राणी मी राजाची भाग ३७
मागील भागाचा सारांश: जान्हवी व श्रीमध्ये प्रेम या विषयावरुन चर्चा झाली. ट्रॅफिक मुळे श्री व जान्हवीला पुण्याला पोहोचायला वेळ लागला. नंदाताई बाहेर गेलेल्या असल्याने श्री व जान्हवीला त्यांची वाट बघत बसावे लागले.
आता बघूया पुढे….
नंदाताई आल्याचा निरोप शिपायाने श्री व जान्हवीला दिला. श्री व जान्हवी नंदाताईंच्या केबिनमध्ये जाऊन बसले. नंदाताई केबिनमध्ये नसल्याने श्री व जान्हवी केबिनला न्याहाळत होते. भिंतीवर वेगवेगळी सर्टिफिकेट लावलेले होते. नंदाताईंचं कार्य किती अफाट आणि कौतुकास्पद आहे, हे सर्टिफिकेट दर्शवत होते.
"सॉरी तुम्हाला बराच वेळ थांबावे लागले. अचानक इमर्जन्सी आल्याने मला जावे लागले होते." नंदाताई केबिनमध्ये आल्याबरोबर म्हणाल्या.
जान्हवीने एकदाच त्यांच्याकडे बघितलं, तिला भरुन आल्यामुळे ती मान खाली घालून बसली. श्रीला जान्हवीची मनस्थिती समजून येत होती. श्री स्वतःची ओळख करुन देताना म्हणाला,
"मी श्री देशमुख यशोमती देशमुखांचा नातू आणि ही माझी कलीग आहे, तिला पुण्यात थोडं काम होतं, म्हणून ती सोबत आली आहे."
"अच्छा. यावेळी यशोमती मॅडम ऐवजी तुम्ही कसे आलेत? यावर्षी मॅडमची भेट काही होणार नाही. त्यांचे विचार ऐकायला मला खूप आवडतात." नंदाताई म्हणाल्या.
यावर श्री म्हणाला,
"मी तुमचं नाव आईआजी कडून बऱ्याचदा ऐकले होते. तुमचं कार्य ऐकून तुम्हाला भेटण्याची इच्छा होती, म्हणून म्हटलं चला एकदा तुम्हाला येऊन समक्ष भेटावं. तुम्हाला आजीची भेट घ्यायची असेल, तर नाशिकला आमच्या घरी या. घरातील सर्वांसोबत तुमची भेट होईल."
"मी सहसा नाशिकला जात नाही. भूतकाळाच्या आठवणी पुन्हा जाग्या व्हायला नको, म्हणून मी टाळते. मागे एकदा अशीच गेले होते, पण तिथेही भूतकाळात असणाऱ्या लोकांसोबत भेट झाली आणि जुन्या जखमा पुन्हा सलू लागल्या. कधी नाशिकला आलेच तर नक्कीच तुमच्या घरी येईल. तुमच्या घरातील यशोमती मॅडम व राम दादांना आजवर भेटलेली आहे आणि तुम्ही तिसरे देशमुख आहात." नंदाताईंनी सांगितले.
नंदाताईंच्या तोंडून स्वतःच्या वडिलांचे नाव ऐकल्यावर श्रीला आश्चर्य वाटले, म्हणून तो म्हणाला,
"तुम्ही डॅडला भेटला आहात का? कसं ते?"
"हो. मला जेव्हा आधाराची गरज होती, तेव्हा राम दादांनी मला मदत केली होती. मी जर आज तुमच्या समोर जी दिसते आहे, ते केवळ राम दादांमुळेच. ही संस्था उभी राहण्यास सुद्धा दादांचा खूप मोठा हातभार लाभला आहे. ज्या काळात आपल्या माणसांनी माझ्यावर विश्वास ठेवला नव्हता, तेव्हा अनोळखी असून सुद्धा राम दादांनी माझ्यावर विश्वास ठेवला होता. राम दादा देवमाणूस बनून माझ्या आयुष्यात आले असते. दादांनी वेळीच मला अडवले नसते, तर मी आज या जगात नसते." नंदाताईंनी सांगितले.
"माफ करा मी तुमच्या दोघांच्या मध्ये बोलते आहे, पण तुमच्या आयुष्यात असं काय घडलं होतं? तुम्ही म्हटल्या की तुम्ही सहसा नाशिकला जात नाहीत. श्री सरांच्या वडिलांनी तुम्हाला अडवले, म्हणजे तुम्ही आत्महत्या करायला निघाल्या होत्या का? माझ्या मनात तुमच्या बद्दल अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. तुमच्या आयुष्यातील संघर्ष कथा मला ऐकायला नक्कीच आवडेल. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम नसेल तर प्लिज सांगाल का?" जान्हवीने विचारले.
"माझ्या आयुष्याची संघर्ष गाथा तुला ऐकावी का वाटत आहे?" नंदाताईं म्हणाल्या.
यावर जान्हवीला काय उत्तर द्यावे हे न समजल्याने श्री लगेच म्हणाला,
"कसं असतं ना मॅडम. आपल्यापेक्षा जास्त दुःख समोरच्याचा आयुष्यात आहे आणि समोरच्याने ते दुःख सहन करुन त्याला तोंड दिले आहे, हे कळल्यावर आपल्या आयुष्यातील असणाऱ्या दुःखाची तीव्रता कमी होते किंवा ते सहन करण्याची ताकद मिळते. पंधरा दिवसांपूर्वी हिच्या बाबांनी आत्महत्या केली, त्यामुळे ती बरीच डिस्टर्ब आहे. तिच्या आयुष्यात आधीही खूप काही घडून गेलं आहे."
यावर नंदाताई म्हणाल्या,
"मला मॅडम म्हणू नका. मला नंदाताई म्हणून सर्वजण ओळखतात. माझ्या जीवनप्रवासामुळे जर कोणाला दुःख सहन करण्याची ताकद मिळत असेल, तर मी नक्कीच माझा जीवनप्रवास सांगेल.
माझं माहेर एका खेडेगावातील होते. आई वडील मोलमजुरी करुन पोट भरत होते. आम्ही सहा भावंडे होतो, चार भाऊ व दोन बहिणी. मी सगळ्यात लहान असल्याने थोडी लाडकी होते. माझे चारही भाऊ शाळेतून आल्यावर रोजंदारीच्या कामावर जायचे. आमच्या सगळ्यात जास्त शिक्षण मीच घेतलेले आहे. माझी बारावी झालेली आहे. मला पुढे शिकण्याची इच्छा होती, पण बारावी झाली आणि एक स्थळ सांगून आलं. मुलगा शहरात नोकरीला आहे म्हटल्यावर वडिलांनी लगेच होकार दिला.
लग्न झाल्यावर नाशिकमध्ये आल्यावर समजले की, हे ह्यांना कमी पगाराची कंपनीत नोकरी आहे. आपल्या संसाराला हातभार लागावा म्हणून एका संस्थेत कामाला लागले. मला एक नणंद होती, तिला माझे बाहेर जाऊन काम करणे पटत नव्हते, म्हणून ती यांचे माझ्याविरुद्ध कान भरवायची, विशेष म्हणजे ह्यांना तिचं म्हणणं पटायचं.
मला एक मुलगी झाली. मी तिला घेऊन कामावर जायचे. आपले शिक्षणाचे अपूर्ण स्वप्न आपल्या मुलीने पूर्ण करावे, हे ध्येय समोर ठेऊन काम करायचे. एके दिवशी नणंदेने खूप मोठा तमाशा घातला आणि मी घराबाहेर पडणे कायमचे बंद केले. किती दिवस ह्यांचे टोमणे ऐकायचे.
घरात राहून राहून मला नैराश्य येत होतं. मी ह्यांच्या सोबत संवाद साधणे सोडलं होतं. ह्यांना माझी कीव कधीच आली नाही. मी कशी आहे? हा प्रश्न सुद्धा त्यांनी कधी मला विचारला नाही.
दिवसामागून दिवस जात होते. एके दिवशी मी ज्या संस्थेत काम करत होते, त्या संस्थेतील मॅनेजर आमच्या घरी आले होते, त्यावेळी माझ्या नणंदबाई घरात होत्या. ते मला पुन्हा नोकरी करणार का? म्हणून विचारायला आले होते. मी त्यांना नकार दिला होता. कोणी आपल्या घरी आल्यावर आपण त्यांना चहा घेण्याचा आग्रह करतोच ना. मीही तेच केलं होतं.
मॅनेजर निघून गेल्यावर हे घरी आले आणि माझ्या नणंदेने नको ती बडबड चालू केली. माझ्या चारित्र्यावरुन वाईट साईट बोलणं सुरु केलं. मला तिचे आरोप काही सहन झाले नाही. मग इतकी वर्षे मनात साचलेलं मी बोलून मोकळे झाले, ह्यांना माझं बोलणं खटकलं आणि माझ्या कानाखाली वाजवली. मी घर सोडण्याचा निर्णय घेतला. मुलीला सोबत घेऊन निघाले तर ह्यांनी तिला माझ्या सोबत येऊ दिले नाही. मी हात जोडून विनंती केली, पण त्यांनी काहीच ऐकलं नाही. शेवटी मला एकटीलाच ते घर सोडावे लागले. मला वाईट ह्याचं वाटलं की, ह्यांनी मला एकदाही अडवलं नाही.
मी घरापासून पायी थेट नाक्यापर्यंत गेले. माझ्या नशिबाने आमच्या गावी जाणारा एक टेम्पो मला दिसला. माझ्याकडे पैसे नसल्याने मी टेम्पोत बसून माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. टेम्पोवाला मला ओळखत असल्याने त्याने मला टेम्पोत बसू दिले.
माहेरी गेल्यावर मला अचानक आलेलं पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले होते. रात्रीची वेळ असल्याने मी जेवण करुन झोपून घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी घडलेला प्रकार भावांना सांगितला. भाऊ व वहिनींनी माझ्याच चुका काढल्या आणि भावांनी सांगितले की, "इथं राहून आमची इज्जत घालू नको. तू आताच्या आत्ता इथून निघून जा. माझ्या मोठया भावाने मला एक हजार रुपये दिले. मीही तशीच रेल्वे स्टेशनवर आले आणि एका रेल्वेत बसले. मनात असंख्य विचार येत होते की, आता आपलं म्हणावं असं या जगात कोणीच राहिलं नाहीये. आता आपण कुठे जाणार? कोणासाठी जगणार? आपल्या जगण्याला काहीच अर्थ उरला नाहीये. जिवंत राहून तळमळण्यापेक्षा मेलेलं बरं, म्हणून आत्महत्या करण्याचे ठरवले.
एका रेल्वे स्टेशनवर उतरले आणि एखाद्या रेल्वे आली की, तिच्या समोर जाऊन उडी मारायची असे ठरवले. दहा ते पंधरा मिनिटांनी एक रेल्वे आली, उडी मारण्याची पूर्ण तयारी केली, पण हिंमतच झाली नाही. अश्या दोन ते तीन रेल्वे निघून गेल्या, पण उडी मारण्याची हिंमत काही होत नव्हती.
नंदाताई व श्रीच्या डॅडची भेट कशी होते? नंदाताईंच्या आयुष्यातील पुढील प्रवास जाणून घेऊया पुढील भागात…..
©®Dr Supriya Dighe
