राणी मी राजाची भाग ४२
मागील भागाचा सारांश: पुण्यावरुन घरी आल्यावर आईआजीने आपल्यासाठी मुलगी बघितल्याचे आई कडून त्याला कळले. आईआजीने मुलगी बघण्याचा कार्यक्रम फिक्स करुन टाकल्याने श्रीला काही बोलताही येत नव्हते. जान्हवीची भेट घेऊन श्रीने तिच्याकडून टिप्स घेतल्या.
आता बघूया पुढे….
कंपनीत जाऊन श्रीने पटापट सर्व कामे उरकली. सुजय मार्केटिंग डिपार्टमेंट मध्ये असल्यापासून श्रीचे काम बरेच हलके झाले होते, तसेच प्रोडक्टचा सेल बऱ्यापैकी वाढला होता. भरत काका कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग कडे लक्ष देत होते. लक्ष्मण काकांनी अकाऊंट डिपार्टमेंट सांभाळून घेतले होते. बाकीची किरकोळ कामे करायला जान्हवी होतीच.
संध्याकाळी मुलीच्या घरी जायचे असल्याने श्री कंपनीतून लवकर निघाला. मुलीच्या घरी श्री, आईआजी, त्याची आई व भरत काका असे चौघेजण गेले. मुलीच्या घरी गेल्यावर आईआजीने श्रीची ओळख मुलीच्या घरच्यांसोबत करुन दिली.
चहापाणी झाल्यावर मुलीला बोलावण्यात आले. मुलीने पंजाबी ड्रेस परिधान केलेला होता. आईआजीने मुलीला बेसिक प्रश्न विचारले, त्यावरुन श्रीला तिचे नाव मोनिका असल्याचे कळले. बेसिक माहिती घेऊन झाल्यावर श्री व मोनिकाला बोलण्यासाठी तिच्या रुममध्ये पाठवण्यात आले. रुममध्ये गेल्यावर मोनिकाने सुटकेचा निःश्वास सोडला व ती म्हणाली,
"तू या खुर्चीत बसू शकतोस. लग्न आपल्याला करायचं आहे, सो आपण फ्रिली बोलूयात. तुझी आजी जुन्या विचारांची असल्याने मला असा साळसूदपणाचा आव आणावा लागला होता. आता रुममध्ये येऊन जरा बरं वाटत आहे.
डोन्ट वरी माझं खरं रुप मी तुझ्या घरच्यांसमोर सुरुवातीला काही दिवस येऊन देणार नाही. काही दिवसांनी मी कशीही वागले, तरी ते माझं काही बिघडवून घेणार नाही. श्री तू लंडनमध्ये राहत असल्याने तुला सगळंच काही माहीत असेल. तिकडे इंडियन मुल-मुली एकत्र राहतात. मीही तिकडे एका मुलासोबत जवळपास वर्षभर लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये राहत होते.
पंधरा दिवसांपूर्वीचं माझं ब्रेकअप झालंय. आता पर्यंत माझे भरपूर बॉयफ्रेंड झाले आहेत. काहींसोबत फिजिकल रिलेशनशिप होतं, काहींसोबत नाही. लग्नानंतर मात्र मी तुझ्या सोबत पूर्णपणे लॉयल राहण्याचा प्रयत्न करेल.
श्री मी एक पार्टी गर्ल आहे. मला रात्री उशिरापर्यंत बारमध्ये जाऊन खायला, प्यायला, डान्स करायला खूप आवडतं. माझे फ्रेंडसही तसेच आहेत. तुला जर पार्टीत यायला आवडत असेल, तर तुही आम्हाला जॉईन होऊ शकतोस.
माझ्या डॅडकडे भरपूर पैसे आहेत, त्यामुळे मला काहीच काम करण्याची गरज नाही. मी तुझ्याघरी येताना माझे पर्सनल दोन नोकर सोबत घेऊन येईल. मला किचनमध्ये जायला बिलकुल आवडत नाही. मला बेड टी लागतो. मला वेस्टर्न ड्रेस घालायला आवडतात. साडी परिधान करेल, पण ब्लाउज मात्र स्लीवलेस घालेल.
