर भेटणार आहेत. तुम्ही जर इतकं त्यांचं वागणं मनाला लावून घेतलं, तर जगणं अशक्य होईल. जेव्हा आपल्याच रक्ताचे नातेवाईक आपल्याला फसवून आपल्या आयुष्यातून निघून जातात, त्यापुढे ह्या बाहेरच्या लोकांचं काय घेऊन बसलात? श्री तुम्ही अति इमोशनल आहात. हा स्वभाव तुम्हाला बदलावा लागेल, नाहीतर ह्या स्वभावाचा त्रास सगळ्यात जास्त तुम्हालाच होईल."
तेवढ्यात बस स्टॉप आल्यावर दोघेजण खाली उतरले.
"राहिलेल्या ग्राहकांकडे मी एकटा जाईल. तुम्ही आराम करा." श्रीने सांगितले.
"पण का?" जान्हवीने विचारले.
श्री म्हणाला,
"तो एरिया थोडा लांब आहे. मी मित्राला घेऊन त्याच्या बाईकवर जाईल. आज खूप जास्त पायपीट झाली."
"हो चालेल. माझी काही मदत लागली तर फोन करा." जान्हवी एवढं बोलून आपल्या घराच्या दिशेने निघून गेला.
श्री आपल्याच विचारात दंग होऊन घरात चालला होता. आजूबाजूला कोण आहे? याकडे सुद्धा त्याच लक्ष नव्हतं.
"श्री काय झालं?" भरतने त्याला विचारले.
"काही नाही." श्रीने थांबून उत्तर दिले.
भरत म्हणाला,
"अरे पण तुझा चेहरा असा का पडलाय?"
श्री म्हणाला,
"काही नाही काका, कामाचा थोडा स्ट्रेस आलाय."
भरतकडे न बघता श्री हॉलमध्ये जाऊन सोप्यावर बसला. भरत त्याच्या पाठोपाठ हॉलमध्ये गेला. श्रीची आई किचनमध्ये काहीतरी करत होती.
"जानकी वहिनी आधी हातातील काम सोडून इकडे या." भरत म्हणाला.
"काय झालं भाऊजी?" श्रीच्या आईने येऊन विचारले.
भरत काळजीने म्हणाला,
"अहो वहिनी एकदा श्रीच्या चेहऱ्याकडे बघा ना. त्याचा चेहरा किती पडलाय. मला तर तो काहीच सांगत नाहीये. तुम्ही तरी विचारा, म्हणजे तो सांगेल."
श्रीची आई त्याच्या जवळ गेली व त्याच्या केसात हात फिरवून म्हणाली,
"श्री बाळा काय झालंय? तुझा चेहरा असा का दिसतो आहे?"
इतक्या वेळ दडवून ठेवलेले अश्रू बाहेर पडायला सुरुवात झाली, तशी श्रीने आईला मिठी मारली. श्री हुंदके देऊन देऊन रडत होता. आपल्या मुलाच्या डोळ्यातील पाणी बघून त्याच्या आईच्याही डोळयात पाणी आले.
दृष्टी तिथे आल्यावर भरत तिला म्हणाला,
"माऊ आईआजीला बोलावून आण. नेमकं कंपनीत काय सुरु आहे? हे तिच्याकडूनचं कळेल."
दृष्टीने लगेच आईआजीला बोलावून आणले. श्री रडतो आहे हे कळल्यावर आईआजी लगेच हॉलमध्ये आली. श्री तोपर्यंत सावरला होता.
"आई, श्री कंपनीत काय सुरु आहे? श्री इतका इमोशनल का झाला आहे?" भरतने विचारले.
"श्री माझ्याबद्दल कोणी काही बोललं असेल, तर मनाला लावून घेऊ नकोस. इतका मोठा बिजनेस उभारताना मला अनेक टिप्पण्यांना सामोरे जावे लागले आहे. याव्यतिरिक्त तुला कसले वाईट वाटले आहे?" आईआजी म्हणाली.
डोळ्यातील पाणी पुसत श्री म्हणाला,
"आजवर मला कधीच डॅडची आठवण आली नाही, पण आज ते इथे हवे होते. आईआजी आज पहिल्यांदा मला एकटं असल्यासारखं वाटलं. ज्या लोकांची लायकीही नाही, ते लोकं माझ्या आईआजीला वाईट बोलत होते आणि मी काहीच करु शकलो नाही.
