राणी मी राजाची भाग ४१
मागील भागाचा सारांश: जान्हवीने श्रीला अचानक येऊन मिठी मारली. श्रीने मैत्रीचा हात जान्हवी पुढे केला. जान्हवीने श्रीची मैत्री स्विकारली. नंदाताईंनी जान्हवी व श्रीसाठी स्वतः स्वयंपाक केला होता. जान्हवीला आवडणारी शेवयाची खीर त्या अजूनही विसरल्या नव्हत्या.
आता बघूया पुढे…..
परतीच्या प्रवासात जान्हवी श्री सोबत मोकळेपणाने बोलत होती. जान्हवी हसत खेळत गप्पा मारत असल्याने रस्ता नाशिक जवळ येऊ लागले होते. जान्हवीचं हसत खेळत रुप श्रीला आवडलं होतं. एका हॉटेलवर थांबून दोघांनी जेवण केले. जेवण झाल्यावर पुढील प्रवासाला ते दोघे लागले. गप्पा मारता मारता नाशिक कधी आले, हे दोघांनाही समजले नाही.
श्रीने जान्हवीला तिच्या घरी सोडले व तो आपल्या घरी गेला. प्रवासाने थकला असल्याने श्रीने घरीचं आराम करण्याचे ठरवले. आईआजीची भेट घेऊन तिला पुण्याला काय घडलं? याची इतमभूत माहिती श्रीने दिली.
संध्याकाळी जान्हवीने श्रीला मॅसेज केला,
"सर तुमचे आभार किती व कसे मानू हे कळत नाहीये. तुम्ही माझ्या वाईट काळात माझ्यासोबत उभे राहिलात. माझ्या आईची व माझी भेट इतक्या सहजासहजी तुमच्यामुळेच होऊ शकली. घराचे खूप मोठे कर्ज माझ्या डोक्यावर आहे, पण हळूहळू ते कमी करण्याचा प्रयत्न मी करेल. थँक् यू सो मच सर."
श्रीने लगेच रिप्लाय केला,
"मैत्रीचा एक जगजाहीर नियम आहे, नो सॉरी, नो थँक् यू. माझे आभार मानण्याची काहीच गरज नाहीये. एकच काम कर की, तुझ्यातील व तुझ्या आई मधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न कर."
"श्री आत येऊ का?" श्रीच्या आईने दरवाजावर नॉक करुन विचारले.
"आई ये ना." श्री म्हणाला.
आई आत येऊन म्हणाली,
"श्री प्रवासाने दमला असशील ना?"
"हो थोडा थकवा जाणवत होता. इतक्या लांबच्या प्रवासाची सवय नव्हती ना म्हणून. थोड्यावेळ आराम केला, आता बरं वाटतंय." श्रीने सांगितले.
आई म्हणाली,
"श्री माझ्याकडे आईंनी एक काम दिले होते, तेच करायला मी इकडे आले. आईंनी तुझ्यासाठी एक मुलगी शोधली आहे. उद्या संध्याकाळी आपल्याला तिच्या घरी जायचं आहे. उद्या कंपनीतून घरी लवकर ये."
"अग आई, पण इतकी घाई का आहे? मी लगेच लग्नाला तयार नाहीये." श्री म्हणाला.
"हे बघ श्री. उद्या मुलीला भेटला म्हणजे लगेच लग्न होईल, असं होतं नाही. तुला मुलगी आवडली नाही, तर तसं तू स्पष्ट सांगू शकतोस. आईंनी एखादी गोष्ट ठरवली की त्या कोणाचंही ऐकत नाहीत. तू तुझ्या आयुष्यात सेटल व्हावा हीच त्यांची इच्छा आहे. तुझ्या मनाविरुद्ध काहीच होणार नाही." आई एवढं बोलून निघून गेली.
श्रीच्या मनात विचार येऊन गेला की, "मुलगी बघायला जाणं हा आईआजीने निर्णय घ्यायला नको होता. मी तर याबद्दल अजून काहीच विचार केला नव्हता. उद्या मुलीला बघायला गेल्यावर तिच्या सोबत नेमकं काय बोलायचं? प्रणव कामात असेल, सो त्याला विचारता येणार नाही. जान्हवी सोबत या विषयावर बोलायला हवं. एका मुलीच्या काय अपेक्षा असतात? हे तिला नक्कीच माहीत असेल. उद्या सकाळी वॉकला गेल्यावर तिच्या सोबत बोलतो."
श्रीने जान्हवीला तसा मॅसेज करुन ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी वॉकला जाण्यासाठी सृष्टी व दृष्टी तयारच होत्या. श्रीने जॉगिंग ट्रॅककडे जाताना त्यांना सांगितले की, "मला जान्हवी सोबत थोडं महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. तुम्ही दोघी वॉक करा. आम्हाला डिस्टर्ब करु नका."
सृष्टी व दृष्टी एकमेकींकडे बघून गालातल्या गालात हसल्या. जान्हवी श्रीची वाट बघत होती. जान्हवीला बघितल्यावर सृष्टी व दृष्टी लगेच बाजूला निघून गेल्या.
"तुम्हाला माझ्या सोबत काय बोलायचं होतं? तुम्ही लवकर ये म्हणून मॅसेज का केला होता?" जान्हवीने विचारले.
"आपण तिकडे बेंचवर बसून बोलूयात का?" श्री म्हणाला.
जान्हवीने मान हलवून होकार दिला. श्री व जान्हवी एका बेंचवर जाऊन बसले.
श्री म्हणाला,
"आईआजीने माझ्यासाठी एक मुलगी बघितली आहे, तिला बघायला आज संध्याकाळी जायचं आहे."
"अरे वा, ही तर चांगली बातमी आहे, पण तुमच्या चेहऱ्यावर असे बारा का वाजले आहेत?" जान्हवीने विचारले.
यावर श्री म्हणाला,
"अग जान्हवी एकतर मी इतक्या लवकर लग्न करेल, हा विचारचं कधी केला नव्हता. मी अनोळखी मुलींसोबत कधी बोललेलो नाहीये. अशावेळी मुलींसोबत नेमकं काय बोलायचं असतं? हेही कळत नाहीये. आईआजी कधीही कसलाही बॉम्ब फोडू शकते."
जान्हवी हसून म्हणाली,
"बरं तुम्हाला या विषयावर बोलायचं आहे तर….
आता आज संध्याकाळी मुलगी बघण्याचा प्रोग्रॅम ठरला आहे ना, तर त्यावरुन उगीच चिडचिड करत बसू नका. मला असल्या कार्यक्रमांचा अनुभव नाहीये, पण मैत्रिणींची लग्न झाली असल्याने थोडंफार सांगू शकते. बेसिकली समोरची मुलगी कशी असेल? हे तिला बघता क्षणीचं समजून येते.
मुलगी कोणत्या घरातील आहे? ती संस्कारी आहे की नाही? हे सगळं यशोमती मॅडम बरोबर बघतील. आता तुम्हाला तुमचा लाईफ पार्टनर कसा हवा आहे? किमान दोन ते तीन अपेक्षा तर नक्कीच असतील, त्यांचा आधार घेऊन तुम्ही तिच्या सोबत बोलू शकतात.
सर्वप्रथम तिच्या काय अपेक्षा आहेत? याबद्दल जाणून घ्या. तुम्हाला दोघांना बोलायला नक्कीच वेळ देतील, त्या वेळेत तुम्ही न लाजता तिच्यासोबत बोलून घ्या. तिचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे? हे जाणून घ्या. तुमच्या जेवढ्या काही अपेक्षा तेवढया सगळ्याच पूर्ण होऊ शकणार नाही, पण त्यातील महत्त्वाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या तरी पुरेसे आहे.
सर एक लक्षात ठेवा की, कोणीच परिपूर्ण नसतो. सगळ्यांमध्ये काहीतरी कमतरता नक्कीच असते. तुमच्यातही असेल आणि माझ्यातही, सो ते लक्षात ठेवून तिला जज करा."
"मी तसा विचार कधी केला नाही. माझी किमान एक अपेक्षा आहे की, माझ्या लाईफ पार्टनरने मला व माझ्या कामाला समजावून घ्यावे. कंपनीतीच्या कामाची तिला माहिती नसली, तरी चालेल, पण तिने त्याबद्दल माझ्याकडून जाणून घेतले पाहिजे. मी जर कंपनीतील काही टेन्शन तिच्या सोबत शेअर केले, तर तिने ते समजून घ्यायला पाहिजे. तिने त्यावर काही उपाय सुचवला पाहिजे असं मी म्हणणार नाही, पण निदान मला माझे मन तिच्याकडे मोकळे करता आले पाहिजे. तिला माझ्या टेन्शनची तीव्रता समजली पाहिजे.
ती दिसायला सर्वसाधारण असली तरी चालेल,पण तिचे मन स्वच्छ असेल पाहिजे. माझ्या फॅमिलीतील सर्वचजण फ्रेंडली आहेत. आमच्या घरात कामाला नोकर असल्याने तिला तो लोड नसेल, पण स्वयंपाक शिकण्याची आवड तिला असायला हवी.
आमच्याकडे काम करणाऱ्या रमाकाकू छान स्वयंपाक बनवतात, पण आई व काकूच्या हातच्या जेवणाची चव वेगळीचं असते. मलातरी घरातील स्त्रीच्या हातचं जेवण खूप आवडतं. कदाचित तुम्हा मुलींना ही टिपिकल अपेक्षा वाटेल, पण बेसिक स्वयंपाक तर प्रत्येक मुलीला यायलाच पाहिजे." श्रीने सांगितले.
जान्हवी पुढे म्हणाली,
"आपल्याला काय हवं? हे क्लिअर असेल तर निर्णय घ्यायला सोपं जातं. कंपनीत आपल्याला या विषयावर बोलता येणार नाही. एकच सांगेल की, मुलीला स्वतःहून प्रश्न विचारा. अश्या कार्यक्रमांमध्ये मुली बोलायला लाजतात. चला आता निघूयात."
एवढं बोलून जान्हवी निघून गेली. सृष्टी व दृष्टी लगेच श्री जवळ येऊन म्हणाल्या,
"दादू जान्हवी सोबत एवढं महत्त्वाचे काय बोलत होतास?"
"काही विशेष नाही. संध्याकाळी जो कांदेपोहे कार्यक्रम आहे, त्यासाठी टिप्स घेत होतो." श्रीने उत्तर दिले.
यावर सृष्टी म्हणाली,
"अरे दादू मग आमच्याकडे टिप्स मागायच्या ना. एक काम कर आमची व त्या मुलीची भेट घालून दे. आम्ही बरोबर तिची माहिती काढू."
"तुम्ही आईआजीची परवानगी घ्या. मी तरी असं काही करणार नाही. चिमण्यांनो आता घरी जाऊन चिवचिव करा." श्री म्हणाला.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा