Login

राणी मी राजाची भाग ४७

गोष्ट राजा राणीची
राणी मी राजाची भाग ४७

मागील भागाचा सारांश: रामला भरत व श्री आपल्या सोबत घरी घेऊन गेले. रामला अचानक घरी आलेलं बघून सगळेच शॉक झाले. कोणीही राम सोबत बोलले नाही. श्रीला त्याच्या मनात असलेला राग जान्हवी कडे व्यक्त करायचा होता, म्हणून त्याने तिला फोन केला, पण आईला रात्री उशिरा फोनवर बोलणं पटणार नाही, म्हणून जान्हवीने श्री सोबत बोलणं टाळलं.

आता बघूया पुढे….

"श्री झोप झाली का?" आईने श्रीच्या रुममध्ये येऊन विचारले.

श्री नेटकाच उठून बेडवर बसलेला होता. रविवार असल्याने ऑफिसला जाण्याची त्याला घाई नव्हती.

"रात्रभर डोक्यात नको ते विचार येत होते. पहाटे पहाटे झोप लागली होती. तू माझ्या सोबत काही बोलण्यासाठी आली आहेस का?" श्री म्हणाला.

"हो. काल रात्री जेवण झाल्यावर तुझे डॅड रुममध्ये आले होते, त्यांनी हे तुझ्या समोर मांडलं होतं तेच मलाही सांगितलं. श्री मला त्यांचा रागही आला नाही आणि त्यांनी माझ्यासोबत प्रतारणा केल्याचे दुःखही वाटले नाही. श्री आमच्यात जो काही भावनिक बंध होता, तो काही वर्षांपूर्वीचं विरुन गेला होता. एका बाईच्या मनात तिच्या नवऱ्याबद्दल ज्या भावना असतात, त्या आता माझ्या मनात काहीच नाहीयेत. 

श्री मी एकटी जगायला शिकली आहे. आता मला कुणाच्या आधाराची गरज नाहीये. मी एकटी राहू शकते. तुझ्या डॅडला मी हे स्पष्टपणे सांगून टाकलं. ते या घरात राहिले तरी मला काहीच अडचण नाहीये, पण इथून पुढे आम्ही दोघे एका रुममध्ये कधीच राहू शकणार नाही. 

तुझ्या डॅडने माझ्याशी प्रतारणा केल्याचा राग तुला येत असेल, तर तो सोड. काहीही झालं तरी ते तुझे डॅड आहेत. जेवढा राग तू व्यक्त केलास, ते बस झालं. आता त्यासाठी त्यांच्यावर रागावू नकोस. तुझ्या डॅडला ब्लड कॅन्सर झाला आहे. त्यांच्या कडे कमी काळ उरला आहे, हा उरलेला काळ त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत घालवायचा आहे, म्हणून ते भारतात परत आले आहेत.

मरणाच्या दारात असलेल्या माणसावर राग ठेवू नकोस. तुझं डोकं शांत झाल्यावर त्यांच्या सोबत बोल, त्यांना समजून घे. चुका सर्वांच्या हातून घडतात, पण त्या मान्य करण्याची ताकद खूप कमी लोकांमध्ये असते. तुझ्या डॅडच्या चांगल्या बाजूकडे बघून त्यांना माफ कर. तू समजदार आहेसच. तुला सगळं कळतं." आईने सांगितले.

यावर श्री म्हणाला,
"ठीक आहे आई मी डॅड सोबत नक्कीच बोलेल. आई डॅडने काल वेळेसंबंधी काहीतरी सांगितलं होतं. कोणतीही गोष्ट वेळेवर करावी असं त्यांचं मत आहे. मलाही ते पटलंय, म्हणून मी आज काहीतरी करण्याचे ठरवले आहे. माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट आज मी करणार आहे आणि त्याची माहिती तुला असावी असं मला वाटतं."

"तू कशाबद्दल बोलत आहेस?" आईने विचारले.

"आई तू जान्हवीचं नाव माझ्या तोंडून अनेकदा ऐकलं आहेस. आई मला जान्हवी आवडते आणि मला तिच्यासोबत लग्न करायचे आहे. ती माझ्यासाठी व आपल्या घरासाठी एकदम परफेक्ट आहे. आज मी तिला प्रपोज करणार आहे." श्रीने सांगितले.

आई म्हणाली,
"माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा. तुझी निवड योग्यचं असेल. जान्हवीला प्रपोज करण्याआधी गणपतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घे. गणपती बाप्पा तुझी इच्छा नक्कीच पूर्ण करतील. आता उठ आणि अंघोळ कर. शुभ काम करायला जाणार आहेस, तर अंगातील आळस झटक." 

आई रुममधून गेल्यावर श्री उठला व आवरुन नाश्ता करण्यासाठी खाली गेला. चहा नाश्ता केल्यावर त्याचे पाय आपसूकचं गेस्टरुम कडे वळले.

"मी आत येऊ का?" श्रीने दरवाजावर नॉक करुन विचारले.

दरवाजाकडे बघून राम म्हणाला,
"श्री बाळा ये ना." 

"आईने तुम्हाला ब्लड कॅन्सर असल्याचे सांगितले. तुम्ही सगळे तुमचे रिपोर्ट्स आणले आहेत का?" श्री म्हणाला.

"हो. माझी फाईल माझ्यासोबत नेहमीच असते."रामने सांगितले.

"माझ्या मित्राचे वडील कॅन्सर स्पेशालिस्ट आहेत. उद्या संध्याकाळी आपण त्यांना तुमचे रिपोर्ट्स दाखवूयात, ते अनुभवी डॉक्टर आहेत. एका महत्त्वाच्या कामासाठी मी बाहेर चाललो आहे." श्री एवढं बोलून पटकन तेथून निघून गेला.

आईने सांगितल्या प्रमाणे जान्हवीच्या घरी जाण्याआधी श्री गणपतीच्या मंदिरात गेला. मंदिराच्या बाहेर एक मुलगी गुलाबाचे फुलं विकत होती. श्रीने तिच्याकडून एक गुलाबाचे फुल विकत घेतले. 

जान्हवी श्रीची वाट पाहत होती. 

"सर किती उशीर केलात? मला वाटलं होतं की, तुम्ही सकाळी लवकर याल. मी तुमच्यासाठी मसाला इडली करुन ठेवली आहे. आता पुन्हा गरम करावी लागेल." जान्हवीची बडबड सुरु होती.

प्रसाद तिच्या हातात देत श्री म्हणाला,
"आज रविवार असल्याने गणपतीच्या मंदिरात खूप गर्दी होती, म्हणून मला उशीर झाला."

जान्हवी हसून म्हणाली,
"रविवार असल्याने गर्दी नव्हती, तर आज चतुर्थी आहे, म्हणून गर्दी असेल. पण आज तुम्ही गणपतीच्या दर्शनाला कसे काय गेलात?"

"माझ्या आईचं म्हणणं आहे की, कुठलंही महत्त्वाचं काम करायचं असेल, तर त्याआधी देवाचे दर्शन करायला हवे. एनिवेज तुझी आई गेली का?" श्री म्हणाला.

"हो सकाळीचं गेली. आम्ही खूप धमाल केली. आता घरात आई नसेल तर जाम बोअर होईल." जान्हवी म्हणाली.

"तू माझ्या सोबत बोललेलं तुझ्या आईला आवडत नाही का?" श्रीने विचारले.

"अगदीच असं नाही, पण एवढ्या रात्री तिने आपला फोन ऐकला असता, तर तिने काय प्रतिक्रिया दिली असती, याची कल्पना मला आली नाहीये ना. मी फोन कट केला, म्हणून तुम्हाला राग आला होता ना?" जान्हवी म्हणाली.

"हो, पण तुला कसं कळालं?" श्री म्हणाला.

जान्हवी म्हणाली,
"सर एवढ्या दिवसात तुम्हाला मी एवढं ओळखू लागले आहे."

"अजून माझ्याबद्दल काय काय सांगू शकतेस?" श्रीने विचारले.

"वेळ आली की एकेक गोष्ट सांगत जाईल." जान्हवीने सांगितले.

"अरे बापरे, मग तर मला त्या वेळेची वाट पहावी लागेल." श्री म्हणाला.

जान्हवीने श्रीला मसाला इडली खायला दिली. पहिला घास खाल्ल्यावर श्री म्हणाला,
"वाह! काय टेस्टी बनवली आहेस. एकच नंबर."

"मसाला इडली माझी स्पेशल डिश आहे. बरं मला एक सांगा की, तुमचे डॅड अचानक कसे आले?" जान्हवीने विचारले.

इडली खाऊन झाल्यावर श्रीने घडलेली इतमभूत कथा जान्हवीला सांगितली. सगळं काही ऐकल्यावर जान्हवी म्हणाली,
"अच्छा, तुमच्या डॅडच्या आयुष्यात बाई व बाटली होती , हे आईने मला सांगितले होते. मी आईला तुमच्या डॅड बद्दल विचारलं होतं, पण तिला तेवढंच माहीत होतं. तुमच्या आई खरंच खूप मोठ्या मनाच्या आहेत, त्यांनी एवढं सगळं करुन सुद्धा त्यांना ब्लड कॅन्सर असल्याचे कळताच त्यांनी तुला मुलाचे कर्तव्य निभवायला सांगितले."

श्री म्हणाला,
"हो माझी आई ग्रेटचं आहे. जान्हवी मी माझ्या डॅड सारखं कधीच वागणार नाही. ज्या चुका त्यांनी केल्या, त्या चुका मी कधीच करणार नाही. तुझ्या आईला कदाचित ती भीती वाटली असेल, म्हणून त्यांनी तुला माझ्यापासून चार हात लांब रहायला सांगितले असेल ना?

आता तू विचार करत असशील की, हे मला कसं कळलं? तर जान्हवी मीही तुला चांगलंच ओळखायला लागलो आहे. काल तुला माझं बोलणं ऐकायचं होतं, पण तू मनाविरुद्ध फोन कट केला. जान्हवी मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे."

"बोला ना." जान्हवी म्हणाली.

पँटच्या मागील खिशात ठेवलेले गुलाबाचे फुल हातात घेऊन जान्हवी समोर धरुन श्री म्हणाला,
"जान्हवी मला तू खूप खूप आवडतेस. मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. जान्हवी आपण दोघे एकमेकांसाठी परफेक्ट मॅच आहोत. न बोलताही आपल्याला एकमेकांच्या मनातील कळतं.

जान्हवी ही मसाला इडली मला आयुष्यभर खायची आहे. कंपनीत माझ्या शेजारील खुर्चीत तुला बसलेलं बघायचं आहे. जान्हवी आय लव्ह यू वेरी मच."

श्रीने जान्हवीला प्रपोज तर केले, पण आता यावर जान्हवीचे काय उत्तर असेल? हे बघूया पुढील भागात….