राणी मी राजाची भाग ४९
मागील भागाचा सारांश: श्रीने जान्हवीला प्रपोज केल्यावर विचार करण्यासाठी जान्हवीने वेळ मागून घेतला. जान्हवी श्रीसोबत तुटक वागत असल्याने तिच्या मनात नक्की काह सुरु आहे? याचा अंदाज श्रीला येत नव्हता, म्हणून सृष्टी व दृष्टीने श्रीला काही जान्हवीच्या नजरेसमोर येऊ नकोस असे सांगितले. श्री डोळ्यासमोर नसताना जान्हवी अस्वस्थ झाली होती.
आता बघूया पुढे….
दरवाजावरील बेलचा आवाज ऐकू आल्याने जान्हवीची झोप मोडली. बाजूला ठेवलेल्या मोबाईलमध्ये तिने वेळ बघितली, तर सकाळचे सहा वाजले होते. इतक्या सकाळी कोण आलं असेल? या विचारात ती बेडवरुन उठली व तिने डोळे चोळत चोळत दरवाजा उघडला.
"गुड मॉर्निंग जान्हवी." दारात उभा असलेला श्री म्हणाला.
जान्हवी श्रीकडे आश्चर्याने बघत होती. श्री घरात येत म्हणाला,
"तू मला आत बोलावलं नाही, तरी मी येणार आहे. एनिवेज तू मोकळ्या केसात सुंदर दिसतेस. एरवी तू केस बांधलेले असतात. मोकळ्या केसात बघण्याचा योग्य पहिल्यांदा आला आहे."
श्री असं बोलल्यावर जान्हवीच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली. श्री घरात जाऊन सोप्यावर बसला. जान्हवीने दरवाजा लावून घेतला व तोंड धुण्यासाठी म्हणून ती आतमध्ये गेली.
"तुम्ही चहा घेणार आहात ना?" जान्हवीने किचन मधून श्रीला आवाज देऊन विचारले.
श्री किचनमध्ये जाऊन म्हणाला,
"हो मग. तुझ्या हातचा चहा मी मिस कशाला करेल. मला यावेळी इथं बघून तुला प्रश्न पडला नाही का?"
"माझा मॅसेज वाचल्यावर तुम्ही आला आहात. एवढं कळलं आहे." जान्हवी चहाचं पातेलं गॅसवर ठेवत म्हणाली.
श्री तिथेच उभा राहून जान्हवीकडे एकटक बघत होता.
"तुम्ही माझ्याकडे असं का बघत आहेत?" जान्हवीने विचारले.
"तुला बघून पाच ते सहा दिवस होऊन गेलेत, म्हणून बघतो आहे." श्रीने सांगितले.
"असं आहे, मग एवढ्या दिवस कुठे जाण्याची गरज होती का?" जान्हवी म्हणाली.
श्री म्हणाला,
"तू मला टाळत होती, मग मी काय करणार होतो. बरं ऐक ना जान्हवी जे ऐकण्यासाठी मी मुंबई वरुन डायरेक्ट इकडे आलो आहे, ते सांग ना. तू काय बोलशील? या विचाराने मला रात्रभर झोप लागली नाहीये."
जान्हवी गालातल्या गालात हसून म्हणाली,
"सांगायचं काय त्यात. सकाळची वेळ आहे, तुमच्यासाठी मी चहा बनवत आहे. तुम्ही माझ्याकडे टक लावून बघत आहात, तरीही मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, याचा काय अर्थ होऊ शकतो? तुम्ही मुंबईला कोणासोबत होता? तुमचा फोन कोणत्या मुलीने उचलला होता?"
श्री म्हणाला,
"मी ते सगळं सांगेल, त्याआधी मला तुझ्या मनातील भावना ऐकायच्या आहेत. प्लिज जान्हवी सांग ना. नाहीतर मी पुन्हा अज्ञातवासात निघून जाईल."
जान्हवीने चहा दोन कपात गाळला, ते दोन कप घेऊन ती हॉलमध्ये गेली, श्रीही तिच्या पाठोपाठ गेला.
"दररोज सकाळी उठून मला तुमच्या साठी चहा बनवायला आवडेल. मला तुम्ही एक माणूस म्हणून अगदी पहिल्या दिवसापासूनचं आवडला होतात. पण त्या दिवशी तुम्ही अचानक प्रपोज केल्याने माझा गोंधळ उडाला होता, कारण मला कधीच वाटलं नव्हतं की, तुमची चॉईस माझ्यासारखी एखादी सर्वसामान्य मुलगी असू शकेल म्हणून. लग्न म्हणजे ही एक खूप मोठी गोष्ट आहे.
तुम्ही डोळ्यासमोर दिसत नव्हतात, शिवाय तुम्ही नेमके कुठे गेलात? ह्याबद्दल काहीच माहिती न मिळाल्याने माझा जीव कासावीस झाला होता. तुमच्या फोनवर मुलीचा आवाज ऐकून तर माझी तळपायाची आग मस्तकाला भिडली होती. तुम्ही माझ्या आयुष्यात असणे किती महत्त्वाचे आहे, हे तुम्ही समोर नसल्यावर जाणवले. मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. आय लव्ह यू श्री." जान्हवी असं बोलल्या बरोबर श्रीने तिला मिठी मारली. दोघांच्याही डोळयात आनंदाश्रू होते. दोघेही जण या क्षणाची वाट बघत होते.
श्री व जान्हवी एकमेकांच्या मिठीत असतानाच दरवाजा वरील बेल वाजली.
"आता कोण असेल? जाऊदेत बेल वाजवतील आणि निघून जातील." श्री वैतागून म्हणाला.
पुन्हा बेल वाजल्यावर जान्हवी म्हणाली,
"मला सोडा आता. कोण आलंय? ते बघते."
जान्हवीने दरवाजा उघडला.
"सरप्राईज!" असं म्हणत तिची आई घरात आली. समोर उभ्या असलेल्या श्रीकडे बघून तिची आई शॉक झाली. जान्हवी व श्री दोघेही जरा गडबडले होते.
"जान्हवी हा काय प्रकार आहे? यावेळी हे इथे काय करत आहेत? निदान जनाची नाही तर मनाची बाळगा. मी इथे तुला सरप्राईज देण्यासाठी आले होते आणि तुम्हाला दोघांना या अवस्थेत बघून मीच सरप्राईज झाले." जान्हवीची आई रागाने म्हणाली.
"आई तू समजते तसं काही नाहीये. तुझा काहीतरी गैरसमज होतो आहे." जान्हवी म्हणाली.
"माझा काही गैरसमज होत नाहीये. जान्हवी मी तुला या माणसापासून दूर रहायला सांगितलं होतं. हे लोकं समाजसेवा करतात, पण घरातील स्त्री सोबत प्रतारणाही करतात." जान्हवीची आई म्हणाली.
यावर श्री म्हणाला,
"आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही दोघे लग्न करणार आहोत. मी काही वेळापूर्वी इथे आलो होतो. प्लिज तुम्ही आमच्या घराबद्दल काही बोलू नका. जान्हवी मला तुमच्या पेक्षा जास्त ओळखते. तुम्ही जान्हवीच्या आई आहात, म्हणून मी जास्त काही बोलत नाहीये. मी हात जोडून विनंती करतो की, माझ्या व जान्हवीच्या मध्ये येऊ नका."
"ठीक आहे. आपण तिघे आत्ताच्या आत्ता तुमच्या घरी जाऊयात. तुमच्या घरातील लोकांना त्यांच्या मुलाचा पराक्रम समजला पाहिजे. तुम्ही लग्न करणार आहात, हे त्यांनाही समजलं पाहिजे ना. जान्हवी कपडे बदलून ये. तुला मी या अवतारात तिकडे घेऊन जाऊ शकणार नाही." जान्हवीच्या आईने सांगितले.
जान्हवीच्या आईचा गैरसमज होऊ नये, म्हणून श्री त्यांना आपल्या घरी घेऊन जाण्यास तयार झाला. श्री, जान्हवी व तिची आई तिघे एकत्र एका गाडीत बसून श्रीच्या घरी गेले. जान्हवी घाबरलेली होती. आता कुठे जाऊन जान्हवीने श्रीवर प्रेम आहे हे मान्य केले होते, त्यात तिच्या आईने अचानक येऊन गोंधळ घातला होता.
घरी गेल्यावर जान्हवीच्या आईने श्रीच्या घरातील सर्वांना एकत्र करुन झालेला प्रकार सांगितला. मग श्रीने खरं काय घडलं होतं? ते सांगितलं. सगळं ऐकून घेतल्यावर आईआजी म्हणाली,
"श्री मला ज्या गोष्टीची भीती होती, तेच झालं. तू जेव्हाही जान्हवीला मदत केल्याचे सांगायचा, तेव्हा तुझ्या मनात तिच्याबद्दल काहीतरी आहे, हे मला जाणवत होते. श्री एकटी मुलगी राहत असताना पहाटेच्या वेळी तिच्या घरी जाणे अयोग्य आहे, हेही तुला समजले नाही का? तू एका संस्कारी घरातील मुलगा आहे, असं तू कसं वागू शकतोस.
