राणी मी राजाची भाग ४६
मागील भागाचा सारांश: आपले डॅड आपल्या समोर उभे बघून श्रीने त्याच्या मनातील राग व्यक्त केला. रामने त्याच्या हातून घडून गेलेल्या चुका श्रीपुढे मान्य केल्या. रामने एकदा जानकीची भेट घेऊन तिची माफी मागू देण्याची विनंती श्रीकडे केली.
आता बघूया पुढे…..
आपल्या हातून घडलेल्या चुका श्री समोर मांडल्यावर रामच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. श्रीने पाण्याचा ग्लास राम समोर दिला. राम घटघट ते पाणी प्यायला. तेवढ्यात भरत श्रीच्या केबिनमध्ये येऊन म्हणाला,
"अरे श्री कितीवेळ काम करत बसशील? घरी जायचं नाहीये का?"
बोलता बोलता भरतचं लक्ष खुर्चीत बसलेल्या रामकडे गेलं, तो आश्चर्याने म्हणाला,
"दादा तू!"
इतक्या वेळ शांत बसलेला श्री म्हणाला,
"काका या व्यक्तीची आणि माझी भेट लंडन मधील एका पार्कमध्ये झाली होती, त्यावेळी ते माझे डॅड आहेत, हे मला माहीत नव्हतं. मी त्यांचा मुलगा आहे हेही त्यांना माहीत नव्हतं. त्यावेळी ते फॅमिली पासून दूर राहत असल्याचे त्यांना दुःख आहे, असं त्यांनी सांगितलं होतं, तेव्हा मला त्यांच्याकडे बघून वाईट वाटलं होतं की, एका मर्सडीज कार मधून प्रवास करणारा माणूस आपल्या लोकांशिवाय खुश राहू शकत नाही.
आता जेव्हा ते माझे डॅड आहेत व त्यांनी केलेल्या चुका कळल्यावर मला त्यांचा खूप राग येतो आहे. मी त्यांना घरी घेऊन जावं अशी ते विनंती करत आहे, पण माझी इच्छाच होत नाहीये. मी ह्यांना आई समोर घेऊन गेल्यावर तिच्या मनाला किती यातना होतील."
भरत श्रीला शांत करत म्हणाला,
"श्री शांत हो. तुझा राग मी समजू शकतो. आपण त्याला आत्ता घरी घेऊन जाऊयात. वहिनीचा निर्णय तिला घेऊदेत. आपण त्या दोघांमध्ये पडू शकणार नाही. कितीही नाही म्हटलं तरी तो तुझा डॅड आहे आणि देशमुखांचा मोठा मुलगा. दादा सगळं काही योग्य वागला होता, पण स्वतःच्या मनावर तो नियंत्रण मिळवू शकला नाही, ही सर्वांत वाईट गोष्ट त्याने केली होती. आपल्या कुटुंबाला भेटण्याची ओढ त्याला परत घेऊन आली आहे. आता आपण उर्वरीत बोलणं घरी जाऊन करुयात."
"भरत तुला एकदा माझ्याकडे बघून बोलावंसं वाटत नाहीये का?" रामने विचारले.
"दादा आता जर मी बोललो,तर तुला खूप वाईट वाटू शकेल. आपण निवांत रात्री बोलूयात." भरतने उत्तर दिले.
भरत, श्री व राम एकाच गाडीत घरी जायला निघाले. रामला बघितल्यावर घरातल्या सर्वांची प्रतिक्रिया काय असेल? हा प्रश्न श्रीला पडला होता. घर आल्यावर तिघेही गाडीतून उतरले. राम घराकडे आश्चर्याने बघत होता. तिघेही सोबतच घरात गेले. दृष्टी हॉलमध्ये बसलेली होती.
"दृष्टी आईला व जानकी वहिनीला बोलावून आण." भरतने सांगितले.
रमाकाकूंनी तिघांना पाणी आणून दिले. तिघेही जण सोप्यावर बसले. ते एकमेकांशी काहीच बोलत नव्हते. त्याचवेळी लक्ष्मण बँकेतून घरी आला होता. रामला सोप्यावर बसलेलं बघून तो शॉक झाला. लक्ष्मणने भरतकडे बघितल्यावर भरतने त्याला नजरेने शांत रहा म्हणून सांगितले.
"भाऊजी मला कशाला बोलावलं?" श्रीच्या आईने विचारले, तोपर्यंत तिचे लक्ष रामकडे गेले नव्हते. तोपर्यंत आईआजीही तिथे आली होती. दोघीजणी रामकडे बघून जागीच थबकल्या होत्या. घरात भयानक अशांतता पसरली होती.
श्रीला न राहवल्यामुळे तो म्हणाला,
" हे आपल्या घराचा पत्ता विचारण्यासाठी कंपनीत आले होते. ह्यांना आईची माफी मागायची आहे, म्हणून ते इथे आले आहेत. हे घर का सोडून गेले होते? याचं कारण अखेर मला कळलं आहे.
आई तुला त्यांना माफ करायचं आहे की नाही? हे तुझं तू ठरव. पण आई एक मात्र लक्षात ठेव की, ह्यांनी तुला फसवलं आहे. तुझा विश्वासघात या माणसाने केला आहे.
नंदाताईंना ह्यांनी केलेली मदत ऐकून मला त्यांचा मुलगा असल्याचा अभिमान वाटत होता. एका अनोळखी स्त्रीचं दुःख, तिची व्यथा तुम्हाला समजली, पण स्वतःच्या बायकोचं मन ह्यांना समजलं नाही. मी माझ्या रुममध्ये चाललो आहे. मला काही ऐकायचं नाहीये आणि बघायचंही नाहीये."
श्री एवढं बोलून आपल्या रुममध्ये जायला निघाला असताना राम म्हणाला,
"एक मिनिटं श्री. मला मान्य आहे की, तुम्ही सगळेच माझ्यावर रागावलेले असतील. मी कामच तसं केलं आहे, म्हणून तुमचा राग समजू शकतो. माझी सगळ्यात मोठी चूक ही झाली की, वेळीच मी बोलू शकलो नाही. माणसाने आयुष्यात प्रत्येक गोष्ट वेळेवर करायला हवी.
लग्न झाल्यावर जानकीला मी वेळ द्यायला हवा होता. आईने कंपनीचे काम सांगितल्यावर मी तिला विरोध करुन जानकी सोबत वेळ घालवायला हवा होता. बाहेरगावी कामासाठी जाताना जानकीला सोबत घेऊन जायला हवे होते. जानकी व माझे नाते अधिक फुलावे यासाठी मी काहीच प्रयत्न केला नाही.
श्री जी चूक मी केली आहे, ती चूक तू कधीच करु नकोस. तुला जर एखाद्या बद्दल प्रेम वाटत असेल, तर वेळीच ते व्यक्त कर. तुला जे काही करायचं आहे, त्यासाठी आपल्या माणसांशी भांडाव लागलं तरी भांड. एकदा वेळ निघून गेली की आपण काहीच करु शकत नाही."
रामचे बोलून झाल्यावर श्री आपल्या रुममध्ये निघून गेला. "माझा भजनाचा ऑनलाईन क्लास आहे." हे बोलून श्रीची आई तेथून निघून गेली.
भरत रामला गेस्टरुम दाखव, त्याला फ्रेश येऊन थोड्यावेळाने जेवणासाठी यायला सांग." हे सांगून आईआजी तिच्या रुममध्ये निघून गेली. हळूहळू सर्वजण एकेक करुन निघून गेले. भरतने रामला गेस्टरुम दाखवली.
"भरत माझ्यासोबत कोणीच बोलणार नाही का?" रामने विचारले.
"दादा सगळ्यांना थोडा वेळ दे. तू अचानक निघून गेला होता आणि आजही अचानक आला आहेस. तुझं जाणं कोणी पटकन स्विकारलं नव्हतं, मग परत येणं कसं काय कोणी स्वीकारु शकेल? श्रीचं बोलणं मनावर घेऊ नकोस. तो तसा बऱ्यापैकी समजदार आहे. वरवर कितीही तो तुझ्यावर रागावला असेल, तरी त्याच्या मनात तुझ्याबद्दल प्रेमचं आहे." भरत एवढं बोलून निघून गेला.
रात्री सगळ्यांनी एकत्र जेवण केले. जेवण झाल्याबरोबर श्री आपल्या रुममध्ये निघून गेला. श्रीला आपला राग कोणाकडे तरी व्यक्त करायचा होता, म्हणून त्याने जान्हवीला फोन लावला.
"सॉरी जान्हवी, मी तुला रात्री फोन करतो आहे, पण मला सगळं काही असह्य झालं होतं आणि तुझ्याशी बोलावं वाटलं, म्हणून फोन केला." श्री एका दमात सर्व काही बोलून गेला.
"काय झालंय?" जान्हवीने विचारले.
"जान्हवी डॅड परत आलेत." श्रीने सांगितले.
जान्हवी म्हणाली,
"मग ही तर चांगली बातमी आहे, पण तुम्ही नाराज का झाला आहात?"
"आईला बघून तुझी जी प्रतिक्रिया होती, तसंच माझं झालं आहे. डॅडने केलेल्या चुकांचा पाढा त्यांनी स्वतः माझ्यासमोर मांडला, ते ऐकून तर मला त्यांचा खूप जास्त राग येतो आहे." श्री म्हणाला.
यावर जान्हवी म्हणाली,
"सर जी काही तुमची प्रतिक्रिया आहे, ते नॉर्मल आहे. माझ्याही बाबत असंच काहीतरी झालं होतं. मी माझ्या आईची, तुम्ही तुमच्या डॅडची आतुरतेने वाट बघत होतो, पण ते समोर आल्यावर इतक्या दिवस मनात साचवून ठेवलेला राग आपोआप बाहेर पडतो. तुम्ही आता रात्री शांत झोपा. डॅड बद्दल जास्त विचार करु नका. आई आता सुजयच्या घरी गेलेली आहे, ती लगेच परत येईल. रात्रीच्या वेळी तुमचा फोन येणं तिला पटणार नाही. उद्या सकाळी आई पुण्याला परत चालली आहे. उद्या रविवार असल्याने तुम्हालाही सुट्टीचं असेल, तर घरी या. मग आपण बोलूयात. आता रिलॅक्स होऊन शांत झोपा."
एवढं बोलून जान्हवीने फोन कट केला. आईचे नाव सांगून जान्हवीने फोन कट केला हे श्रीला आवडले नाही. श्रीला जान्हवी सोबत बोलायचे होते, पण बोलता न आल्याने श्रीची चिडचिड होत होती.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा