राणी मी राजाची भाग ४०
मागील भागाचा सारांश: जान्हवी ही आपली मुलगी आहे, हे नंदाताईंना समजले. जान्हवीला तिच्या आईची उणीव केव्हा वाटली? हे तिने स्पष्टपणे नंदाताईंना सांगितले.
आता बघूया पुढे….
श्री बाहेर वेटींग एरियात बसलेला होता. जान्हवीने बाहेर येऊन काही विचार न करता श्रीला मिठी मारली. जान्हवीने अचानक येऊन मिठी मारल्याने श्री थोडा गोंधळून गेला होता. जवळपास पुढील पाच मिनिटांने जान्हवीला जाणवले की, आपण श्रीला मिठी मारली आहे, मग लगेच ती बाजूला झाली. आपण श्रीला मिठी मारुन चूक केली, असे जान्हवीला वाटत होते. तिच्या चेहऱ्यावरुन ते स्पष्ट जाणवत होते.
श्री काही बोलणार तेवढ्यात शिपाई येऊन म्हणाला,
"नंदाताईंनी तुम्हाला दोघांना गेस्टरुम मध्ये जाऊन आराम करायला सांगितले आहे. नाशिकला पोहोचायला तुम्हाला बराच उशीर होईल, म्हणून आज इथेच थांबण्याची त्यांनी विनंती केली आहे."
शिपाई निघून गेल्यावर श्री व जान्हवी गेस्टरुम कडे गेले. दोघांची व्यवस्था वेगवेगळ्या रुममध्ये केलेली होती. श्रीने आज परत येणार नसल्याची कल्पना घरी फोन करुन दिली होती. श्रीला नंदाताईंना आपल्या डॅड बद्दल विचारायचे होते, पण नंदाताईंची मनस्थिती ठीक नसेल, म्हणून श्रीने लगेच त्यांच्या सोबत जाऊन बोलणे टाळले.
जान्हवीने श्रीला मिठी मारल्याने तिला श्री समोर जाणे अवघडल्यासारखे वाटत होते. थोड्यावेळ आराम करुन झाल्यावर श्री जान्हवीला भेटण्यासाठी गेला, तिच्या रुमच्या दरवाजावर नॉक करुन त्याने आता येण्याची परवानगी घेतली.
रुममध्ये गेल्यावर जान्हवी श्रीकडे बघत नव्हती. श्रीला जान्हवीच्या अवघडल्यापणाचे कारण समजले होते.
"चहा, नाश्ता झाला का?"श्रीने विचारले.
"हो, काही वेळापूर्वी त्यांनी रुममध्ये आणून दिला होता." जान्हवीने खाली मान घालून उत्तर दिले.
"माझ्या चेहऱ्याला काही झालं आहे का?"श्रीने विचारले.
जान्हवी वर मान करुन म्हणाली,
"नाही, तुमचा चेहरा नॉर्मल आहे. पण तुम्हाला काहीतरी झाल्यासारखं का वाटत आहे?"
श्री म्हणाला,
"तुम्ही माझ्याकडे बघून बोलत नाही आहात, तर मला वाटलं की, माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला भीती वाटली असेल."
जान्हवी हसून म्हणाली,
"तसं काही नाही ओ सर. ते मघाशी…."
जान्हवी पुढे काहीच बोलली नाही, मग श्री म्हणाला,
"आपण जेव्हा खूप आनंदात असतो किंवा खूप दुःखात असतो, तेव्हा आपल्या मित्र- मैत्रिणींना मिठी मारुच शकतो. मिठी मारणं नॉर्मल आहे. तुम्ही अचानक येऊन मिठी मारल्याने मीही जरावेळ गोंधळून गेलो होतो, पण इट्स ओके. एक मिठी तर मारली आहे, काही मोठा गुन्हा केला नाहीये."
"मी एखाद्या मुलाला पहिल्यांदा मिठी मारली आणि ती कशी व का मारली? हे मलाच समजले नाही. मीच गोंधळून गेले होते." जान्हवीने सांगितले.
"बरं मला एक सांगा की, तुम्ही आनंदी होतात की दुःखी?" श्रीने विचारले.
जान्हवी म्हणाली,
"माहीत नाही. पण खूप रिलॅक्स वाटत होते. अनेक वर्षांपासून मनात साचलेली भडास आज बाहेर पडल्यासारखी वाटली. मी अजून माझ्या आईला स्वीकारु शकले नाही, पण तिला भेटून छान वाटले."
"जे झालं ते चांगलं झालं. मला माझ्या डॅड बद्दल त्यांच्याकडे चौकशी करायची होती, पण लगेच जाऊन बोलणं मला योग्य वाटलं नाही." श्री म्हणाला.
श्री- जान्हवीच्या गप्पा सुरु असतानाच त्यांना जेवण करण्यासाठी एक बाई बोलवायला आल्या होत्या. श्री व जान्हवी जेवण करण्यासाठी संस्थेच्या डायनिंग रुममध्ये गेले. श्री व जान्हवी हात धुऊन जेवण करण्यासाठी वाढलेल्या ताटांवर बसले.
पहिला घास खाल्ल्यावर श्री म्हणाला,
"वाह! जेवण तर अप्रतिम झालं आहे. स्वयंपाक कोणी केला?"
यावर तिथे असलेल्या एक बाई म्हणाल्या,
"आज सगळा स्वयंपाक नंदाताईंनी केला आहे, त्यांनी कोणाला काहीच करु दिले नाही. ताई कधीतरीचं स्वयंपाक करतात."
जान्हवीला कळून चुकले होते की, हा स्वयंपाकाचा खटाटोप आपल्यासाठी केला आहे म्हणून.
"त्या कुठे आहेत?" जान्हवीने विचारले.
तुमच्यासाठी त्या गरमागरम शेवयाची खीर घेऊन येत आहेत. हे बोलत असतानाच नंदाताई दोन वाट्यांमध्ये शेवयाची खीर घेऊन आल्या. जान्हवी जवळ जाऊन त्यांनी एक चमचा खीर जान्हवीला भरवली व त्या म्हणाल्या,
"तुला अजूनही शेवयाची खीर आवडते ना?"
जान्हवीच्या डोळ्यातून अश्रू आले. "तुम्हाला अजूनही माझी आवड लक्षात आहे." जान्हवीने विचारले.
"आई आपल्या बाळाला व त्याच्या आवडी निवडी कधीच विसरत नाही." नंदाताईंनी उत्तर दिले.
"ताई तुमच्या हाताला खरंच खूप चव आहे. शेवयाची खीर तर अप्रतिम आहे. जान्हवीच्या हातालाही अशीच चव आहे." श्री म्हणाला.
जेवण झाल्यावर श्री बाहेर लॉनवर वॉक करत होता. काही वेळात जान्हवीही तिथे आली.
"आता सकाळी वॉकला येणार की नाही?" श्रीने विचारले.
"घरात आता जास्त कामं नसतील, सो येत जाईल. बाबा नसले तरी वॉक करण्याची सवय ठेवावी लागेल." जान्हवीने उत्तर दिले.
श्री म्हणाला,
"नंदाताईंनी तुमच्यासाठी स्वयंपाक केला होता ना?"
"हो, ते माझ्याही लक्षात आलं." जान्हवीने उत्तर दिले.
यावर श्री म्हणाला,
"आईची भेट व्हावी, म्हणून इतके दिवस देवाकडे प्रार्थना करत होत्या आणि आज भेट झाली, तरी आईसोबत तुम्ही बोलत नाही आहात."
"सर मला थोडा वेळ घ्यायचा आहे. तिने मला जन्म दिलाय, पण आम्ही सोबत राहत नसल्याने आमच्यात तसं बॉंडींग नाहीये. आता तुमची व माझी काही दिवसांपूर्वी भेट झाली, तरी तुमच्या सोबत बोलायला मला कम्फर्ट वाटतो. सुजय पेक्षा तुमच्याशी बोलण्याची इच्छा होते. तुमचं नातं किती वर्षांपासून आहे, हे महत्त्वाचं नसतं, तर ते कसं आहे? हे महत्त्वाचं असतं." जान्हवी म्हणाली.
"अच्छा. म्हणजे तुम्ही मला सुजय पेक्षा जवळचं मानतात. आपण एकमेकांचे छान मित्र नक्कीच होऊ शकतो ना?" श्रीने विचारले.
"हो आपल्यात चांगली मैत्री होऊ शकते, पण आपल्या मैत्रिणीला कोणी अहो काहो करत नाही." जान्हवीने सांगितले.
श्री म्हणाला,
"हे तुलाही लागू पडतं."
यावर जान्हवी म्हणाली,
"नाही ओ सर. तुम्ही माझे बॉस आहात, तुम्हाला एकेरी नावाने हाक मारणं शक्य होणार नाही. तुमच्या सारखा मित्र मला मिळतो आहे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आज पासून हक्काने मी तुम्हाला काहीही सांगू शकते."
"अर्थात." श्रीने उत्तर दिले.
जान्हवी म्हणाली,
"आता जाऊन झोपूयात. उद्या एवढ्या लांब ड्रायव्हिंग करायची आहे. तुमचा आराम व्हायला हवा."
जो हुकूम मेरे आका. गुड नाईट." श्री झोपण्यासाठी निघून गेला. जान्हवीही आपल्या रुममध्ये गेली.
दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यावर श्री नंदाताईंना शोधत होता. संस्थेत चौकशी केल्यावर श्रीला समजले की, काल ज्या मुलीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते, त्या मुलीची तब्येत बिघडल्याने नंदाताईंना अर्जंट हॉस्पिटलमध्ये जावे लागले.
श्रीला वाटलं होतं की, डॅड बद्दल काहीतरी माहिती नंदाताईं कडून मिळेल म्हणून. नंदाताईंची भेट न झाल्याने श्री मनातून नाराज झाला. नाशिकला जायचे असल्याने श्रीला थांबून नंदाताईंची वाटही बघता येणार नव्हती. श्री मनातून नाराज आहे, हे जान्हवीला जाणवल्याने ती म्हणाली,
"सर तुमच्या डॅड बद्दलची माहिती त्यांच्याकडून फोनवर घ्या. नाराज होऊ नका. वेळ आली की, अचानक तुमचे डॅड तुमच्या समोर येऊन उभे राहतील. नाराज होऊन होप्स सोडू नका. मला वाटलंही नव्हतं की, माझी व माझ्या आईची इतक्या सहजासहजी भेट होईल म्हणून."
श्री म्हणाला,
"हो ते आहेच, पण आज नंदाताईं सोबत बोलणं झालं असतं, तर डॅड बद्दल नक्कीच काहीतरी माहिती मिळाली असती. डॅडने नंदाताईंना केलेली मदत ऐकून त्यांचा मुलगा असल्याचा अभिमान वाटतो आहे. एखाद्याची ओळख नसताना त्याची मदत करणे म्हणजे कौतुकास्पद आहे. डॅडने नंदाताईंना कसलीही जबरदस्ती केली नाही, त्यांना व्यवस्थित उदाहरण देऊन समजावले."
"बघायला गेलं तर. मलाही आईचा अभिमान वाटतो आहे. तिची त्यावेळी मनस्थिती किती वाईट असेल. आपल्याला आपल्या जवळच्या माणसांपैकी कोणीच समजून घेत नाही, ही फिलिंग किती वाईट आहे. हॅट्स ऑफ टू हर." जान्हवी म्हणाली.
"हे इथे बोलण्यापेक्षा त्यांच्याकडे जाऊन बोल ना. त्यांच्या मनाला तेवढेच बरे वाटेल." श्रीने सांगितले.
जान्हवी म्हणाली,
"थोड्या दिवसांनी नक्कीच बोलेल."
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा