Login

राणी मी राजाची भाग ५० (अंतिम)

गोष्ट राजा राणीची

राणी मी राजाची भाग ५० (अंतिम)


मागील भागाचा सारांश: श्री सकाळी सहाच्या दरम्यान जान्हवीच्या घरी गेला होता. जान्हवीने तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. जान्हवी श्रीच्या मिठीत असताना दरवाजावरील बेल वाजली. जान्हवीची आई तिला सरप्राईज देण्यासाठी आली होती. श्री व जान्हवीला एकत्र बघून तिला शंका आली. श्रीने त्याला जान्हवी सोबत लग्न करायचे असं तिच्या आईला सांगितलं. तिघेजण श्रीच्या घरी गेला. आईआजीने श्री व जान्हवीच्या लग्नाला नकार दिला. 


आता बघूया पुढे….


जान्हवी श्रीच्या रुममध्ये गेली. श्री बेडवर खाली मान घालून बसला होता. श्रीच्या डोळयात अश्रू होते. जान्हवी त्याच्या जवळ गेली. जान्हवी श्रीचा हातात हात घेऊन म्हणाली,

"श्री आई आपल्या लग्नासाठी तयार झाली आहे. तुमचे डॅड व आईही तयार आहेत. मग तुम्ही नाराज होऊन निघून का आलात?" 


"जान्हवी आता कुठे आपल्यातील प्रेम फुलायला लागलं होतं. आपल्याला तो क्षण एन्जॉय सुद्धा करता आला नाही. हे सगळं अश्या रीतीने मला सर्वांसमोर येऊ द्यायचं नव्हतं. जान्हवी तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस, हे मला तुला जाणवून द्यायचे होते. एकतर आईआजी तिला वाटेल ते बोलून जाते, ती समोरच्याच्या मनाचा अजिबात विचार करत नाही." श्रीने सांगितले.


यावर जान्हवी म्हणाली,

"यशोमती मॅडमची जी प्रतिक्रिया होती, ती नॉर्मल आहे. जी मुलगी कालपर्यंत आपल्या कंपनीत काम करत होती, ती त्यांची नातसून होईल, हे त्यांना लगेच पचू शकणार नाही. आपण ती अपेक्षा त्यांच्या कडून करु शकत नाही. आपलं प्रेम लग्नानंतर अधिक फुलणार आहे. मी तुमच्यासाठी किती स्पेशल आहे, हे तुमच्या डोळ्यातील अश्रूंकडून मला कळलं आहे. आज तुम्ही सर्वांसमोर ठोसपणे आपल्या बद्दल बोललात, हेच माझ्यासाठी खूप आहे. 


माझ्या आईचं बोलणं मनावर घेऊ नका. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही माझ्यासोबत कधीही प्रतारणा करणार नाही, हे मला ठाऊक आहे. आणि समजा तुम्ही तसं काही करण्याचा प्रयत्न केला, तर गाठ माझ्याशी आहे."


श्री डोळयातील पाणी पुसत म्हणाला,

"बरं मॅडम लग्नानंतर ही आपली बेडरुम असणार आहे. काही बदल करायचे असतील, तर आताच सांगून ठेवा."


"चला तुमच्या चेहऱ्यावर थोडे हसू तरी आले. आपली रुम मस्त आहे. सध्या तरी काहीच बदल करायला नको. आता आपण खाली जाऊयात. उगीच बाकीच्यांचा गैरसमज होईल." जान्हवीने सांगितले.


श्री व जान्हवी दोघे खाली गेले. श्रीने घरातील सर्वांसोबत जान्हवीची ओळख करुन दिली. घरातील महिला वर्गाने सगळ्यांसाठी नाश्ता तयार केला. आईआजी सोडता घरातील सर्वच हॉलमध्ये होते. नाश्ता तयार झाल्यावर सर्वजण एकत्रच डायनिंग टेबलवर बसले. 


"चिऊ आईला नाश्ता करण्यासाठी बोलावून आण." लक्ष्मणने सृष्टीला सांगितले.


