राणी मी राजाची भाग ३९
मागील भागाचा सारांश: नंदाताईंनी श्रीच्या वडिलांनी तिला कसे वाचवले? आणि आत्मसन्मान या संस्थेची स्थापना कशी झाली? याबद्दल सांगितले. नाशिकला गेल्यावर कार्यक्रमाच्या दरम्यान नंदाताईंच्या नवऱ्याची व त्यांची भेट झाली व त्या भेटीत काय गप्पा झाल्या हे त्यांनी सांगितले.
आता बघूया पुढे…..
"आम्ही दोघे एकत्र येणे हे देवालाच मान्य नाहीये, असं तू कशावरुन म्हणालीस?" नंदाताईंनी जान्हवीला विचारले.
जान्हवी म्हणाली,
"ते या जगात असतील, तरचं तुम्ही दोघे एकत्र येऊ शकाल ना?"
"मला कळेल अश्या भाषेत सांगशील का? आणि तू त्यांना कशी ओळखतेस?" नंदाताईंनी विचारले.
"मी माझ्या बाबांना ओळखणार नाही, तर कोणाला ओळखेल." जान्हवीने सांगितले.
नंदाताई म्हणाल्या,
"श्री मला ह्या मुलीचं बोलणं कळत नाहीये. प्लिज तुम्ही सांगाल का?"
"तुम्हाला कळत आहे, पण हेच खरे असेल का? हे समजत नाहीये. बरोबर ना?
असो मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. ह्या मुलीचं नाव जान्हवी आहे आणि ही तुमची तीच मुलगी आहे, जी दहा वर्षांची असताना तुमची शेवटची भेट झाली होती.
तुमची व जान्हवीच्या बाबांची भेट झाल्यावर त्यांना त्यांची चूक समजली होती. आपण किती मोठा गुन्हा करुन बसलो आहे? हे त्यांना त्यावेळी जाणवले. पण ते याबद्दल जान्हवी सोबत बोलू शकले नाही. त्यांना आरशात बघून स्वतःला फेस करता येत नव्हते.
आपल्या हातून घडून गेलेली चूक ते सर्वांसमोर मांडू शकत नव्हते, त्यांना स्वतःचीच लाज वाटत होती. सतत तोच विचार करुन ते मनातून थकले होते. परिणामी एक दिवस कोणाशी न बोलता, कोणाला काही न सांगता टेरेसवरुन उडी मारुन त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्याच्या मागील कारण त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीतून समजले. तुमची भेट झाल्याचा उल्लेख त्यांनी चिठ्ठीत केला होता.
जान्हवीला एकदा येऊन तुम्हाला भेटायचे होते, पण एकटी येण्याची हिंमत तिच्यात नव्हती, म्हणून मला सोबत यावे लागले. बाबा अचानक गेल्याने जान्हवी खूप हादरली आहे, तिला तुमच्या मायेची, प्रेमाची गरज आहे. तुम्ही दोघी एकमेकींसोबत बोला. मी बाहेर जाऊन बसतो. मलाही तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे असतील, अशी अपेक्षा मी करतो."
एवढं बोलून श्री बाहेर निघून गेला. जान्हवी आपली मुलगी आहे, हे समजल्यावर नंदाताईंच्या डोळयातील अश्रू बाहेर पडू लागले होते. जान्हवी मात्र खाली मान घालून बसली होती. नंदाताईं आपल्या जागेवरुन उठल्या व जान्हवी शेजारील खुर्चीत येऊन बसल्या. नंदाताईं जान्हवीचा हात हातात घेऊन म्हणाल्या,
"बाळा मला माफ कर. माझी इच्छा असून सुद्धा मला तुझ्यासोबत राहता आलं नाही."
जान्हवीने आपला हात नंदाताईंच्या हातातून सोडवला व थोडी दूर जाऊन उभी राहिली आणि म्हणाली,
"मी तुम्हाला माफ करणारी कोण आहे? मला एकतर आता काय बोलावं हे कळत नाही. पण आज जर माझं मन मोकळं केलं नाही, तर पुन्हा कधीच बोलू शकणार नाही आणि मनाच्या एका कोपऱ्यातील राग तसाच राहील. ज्या आईला बघण्याची, भेटण्याची इतक्या वर्षांपासून इच्छा होती, पण आज मला आनंद होत नाहीये, तर दुःख होत आहे. इतर महिलांमधील आत्मविश्वास जागा करत असताना एकदा आपल्या मुलीला जाऊन भेटावे असे तुम्हाला कधीच वाटले नाही का? आपली मुलगी जीवंत आहे की, मेली आहे, हे बघण्याची इच्छा सुद्धा तुम्हाला झाली नाही का?
ज्यावेळी तुम्ही घर सोडलं, तेव्हा तुम्हाला मला सोबत घेऊन जाता आलं नाही, तेव्हाची तुमची हतबलता मी समजू शकते. पण जेव्हा तुम्ही ही संस्था स्थापन केली, देशमुखांसारख्या मोठ्या लोकांसोबत तुमची ओळख झाली, तेव्हा तुम्ही मला भेटू शकला असता ना?
मी शाळेत जायचे, तेव्हा मला केस वाढवायचे होते, पण बाबांना वेण्या घालता येत नसल्याने मला नेहमी केस कापावे लागायचे. मैत्रिणींच्या डब्यात दररोज वेगळ्या भाज्या असायच्या, मात्र माझ्या डब्यात मोजून दोन ते तीन भाज्या असायच्या, कारण बाबांना सगळा स्वयंपाक येत नव्हता. शाळेचा ड्रेस नेहमी मळका असायचा, कारण बाबांना नीट कपडे धुता येत नव्हते.
मी बाबांकडे मला हेच जेवायला पाहिजे, हा हट्ट कधीच करु शकले नाही. ताटात जे येईल ते गुपचूप खायचे. मैत्रिणी जेव्हा त्यांच्या आई बद्दल सांगायच्या तेव्हा मला खूप वाईट वाटायचे. माझी आई या विषयावर सगळेजण दोन ते तीन पाने निबंध लिहायच्या, मात्र माझा निबंध अर्ध्या पानात संपायचा.
आजारी असल्यावर आईच्या मांडीची उब कधी मिळाली नाही. कमी वयात शेजारच्या काकूंकडे जाऊन स्वयंपाक करायला शिकले. दररोज कितीही कंटाळा आला, तरी घरातील कामं करावीच लागायची.
वय वाढत असताना आपल्या शरीरात कोणकोणते बदल होतात? व ते का होतात? याची माहिती शेजारच्या काकूंकडून मिळाली. दर महिन्याला त्या पाच दिवसांची माहिती सुद्धा त्यांच्या कडून मिळाली. पहिल्या वेळी पाळी आली होती, तेव्हा मी खूप घाबरले होते, पण त्यावेळी मिठीत घेऊन समजवणारी आई माझ्याकडे नव्हती.
माझ्या आयुष्यात असे अनेक क्षण येऊन गेले की, त्यावेळी मला माझी आई हवी होती. बाबांनी माझी आई कशी होती? या प्रश्नाचं उत्तर त्यांनी कधीच दिले नाही.
तुमच्या आयुष्यात जे घडलं ते वाईटचं होतं, पण मला आईचे प्रेम का मिळाले नाही? आजही जेव्हा मला दोघांचे प्रेम मिळाले असते, तेव्हा बाबा का निघून गेले? मला मान्य आहे की, तुम्ही दोघे कधीच एकत्र येऊ शकले नसते, पण निदान मलातरी दोघांचे प्रेम एकत्र मिळाले असते.
तुमच्यावर कोणत्या हक्काने रागवावं हेच कळत नाहीये. आपण आपल्या लोकांवर रागावू शकतो, पण तुम्ही मला आपल्या वाटतंच नाही."
जान्हवीला खूप भरुन आल्याने ती शांत झाली. इतकी वर्षे मनात साचवून ठेवलेला राग तिने व्यक्त केला होता.
नंदाताईंनी तिच्याजवळ जाऊन तिला घट्ट मिठी मारली. जान्हवी व नंदाताई या दोघींनी आपल्या अश्रूंना मोकळी वाट करुन दिली. थोडा वेळ झाल्यावर जान्हवी खुर्चीत जाऊन बसली. नंदाताई त्यांच्या खुर्चीत जाऊन बसल्या, त्यांनी जान्हवीला प्यायला पाणी दिले.
"जान्हवी तुझ्या बाबांमध्ये व माझ्यात अश्या काही गोष्टी घडल्या होत्या की, मला त्यांचं तोंड बघण्याची इच्छा होत नव्हती. घर सोडल्यानंतर मला तुझी चौकशी करावी वाटली, म्हणून मी माझ्या दोन कार्यकर्ता महिलांना घराचा पत्ता देऊन पाठवलं होतं. तिथे त्या गेल्यावर असं समजलं की, तुम्ही लोकं तिकडे राहतच नाहीत. तुमच्या नवीन जागेचा पत्ताही कोणालाच ठाऊक नव्हता, त्यावेळी मी माझ्या परीने तुम्हाला शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण इतक्या मोठ्या नाशिकमध्ये तुम्हाला कुठे कुठे शोधणार होते?
काही वर्षांनी तुमचा शोध घ्यावा असे वाटले, पण तुझ्या बाबांनी दुसरे लग्न केले असेल, असं मला वाटलं. जान्हवी आपल्या आयुष्यातील अशी काही सत्य असतात, ज्यांचा आपण सामना पुन्हा करु शकत नाही, म्हणून मी तुझ्या बाबांसमोर जाणे टाळले होते. जान्हवी एक स्त्री सर्व काही सहन करु शकते, पण ती आपल्या चारित्र्यावर उडालेले शिंतोडे सहन करु शकत नाही.
तुझे बाबा जाण्याआधी काहीच बोलले नव्हते का?"
नंदाताईंनी विचारले.
"नाही. बाबांनी आत्महत्या केल्यावर मला मोठा धक्का बसला होता. मी अनाथ झाल्यासारखं त्यावेळी वाटत होतं. श्री सरांनी मला बरीच मदत केली. श्री सरांसारखे चांगली माणसं या जगात आहेत, हे बघून खरंच खूप छान वाटतं. श्री सरांच्या मदतीमुळेचं मला इथवर येता आलं.
तुम्ही एक चांगल्या आई जरी झाल्या नसाल, तरी तुम्ही अबला स्त्रियांना मदत करत आहात, हे बघून छान वाटलं." जान्हवी म्हणाली.
यावर नंदाताई म्हणाल्या,
"आपल्या आईला कोणी अहो काहो करतं का?"
"तुम्ही माझ्या आई आहात, हे स्विकारायला मला थोडा वेळ लागेल. तुम्ही मला जन्म दिला, हे सत्य मी नाकारणार नाही, पण तुम्हाला आई म्हणायला मला थोडा वेळ लागेल." एवढं बोलून जान्हवी केबिन मधून बाहेर पडली.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा