Login

राणी मी राजाची भाग ३८

गोष्ट राजा राणीची

राणी मी राजाची भाग ३८


मागील भागाचा सारांश: जान्हवीने रिक्वेस्ट केल्यावर नंदाताईंनी त्यांचा जीवन प्रवास सांगायला सुरुवात केली होती. नंदाताईंचा जन्म कोणत्या कुटुंबात झाला? तसेच भावंडांबद्दल त्यांनी सांगितले. लग्न झाल्यावर काय काय घडले? घर सोडण्यासाठी जो प्रसंग कारणीभूत ठरला? तेही सांगितले.


आता बघूया पुढे…..


नंदाताईं त्यांचा पुढील जीवन प्रवास सांगत होत्या,


"पुढील अर्धा तास एकही रेल्वे आलीच नाही. मला मरण्याची इच्छा असून सुद्धा मरता येत नव्हतं. मी स्वतःपुढे हतबल झाले होते. माझ्या डोळ्यातील अश्रू सुकले होते. रेल्वे येण्याची वेळ झाली, तशी मी मनाची पूर्ण तयारी केली. आता काही झालं तरी रेल्वेसमोर उडी मारायची म्हणजे मारायची.


रेल्वे आली आणि मी उडी मारण्याच्या तयारीत असतानाच एका व्यक्तीने माझे हात ओढून मला खेचलं. मी त्या व्यक्तीकडे बघितलं, तर तो व्यक्ती थोडा चिडून म्हणाला,

"ओ बाई तुम्हाला मरायचं आहे का? समोरुन रेल्वे येत आहे, हेही कळलं नाही का?" 


"हो मला मरायचं होतं. तुम्ही मला का अडवलं? मला जगायचं नाहीये. माझ्या आयुष्यात जगण्यासारखं काहीच उरलं नाहीये." मी माझी शोकांतिका गात बसले होते.


"इकडे बेंचवर बसा. मी पाण्याची बाटली घेऊन येतो. आज एकही रेल्वे येणार नाही. तुम्हाला मरण्याचा प्लॅन उद्या करावा लागेल. आजचा एक दिवस तुम्हाला देवाने जीवनदान दिले आहे." हे बोलून ती व्यक्ती पाण्याची बाटली आणण्यासाठी निघून गेली. 


मी गुपचूप बेंचवर जाऊन बसले. त्या व्यक्तीने पाण्याच्या बाटलीचे झाकण काढून माझ्या हातात दिले. मला कोरड पडलीच होती, तर मी बाटलीतील पूर्ण पाणी प्यायले. तेवढ्यात एक दोन्ही पायाने अपंग असलेला भिकारी आमच्याकडे भीक मागण्यासाठी आला.


त्या व्यक्तीने त्याच्या हातात शंभर रुपयांची नोट देत विचारले,

"तू कधी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नाही का? म्हणजे तुला कधी हे आयुष्य नकोसे वाटले नाही का?"


यावर त्या अपंग व्यक्तीने उत्तर दिले,

"साहेब हे आयुष्य त्या देवाने मला दिले आहे. मला मृत्यू कधी यावा, हेही त्याच्याचं हातात आहे. मानव जन्म सहसा मिळत नाही. मी या जन्मात अपंग म्हणून जन्माला आलो असेल, तरी हे भोग माझ्या मागील जन्माचे असतील. मी नक्कीच काहीतरी वाईट काम केले असेल. मी मला लवकरात लवकर मृत्यू यावा हे देवाकडे दररोज मागत असतो, पण आत्महत्या करण्याचा विचार अजूनतरी डोक्यात कधीच आला नाही.


साहेब मागील आठवड्यात एका तरुण मुलाने रेल्वेसमोर उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, तो त्यात अपंग झाला. आता त्याला किती दुःख सहन करावे लागत असेल, याची कल्पना मला आहे."


स्मितहास्य देऊन तो अपंग व्यक्ती निघून गेला.


यावर माझ्या बाजूला असलेली व्यक्ती म्हणाली,

"ऐकलत तो व्यक्ती काय म्हणाला. मला नाही माहीत की, तुमच्या आयुष्यात काय दुःख असेल? त्याची तीव्रताही तुम्हालाच माहीत. पण त्या अपंग भिकाऱ्या पेक्षा कमीच दुःख असेल. मी यापुढे जास्त काही बोलणार नाही. मला उपदेश वगैरे काही देता येत नाही. एक सल्ला देईल की, आज इथे स्टेशनवर थांबू नका. टवाळखोर लोकांच्या तावडीत तुम्ही सापडला तर काय होईल? याची कल्पना आपण करु शकणार नाही. हे माझं कार्ड आहे आणि हे एक हजार रुपये. पुढे गावात गेल्यावर तिथे चांगलं लॉज आहे, तिथे जाऊन रुम घेऊन रहा. तुम्हाला जगण्याची इच्छा झाली, तर मला फोन करा मी तुमची नक्कीच काहीतरी मदत करु शकेल. 


आयुष्य हे अनमोल आहे, असं काही न करता संपवू नका. चोचही तोच देतो आणि चाराही तोच देतो. आयुष्याला अजून एक संधी देऊन बघा."


यावर ती व्यक्ती निघून गेली. मी मात्र आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होते. कार्ड घेऊन त्यावरील नाव वाचलं, 'श्री राजाराम देशमुख, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ देशमुख फूड्स.' राम दादांची व माझी पहिली भेट झाली होती. 


पुढील कितीतरी वेळ मी त्या अपंग व्यक्तीचे निरीक्षण करत बसले. अंधार पडायला लागल्यावर मी स्टेशनच्या बाहेर पडले. गावात जाऊन लॉजवर रुम घेतली. राम दादांनी दिलेल्या पैश्यांचा हातभार लाभला. दिवसभर उपाशी असल्याने हॉटेलमध्ये जाऊन पोटभर जेवण केलं. राम दादांच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा वाटला. रात्रभर त्यांच्या बोलण्याचा विचार केला.


दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्यांना फोन केला, तेव्हा दादांनी मला पुण्याच्या एका वृद्धाश्रमाचा पत्ता सांगितला व तिथे जाण्यास सांगितले. मी त्याच पुण्याला जाणाऱ्या बसमध्ये बसले व तिथे गेले. दादांनी मी जाणार असल्याचे आधीच सांगून ठेवल्याने तेथील सर्वांनी माझे स्वागत केले. मला कोणीच काहीच प्रश्न विचारले नाहीत, म्हणजे तू कुठून आलीस? तुझ्या सोबत काय घडलं होतं? 


सुरुवातीचे दोन ते तीन दिवस मला तिथे रहायला जड गेलं, पण हळूहळू मी तेथील वातावरणात रुळत चालले होते. निसर्गरम्य ठिकाणावरील मोकळा श्वास मला तिथे अनुभवता येत होता. तेथील अनेकांची दुःख ऐकून आपलं दुःख त्यांच्या पुढे काहीच नाही, असं वाटत होतं.


पुढील आठ दिवसांनी राम दादा तिथे आले. आश्रमातील सगळेच त्यांना राम दादा म्हणायचे, म्हणून मीही त्यांना राम दादा म्हणू लागले होते. मी स्वतःहून राम दादांना माझी कथा सांगितली. तेव्हा राम दादांनी मला विचारले की, "नंदाताई तुझ्यासारखं आयुष्य जगणाऱ्या महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करशील का? त्यांना आत्मसन्मानाने जगणं शिकवशील का?" 


राम दादांच्या बोलण्याचा हेतू त्यावेळी मला कळला नव्हता, मग त्यांनी मला सगळं काही समजावून सांगितलं. सुरुवातीला मला हे जमेल का? अशी भीती वाटत होती, पण हळूहळू सगळं काही जमायला लागलं होतं. काहीही अडचण आली की, राम दादांकडे त्याचं उत्तर असायचं. ही आत्मसन्मान संस्था त्यांच्यामुळे उभी आहे आणि मीही. 


काही दिवसांपूर्वी नाशिकला एक कार्यक्रम होता, म्हणून मी गेले होते. त्या कार्यक्रमात माझा नवरा आला होता. आमच्या दोघांची भेट झाली होती. त्यांनी पहिला प्रश्न विचारला की, "तू कशी आहेस?" 


"हा प्रश्न जर तुम्ही काही वर्षांपूर्वी विचारला असता, तर आज मी ह्या स्टेजवर नसते आणि तुम्ही खाली बसून माझं व्याख्यान ऐकत नसता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी मुलगी माझ्यापासून दुरावली नसती. तुम्ही एकदाही माझा विचार केला नाही. 


एका परक्या माणसाने माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्यातील काही टक्के विश्वास तुम्ही दाखवायला हवा होता. नवरा-बायकोचं नातं हे विश्वासावर अवलंबून असतं, पण तो विश्वास तुम्ही कधी दाखवलाचं नाही.


मला तुमच्या सोबत बोलण्याची इच्छाही नाहीये. फक्त मला एवढंच सांगा की, माझी मुलगी कशी आहे? आपली मुलगी म्हणायला सुद्धा मला कसंतरी वाटतंय." मी सडेतोडपणे सांगितले.


ते म्हणाले,

"नंदा तुझा राग मी समजू शकतो. मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. छायाचा मूळ स्वभाव समजायला मला खूप उशीर झाला. तुला आपली मुलगी म्हणायला कसंतरी वाटतंय, पण मी मात्र अभिमानाने आपली मुलगी म्हणू शकतो. आपली मुलगी तुझ्यासारखीच सुगरण आहे, तिच्या हाताला तुझ्यासारखीच चव आहे. मी तिला सर्व काही देण्याचा प्रयत्न केला, पण एका आईचे प्रेम मी तिला देऊ शकलो नाही. ती तसं बोलावून दाखवत नाही, पण तिच्या डोळ्यात ते दिसतं."


मग त्यानंतर आमच्या दोघांमध्ये मुलीवरुन बरीच चर्चा झाली. ते मला फोटो दाखवत होते, पण मीच बघायला नकार दिला. माझी मुलगी तिच्या वडिलांशी जास्त कनेक्टेड आहे, आता अचानक ती माझ्याशी कनेक्ट होणार नाही आणि शिवाय तिची अशीही इच्छा असू शकेल की, आम्ही दोघांनी एकत्र यावं म्हणून आणि हे कधीच शक्य होणार नाही. म्हणून मी मुलीला भेटायला नकार दिला."


यावर जान्हवी म्हणाली,

"तुम्ही दोघे एकत्र येणं हे देवालाच मान्य नाहीये."


क्रमशः


©®Dr Supriya Dighe





0

🎭 Series Post

View all