रथयात्रा (Tenali Rama Story In Marathi)

Tenali Rama Story In Marathi
रथयात्रा

रामा स्वतःचं चित्र तिथे पाहून गोंधळला होता. त्याला कोणी ओळखू नये म्हणून शारदा त्याच्याच उपरण्याने त्याचा घाम टीपायचे नाटक करत होती.

“आता स्वतः राजगुरू प्रजेला संबोधित करायला येणार आहेत. लवकर आपली जागा पकडून उभे रहा.” तिथला एक शिपाई म्हणाला.

शारदा आणि रामा पटकन तिथून बाजूला झाले. रामाने स्वतःचं तोंड उपरण्याणे झाकून घेतले होते. एका दुकानाजवळ आल्यावर त्याला तिथे कोळसा दिसला आणि तो तिथेच बसला. शारदा त्याच्या सोबत होतीच. त्याने तिथला कोळसा घेऊन त्या चित्राच्या कागदावर काहीतरी करु लागला.

“हे काय करतोयस रामा?” बंधू म्हणाली.

“जरा गप्प बस ना.” रामा म्हणाला.

“पण मी कुठे काय बोलले?” शारदा म्हणाली.

“अगं तुला नाही. दोन मिनिटं शांत बस.” रामा म्हणाला.

“आता हे कोणाला?” तिने पुन्हा विचारलं.

“हे तुलाच.” रामा म्हणाला.

तोवर पालखीत बसून तथाचार्य येत होता. सगळीकडे महागुरू तथाचार्य यांचा विजय असो असा जयघोष सुरू होता. रामाने त्याचं चित्र संपवलं आणि शारदा डोळे विस्फारून ते पाहत होती. रामाने तिथे तथाचार्यचे चित्र काढले होते. त्याने पटकन जाऊन ते चित्र बुजगावण्यावर चिकटवले आणि उघडपणे गर्दीत जाऊन सामील झाला. राजगुरू बोलण्यासाठी तिथे तात्पुरत्या उभारलेल्या लाकडी फळीवर जाऊन उभा राहिला. धनी आणि मणीने ते चित्र पाहिले.

“त्या पंडित रामा ऐवजी या म्हाताऱ्याचे चित्र इथे कसे आले?” मणी म्हणाला.

ते दोघं त्याला सांगायला जाणारच पण काहीतरी विचार करून ते मागेच उभे राहिले.

राजगुरूने मागे वळून न पाहताच बोलायला सुरुवात केली.

“भक्तजनो! आज मी स्वतः तुमच्याशी बोलायला आलोय. इथे हे जे चित्र लावलं आहे त्या व्यक्तीविषयी अगदी खरं आणि सत्य तुम्हाला समजलं पाहिजे. हा पंडित एकदम धूर्त आणि कपटी आहे. याच्यासारखा दुष्ट कोणी असूच शकत नाही.” तो मागे न बघता फक्त चित्राकडे हात दाखवून बोलत होता.

“हा म्हातारा तर स्वतःलाच बोल लावतोय.” मणी हळूच म्हणाला.

“तोंड बघितलं आहे याचं? दिसतानाच अपशकुनी आहे. याच्या एवढा अपशकुनी तोंड बघितलं आहे कोणाचं? तोंडावरूनच कळतंय किती खालच्या पातळीचा आणि कवडीमोल माणूस आहे हा.”

“बरोबर आहे गुरुजी! तुम्ही आज जे बोलत आहात ते केवळ आणि केवळ सत्यच आहे. याच्या एवढा पाखंडी आणि चिंधी चोर माणूस अजून कोणी असूच शकत नाही.” धनी पुढे होऊन म्हणाला.

“आजवर तुम्ही अश्या माणसातल्या प्राण्याला बघितलं नसेल. चोर आहे हा भक्तो. फरार अपराधी आहे हा. लोकांचे सामान लुबाडणे, पळवणे ही याची कामं! याला शिक्षा झालीच पाहिजे. अशी शिक्षा याला करायची की भविष्यात पण तो कोणती चोरी करणार नाही. हा कुठेही दिसला तरीही याला धरून मारा, कुटा काहीही करा पण पुन्हा याचे चोरी करायचे साहस होता कामा नये.” तो बोलत होता.

सर्व जनता तोंडावर हात ठेवून आश्चर्याने बघत होती.

“अश्या माणसाचं तर तोंड काळं करायला पाहिजे.” मणी म्हणाला.

“हो! असंच झालं पाहिजे. याच्यावर चप्पल फेकून मारल्या पाहिजेत आणि याची सुरुवात आम्हीच करतो.” तो म्हणाला आणि स्वतःची चप्पल काढून मारायला मागे वळला तर स्वतःचे चित्र पाहून त्याचा आ वासला. तो बघतच राहिला. त्याने हातातली चप्पल खाली टाकली.

“हे चित्र तर आमचे आहे.” तो म्हणाला.

धनी मणी देखील एकदा चित्र आणि एकदा राजगुरू कडे बघू लागले. “हो गुरुजी हे तर तुमचे चित्र आहे.” दोघं नाटक करत म्हणाले.

“तो धूर्त पंडित पुन्हा तुमच्या अब्रुवर काळं फासून गेला.” धनी म्हणाला.

“व्वा रामा काय युक्ती लावलीस.” बंधू म्हणाली.

रामा फक्त हसला आणि त्याने तिथून काढता पाय घेतला. राजगुरू अजूनही रागाने ते चित्र बघत होता.

‘एकदा हा पंडित हाती लागला की त्याला दाखवतो आमच्याशी वैर घेतल्याचा परिणाम.’ तो रागात स्वतःशीच म्हणाला.

इथे आता नगरातून राधा कृष्णाची रथयात्रा निघाली होती. हाथी घोडा पालखी जय कनैयालाल की. अश्या जय घोषात पालखी चालली होती. रामाने यात्रेसोबत जाणाऱ्या एका इसमाला विचारले; “ही रथयात्रा कुठे चालली आहे?”

“नगरात नवीन आहात वाटतं. ही यात्रा दरवर्षी राजा कृष्णदेवराय यांच्या महलात जाते तिथे स्वतः राजा कृष्णदेवराय राधा कृष्णाची आरती करतात.” तो म्हणाला.

माहिती घेतल्यावर पुन्हा शारदा आणि रामा त्यात सामील झाले. अचानक रामाला काहीतरी सुचलं आणि तो मागेच राहिला.

“काय झालं रामा?” बंधूने विचारलं.

“काय?” रामा म्हणाला.

“तुझ्या चेहऱ्यावरचं हसूच सांगतंय काहीतरी खिचडी शिजतेय तुझ्या डोक्यात.” बंधू म्हणाली.

“संयम ठेव बंधू! वेळ आली की सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील.” रामा म्हणाला.

एवढ्यात शारदा पुन्हा मागे आली.

“कुठे राहिलात. चला जाऊया ना?” तिने विचारलं.

तोही तिच्या सोबत गेला. मागून राजगुरूची पालखी येत होती. त्याने पालखीतून रामाला पाहिलं आणि कोतवाल आणि त्याच्या शिष्यांना त्याच्या मागावर पाठवलं. रामा त्यांची नजर चुकवून पळत होता पण त्याच्या शिष्यांसमोर तो आलाच. त्याने पटकन गुलाल स्वतःच्या तोंडाला फासून घेतला.

“तुझ्या चेहऱ्यावरचा गुलाल जर काढला तर तू तोच आहेस.” मणी म्हणाला.

“पण मी तो कसा असेल? तुम्ही ज्याला शोधताय तो तिथे गेला. मी इथे तुमच्या समोर आहे म्हणजे मी तो कसा असेन?” रामा म्हणाला.

“हा बरोबर.” मणी म्हणाला.

“कमाल आहे! त्याचा आवाज पण त्या पंडित सारखाच होता.” धनी म्हणाला.

“अरे जाऊदे ना! तो सांगून तर गेला की तो तो नाहीये म्हणून. चल मिळून शोधू.” मणी म्हणाला.

कसंबसं त्या दोघांना मूर्ख बनवून रामा तिथून निसटला. पळत येऊन नेमका तो रजगुरूच्या रथात चढला. प्रसादाची थाळी खाली ठेवताना दोघांच्या डोक्याची टक्कर झाली तेव्हा त्याने त्याला पाहिलं. राजगुरू काही करणार याच्या आतच रामाच्या हातून थाळी निसटली आणि राजगुरूच्या पायावर पडली. त्यातून सावरेपर्यंत रामा तिथून निसटला. पुढे शारदाला घेऊन जाताना त्याने एका दुकानात छान छान पोशाख पाहिले आणि त्याला त्या माणसाचे राजा राधा कृष्णाची आरती करतात हे बोलणं आठवलं आणि काहीतरी सुचलं.
********************************
इथे राजदरबारात राजा आणि त्याच्या दोन राण्यांचे आगमन झाले. सर्व आसनस्थ झाल्यावर काही कलाकार दरबारात आले. रामा आणि शारदा राधा कृष्ण बनून गेले होते. दरबारात पोहोचल्यावर त्यांनी छान नृत्य सादर केले. सर्व दरबारी मंत्रमुग्ध होऊन पाहत होते.

“अद्भुत! अप्रतिम. आजवर आम्ही अनेक रासलीला पाहिल्या पण असे प्रदर्शन पहिल्यांदा पाहिले. खूप सुंदर. शब्द नाहीत आमच्याकडे.” राजा दोघांची आरती करून म्हणाला.

“मी पण खूप राजे पाहिले महाराज पण असं तेज अजून कुठेच नाही पाहिलं. साक्षात देवाचे स्वरूप, साक्षात दैवी प्रकाश, साक्षात तिन्ही लोकांच्या विशालतेचे रूप. जर मी शब्दात माझ्या या भावना मांडू शकलो असतो पण शब्दच सुचत नाहीयेत महाराज. मला कळतच नाहीये मी श्रध्दा, प्रेम आणि समर्पणाची भावना कशी व्यक्त करू!” रामा हात जोडून म्हणाला आणि गुडघ्यावर बसला.

“उठ. कोण आहेस तू?” राजाने त्याला धरून उठवत विचारलं.

“मी तुमच्याच प्रजेचा एक अंश आहे महाराज. नाव पंडित रामाकृष्णा आणि ही माझी धर्मपत्नी शारदा. तुमच्याच राज्यातल्या तेनाली गावातून आलोय.” रामा म्हणाला.

त्याचं बोलणं ऐकल्यावर राजगुरू आणि त्याचे शिष्य आणि कोतवाल एकदम चमकले.

“तेनाली गावातून” राजा म्हणाला.

एवढ्यात राजगुरू ओरडला; “सावधान महाराज! हा तोच चोर आहे मल्लूदेवा ज्याला आपल्या नगरातला सामान्य माणूसही शोधतोय. हा तोच चोर आहे त्याने सगळ्यांचं जगणं मुश्किल केलं आहे.”

“नाही नाही महाराज मी मल्लूदेवा नाही. मी चोर नाहीये. हे सगळं खोटं आहे.” रामा गयावया करत म्हणाला.

“हे खोटं आहे? तू आमची आचार्य तथाचार्यची पालखी चोरण्याचा प्रयत्न नाही केलास? विचारा महाराज आमच्या शिष्यांना! याने त्यांना चक्रावून आमची पालखी चोरण्याचा नीच प्रयत्न केला नव्हता? अरे बोला.” तो धनी मणीकडे बघून म्हणाला.

ते दोघे पुढे आले. “हो महाराज हाच आहे तो कपटी चोर मल्लूदेवा.” धनी म्हणाला.

“एवढंच नाही महाराज याला नगर कोतवालाने रंगे हात चोरीच्या ऐवजासह पकडलं आहे पण हा चलाख तिथूनही पळून गेला.” राजगुरू म्हणाला.

“हो महाराज आणि राजगुरुंचे शिष्य याचे साक्षी आहेत.” नगर कोतवाल म्हणाला.

“हो महाराज. हाच आहे तो पाखंडी चोर.” मणी म्हणाला.

“नाही महाराज हे सर्व खोटं आहे…” रामा बोलत होता पण त्याला अडवत राजगुरू बोलू लागला; “याचं धारिष्ट्य तर बघा महाराज. तुमच्या समोर या महाउत्सवात घुसला आणि तेही कृष्णाच्या वेशात. यासाठी तर त्याला कडक शिक्षा मिळाली पाहिजे महाराज.”

“माझ्याकडे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा दुसरा मार्ग नव्हता महाराज. मी हे सगळं…” रामा बोलत होता पण त्याला तोडून राजा बोलू लागला; “बास! अजूनही एक शब्दही बोलू नकोस. आचार्य तथाचार्यंचा शब्द म्हणजे सत्यच असतो. जर ते म्हणतायत तू चोर आहेस तर त्यांच्या बोलण्यावर संशय घेण्याचा प्रश्नच येत नाही.” राजा रागाने म्हणाला.

रामा एकदम बिथरून बघत होता. शारदा देखील घाबरली होती.

“या अपराध्याला कारावासात टाका. आजीवन कारावासात.” राजा म्हणाला आणि तिथून निघाला.

“महाराज! महाराज!” रामा ओरडत होता पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शिपाई आणि कोतवालने मिळून त्याला धरले आणि घेऊन जाऊ लागले.

“रामा! रामा” शारदा रडत रडत ओरडली.

क्रमशः….

Credit:- Sony SAB Tenali Rama serial.

🎭 Series Post

View all