मी ऐशो आरामात वाढलेली मुलगी आहे. तुमच्या घरात एखादी रुम रिकामी असेलच ना, तर तिथे मी जिम तयार करेल. माझा पर्सनल ट्रेनर तिथे येत जाईल. मी डाएट कॉन्सीअस मुलगी आहे, माझे नोकर माझ्यासाठी जेवण बनवतील.
लग्नानंतर हनिमून साठी आपण स्वित्झर्लंडला जाऊयात. बाकी लग्नाचा प्लॅन नंतर सांगेल. श्री मला खोटं बोलायला आवडत नाही, म्हणून मी सगळं तुला खरं सांगत आहे. घरातून बाहेर पडताना मी कोणाचीही परवानगी घेणार नाही. मी कोणते कपडे घालावे? ह्यावरुन मला घरात चर्चा झालेली आवडणार नाही." मोनिकाने सांगितले.
"तू लग्न का करत आहेस? लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये तू राहिली असल्याने फिजिकल रिलेशन साठी तुला लग्न करायची गरज नाही. तुझ्या डॅडकडे भरपूर पैसे असल्याने त्यासाठी तुला लग्न करण्याची गरज नाही. लग्न केल्यावर तू अडकून जाशील. तुझ्यावर बंधने येऊ शकतील." श्री म्हणाला.
मोनिका म्हणाली,
"मला लग्न करायचेच नव्हते, पण आपली सो कॉल्ड सोसायटी तिच्यामुळे मी लग्न करायला तयार झाले. एकदा लग्न झाल्याचा शिक्का लागला की, कोणी काही बोलत नाही. डॅडने मला बऱ्याच यंग बिजनेसमनचे फोटो दाखवले, त्यातील मला तुच सर्वांत जास्त आवडला."
श्री आपल्या जागेवरुन उठून म्हणाला,
"आता एक काम कर. बाकीच्या यंग बिजनेसमन पैकी कोणीतरी बळीचा बकरा शोध. तू खरं बोललीस याबद्दल मी तुझे मनःपूर्वक आभार मानतो, पण आपल्या दोघांचे विचार पुढील दहा जन्मात सुद्धा जुळणार नाहीत."
श्री ताडकन तेथून निघून गेला. श्रीला बघून मोनिकाचे डॅड म्हणाले,
"तुमच्या दोघांचं बोलणं झालं वाटतं. बसा ना. काहीतरी खाऊन घ्या."
यावर श्री थोडा चिडून म्हणाला,
"माफ करा काका, पण मला इथे एक क्षणही थांबायचं नाहीये. काका आपल्या मुलीबद्दल खोटं सांगून समोरच्या लोकांचा वेळ वाया घालवू नका. तुमच्या मुलीचे आणि माझे विचार कधीच जुळणार नाहीत. आमचं घर एक संस्कारी घर आहे. आम्ही आपली संस्कृती जपतो. तुमच्या मुलीने तुमची संस्कृती कधीच वेशीवर टांगली आहे. तिचे वागणे तुम्हाला पटत असेल, पण आम्हाला कधीच पटणार नाही. आईआजी, आई, भरत काका आपण लगेच निघूयात."
श्रीला चिडलेलं बघून सगळेच लगेच घराबाहेर पडले. गाडीत बसल्यावर श्रीने मोनिकाच्या गप्पा सर्वांना सांगितल्या.
"अरे पण श्री मला तर मोनिका बद्दल चांगली माहिती मिळाली होती." आईआजी म्हणाली.
