Login

राणी मी राजाची भाग ४८

गोष्ट राजा राणीची

राणी मी राजाची भाग ४८


मागील भागाचा सारांश: रामला ब्लड कॅन्सर असल्याचे जानकीने श्रीला सांगितले. श्री जान्हवीवर प्रेम करतो, हे त्याने आपल्या आईला सांगितले. श्रीने जान्हवीला प्रपोज केले.


आता बघूया पुढे….


श्रीने प्रपोज केल्यामुळे जान्हवी जागेवरचं थबकली, तिला काय बोलावे काहीच सुचत नव्हते. श्री तिच्याकडे आशेने बघत होता. श्रीच्या हातातील फुल तसेच होते. जान्हवी एक खोल श्वास घेऊन म्हणाली,

"सर मला विचार करायला वेळ हवा आहे. मी पटकन होकार किंवा नकार काहीच देऊ शकणार नाही."


"ठीक आहे. विचार करुन तू योग्य तोच निर्णय घेशील याची मला खात्री आहे." श्री एवढं बोलून जान्हवीच्या घरातून बाहेर पडला. 


श्री घरातून निघून गेल्यावर सुजय जान्हवीच्या घरात येऊन म्हणाला,

"श्री सर आले होते ना. त्यांनी जाताना माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. सगळं काही ठीक आहे ना? तुझा चेहरा असा का दिसतो आहे?"


"सुजय श्री सरांनी मला प्रपोज केलं." जान्हवीने सांगितले.


सुजय हसून म्हणाला,

"सिरीयसली एकदम भारीच ना, मग तू काय उत्तर दिलेस?" 


"भारी काय त्यात. मी काहीच उत्तर दिले नाहीये. मी त्यांच्या कडून वेळ मागून घेतला आहे. सुजय देशमुख म्हणजे खूप मोठे लोकं आहेत. माझी आणि त्यांची बरोबरी कधीच होऊ शकणार नाही. श्री सर जर आपल्या सारख्या मिडल क्लास घरातील असते, तर मी कधीच त्यांना नाही म्हटले नसते, पण…" जान्हवी म्हणाली.


यावर सुजय म्हणाला,

"जान्हवी तू आर्थिक परिस्थितीचा विचार करुन निर्णय घेऊ नकोस. तिला मनापासून जे वाटत असेल, तो निर्णय घे. श्री सर एक माणूस म्हणून खूप चांगले आहेत, याचा विचार करुन निर्णय घे. श्री सरांनी प्रपोज करताना तुझ्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला का? नाही ना, मग तू निर्णय घेताना तो विचार करु नकोस. तुझं विचारचक्र चालू राहुदेत. मी निघतो."

------------------------------------------------------


जान्हवीचा निरोप कधी येईल? याची श्री आतुरतेने वाट बघत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जान्हवी वॉक करण्यासाठी सुद्धा आली नव्हती. कंपनीत गेल्यावर जान्हवी श्रीला टाळत होती, हे श्रीच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. 


संध्याकाळी श्री रामला घेऊन त्याच्या मित्राच्या वडिलांकडे घेऊन गेला होता. रिपोर्ट्स बघून त्यांनी पुढची ट्रीटमेंट ठरवली. श्री एका मुलाचे आपल्या वडिलांप्रती असलेले कर्तव्य पुरेपूर पार पाडण्याचा प्रयत्न करत होता.


जान्हवीचं तुटक वागणं श्रीला अजिबात आवडत नव्हतं. जान्हवी कंपनीत श्री सोबत कामापुरतं बोलत होती. श्री जान्हवीच्या बदललेल्या वर्तनाचा विचार करत बसलेला असतानाच सुजयने केबिनच्या दरवाजावर नॉक करुन विचारले,


"सर आत येऊ का?" 


श्री आपल्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर येत म्हणाला,

"हो ये ना."


"सर मार्केटींग डिपार्टमेंट मध्ये काही नवीन लोकं भरण्याची आवश्यकता आहे. ज्यांना सोशल मीडियाबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे, त्यांना ऑनलाईन काम करण्याचा अनुभव असेल, असे दोघेजण तरी मला आवश्यक वाटतात." सुजयने सांगितले.


यावर श्री म्हणाला,

"तुला जे योग्य वाटत असेल, तसे एम्प्लॉईज तू घेऊ शकतोस. एच आर डिपार्टमेंटला सांगून जाहिरात द्यायला सांग. तू कंपनी जॉईन केल्यापासून आपला सेल बऱ्यापैकी वाढला आहे, सो माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे."


"सर तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला म्हणून हे सहज शक्य झालं. माझी कंपनी असल्या सारखं मला इथे काम करता येत आहे. सर हल्ली तुमच्या चेहऱ्यावर सतत कसले तरी टेन्शन दिसून येते. सगळं काही ठीक आहे ना?" सुजय म्हणाला.


"मी तुझ्यासोबत या विषयावर बोलणारचं होतो. तू जान्हवीला पहिल्यापासून ओळखतोस. मी तिला प्रपोज केलं हे तिने तुला सांगितलं असेलचं. त्या दिवसापासून जान्हवी माझ्याशी तुटकपणे वागत आहे. जवळजवळ ती मला टाळतच आहे. जान्हवी सकाळी वॉकला सुद्धा येत नाही. कंपनीत सुद्धा माझ्याशी फारशी बोलत नाही. आता या सगळ्याचा अर्थ मी काय घ्यायचा?" श्रीने विचारले.


सुजय म्हणाला,

"याबद्दल आमच्यात फारसं बोलणं झालं नाही, पण तुम्ही एकमेकांसाठी परफेक्ट मॅच आहात, असं मीही तिला सांगितलं होतं. जान्हवीच्या डोक्यात आर्थिक परिस्थितीमुळे गोंधळ सुरु आहे. मी त्याबद्दलही तिला समजावून सांगितलं होतं, पण सर ती अतिविचार करणारी मुलगी आहे. तिला तुम्ही आवडत असाल, पण ती ठोस निर्णय घेऊ शकत नाहीये, म्हणून कदाचित ती तुम्हाला टाळत आहे."


"अच्छा हे सगळं असं असेल तर…. म्हणजे तिच्या मनात माझ्याबद्दल प्रेम असेल, पण त्याची जाणीव तिला होत नाहीये. माझ्या कुरापती डोक्याच्या बहिणी याबद्दल मला नक्कीच काहीतरी सुचवतील. बरं तू आपल्यात काही बोलणं झालंय, हे जान्हवीला कळू देऊ नको." श्रीने सांगितले.


सुजयने मान हलवून होकार दर्शवला व तो केबिन मधून बाहेर पडला. संध्याकाळी घरी गेल्यावर श्रीने सृष्टी व दृष्टीची भेट घेऊन जान्हवी बद्दल सांगितलं. थोड्या वेळ दोघींनी विचार केला, मग दृष्टी म्हणाली,

"दादू काही दिवसांसाठी तू गायब हो. जान्हवीचा फोन आला तरी उचलू नकोस, तिचा मॅसेज बघून रिप्लाय करु नकोस. तू कुठे गेला आहेस? हेही तिला कळू देऊ नकोस. तुझी काहीच न्यूज कळत नाहीये हे बघून तिला तुझी काळजी वाटू लागेल, तिच्या मनात तुझ्या बद्दल असलेलं प्रेम तिला जाणवेल आणि जेव्हा तू अचानक तिच्यासमोर येशील, तेव्हा ती ते कबूल करेल."


"अग पण त्याचा तिला खूप त्रास होईल. मला तिला त्रास होईल, असं काहीच करायचं नाहीये." श्री म्हणाला.


सृष्टी हसून म्हणाली,

"दादू आपल्याला तिला त्रास होऊ द्यायचा नाहीये, पण त्याशिवाय तिच्या मनात तुझ्या बद्दल जे दडलंय ते बाहेर येणार नाही. तू सुजय सोबत बोलतोय, पण तिला टाळतो आहेस, हे तिला समजलं पाहिजे. दादू हे फक्त पुढील आठ दिवस करायचं आहे. आमच्यावर विश्वास ठेव, ही ट्रिक नक्कीच काम करेल."


श्रीने त्यावर थोडा विचार केला, मग त्याला ते पटले. श्रीने त्यावर लगेच ऍक्शन घेण्याची ठरवली. सुजयला फोन करुन सगळा व्यवस्थित प्लॅन ठरवला. श्रीला कधीपासून त्याच्या कॉलेज फ्रेंड्सला भेटायला जायचं होतं. त्याची कॉलेजची गॅंग मुंबईला रहायला होते. श्री दुसऱ्याचं दिवशी कंपनीतील सर्व कामे मार्गी लावून मुंबईला रवाना झाला.


श्री कंपनीत नाहीये, हे बघून जान्हवीला प्रश्न पडला होता, कारण श्री कंपनीत आला नाहीये, असा एकही दिवस झाले नव्हते. पुढील दोन ते तीन दिवस श्री कंपनीत नसल्याने जान्हवीला त्याची काळजी वाटू लागली होती. जान्हवीने सुजयकडे याबद्दल चौकशी केली, तर सुजयने तिला तो कुठेतरी बाहेर गेला आहे, असं सांगितलं, पण सुजयने श्री बद्दल फारशी माहिती दिली नाही. 


दुसऱ्या दिवशी सकाळी जॉगिंग ट्रॅकवर जाऊन तिने सृष्टी व दृष्टीची भेट घेऊन अप्रत्यक्षरित्या श्री कुठे गेला आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्या दोघींनी तिला काहीच सांगितले नाही. जान्हवीने श्रीला लगेच मॅसेज केला,

"हॅलो सर, तुम्ही कुठे आहात? अचानक कुठे निघून गेलात? तुम्ही कुठे गेलात, हे कोणालाही माहीत नाहीये?"


श्रीने मॅसेज वाचला, पण काहीच उत्तर दिले नाही. श्रीने काहीच रिप्लाय न दिल्याने जान्हवीला त्याची काळजी वाटू लागली होती. जान्हवीने पुन्हा सुजयला श्रीबद्दल विचारले, तेव्हा सुजयने श्री सोबत कामाबद्दल बोलणं होतं आहे, असं सांगितलं.


श्री आपल्याला टाळतो आहे, हे जान्हवीला जाणवलं होतं. न राहवल्याने जान्हवीने श्रीला फोन केला, तर श्रीचा फोन एका मुलीने उचलला होता. श्रीच्या फोनवर मुलीचा आवाज ऐकून काही न बोलता जान्हवीने फोन कट केला.


आता तर जान्हवीच्या मनात श्री बद्दल वेगळेच विचार येत होते. जान्हवीने श्रीला मॅसेज केला की,

"मला नाही माहीत तुम्ही कुठे आहात? कसे आहात? मला तुमची काळजी वाटत होती, म्हणून मी तुम्हाला मॅसेज व कॉल करत होते. तुम्ही मला टाळत आहात, हे स्पष्टपणे मला जाणवलं आहे. मैत्रीण म्हणता आणि असे अचानक गायब होतात. तुम्ही डोळ्यासमोर नाही आहात याचा मला प्रचंड त्रास होत आहे. आपल्यातील मैत्री जर खरी असेल, तर प्लिज मला येऊन भेटा." 


क्रमशः


©®Dr Supriya Dighe




0

🎭 Series Post

View all