आईआजी व सृष्टी दोघी खाली आल्या. नाश्ता करायला सुरुवात केल्यावर आईआजी म्हणाली,

"नंदा मी आमच्या गुरुजींना फोन केला होता. पंधरा दिवसांनी एक उत्तम मुहूर्त आहे, त्या दिवशी आपण या दोघांचं लग्न लावून देऊयात. लग्न विधिवत कमी लोकांमध्ये करुयात. रिसेप्शन मात्र जंगी करुयात. देशमुख फुड्सच्या मालकाचं रिसेप्शन सगळ्यांच्या लक्षात राहिलं असंच करावं लागेल. लग्नात जास्त लोकांना निमंत्रित केलं की विधी वेळेवर होत नाहीत. लग्न मोजक्या लोकांमध्येचं करुयात. 


भरत लग्नात व रिसेप्शनला जेवण काय ठेवायचं? हे तू ठरव. लक्ष्मण लॉन्स व पाहुण्यांची यादी तू कर. जानकी, गायत्री व रंजना लग्नात येणाऱ्या सर्वांना आपल्याकडून एकेक भेटवस्तू द्यायची आहे, ते ठरवा. जान्हवीसाठी मंगळसूत्र व अंगठीची खरेदी करावी लागणार आहे.


चिऊ श्री व जान्हवीचे कपडे डिझाईन करुन घेण्याची जबाबदारी तुझी. बाकी मेहंदी, पार्लर माऊ हँडल कर. सगळ्यांनी काम वाटून घेतली की, सगळं कसं पटपट होईल. जान्हवी आता कंपनीत जायचं नाही. लग्नानंतर मालकीण म्हणूनच जायचं. श्री जान्हवी साठी सेपरेट केबिन तयार करुन घे. 


नंदा व जान्हवी तुम्हाला दोघींना तुमच्या कोणत्या नातेवाईकांना बोलवायचं ते ठरवा. जान्हवी तू विचार करत असशील की, बाबा जाऊन काही दिवसचं झालेत, तर मग कसं करायचं म्हणून? तर एक लक्षात ठेव. तुझ्या बाबांना तुझा आनंद महत्त्वाचा आहे. ते जिथे कुठे असतील, तिथे त्यांना आनंदचं होईल."


सगळेजण आईआजीकडे आश्चर्याने बघत होते. 

"आईआजी पहिल्या पासून अशीच आहे. शेवटच्या बॉलला अशी सिक्सर मारते की, सगळेच शॉक होऊन जातात." श्री बोलल्यावर सगळेजण हसायला लागले.


"यशोमती मॅडम मी काही न बोलता तुम्हाला माझ्या मनातील बरोबर कळालं. तुम्हाला जशी नातसून हवी आहे, तशी बनण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. तुमच्या सॉरी आपल्या घरातील संस्कार अबाधित राहतील, असा मी शब्द तुम्हाला देते. माझं काही चुकलं तर मला समजून घ्या." जान्हवी म्हणाली.


यावर आईआजी म्हणाली,

"जान्हवी मला यशोमती मॅडम नाही, तर आईआजी म्हणायचं आणि तुला माझ्यासाठी बदलण्याची गरज नाहीये. तू जशी आहेस तशीच मला आवडते. मला कोणतीही गोष्ट स्विकारायला थोडा वेळ लागतो. आपला नातू लव्ह मॅरेज करतो आहे, हेच पचायला मला वेळ लागला. माझ्या स्वभावाची कल्पना घरातील सगळ्यांना आली आहे. तुलाही हळूहळू माझा स्वभाव कळेल."


दुसऱ्या दिवसापासून देशमुखांच्या घरी लगीनघाई सुरु झाली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदी आनंद होता. नितीन व स्वाती गावावरुन परत आले होते. स्वाती मेहंदी काढण्यात एक्सपर्ट असल्याने श्री व जान्हवीच्या हातावर मेहंदी तिचं काढणार होती. लग्नाच्या कामांमध्ये नितीनही बरीच मदत करत होता. 


एके दिवशी श्रीने जान्हवीला भेटण्यासाठी बाहेर बोलावून घेतले. श्री जान्हवीला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. श्रीने तिथे एक टेबल आधीच बुक करुन ठेवलेला होता.


"श्री लग्नाची खूप कामं पडली आहेत आणि तुम्ही मला इकडं का बोलावलं?"जान्हवीने विचारले.


श्री म्हणाला,

"लग्नानंतर तर आपण अनेकदा बाहेर जेवायला जाऊचं, पण लग्नाच्या आधीची अशी एखादी आठवण असूदेत ना. मी तुला डेटवर घेऊन आलो आहे असं समज. ह्या लग्नाच्या गोंधळात आपल्याला निवांत बोलता आलं नाही."


"ओके, ही आपली लग्नाआधीची पहिली आणि शेवटची डेट म्हणायची. श्री गोष्टी किती भरभर घडत गेल्या ना. तुम्ही आधी एम्प्लॉई म्हणून कंपनीत आलात, त्यानंतर तुम्ही बॉस आहात हे कळलं. कमी दिवसांच्या ओळखीत सुद्धा तुम्ही खूप ओळखीचे वाटू लागला होतात. माझे बाबा गेल्यावर मला आधार दिलात. माझ्या आईला शोधण्यात तुम्ही मदत केलीत. अचानक येऊन मला प्रपोज केलं. मीही तुम्हाला होकार दिला आणि आपलं आता काही दिवसात लग्न होणार आहे. जान्हवी श्री देशमुख असं नाव होणार." जान्हवी म्हणाली.


यावर श्री म्हणाला,

"मला तर हे सगळं स्वप्नवतचं वाटत आहे. मी तुझ्या प्रेमात पडलो, हेही मला माझ्या बहिणींमुळे कळलं. तुला माझ्या मनातील भावना सांगाव्या की नाही, हा प्रश्न पडला होता. त्याचवेळी डॅडने येऊन सांगितले की, प्रत्येक गोष्ट वेळेवर करायला हवी. एकदा हातातून वेळ गेली की पुन्हा परत येत नाही. तुझ्यावर माझं प्रेम आहे, हे सांगण्याआधी मला घाम फुटला होता. जान्हवी नशिबात ज्या गोष्टी असतात ना त्या घडतात. आपण त्या घडण्याआधी त्यांची आतुरतेने वाट बघत असतो, मात्र त्या जेव्हा घडायच्या असतात तेव्हाच घडतात.


जान्हवी लग्नानंतर जर कधी मी तुला कळत नकळतपणे दुखावलं, तर हक्काने माझा कान पिळ. माझं काही चुकलं तर हक्काने सांग. आपल्यात कितीही भांडण झालं, तरी माझ्याशी अबोला कधीच धरु नकोस आणि माझा हात कधी सोडू नकोस. मला माझ्या प्रत्येक सुख दुःखात तू हवी आहेस."


"इथून पुढील प्रत्येक क्षण मला तुमच्या सोबत जगायचा आहे. मी तुमची साथ कधीच सोडणार नाही." जान्हवीने सांगितले.


श्रीने जान्हवीच्या आवडीचं जेवण ऑर्डर केलं होतं. सगळी अरेंजमेंट जान्हवीची आवड लक्षात घेऊन केलेली होती. जेवण झाल्यावर जान्हवीचे आवडते गाणे लावण्यात आले, त्यावर श्री व जान्हवीने कपल डान्स केला. श्री सारखा जोडीदार आपल्याला मिळाल्याने जान्हवीने देवाचे आभार मानले.


श्री व जान्हवीचे लग्न घरातील वडीलधारी मंडळी व आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत विधिवत पार पडले. रिसेप्शन मात्र जंगी झाले होते. बिजनेसमन व मोठमोठ्या मंडळींनी रिसेप्शनला हजेरी लावली होती. श्री व जान्हवीच्या वैवाहिक जीवनाला प्रारंभ झाला होता.


समाप्त..


आपणा सर्वांना माझी ही कथा कशी वाटली? हे कमेंट करुन नक्की कळवा. ह्या कथेचे पर्व २ वाचायला आवडेल का? हेही कमेंट करुन सांगा.


धन्यवाद. 


©®Dr Supriya Dighe




0

🎭 Series Post

View all