श्री चिडून म्हणाला,
"आईआजी तुला माणसं ओळखता येत नाही, हे आज दुसऱ्यांदा सिद्ध झालं आहे. आज त्या मुलीने सगळं खरं सांगितलं, म्हणून तिचं खरं रुप माझ्या समोर आलं. थोडा वेळ घेतला असता, तर मी तिच्या बद्दलची माहिती काढली असतीचं. आईआजी मी तुझ्या इच्छेखातर ह्या मुलीला बघायला आलो होतो. पुढच्या वेळी काहीही ठरवण्याआधी मला एकदा विचारशील."
घर येण्याआधीच श्री ड्रायव्हरला म्हणाला,
"काका इकडे गाडी थांबवा. मला इथेच उतरायचं आहे."
"श्री इकडेच का उतरतो आहेस?" आईने विचारले.
"आई मला माझं डोकं शांत करावं लागणार आहे. मी काही वेळाने घरी येईल. तुम्ही जा." श्री एवढं बोलून गाडीतून खाली उतरला. गाडीतून उतरल्यावर श्री पायी चालत थेट जान्हवीच्या घरी गेला. श्रीने तिच्या घरावरील बेल वाजवली. जान्हवीने दरवाजा उघडला, पण ती फोनवर बोलत होती. श्रीला दारात बघून तिला आश्चर्य वाटले. जान्हवीने नजरेने त्याला आत येण्यास खुणावले. घरात गेल्यावर श्रीने दरवाजा लावून घेतला.
जान्हवीने फोनवर बोलता बोलता श्रीला पाणी दिले. किचनमध्ये जाऊन जान्हवीने त्याच्यासाठी चहा ठेवला. चहा झाल्यावर जान्हवीने फोन कट केला. श्रीच्या हातात चहाचा कप देत जान्हवी म्हणाली,
"हा आल्याचा कडक चहा प्या आणि तापलेलं डोकं शांत करा. मग आपण बोलू."
"तुला कसं कळलं की, माझं डोकं तापलेलं आहे ते." श्रीने विचारले.
जान्हवी म्हणाली,
"तुमची मैत्रीण आहे ना, तर मला तुमच्या मनातील भावना समजणार नाहीतर कोणाला समजतील. आईचा फोन आला होता, म्हणून तिच्यासोबत बोलत होते."
"तू नंदाताईंना आई म्हणून लगेच स्विकारलं सुद्धा." श्री म्हणाला.
"काल घरी आल्यावर मी सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केला, मग मला आईची बाजूही पटली. काल रात्री तिचा फोन आला होता, त्यावेळी आमच्यात बऱ्यापैकी बोलणं झालं. येत्या शनिवार- रविवार आई मला भेटायला येणार आहे. बरं माझं जाऊदेत, तुमचं काय झालं? ते सांगा." जान्हवी म्हणाली.
श्रीने मोनिका बद्दल सर्व काही सांगितले. श्री बोलताना खूप चिडला होता. जान्हवीने त्याचं संपूर्ण बोलणं शांतपणे ऐकून घेतले. श्री शांत झाल्यावर जान्हवी म्हणाली,
"तुम्ही एवढे का चिडले आहात? ती मुलगी जशी असेल तशी असेल, पण तुम्ही त्याचा एवढा त्रास का करुन घेत आहात? या जगात कोण कसं असावं? यावर आपला कंट्रोल नसतो. आपण त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची? हे आपल्या हातात असतं. श्रीमंतांची माजलेली मुले ज्या कॅटेगरीत येतात, त्याचं कॅटेगरीतील ही मोनिका आहे. तुमची चिडचिड होणे स्वाभाविक आहे, पण आता चिडून काहीच होणार नाही. घरी जाऊन यशोमती मॅडम वर चिडू नका, त्यांना तुमचं चांगलं व्हावं असंच वाटत असेल. तुमच्यापेक्षा जास्त धक्का त्यांना बसला असेल."
पुढील बराच वेळ श्री जान्हवी सोबत बोलत होता. मनसोक्त गप्पा मारुन झाल्यावर श्री आपल्या घरी गेला.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा