Login

राणी मी राजाची भाग ४३

गोष्ट राजा राणीची

राणी मी राजाची भाग ४३


मागील भागाचा सारांश: आईआजीच्या आग्रहाखातर श्री मुलगी बघायला गेला. मुलीचं खर रुप समोर आल्यावर श्रीला खूप चीड आली होती. डोकं शांत करण्यासाठी श्री जान्हवीच्या घरी गेला होता.


आता बघूया पुढे….


श्री जान्हवीच्या घरुन गेल्यावर जेवण करुन आपल्या रुममध्ये जाऊन बसला. 


"दादू आत येऊ का?"


श्रीने दरवाजाकडे बघितले, तर सृष्टी व दृष्टी दारात उभ्या होत्या. 


"चिमण्यांनो माझ्या रुममध्ये येण्यासाठी तुम्हाला कधीपासून परवानगीची गरज लागली आहे." श्री म्हणाला.


"तसं नाही दादू हल्ली तुला बऱ्याच लोकांसोबत महत्त्वाचं बोलायचं असतं ना, म्हणून म्हटलं उगाच जाऊन आपण डिस्टर्ब करायला नको." दृष्टी म्हणाली.


श्री म्हणाला,

"तुम्ही जे बोलण्यासाठी आल्या होत्या, ते बोला आणि मुद्द्यावर या."


यावर सृष्टी म्हणाली,

"दादू मुलीच्या घरी काय झालं? ते आम्हाला कळलं आहे. तू त्यामुळे डिस्टर्ब झाला असशील, तेही स्वाभाविक आहे. दादू हल्ली मुली अश्याच झाल्या आहेत, विशेष करुन श्रीमंत घरातील मुली हाय क्लासच्या नावाखाली लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात. लेट नाईट पार्टीजला जातात. आपल्या घरात एकमेव आईआजी मुळे या गोष्टी चालल्या नाहीत. आपल्यावर लहानपणापासून जे संस्कार झाले आहेत, त्यांची आपण जाण ठेवली आहे. बाकी घरात असं घडत नाही.


आई वडील पार्टीजला जातात, मग मुलांनाही तीच सवय लागते. दादू या हाय क्लास मध्ये लग्न झाल्यानंतर सुद्धा नवरा बायको दोघांचे अफेअर चालू असतात. शिवाय वाईफ स्वँपिंग नावाचा खेळ सुरु असतो.


आपण हाय क्लास मध्ये मोडत असलो, तरी आपल्याला या गोष्टी झेपत नाहीत आणि पटतही नाहीत. बाकीचे लोकं ह्याला मिडल क्लास मेंटॅलिटी म्हणतात.


दादू आईआजी तुझ्यासाठी आपल्या तोला-मोलाचे स्थळ शोधेल आणि आपली आर्थिक दृष्ट्या बरोबरी करणार कोणतंही घर या हाय क्लास मध्येच येईल. एखादं आपल्या सारखं घर असूही शकेल, पण गॅरंटी देता येणार नाही."


"पण नक्की तुमचं म्हणणं काय आहे?" श्रीने विचारले.


"दादू तू स्वतःचं तुला सुटेबल अशी मुलगी शोधत का नाही?" दृष्टी म्हणाली.


श्री म्हणाला,

"हे बघ कॉलेज मध्ये होतो, तेव्हा अशी मुलगी कधी भेटलीचं नाही, तर आता तिला कुठे शोधू?" 


"तुला सूट होईल अशी मुलगी आधीच तुझ्या आयुष्यात आली आहे. तुम्ही दोघेही एकमेकांना चांगल्या रीतीने ओळखतात सुद्धा." सृष्टी म्हणाली.


श्री न कळल्या सारखा म्हणाला,

"माझ्या आयुष्यात कोण मुलगी आली आहे. मला तर अशी मुलगी आठवत नाहीये."


"जिच्या घरुन तू आत्ता जाऊन आला आहे ती." सृष्टी म्हणाली.


श्री आश्चर्याने म्हणाला,

"तुम्ही जान्हवी बद्दल बोलत आहात का?"


"हो. आम्ही तिच्या बद्दलचं बोलत आहोत." दृष्टीने सांगितले.


श्री हसून म्हणाला,

"ये चिमण्यांनो तुमचं डोकं कुठंही चालतं. आमच्यात आत्ता कुठे मैत्री झाली आहे. आमच्यात बाकी काही नाहीये."


"दादू तुमच्यात आत्ता काही नाहीये, पण होऊ तर शकतं ना. दादू तुमच्या दोघांची केमिस्ट्री खूप छान जुळते. एका गोष्टीचा विचार कर की, तुला जेव्हा तुझं मन मोकळं करायचं होतं, तेव्हा तू तिच्याकडेचं का गेला? जान्हवीची व तिच्या आईची भेट व्हावी, म्हणून तू तिची मदत का केली? आईआजीची इच्छा नसताना सुद्धा तू जान्हवी बेघर होऊ नये, म्हणून तिचे घर विकत घेतले.


आता तू हे सगळं माणुसकीच्या नात्याने केलं असं म्हणशील, पण दादू तू हे सगळं तिच्यासाठी केलं कारण कुठेतरी तुझ्या मनात तिच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे. 


सकाळी जॉगिंग ट्रॅकवर जेव्हा तुमची भेट होते, तेव्हा तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावर वेगळीच स्माईल येते. तू जेव्हा तिच्याशी बोलत असतो, तेव्हा सतत तुझ्या चेहऱ्यावर स्माईल असते. दादू एकदा तिच्याबद्दल विचार करुन बघ. जान्हवी तुझ्यासाठी एकदम परफेक्ट आहे.


जान्हवी ही एकमेव मुलगी आहे, जी तुझ्यासारख्या इमोशनल मुलाला समजून घेऊ शकेल. दादू तुला कुटुंबामध्ये रहायला आवडतं, जान्हवीही अगदी तशीच आहे. एकदा जान्हवीकडे त्या अँगलने बघ. तुला तुझ्या मनात असणाऱ्या तिच्या बद्दलच्या भावना समजतील." सृष्टीने सांगितले.


श्री म्हणाला,

"बरं मी नक्कीच तुमच्या बोलण्याचा विचार करेल. आता अजून काही बोलून माझ्या मनातील गोंधळ वाढवू नका. तुम्हाला माझी इतकी काळजी आहे, हे बघून छान वाटलं."


"दादू तू नेहमी खुश रहावास असं आम्हाला वाटतं आणि तुला आनंदी ठेवणारी योग्य व्यक्ती तुझ्या आयुष्यात असावी, असं आम्हाला वाटतं." एवढं बोलून दोघीजणी श्रीच्या रुम मधून निघून गेल्या.


श्री रात्रभर सृष्टी व दृष्टीच्या बोलण्याचा विचार करत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे जॉगिंग ट्रॅकवर श्री व जान्हवीची भेट झाली. वॉक करताना श्री व जान्हवी मध्ये बऱ्यापैकी गप्पा होत होत्या. श्री जान्हवीकडे मैत्रीच्या पलीकडे बघू लागला होता. जान्हवी सोबत श्रीला बोलणं आवडू लागलं होतं.


पुढील आठ ते दहा श्रीने जान्हवीचा एक लाईफ पार्टनर म्हणून विचार केला होता. जान्हवी त्याच्या सर्व अपेक्षा पूर्ण करु शकणार होती. 


एके दिवशी कंपनीत भरपूर काम असल्याने श्रीला कंपनीतून निघायला उशीर झाला. जान्हवीही त्याचवेळी कंपनीतून बाहेत पडत होती. 


"जान्हवी चल मी तुला घरी सोडतो." श्री म्हणाला.


"नाही नको. मी बसने जाईल." जान्हवीने सांगितले.


श्री म्हणाला,

"जान्हवी आज नेहमीपेक्षा उशीर झाला आहे. तू गाडीत बसली तर पेट्रोल जास्त लागणार नाही. चल बस." 


श्रीने आग्रह केल्यामुळे जान्हवी श्रीच्या गाडीत बसली. 


"नितीन अजून गावाकडून आला नाही का?" जान्हवीने विचारले.


"आला होता, पण त्याला गावाकडे काहीतरी काम होतं म्हणून दोन तीन दिवसांसाठी गेला आहे. आता साहेबांचं लग्न झालंय म्हटल्यावर काही ना काही गावाकडे काम निघतचं. इतक्या स्वातीला सोबत घेऊन आला नव्हता, आता यावेळी येणार आहे. आता त्यांच्या रहाण्याची व्यवस्था करावी लागेल." श्रीने सांगितले.


"तुमची शोधमोहीम कुठवर आली आहे? यंदा कर्तव्य आहे की नाही?" जान्हवीने विचारले.


श्री म्हणाला,

"मुलीच्या मनात असेल तर होईल यंदा कर्तव्य."


"म्हणजे मुलगी फायनल झाली पण." जान्हवी आश्चर्याने म्हणाली.


"मी फायनल केली आहे, पण तिने मला फायनल करायला हवे ना." श्रीने सांगितले.


"तुम्ही प्रेमात पडला आहात का?" जान्हवीने विचारले.


"हो." श्रीने उत्तर दिले.


जान्हवी म्हणाली,

"मला मैत्रीण मानता आणि सांगितलं सुद्धा नाही."


"वेळ आली की, तिच्या बद्दल तुला सगळं काही सांगेल. बरं आई सोबत सूत जुळलं का?" श्री म्हणाला.


"विषय बदलावा तर तुम्हीच. परवा आई घरी येणार आहे. दोन तीन दिवस ती राहणार आहे. मी सुट्टी घेऊन तिच्यासोबत वेळ घालवण्याच्या विचारात होते." जान्हवी म्हणाली.


श्री म्हणाला,

"तू हव्या तितके दिवस सुट्टी घे. सध्या कामाचा एवढा लोड नाहीये."


"सर तुम्हाला रस्त्याच्या कडेचं गाड्यावरील चाट खायला आवडतं का?" जान्हवीने विचारले.


"शाळेत असताना मित्रांसोबत खाल्लं होतं." श्रीने सांगितले.


जान्हवी म्हणाली,

"पुढच्या सिग्नल वरुन उजवीकडे टर्न घ्या. तिथे गार्डनच्या इथे चाटचे अनेक गाडे उभे असतात. मला आता घरी जाऊन स्वयंपाक करण्याचा खूप कंटाळा आला आहे, तर आपण तिकडे जाऊन काहीतरी खाऊयात ना."


श्रीने मान हलवून होकार दिला. श्रीने गाडी गार्डनच्या तिथे नेऊन पार्क केली. जान्हवीने तिथे काय काय स्पेशल मिळतं ते श्रीला सांगितलं. जान्हवी जे खात होती, त्याची टेस्ट श्री चाखत होता. जान्हवीने श्रीला पाणीपुरी कशी खायची ते शिकवलं. श्रीला जान्हवीची कंपनी आवडली. सगळ्यात शेवटी जान्हवीने श्रीकडे आईस्क्रीम खाण्याचा हट्ट केला. आईस्क्रीम खाऊन झाल्यावर जान्हवी व श्री गाडीत बसून घराच्या दिशेने निघाले. 


"तुला पाणीपुरी खूप आवडते का?" श्रीने विचारले.


जान्हवी म्हणाली,

"हो. मी शाळेत असताना दोन रुपयाला पाच पुऱ्या मिळत होत्या. हळूहळू पाणीपुरीची किंमत वाढून वीस रुपये झाली आहे. सर मी ना छोटछोट्या गोष्टींत आनंद शोधणारी मुलगी आहे. पाणीपुरी खाऊन झाल्यावर फ्रीमध्ये सुकी पुरी मिळाली तरी आनंद होतो. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन जेवणं करण्यात ती मजा नाहीये, जी मजा गाड्यावरची पाणीपुरी खाण्यात असते. 


काही लोकं हायजिनिक खाण्याचा विचार करत बसतात, त्यांना पाणीपुरी खाण्याची मजा कधी कळणार नाही. तुम्हाला पाणीपुरी आवडली की नाही?"


"आवडली पण तुझ्याइतकं मी एन्जॉय करुन खाल्लं नाही. अजून दोन तीन वेळेस खाल्ली की मलाही मजा येत जाईल." श्रीने सांगितले.


जान्हवीला तिच्या घरी सोडून श्री आपल्या घरी गेला.


क्रमशः


©® Dr Supriya Dighe


0

🎭 Series Post

View all