रत्नजडित नथ (Tenali Rama Story In Marathi)

Tenali Rama Story In Marathi
रत्नजडित नथ

अंधारातून एक दारुडा व्यक्ती हातात दारूची बाटली घेऊन बडबडत येत होता. त्याला बघून त्या तिघांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तो माणूस हातातल्या बाटलीशी बोलत होता हे त्यांच्या लक्षात आले. एका क्षणाला तो तिथेच खाली पडला.

“चला निघूया?” रामा आचार्यला हात जोडून म्हणाला.

त्यानेही होकार दिला आणि ते तिथून निघाले.

आचार्य सौदामिनीच्या घराबाहेर आल्यावर गाणं म्हणू लागला. सौदामिनीने पट्कन येऊन दार उघडले आणि त्याला खेचूनच आत घेतले.

“यापुढे जर तुम्ही येऊन गाणं म्हणालात तर मी दार उघडणार नाही.” ती चिडून म्हणाली.

“पण आपलंच ठरलं आहे ना ते? मी गाणं गाणार म्हणजे तुझी खात्री पटेल मीच आलोय. आपली सांकेतिक भाषा?” आचार्य लाडात येऊन पण हळू आवाजात म्हणाला.

“हो पण तेव्हा मला माहित नव्हतं ना तुम्ही इतके वाईट गाता. तुमचं गाणं ऐकून मलाच भीती वाटते. आणि एवढं हळू बोलायची काही गरज नाही. मी सगळ्या सेवकांना सुट्टी दिली आहे नेहमी सारखी.” सौदामिनी म्हणाली.

“हाय! याच तर अदांवर वेडा आहे हा तथाचार्य!. सौंदर्य आणि बुद्धिमत्ता यांचा संगम अजून कुठे पाहायला मिळेल.” असं म्हणत तो पाठमोऱ्या सौदामिनीला खांद्याला धरत होता पण तिने “व्हा बाजूला. येऊन लगेच सुरू होता. आत चला.” असं म्हणून त्याचा हात झटकला आणि दोघे आत गेले.
*****************************
इथे बाहेर रामा आणि गुंडप्पा सौदामिनीच्या घरात कुठून शिरता येईल हे बघत होते.

“तुला तसं माहित हे सौदामिनीते घल आहे?” गुंडप्पाने विचारलं.

“अख्ख्या विजयनगरला माहित आहे हे घर सौदामिनीचे आहे ते.” रामा म्हणाला.

दारे, खिडक्या बंद होती.

“आता काय करायचं?” रामा म्हणाला.

गुंडप्पा त्याला फक्त हात करून मुख्य दाराजवळ गेला आणि तो दार वाजवणार इतक्यात रामाने त्याला अडवले.

“काय करतोयस तू?” रामा हळूच पण चिडून म्हणाला.

“सलल दालातून आत दाऊया ना.” गुंडप्पा म्हणाला.

“व्वा व्वा! माद्या चोट्या मितीवाल्या मितला! सलल दालातुन जाऊया. अरे इथे आपण चोरी करायला आलोय. तुझ्या वाढदिवसाचे निमंत्रण द्यायला नाही आलो.” रामा चिडून म्हणाला.

त्याने थोडे इकडे तिकडे बघितले आणि बोलू लागला; “एक काम कर तू इथेच उभा राहा मी येतो.”

गुंडप्पा घाबरून जोरात मान हलवत नाही म्हणत होता. रामा त्याची नक्कल करून म्हणाला; “असं काय करतोयस! थांब इथे.” आणि तो तिथून गेला.
******************************
इथे आत आचार्य आणि सौदामिनी सारीपाट खेळत होते. आचार्य तिच्या सौंदर्याचे वर्णन करताना थकत नव्हता.

“किती ते मोहक रुप! ओठ म्हणजे जणू मोतीचुरचे लाडू, डोळे म्हणजे जणू सुगंधित अगरबत्ती, केस म्हणजे जणू धूप.” असे त्याचे वर्णन ऐकून सौदामिनी चिडली.

“तुम्ही माझी प्रशंसा करताय की पूजेचे साहित्य मागताय?” ती म्हणाली.

“प्रिये अगं तू खेळ ना लवकर. एवढा वेळ लावलास तर माझ्या जाण्याची वेळ येईल.” आचार्य म्हणाला.

तशी ती अजूनच चिडली आणि बोलू लागली; “ठीक आहे मग तुम्हीच खेळा. मला खेळायचे नाही.”

“अरे अरे तू तर नाराज झालीस. माफ कर तुझ्या तत्थुला. तुला हवा तेवढा वेळ घे. आम्हाला काही घाई नाही.” आचार्य तिच्याकडे बघत तिची हनुवटी हातात घेऊन म्हणाला.
*********************************
इथे बाहेर रामाने एक शिडी आणली आणि गुंडप्पाला धरायला सांगितली. तो भीतीने एवढा थरथरत होता की रामाला त्या शिडीवर चढता येत नव्हते.

“अरे गुंडप्पे काय झालं?” रामाने विचारलं.

“बिती वातते.” तो म्हणाला.

“भीती वाटल्यावर काय करायचं असं अम्मा सांगते?” रामाने विचारलं.

“बजलंगबलीचं नाव ग्यायच.” तो म्हणाला.

“हा मग आता बजरंगबलीचे नाव घे मी लगेच येतो. नीट धर शिडी.” रामा म्हणाला आणि तो शिडीवर चढून वरच्या मजल्यावरून आत शिरला.

आत शिरल्यावर सगळीकडे बघताना त्याला शिंक आली आणि त्याचा धक्का एका फुलदाणीला लागून ती खाली पडल्याने आवाज झाला. आचार्य तर सौदामिनीकडे बघण्यात व्यस्त होता तिनेच त्याला भानावर आणले.

“हा आवाज कसला होता तत्थू?” ती म्हणाली.

“मांजर.” आचार्य तिच्या वरची नजर न हटवता म्हणाला.

“मांजर असती तर म्याव म्याव आवाज आला नसता का?” ती म्हणाली.

“मुकी असेल.” तो म्हणाला.

“आमच्याकडे काही मांजर वैगरे नाही.” ती म्हणाली.

“मग उंदीर असेल.” आचार्य म्हणाला.

“नाही! उंदीर नाहीयेत म्हणून तर मांजर नाहीये.” ती म्हणाली.

“मांजर आहे म्हणून उंदीर नसतील.” आचार्य अजूनही तिच्यावरची नजर न हटवता म्हणाला.

“सगळी अनुमाने इथेच बसून लावणार का? कसे पुरुष आहात? जा बघून या चोर बिर तर नाही शिरला ना.” ती म्हणाली.

“हा..” आचार्य म्हणाला.

“हा काय जा ना बघा.” जवळ जवळ त्याला ढकलत सौदामिनी म्हणाली.

आचार्य लगेच खोलीतून बाहेर पडला.

रामा एका वेगळ्याच खोलीत गेला होता आणि तिथे त्याला काही चोरी करायला मिळतेय का हे बघत होता. इतक्यात आचार्यचा चालता चालता त्या पडलेल्या फुलदाणीला पाय लागला आणि आवाज झाला. त्याने ती उचलून ठेवली. नेमका तो रामा ज्या खोलीत होता तिथेच आला. पण आधीच त्याचा आवाज ऐकल्याने रामा एका मोठ्या पलंगाखाली लपला. आचार्य नेमका त्याच पलंगावर येऊन बसला आणि पाय हलवू लागला. तो मांजर आहे म्हणून उंदीर नाहीत. उंदीर आहेत म्हणून मांजर नाही असे काहीतरी बडबडत विचार करत होता.

“इथे तर चोर कुठे दिसत नाहीये. मग इथे आहे कोण?” तो म्हणाला.

पाय हलवता हलवता त्याच्या पायातली चप्पल खाली पडली. तो पायाने चाचपून ती शोधत होता. ती काही त्याच्या पायाला लागत नव्हती. त्याने खाली वाकून चप्पल घेऊ नये म्हणून रामाने अलगद ती त्याच्या पायात सरकवली. आचार्यने एक क्षण विचार केला आणि खाली वाकला पण तोवर रामा त्याच्या मागे होता. रामाने त्याला बरोबर चकवा दिला आणि तो हळूच खोलीच्या बाहेर आला. लगेचच आचार्य तिथून निघाला. रामा एका पुतळ्या सारखा हातात मशाल घेऊन एका पुतळ्याच्या बाजूला उभा होता. आचार्य तिथून गेला आणि पुन्हा माघारी वळला तर तिथे एकच पुतळा.

“आत्ता मी इथून गेलो तर दोन पुतळे होते. आता एकच? नक्कीच इथे चोर आहे.” तो म्हणाला.

रामा एका खांबामागे लपला होता आणि त्याने त्याच्या फेट्याने घाम टिपला.

“थोडक्यात वाचलास रामा नाहीतर आत्ता पकडला गेला असतास.” तो म्हणाला.

“तो दुष्ट चोर इथेच असेल.” आचार्य म्हणाला.

रामाला काहीतरी ऐकू आल्या सारखे वाटले म्हणून त्याने वाकून बघितले तर कोणी नव्हते. आचार्यने देखील बघितले पण कोणी नव्हते. असे दोन तीन वेळा झाले आणि दोघांनी एकमेकांना बघितले. आचार्य त्याच्याकडे बघून हसू लागला आणि नंतर त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तो हळू आवाजात “चोर चोर” असं ओरडत त्याला पकडायला धावू लागला. रामा त्याला चकवा देत होता.

“थांब.” आचार्य म्हणाला.

तसा रामा थांबला आणि त्याच्या डोक्यात काहीतरी शिजले.

“तुझं एवढं धाडस की तू राज नर्तकी सौदामिनीच्या घरात घुसलास?” आचार्य म्हणाला.

रामा हळूच हसला आणि पुन्हा पळायचे नाटक करू लागला.

“खबरदार! जर एक पाऊल जरी पुढे टाकलेस तरी आरडा ओरडा करून पूर्ण नगर गोळा करू.” आचार्य म्हणाला.

तसा रामा दोन पावले मागे गेला आणि म्हणाला; “ओरडा! ओरडा. बोलवा संपूर्ण नगराला.”

“आम्ही खरंच ओरडू.” आचार्य घाबरून म्हणाला.

“राहू दे आचार्य. तुमच्याने नाही होणार.” रामा म्हणाला.

“आम्ही संपूर्ण जगाला गोळा करू.” आचार्य पुन्हा म्हणाला.

“तुम्ही करूच शकत नाही.” रामा म्हणाला.

“का? का?” आचार्य घाबरून म्हणाला.

“हात पुढे करा.” रामा म्हणाला.

“का?” तो म्हणाला.

“करा तर खरं.” रामा म्हणाला.

आचार्यने बिचकत हात पुढे केला. रामाने लगेच त्याची खोटी मिशी, मस्सा आणि फेटा काढून त्याच्या हातात दिला.

“तू?” आचार्य चकित होऊन त्याच्या हातातील सर्व खाली टाकून म्हणाला.

“हो. मी, स्वतः, साक्षात तुमचा सेवक पंडित रामाकृष्ण.” रामा हात जोडून म्हणाला.

“ओह! म्हणजे तूच आहेस तो चोर.” आचार्य म्हणाला.

“सध्या तरी…” रामा बोलत होता त्याला तोडत आचार्य म्हणाला; “हळू बोल.”

“सध्या तरी. नाहीतर असं समजा की तुमच्या इच्छेने हा पंडित रामाकृष्ण चोर बनलाच.” रामा हळू आवाजात म्हणाला.

“खूप छान. खूप छान. पुरव्या सहित रंगे हाथ पकडला गेला आहेस. सांग काय चोरलं?” आचार्य म्हणाला.

“अजून तरी काही नाही पण आता तुम्ही भेटलात ना. तुम्हीच माझी मदत करा चोरीत.” रामा म्हणाला.

“आम्ही? आम्ही मदत करू तेही तुझी? शुध्दीत आहेस ना?” आचार्य म्हणाला.

“हो आचार्य. मी आहे शुध्दीत. तुम्हीच माझी मदत करणार. असं ऐकलं आहे राज नर्तकी सौदामिनीला तिची हिरेजडित नथ खूप प्रिय आहे. तुम्हीच तर दिली असेल ती. तर… जरा सांगा तरी कुठे आहे ती?” रामा म्हणाला.

त्याच्या बोलण्याने आचार्य चपापला पण तसे न दाखवता हसून बोलू लागला; “घे घे. आत्ता जी मजा घ्यायची ती घे. पण सकाळी जेव्हा दरबारात तुझं भांड फोडेन आणि शंभर फटाक्यांची शिक्षा मिळवून देईन तेव्हा खरी अद्दल घडेल.”

“ते सगळं ठीक आहे पण जेव्हा सकाळी तुम्ही माझी पोल खोल करत असाल आणि महाराज तुम्हाला विचारतील की मध्यरात्री तुम्ही राज नर्तकी सौदामिनीच्या घरी काय करत होतात तेव्हा काय उत्तर द्याल?” रामा म्हणाला.

“आम्ही… आम्ही सांगू की आम्ही तिथे…” आचार्य घाबरून बोलत होता.

“सत्संग करत होतो.” रामा मध्येच बोलला.

“हा… नाही.. नाही..” आचार्य म्हणाला.

“मग भजन करत होतो.” रामा म्हणाला.

“बिलकुल… नाही.. नाही… आम्ही काय सांगू?” आचार्य विचार करत म्हणाला.

“सावकाश आचार्य. उत्तराचा विचार करायला अजून अर्धी रात्र पडली आहे. तोपर्यंत हे तर सांगा ती रत्नजडीत नथ कुठे ठेवली आहे?” रामा म्हणाला.

आचार्य एकदम हताशपणे रामाला त्या तिजोरी जवळ घेऊन गेला. रामाने कुठेही हात न लावता आचार्य कडूनच ती नथ स्वतःच्या हातात ठेवून घेतली.

“धन्यवाद आचार्य. किती महान आहात तुम्ही. माझं तर मन करतंय तुमच्या गालांचे चुंबन घेऊ.” रामा म्हणाला.

आचार्यने पटकन ती नथ ठेवलेली पेटी गालावर धरली.

“पण त्याच्या आधी एक महत्त्वपूर्ण काम आणखी.” रामा म्हणाला.

“अजून काय?” आचार्यने विचारले.

रामाने समोर असलेल्या भिंतीवर काही ओळी लिहिल्या आणि चोर जे चिन्ह बाकी चोऱ्यांमध्ये सोडून गेला होता ते तिथे लावले आणि निघाला.

“शुभ रात्री आचार्य. येतो.” रामा म्हणाला आणि खिडकीतून गेला.

आचार्य आ वासून बघत होता. इतक्यात सौदामिनी धावत आत आली.

“काय झालं? हे कपाट उघडे का आहे आणि तुम्हाला काय झालं? काही बोलत का नाही? चोर होता का?” ती आचार्य ला हलवून म्हणाली.

“हो.” तो म्हणाला.

तिने लगेच कपाट तपासले आणि त्याला विचारले; “काय चोरीला गेले?”

“तुझी रत्नजडित नथ.” तो ती रिकामी पेटी दाखवून म्हणाला.

ती आरडा ओरडा करू लागली तसे आचार्यने तिचे तोंड दाबले.

“अगं ओरडू नकोस. पूर्ण नगर झोपले आहे. जागेल.” तो म्हणाला.

“म्हणूनच तर ओरडते ना.” ती रडत म्हणाली.

“अगं पण आम्ही काय उत्तर देणार? इतक्या उशिरा तुझ्या घरी आहोत. आमची अब्रु वेशीवर टांगली जाईल. गप्प बस. शांत हो. मला विचार करु दे आता काय करायचं ते.” तो म्हणाला.

दुसऱ्या दिवशी सकाळी दरबारात सौदामिनी राजासमोर बसली होती. तिने रडत रडत काल झालेल्या चोरीची बातमी राजाला सांगितली.

“राज नर्तकी सौदामिनी! तुम्ही कसे सांगू शकता की नथ चोरीला गेली आहे. कदाचित ती हरवली देखील असेल.” महामंत्री म्हणाले.

“चोरीच झाली आहे मंत्री जी. यांना विचारा तेही तिथेच होते.” ती आचार्यकडे हात दाखवून म्हणाली.

“हो तिथेच आहेत महाराज. चोर चोरी करून झाल्यावर जी निशाणी टाकून जातो ती निशाणी, काव्य पंक्ती तिथेच आहेत. यात काहीच शंका नाही ही चोरीही त्याच चोराने केली आहे. आम्ही सांगतोय ना.” आचार्य म्हणाला.

“बास्स महामंत्री! बास्स! तो चोर त्याच्या अपराधाच्या सर्व सीमा पार करून गेलाय. त्याने फक्त आपल्या कायदे व्यवस्थेलाच नाही तर आता आमच्या कृष्णदेवराय यांच्या आत्मसन्मानाला ललकारले आहे. जे काही करायचे असेल ते करा. पूर्ण सेना कामाला लावा, सगळ्या विजयनगरचा कोना अन् कोना शोधा पण आता तो चोर पकडला गेलाच पाहिजे.” राजा म्हणाला.

“जी महाराज.” महामंत्री म्हणाले.

इतक्यात रामा आत येता येता बोलू लागला; “आता त्याची काही आवश्यकता नाही महाराज. कारण मी त्या चोराला व्यवस्थित समजून घेतलं आहे आणि ओळखलं आहे. मी ओळखलं आहे महाराज की, चोर कोण आहे.” तो हात जोडून म्हणाला.

सगळे गोंधळून एकमेकांकडे बघत होते.

“कोण आहे तो चोर?” राजाने विचारलं.

“महाराज तो चोर आत्ता इथेच दरबारात हजर आहे.” रामा म्हणाला.

त्याच्या या वाक्याने सर्व आपापसात कुजबुजत होते आणि गोंधळून गेले होते.

क्रमशः…..

Credit:- Sony SAB Tenali Rama serial.

🎭 Series Post

View all