आईआजी मला कुणाचा आधार नाहीये, असंच त्यावेळी वाटत होतं. आईआजी जर तुझा एखादा मुलगा आज तुझ्या बाजूने तुझ्या सोबत उभा असता तर त्या पवार व देसाईची तुला फसवण्याची हिंमत झाली नसती, शिवाय कोणी तुझ्या बद्दल वाईट बोलले नसते. डॅड असते तर त्यांना हक्काने मी बोलू शकलो असतो, त्यांच्या सोबत भांडू शकलो असतो. आईआजी ह्या सगळ्यांचा आज उपयोग नाही तर हे कशासाठी? कुटुंब कशासाठी असतं? वाईट वेळी एकमेकांची साथ देण्यासाठी असतात ना. आईआजी आज आपल्या कुटुंबात माझे दोन काका असताना सुद्धा मी त्यांच्या सोबत हक्काने बोलू शकत नाही की, मी त्यांना जाब विचारु शकत नाही.
आईआजी मला मान्य आहे की, लक्ष्मण व भरत काकाला बिजनेस मध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता, पण त्यांना एक कर्तव्य म्हणून तुझ्या पाठीमागे उभं रहावं का वाटलं नसेल? हा प्रश्न राहून राहून माझ्या मनात येतो."
भरत म्हणाला,
"श्री तू आता सध्या हे सगळं का बोलत आहेस? हे मला कळत नाही, पण आई बद्दल बाहेर काय बोललं जातं आहे? हे तरी सांग, म्हणजे नेमका तू कशामुळे दुखावला गेला आहेस?"
श्री म्हणाला,
" काका ते लोकं सरळ म्हणत आहेत की, ती यशोमती बाई आता म्हातारी झाली आहे, तिच्यात आता पहिल्या सारखा दम राहिला नाहीये. त्या बाईने बिजनेस सांभाळला, पण तिच्या एका मुलालाही स्वतःप्रमाणे घडवण्यात ती असमर्थ ठरली आहे. आता देशमुख फूड्स ही कंपनी डबघाईस जाणार आहे. अजून बरंच काही बोललं जात आहे, ते मी बोलू शकत नाही.
आता मला डॅडची आठवण का आली? तर हे बाहेरचं जग खूप भयानक आहे. या जगाची ओळख आपल्याला एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीने करुन द्यावी असं वाटतं किंवा हे जग इतकं वाईट आहे, हे समजल्यावर या जगात कसं वावरायचं? हे सांगायला कोणीतरी मार्गदर्शक आवश्यक असतो, म्हणून मला डॅडची आठवण आली होती. मी बाहेरच्या जगातील ही वाईट बाजू पहिल्यांदा अनुभवली आहे आणि ते मला पचायला थोडं जड जात आहे."
यावर आईआजी म्हणाली,
"श्री मला तुझी मनस्थिती समजू शकते. हे जग जेवढं चांगलं तेवढंच वाईट आहे. तुझे आजोबा गेल्यावर मी जेव्हा बिजनेस सांभाळला, तेव्हा माझ्याबद्दल बरंच वाईट बोललं गेलं होतं, पण या सगळ्यांना प्रतिउत्तर देऊन मी माझं तोंड दूषित करुन घेतलं नाही. मी माझ्या कामाने सर्वांना चपराक दिली आहे. जेव्हा तुझा डॅड हे घर आणि बिजनेस सोडून गेला, तेव्हाही मला अनेकांनी प्रश्न विचारले होते. मी तेव्हा शांततेचा मार्ग स्विकारला होता. तुझा ह्या जगातील पहिला अनुभव असल्याने तुला वाईट वाटणं स्वाभाविक आहे.
मीही अनेकदा रुममध्ये जाऊन रडली होती. मी माझ्या कुटुंबापुढे कमकुवत पडू शकत नव्हते. तू आज रडून, बोलून मोकळा झालास हे बरं केलं. एक महत्त्वाची गोष्ट सांगेल की, तुझ्या दोन्ही काकांनी बिजनेस जॉईन केला नाही, म्हणून त्यांना दोष देऊ नकोस. हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय होता, त्याचा आदर आपण करावा. इथून पुढे मला तुला कमकुवत झालेलं बघायचं नाहीये."
एवढं बोलून आईआजी श्रीच्या खांद्यावर हात ठेवून निघून गेली.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा