राणी मी राजाची भाग ३५
मागील भागाचा सारांश: जान्हवीच्या आईचा शोध दामले काकांमुळे लागला. जान्हवी मध्ये आईला भेटायला जायला एकटीमध्ये हिंमत नव्हती, म्हणून श्रीने तिच्या बरोबर जाण्याचे ठरवले.
आता बघूया पुढे…
घरी गेल्यावर श्री आईआजीच्या रुममध्ये गेला.
"बोल आज काय सांगायला आला आहेस?" श्री रुममध्ये गेल्या बरोबर आईआजीने विचारले.
श्री म्हणाला,
"मी तुला काहीतरी सांगायला आलो आहे, असं तुला का वाटतंय?"
"श्री मी तुला बाळात्यात असल्यापासून ओळखते. तुझा चेहरा बोलका आहे." आईआजीने सांगितले.
श्री म्हणाला,
"आईआजी तुला आत्मसन्मान संस्थेच्या चालिका नंदाताई माहीत आहे ना?"
"हो. आपण दरवर्षी त्यांना डोनेशन देत असतो. यावर्षीचा चेक त्यांच्या हातात सुपूर्द करायचा राहिला आहे. दरवर्षी मी स्वतः तिकडे जाऊन त्यांना चेक देत असते, पण तुला त्या कश्या काय आठवल्या?" आईआजीने विचारले.
श्री पुढे म्हणाला,
"आईआजी यावर्षी मी त्यांना चेक नेऊन देऊ का?"
"हो, तू गेलास तरी माझी हरकत नाही, पण त्यांची तुला आठवण कशी झाली? आणि तुला का जायचं आहे?" आईआजीने प्रश्न विचारला.
मग श्रीने घडलेली सर्व हकीकत सांगितली. जान्हवीच्या बाबांच्या पत्रापासून ते दामले काकांपर्यंत सगळं काही सांगितलं. श्रीचं बोलणं ऐकल्यावर आईआजी म्हणाली,
" हे तर भयानकचं आहे. इतके दिवस मला वाटायचं की, आपल्याच घरात असे प्रॉब्लेम्स असतील म्हणून. बिचाऱ्या जान्हवीच्या आयुष्यात सुद्धा मोठे वादळचं आहे. जान्हवीच्या बाबांच्या पत्रानुसार नंदा जान्हवीची आई आहे तर…"
"हो आई. जान्हवी मध्ये एकटीला तिच्या आईची भेट घेण्याची हिंमत नाहीये, म्हणून मी तिच्या सोबत जाण्याचे ठरवले. चेक घेऊन जाण्याच्या निमित्ताने त्यांची वेळही घेता येईल. आईआजी तू एवढं काम करशील ना?" श्रीने विचारले.
आईआजी म्हणाली,
"हो मी फोन करुन तू परवा जाणार असल्याचे कळवते. मला एक खरं खरं सांग, श्री तू जान्हवीला अति मदत करतो आहेस, असं वाटत नाही. जान्हवीच्या बाबांचं पत्र फक्त तू पोहचवून आला असता, तरी चाललं असतं. तू तिच्या आयुष्यात जास्त ढवळाढवळ करत आहेस."
"आईआजी तुला म्हणायचे काय आहे? मी याआधीही तुला सांगितले आहे की, मी हे सगळं फक्त माणुसकीच्या नात्याने करत आहे." श्रीने सांगितले.
यावर आईआजी म्हणाली,
"जाऊदेत आपण या विषयावर बोलायला नको. शेवटी तुला जे करायचं आहे, तेच तू करणार. मी संस्थेत फोन करुन तू जात असल्याबद्दल कळवते."
श्री आपल्या रुमपर्यंत जाईपर्यंत आईआजीच्या बोलण्याचा अर्थ लावत होता. त्याला नेमका अर्थ कळाला नव्हता.
------------------------------------------------------
श्री व जान्हवीला पुण्याला जायचे होते आणि नेमकं त्याच दिवशी नितीनला इमर्जन्सी असल्याने अर्जंट गावी जावे लागले होते. आता श्रीला स्वतः गाडी चालवत एवढ्या लांबचे अंतर काटावे लागणार होते. जान्हवीला घेण्यासाठी श्री गाडी घेऊन तिच्या घराजवळ गेला.
"आज नितीन आला नाही का?" जान्हवीने गाडीत बसता बसता विचारले.
"नाही, त्याला त्याच्या गावी अर्जंट जावे लागले." श्रीने उत्तर दिले. श्री व जान्हवी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाले.
"आता एवढ्या लांब तुम्हाला माझ्यासाठी गाडी चालवत यावं लागेल. माझ्यामुळे तुम्हाला बराच त्रास सहन करावा लागत आहे." जान्हवी म्हणाली.
यावर श्री म्हणाला,
"आपल्या जवळच्या माणसांसाठी थोडा त्रास सहन करावा लागला, तरी काही फरक पडत नाही."
जान्हवीला श्रीचे बोलणे जर वेगळे वाटले, म्हणून ती म्हणाली,
"सॉरी सर पण मला तुमच्या बोलण्याचा अर्थ कळाला नाही."
आपण जे बोलून गेलो, त्याचा चुकीचा अर्थ जान्हवीने लावू नये, म्हणून तो म्हणाला,
"असं माझा लंडन मधील रुममेट प्रणव नेहमी म्हणायचा."
"तुमचा मित्रही एम बी ए चं करत होता का?" जान्हवीने विचारले.
"नाही. तो तिकडे जॉब करतो." श्रीने उत्तर दिले.
मग पुढे जान्हवी काहीच बोलली नाही. श्रीने एफ एम चालू केले व गाण्यांची मजा घेत गाडी चालवत होता. जान्हवी मात्र तिच्या विचारात हरवली होती. श्रीला गाडी चालवण्यावर लक्ष केंद्रीत करायचे होते, म्हणून तो जान्हवीला काहीच म्हणाला नाही.
साधारणतः एक तासाने श्रीला नितीनचा फोन आला, म्हणून त्याने गाडी साईडला घेतली. श्रीने फोन उचलून स्पिकरवर टाकला.
"हं बोल नितीन, काय म्हणतोस?" श्रीने विचारले.
"साहेब इकडे मोठा प्रॉब्लेम झाला आहे. माझं ज्या मुलीवर स्वातीवर प्रेम होतं, तिचं तिचे वडील जबरदस्तीने लग्न लावून द्यायला निघाले आहेत, ते माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीयेत. प्लिज साहेब तुम्ही काहीतरी करा ना. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. मी तिच्या शिवाय जगू शकणार नाही." नितीन रडक्या आवाजात बोलत होता.
श्री त्याला शांत करण्यासाठी म्हणाला,
"नितीन तू शांत हो. तू एक काम कर माझं आणि तिच्या वडिलांचं बोलणं करुन दे. मी त्यांना समजावून सांगतो."
नितीन तिच्या वडीलांकडे फोन घेऊन गेला, पण ते फोनवर बोलायला तयार नव्हते, मग श्रीने नितीनला फोन स्पिकरवर ठेवायला लावला आणि श्रीने बोलायला सुरुवात केली,
"नमस्कार काका, मी श्री देशमुख, देशमुख फुड्सचा मालक. नितीन आमच्याकडेच नोकरी करतो. तुम्हाला कदाचित माझ्या सोबत बोलण्याची अजिबात इच्छा असेल, पण जर तुमचे तुमच्या मुलीवर खरे प्रेम असेल, तर तुम्ही माझं म्हणणं ऐकून घ्याल."
श्री असं बोलल्यावर स्वातीचे वडील हातात फोन घेऊन म्हणाले,
"हं पटकन बोला. मला लई कामं हाय."
यावर श्री म्हणाला,
"धन्यवाद काका. काका आपल्या मुलीचे लग्न म्हणजे एका वडिलांचे स्वप्न असते. स्वातीचे लग्न म्हणजे तुमचेही स्वप्नचं असेल. तुम्ही स्वातीला आजवर तुमच्या परीने सगळं काही देण्याचा प्रयत्न केला असेल, मग आजचं तिचं लग्न तिच्या मनाविरुद्ध लावायला का निघाला आहात?"
"साहेब तुम्ही लई मोठं माणसं आहेत. आमचे आणि तुमचे विचात कधीच जुळणार नाहीत. साहेब आम्ही शेतकरी लोकं आहोत. आमच्या घरात हे प्रेम बिम चालत नाही. आम्ही पोरगी देताना पोराची जमीन बघतो. नितीनच्या वाट्याला एक गुंठा जमीन आहे, त्यात माझ्या मुलीचं कसं भागलं?
मी जे स्थळ बघितलं आहे, त्याला पाच एकर जमीन आहे. मी हातावरच्या पोराला माझी पोरगी देणार नाही." स्वातीच्या वडिलांनी सांगितले.
श्री पुढे म्हणाला,
"काका मला तुमचं म्हणणं मान्य आहे, पण एक लक्षात घ्या की, एखाद्या वर्षी दुष्काळ पडला, तर शेती कितीही असली तरी त्यात काहीच पिकणार नाही. पण नितीन जी नोकरी करतो आहे, त्याचा पगार हवामानावर नाही, तर त्याच्या कामावर अवलंबून आहे. काका मी स्वातीला सुद्धा नोकरी देईल. शेतात जाऊन उन्हात काम करण्यापेक्षा तुमची मुलगी सावलीत बसून काम करु शकेल.
नितीन एक निर्व्यसनी मुलगा आहे, तो कष्टाळू आहे. काम करण्याची व काहीतरी करण्याची जिद्द त्याच्यात आहे. काका मला लहान दोन बहिणी आहेत. आजपासून स्वातीही माझी तिसरी बहीण झाली असं समजा.
माझ्यावर विश्वास ठेवून स्वातीचा हात नितीनच्या हातात द्या. स्वाती व नितीनची सगळी व्यवस्था मी करेल. काका तुमच्या मुलीचे सुख नितीन सोबत लग्न करण्यात आहे. एकदा स्वातीला तिच्या मनात काय आहे? हे विचारा. मनाविरुद्ध लग्न करुन ती कधीच सुखी राहू शकणार नाही.
पुढे जाऊन पश्चाताप करण्यापेक्षा आज थोडी माघार घ्या. एक बाप आपल्या मुलीसाठी काहीही करु शकतो ना? आज तुम्हाला ते दाखवून द्यायचे आहे."
स्वातीच्या बाबांनी फोन कट केला. जान्हवी श्रीचं बोलणं शांतपणे ऐकत होती.
"स्वातीचे बाबा या लग्नाला तयार होतील का?" जान्हवीने विचारले.
"नक्कीच होतील. मी माझ्या पद्धतीने प्रयत्न केला आहे. शेवटी आता सगळं देवाच्या हातात आहे." श्रीने सांगितले.
जान्हवी म्हणाली,
"सर तुम्ही सगळ्यांचाच किती विचार करतात. काहीही नातं नसताना तुम्ही सगळ्यांची मदत करत असतात."
यावर श्री म्हणाला,
"माणुसकीचे नाते हे सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि मी त्याच नात्याने सगळ्यांची मदत करण्याचा प्रयत्न करत असतो."
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा