Login

राणी मी राजाची भाग ४५

गोष्ट राजा राणीची

राणी मी राजाची भाग ४५


मागील भागाचा सारांश: श्रीने जान्हवीला प्रपोज करण्याचे ठरवले होते. जान्हवीची आई आल्याने ती काही दिवस सुट्टीवर होती. जान्हवीच्या आईने तिला श्री पासून दूर रहायला सांगितले होते, कारण श्री मध्ये जसे त्याच्या वडिलांचे चांगले गुण येऊ शकतात, तसेच वाईटही गुण असू शकतात. श्रीला जे मि. राम लंडनमधील पार्कमध्ये भेटले होते, तेच त्याच्या केबिनमध्ये आले होते, ते श्रीचे वडील असल्याचे त्यांनी सांगितले.


आता बघूया पुढे….


"तुम्ही माझे डॅड आहात, यावर मी विश्वास कसा ठेऊ?" श्रीने विचारले.


"श्री मी आपल्या जुन्या घरी गेलो होतो, पण आता तिकडे कोणीच राहत नाही असं कळालं. घराचा नवीन पत्ता मला माहित नसल्याने कंपनी शोधत शोधत आलो. मला वाटलं होतं की, आई इकडे असेल. शिपायाकडून तुझे नाव कळल्यावर आपल्या मुलाने कंपनीचा पदभार स्विकारला आहे, हे ऐकून मन प्रसन्न झाले. श्री ज्यावेळी आपली भेट लंडनमध्ये झाली होती, तेव्हा तू माझा मुलगा असशील असं कधीच वाटलं नव्हतं. 


श्री मीच तुझा डॅड आहे, हे मी कसं पटवून देऊ? तू एक काम कर. मला घरी घेऊन चल. जानकी तुला खरं काय आहे ते नक्की सांगेल." रामने सांगितले.


यावर श्री म्हणाला,

"ज्या बाईला तुम्ही इतकी वर्ष फसवलं. कामाच्या नावाखाली लफडी करत होतात. आपली लग्नाची बायको असताना सुद्धा परस्त्री सोबत शारीरिक संबंध ठेवत होतात. तुमचा सहवास लाभावा म्हणून ती तडफडत होती. कधीतरी तिच्या मनाचा तुम्ही विचार केला का? 


एके दिवशी रागात दारुच्या नशेत घर सोडून गेलात, त्यावेळी आपला मुलगा आणि बायकी त्या घरात आहेत, हे सुद्धा विसरला होतात का? तुम्ही सोबत राहत असताना जिने तुम्हाला कधी ओळखलं नाही, ती आता तुम्हाला काय म्हणून ओळख देईल. मि. राजाराम देशमुख तुम्ही लंडनमध्ये मर्सडीज कारमध्ये फिरत असाल, पण माझी आई आजही तशीच आहे. 


तुम्हाला भेटण्याची इच्छा कधीपासून होती, पण आज तुम्हाला बघून खूप राग येतो आहे. माझ्या आईचं मन ज्या माणसामुळे दुखावलं गेलं, त्या माणसाला डोळ्यासमोर बघावसं सुद्धा वाटत नाहीये." 


"श्री तुझा राग मी समजू शकतो, पण एकदा माझी बाजू शांतपणे ऐकून घेशील का? इतकी वर्षे हे सगळं होईल, या भीतीने मी भारतात परत येत नव्हतो, पण त्या दिवशी तुझ्यासोबत बोलणं झाल्यावर एकदा घरी जाऊन सगळ्यांची माफी मागावी असं मनाशी ठरवून आज इथे आलो आहे. एकदा माझं म्हणणं ऐकून घे." राम म्हणाला.


श्री म्हणाला,

"ठीक आहे, बोला. मलाही तुम्ही घर सोडून का गेला होता? हे ऐकायचं आहेच."


राम म्हणाला,

"घरातील मोठा मुलगा असल्याने आईला बिजनेस मध्ये मदत करावी लागत होती. बाबा गेल्याने माझं ते कर्तव्यचं होतं. कंपनीच्या कामामुळे मला मित्रांसोबत कधी वेळ घालवता आला नाही की माझा आवडता छंद जोपासता आला नाही. मी माझ्या सर्व इच्छा मनातल्या मनात मारु लागलो होतो.


माझ्या चेहऱ्यावर स्माईल असायची, पण मी मनातून कधीच खुश नव्हतो. जानकी सोबत लग्न झाल्यावर मला तिच्यासोबत भरपूर फिरायचं होतं. नवरा बायको जसे सोबत वेळ घालवतात, तसा वेळ घालवायचा होता,पण कंपनीतील कामामुळे मला कधी ते जमलंच नाही. आईकडे मी कितीदा त्यासाठी सुट्टी मागितली होती, पण आईला कंपनीचं काम जास्त महत्त्वाचं वाटत होतं. जानकी मला मनापासून आवडत होती. जानकी थोडी बुजरी होती, त्यामुळे ती कधी आईच्या शब्दाच्या पलीकडे गेली नाही.


जानकी स्वयंपाक घरात व्यस्त राहत असल्याने मी कंपनीतून आल्यावर आमच्या फारसं बोलणं व्हायचं नाही. तिला कंपनीच्या कामाच्या बाबत काही कळत नसल्याने माझं टेन्शन कधी तिला कळालंच नाही. मीही तिला कधी ते समजावून सांगितलं नाही. 


तुझा जन्म झाल्यावर कंपनीचे काम वाढले होते. मला घर आणि कंपनी यांचा समतोल साधता आला नाही. मी तिथे कमी पडलो. दिवसेंदिवस कंपनीच्या कामाचा लोड वाढत चालला होता. जानकीला माझा वेळ हवा आहे,हे मला समजत होतं, त्याबद्दल अनेकदा भरत माझ्या सोबत बोलायचा. मला आई कामातून सुटका मिळूचं द्यायची नाही. मीही तिला कधी फोर्स करायचो नाही. 


लक्ष्मण व भरत कंपनीच्या कामात लक्ष घालत नसल्याने मला आईची कीव यायची, म्हणून मी आईला कंपनीच्या कामासाठी कधी नाही म्हणालो नाही. तुला जेवढा वेळ देता येईल तेवढा देण्याचा मी प्रयत्न करायचो.


कंपनीच्या सेलमध्ये वाढ होण्यासाठी आपले प्रॉडक्ट्स दुसऱ्या देशात एक्स्पोर्ट व्हावे, म्हणून मी प्रयत्न करत होतो. लंडनमध्ये भारतीय वंशाचे एक बिजनेसमन पारेख होते. पारेख आपल्या कंपनी सोबत टायप करण्यात इंटरेस्टेड होते. लेट नाईट मिटिंग होऊ लागल्या होत्या. त्यांचा एक मॅनेजर काही दिवसांसाठी इकडे आला होता, त्याला दररोज रात्री ड्रिंक घेण्याची सवय होती. 


कंपनीचं टायप व्हावं, म्हणून तो मॅनेजर खुश राहणे गरजेचे होते. मला त्याच्या सोबत बारमध्ये जावं लागायचं. मी सुरुवातीला कधीच ड्रिंक प्यायलो नाही, पण नंतर असं वाटू लागलं होतं की, एकदा ट्राय करून बघितलं तर काय हरकत आहे? तसंही रात्री उशिरा मी घरी जायचो, त्यामुळे मी पिऊन घरी गेलो आहे, हे कोणालाच कळत नव्हते. बाटलीची एकदा सवय लागली की, ती सुटत नाही. माझंही तसंच झालं होतं. 


कामाच्या निमित्ताने मॅनेजर सोबत मुंबईला जाणं झालं होतं, तेव्हा त्याने ऑनलाईन मुलगी शोधून ठेवली होती. मॅनेजरने मला त्यावेळी सांगितले होते की, कामाचा थकवा घालवायचा असेल तर शरीरालाही प्रेमाची आवश्यकता असते. एकदा ट्राय करुन बघ. मॅनेजर व माझ्यात मैत्री झाली असल्याने मला त्याचं म्हणणं पटलं होतं. माझ्या आयुष्यात बाटली सोबत बाईची एन्ट्री झाली होती. 


श्री अगदी खरं सांगतो, त्या दिवशी मनाचा व शरीराचा थकवा दूर झाला होता. खूप रिलॅक्स वाटत होते. बाईचा नाद मला लागला होता. आठवड्यातून एकदा तरी मी त्यासाठी मुंबईला जायचो. नाशिकमध्ये मला ओळखणारे लोकं होते, म्हणून मी नाशिकला त्या गोष्टी कधी केल्या नाही. 


मॅनेजर निघून गेल्यावर पारेखची मुलगी पुढील कागदपत्रे तयार करण्यासाठी इकडे आली होती. दोन आठवडे ती इकडे असेल. कामाच्या निमित्ताने आम्ही दोघे सतत एकत्र रहायचो आणि आमच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. 


तुझ्या सातव्या वाढदिवसाच्या दिवशी मी तिच्याच सोबत होतो. घरी यायला मला उशीर झाला होता. आईला आमच्या दोघांच्या संबंधांबद्दल समजलं होतं. त्या दिवशी घरी आल्यावर आईच्या रुममध्ये गेल्यावर त्याच विषयावरुन आमच्यात भांडण झालं होतं. मला खूप राग आल्याने मी काहीही विचार न करता घर सोडून निघून गेलो.


मी आईच्या बोलण्याला कंटाळलो होतो. सतत तिचंच म्हणणं ऐकण्याचा मला कंटाळा आला होता. मी पारोल सोबत मुंबईला गेलो. पुढील पंधरा दिवस आम्ही दोघे मुंबईला राहिलो होतो. पारोलने मला लंडनला सोबत येण्याबद्दल सुचवले. मलाही तिचं म्हणणं पटलं. 


लंडनला गेल्यावर मी तिच्यासोबत लग्न केले आणि त्यांची कंपनी जॉईन केली. नव्याचे नऊ दिवस चांगले वाटले होते, पण काही दिवसांनी मला घरातील सर्वांची आठवण येऊ लागली होती. परतीचे मार्ग मी स्वतःच बंद करुन टाकले होते.


पारोल हळूहळू बदलू लागली होती. पारोलला मुल नको होतं, म्हणून तिने तीन वेळेस अबोर्शन केलं होतं. माझे आणि पारोलचे विचार खूप वेगळे होते, पण बिजनेस तिच्या नावावर असल्याने मी तिला उलट बोलू शकलो नाही आणि तिला सोडूही शकलो नाही. 


श्री घरी येऊ मला एकदा जानकीची माफी मागायची आहे. प्लिज मला घरी घेऊन चल."


श्री रामला घरी घेऊन जाईल का? बघूया पुढील भागात….


©®Dr Supriya Dighe




0

🎭 Series Post

View all