श्री आयुष्य हे प्रॅक्टिकल विचार करुन वागायचं असतं. प्रेम हे शेवट पर्यंत टिकत नाही. मला तुमच्या दोघांचं लग्न मान्य नाहीये. जान्हवी ही आपल्या तोलामोलाच्या घरातील नाहीये."
श्री चिडून म्हणाला,
"आईआजी आपल्या तोलामोलाच्या घरातील मुली कश्या असतात, ते मी बघितलं आहे. जान्हवी सोबत लग्न करण्याचा निर्णय घेताना मी प्रॅक्टिकल विचार केला आहे. आईआजी आई व डॅड मध्ये दुरावा का आला? कारण डॅड सतत कामात गुंतलेले असायचे. आईला त्यातील काहीच कळत नसल्याने तिला त्यांचं टेन्शन कधी कळालंच नाही. साहजिकच दोघांमध्ये भावनिक दुरावा निर्माण झाला. त्याही वेळी तू फक्त कंपनीचा विचार केला. आईआजी माणसाला जगण्यासाठी जेवढा पैसा आवश्यक असतो, त्यापेक्षा जास्त भावनिक व मानसिक रित्या माणूस आनंदी असणं आवश्यक आहे.
खरंतर मी तुला समजावून सांगू शकत नाही. काही दिवसांनी तुला माझं म्हणणं कळेल. मी जान्हवी सोबतचं लग्न करणार आहे, त्यात तुझी मर्जी असो किंवा नसो. ( रामकडे बघून) डॅड तुम्ही केलेल्या पराक्रमाचा शिक्का माझ्यावर बसला आहे. जान्हवीच्या आईच्या मते देशमुखांच्या घरातील पुरुष आपल्या बायकोसोबत प्रतारणा करतात आणि त्यामुळे त्यांनी जान्हवीला माझ्यापासून दूर रहायला सांगितले होते."
यावर राम हात जोडून म्हणाला,
"नंदाताई श्री असा नाहीये. माझ्या कृत्याची शिक्षा माझ्या मुलाला देऊ नका. त्याचं जान्हवीवर खरंच खूप प्रेम आहे. जान्हवी ह्या घरात कधीच दुःखी राहणार नाही. प्लिज जान्हवी व श्रीच्या लग्नाला होकार द्या. तुम्ही नेहमी मला म्हणायच्या की, तुम्ही केलेल्या उपकारांची परतफेड मी कशी करु?
माझ्या श्रीला तुमची जान्हवी देऊन परतफेड करा."
"यशोमती मॅडमचा या लग्नाला तर नकार आहे. जान्हवी त्यांना पसंत नाहीये, तर या गोष्टीचा जान्हवीला त्रास होऊ शकेल." जान्हवीची आई म्हणाली.
इतक्या वेळ शांत बसलेली जानकी म्हणाली,
"नंदाताई मी श्रीची आई आहे. मी तुम्हाला शब्द देते की, जान्हवीला या घरात कोणताही त्रास होणार नाही. आईंच्या नकाराचा विचार करु नका. त्या आत्ता जरी नाही म्हटल्या तरी त्या जान्हवीला नातसुनेचं प्रेम देतील."
"आई मला ना आता ही चर्चा सहन होत नाहीये. मी माझ्या रुममध्ये चाललो आहे." एवढं बोलून श्री त्याच्या रुममध्ये निघून गेला.
"जान्हवी बाळा श्रीला तुझी गरज आहे, तो डिस्टर्ब झाला आहे. जाऊन त्याच्याशी बोल. गेल्या काही दिवसांपासून बिचाऱ्याला खूप मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. चिऊ जान्हवीला श्रीची रुम दाखव. तुम्ही बोला, तोपर्यंत मी तुझ्या आईसोबत लग्नाचं प्लॅनिंग करते."
सृष्टी जान्हवीला श्रीच्या रुममकडे घेऊन गेली. जानकी स्वतःच्या मनानेच निर्णय घेत आहे, हे बघून आईआजी चिडून तिच्या रुममध्ये निघून गेली.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा