Login

  रात्रीचे १२ एक रहस्य कथा भाग 6 अंतिम

I am Lawyer by Profession but writer by heart. I used to write articles, poems, stories, letters etc.on social and legal topics. By my writing, I am always in struggle to throw spot light on various social issues which needs discussion.

 अंतिम

                            इन्स्पेटर राणे आपल्या नाईट ड्युटीवर रुजू झाले. काल रवीला अटक करायचं होत; परंतु त्याचाही आता मृत्यू झाला होता. प्रश्नाची उकल होण्याच्या ऐवजी अधिकच गुंतागुंत होऊ लागली होती. इन्स्पेटर राणे विचारात पडले होते. आता जरा वेगळ्या पद्धतीने विचार करण गरजेचं होत. त्यांनी एकूणएक व्यक्तीचा बायोडेटा मागवला होता. सगळे पुरावे हाती लागले होते. हळूहळू सगळं चित्र इन्स्पेटर राणेंच्या डोळ्यासमोर उभं राहू लागलं.

            "पाटील... लवकर गाडी काढा..!" इन्स्पेटर राणे.

            "कुठे जायचं आहे साहेबs...?" कॉन्स्टेबल पाटील

          

             "रोहनच्या घरी...." इन्स्पेटर राणे

            "काय झालं साहेब..." कॉन्स्टेबल पाटील

            "रोहनचा जीव डोक्यात आहे..!" इन्स्पेटर राणे

             "काय...?" कॉन्स्टेबल पाटील     

             "हो आपल्याला त्याला वाचवायला हवं." इन्स्पेटर राणे.

            इन्स्पेटर राणे त्यांच्या टीम सोबत रोहनच्या बंगल्यात हजर झाले.  "रोहन....रोहन..." बंगल्यात गेल्या गेल्या ते रोहनला जोरजोरात आवाज देऊ लागले. पण कोणाचाच काही आवाज येत नव्हता. कमलाताई रूममध्ये बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या. महिला कॉन्स्टेबल त्यांना उठवायचा प्रयत्न करू लागल्या. इन्स्पेटर राणे आणि कॉन्स्टेबल पाटील रोहनला शोधू लागले. अख्खा बंगला शोधला. इन्स्पेटर राणे आणि कॉन्स्टेबल पाटील यांना आगीच्या धुराचा खूप वास येऊ लागला आणि वरच्या मजल्यावर पिवळसर उजेड दिसू लागला. तितक्यात त्यांना मीना तिसऱ्या मजल्यावरून खाली येताना दिसली.

               

                  "मीनाs रोहन कुठे आहे...?" इन्स्पेटर राणे.

                  "हुह्ह....", मीना मिश्किल हसली आणि तिने फक्त वर बोट दाखवलं.

                 आग लागली होती.. सगळा नुसता धूर धूर झाला होता. काहीतरी जळत असल्यासारखं दिसत होत. पण आवाज मात्र येत नव्हता. ती रोहनची बॉडी होती. आग विझवली तरी आता वेळ टळली होती. रोहनचा मृत्यू झाला होता. मीनाला महिला कॉन्स्टेबलने ताब्यात घेतलं होत.

         

               कॉन्स्टेबल पाटील आणि इतर सहकारी फारच आश्चर्य व्यक्त करीत होते. रोहनची बॉडी रुग्णवाहिकेत पाठवून दिली. कमलाताई सुद्धा आता शुद्धीवर आल्या होत्या. राणेंचा संशय मात्र खरा ठरला होता.

               "मीना रोहन कसा गेला?" इन्स्पेटर राणे.

               मीना फक्त एक भुवई वर करून, एका बाजूला तिरके ओठ करून मिश्किल हसत राणेंच्या नजरेला नजर भिडवत राहिली. इतर वेळी सालस, शांत आणि निरागस दिसणारी मीना आज भयावह दिसत होती. एकटक बघणारी... न झुकणारी तिची ती नजर... आज सगळं रहस्य उलगडणार होती. मीनाच्या डोळ्यात सूडाचा भाव झळकत होता. कसलीही चूक न केल्याचा अविर्भाव तिच्या चेहऱ्यावर थांग मांडून बसला होता; आणि एक न कळणारा भलताच आनंद तिच्या ओठांवर गुरमीत हसत होता.

               "मीनाss... मी तुला विचारतोय? रोहनला काय झालं, आग कशी लागली." इन्स्पेटर राणे चिडून बोलत होते.

               मीनाने अजूनही तिचे भाव बदलले नव्हते. राणेंच्या ओरडण्याचा तिच्यावर काहीएक परिणाम होत नव्हता.

                "मीना बऱ्या बोलाने आता सगळं सांग..." इन्स्पेटर राणेंचा बांध आता सुटू लागला होता. त्यांनी महिला कॉन्स्टेबलला इशारा केला, तस तिने खाडकन मीनाच्या थोबाडात एक लगावली.

               "मला माहीत आहे रोहनला तूच मारलंस... का मारलस त्याला तू...?" इन्स्पेटर राणेंचा आवाज आता घुमू लागला होता. राणेंना मीनाकडून उत्तर हवेच  होते.

                "हो...हो...मीच मारलं रोहनला," मीना अजूनही मिश्किल हसत होती. "फक्त रोहनलाच नाही.... समीर आणि रवीचा पण खून केलाय मी; सूड... घेतलाय मी... सूडss ....!" 

                "कसला आणि कशाचा सूड... कोण आहेस तू?"  इन्स्पेटर राणें

                "सीमा... सीमा पवार ... आहे मी..! रीना पवारची लहान बहीण." मीना अजूनही गुर्मितच बोलत होती.

                "रीना पवार...कोण रीना? तिचा इथे काय संबंध?" इन्स्पेटर राणे

                "आहे... संबंध आहे.. तिचाच तर सापळा होता तो." मीना (म्हणजे आत्ताची सीमा) जोरजोरात ओरडू लागली.

                "रीना माझी बहीण.... मोठी बहीण, रीना ताई..." असं म्हणत मीना ढसाढसा रडू लागली. तिचा बांध आता फुटला होता. तरीही ती तावातावात बोलत होती. खूप हुशार आणि देखणी अशी माझी बहीणss. परभणीतून  पुण्यात शिक्षणासाठी आली होती. तिचे कष्ट आणि जिद्द बघून आई-बाबांनाही तिला कधी शिक्षणासाठी थांबवावं वाटलं नाही. तिला CA  होयच होत. तिने मंडलिक सरांचे क्लासेस लावले होते. त्याच क्लासमध्ये रोहन, रवी आणि समीरही होते. रोहनला रीना आवडली होती. तिला पटविण्याचा त्याने खूपदा प्रयत्न केला होता; पण रीनाने त्याला साफ नकार दिला होता. ती एक करिअर ओरिएंटेड मुलगी होती. घरची परिस्थिती फार बेताची होती. स्कॉलशीपच्या जोरावर शिक्षण पूर्ण करीत होती आणि जॉबही करीत होती. CA चा फायनल रिझल्ट आला; आख्या भारतात ती पहिली आली होती. खूप खुश होतो आम्ही सगळे. पुण्यात तिचा सत्कार झाल्यावर गावी येते, असं म्हणाली होती. पण ती गावी आलीच नाही...." मीना (म्हणजे आत्ताची सीमा)  बोलता बोलता एकदमच गप्प झाली. तिचा चेहरा पडला होता.

             "मग.. पुढे काय झालं?" इन्स्पेटर राणे

             "माझं शिक्षण फार नव्हतं... तिला शोधायला आम्ही पुण्यात आलो. रीनाचा खूप शोध घेतला. दुसऱ्याच्या  दारात मजुरी करणारे आई बाप...आणि मी किती अशी ताकद लावणार..? क्लासमध्ये, होस्टेलला, मित्र-मैत्रिणीकडे चौकशी केली. फक्त अभ्यास आणि आपलं काम असं असल्या कारणाने तिला फारसे मित्र-मैत्रिणीही नव्हते. पोलीस केस केलीss. ती पण फक्त मिसिंगचीs. पोलिसांनाही काही मिळालं नाही. तिच्या क्लासमधून तरी मदत मिळेल, अशी आशाही खोटी ठरली होती. त्यांनीही हात वर केले होते. पण मी हार मानली नव्हती. बहिणीला मी शोधणारच..! हा शब्ध आई बापाला दिला होता. तेव्हापासून मी पुण्यातच राहत होते. एका अनाथाश्रमात  सेविका म्हणून कामाला लागले. खूप वेळ गेला;  काहीच  हाती लागत नव्हतं." मीना हताश होऊन बोलत होती.

               "ह्म्म्म...पुढे...." इन्स्पेटर राणे

                "नंतर मला रिनाची मैत्रीण शामला हिच्याबद्दल कळलं. रीना आणि शामला एकाच ठिकाणी पार्ट टाइम जॉब करीत होत्या. रीना बेपत्ता झाल्यापासून शामला कोठे स्थायिक झाली? तिचा पत्ता... कॉन्टॅक्ट नंबर.. काहीच मिळत नव्हता. आणि अचानक एके दिवशी मला माहिती आली की, शामला जालनाला आहे आणि तिकडेच स्थायिक झाली आहे. ती पुन्हा कधीच पुण्यात आली नव्हती." मीना

             "मग तू काय केलंस पुढे?" इन्स्पेटर राणे

              "मी आणि माझे वडील शामलाला भेटायला जालनाला गेलो. तिचे वडील तिला मला भेटूच देत नव्हते. गेल्या कित्येक वर्षापासून ती खोलीतून बाहेरच आली नव्हती. ती कायम घाबरलेली राहायची. मधेच आग... आग... असं म्हणून आरडाओरडा करायची. तिची अवस्था खूपच वाईट झाली होती. झाल्या प्रकाराबद्दल तिच्या वडिलांना सगळी कल्पना होती. तरीही ते बोलायला तयार नव्हते. शेवटी मात्र, एका बापाचं काळीज एक बापचं ओळखू शकतो कदाचित म्हणून जेव्हा माझ्या वडिलांनी त्यांना विचारणा केली तेव्हा ते बोलू लागले.  त्यांनी सारा प्रकार आम्हाला सांगितला, "त्या रात्री रीना खूप खुश होती. रीना आणि शामला दोघी जेवायला बाहेर गेल्या होत्या. जेवण झाल्यावर रीना गावी जायला निघणार होती. जेवणानंतर हॉटेलपासून थोड्या अंतरावर त्या चालत रिक्षासाठी निघाल्या होत्या. त्यांच्याजवळ एक कार आली; त्या दोघीना जबरदस्तीने ते तिघे घेऊन गेले. खूप हातापायी झाली पण सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. रोहनच्या बंगल्याचं काम चालू होत. सुनसान अशी ती जागा होती. रीना रोहनला हवी होती. पण रीनाला तो नको होता, तो एक बिघडलेला मुलगा होता. रोहन ऐकायला तयार नव्हता. रिनाने रोहनला उलटून मारलं. रोहनचा ताबा सुटला होता. रोहनने रीनाचा जबरदस्तीने फायदा घेतला. रवी आणि समीरने शामलाला वरच्या मजल्यावर नेऊन तिचाही फायदा घेतला. रीना खूप धीट मुलगी होती. इतका अत्याचार होऊनही ती रोहनचा विरोध करतच होती. रोहन पुरता चिडला; तो भानावर नव्हता. शेवटी त्याने रीनाला जाळून मारलं. रवी आणि समीर पुरते गांगरून गेले होते. इतका भयावह प्रकार रोहनने केला होता. तरीही त्यांनी त्याची साथ दिली. रिनाची बॉडी तिथेच रोहन पुरणार होता. शामला गयावया करीत पण तिलाही ते सोडणार नव्हते. योगायोगाने रोहनचे वडील साईटवर त्यांचा फोन विसरून राहिल्याने आले होते. समोर दिसणाऱ्या घटनेची त्यांना फार चीड आली. त्यांनी रोहनला विरोध केला, पण त्या तिघांसमोर त्यांची ताकद कमी पडली. रोहन आणि त्यांच्यात हातापायी झाली, रोहनने एक धारदार वस्तू त्यांच्या डोक्यात मारली.  हे सगळं होत असताना शामला तेथून पळाली. स्वतःच्याच बापाचा खून रोहनने केला होता आणि पडून मेल्याची खोटी अफवा पसरवली होती. रोहन पिसाळल्यासारखा शामलाला शोधत होता. २ दिवसात रोहनने शामला शोधून काढलं. तो जालनात हजर झाला; त्याला कोणतेच पुरावे मागे सोडायचे नव्हते. शामलाला वेडसरपणाचा झटका आला होता. तिची अवस्था बघून आणि मी काही न करण्याची हमी दिल्याने तो निघून गेला. कसातरी शामलाचा जीव बचावला होता. तो सगळा भयावह प्रकार सतत तिच्या डोळ्यासमोर उभा राहायचा. “रीनाचं जे झालं तेच तुमच्या मुलीचं होईल;” या भीतीने मी गप्प राहिलो. आजही ते लोक काय करतील, याचा भरवसा नाही." शामलाचे वडील जे बोलले होते त्याबद्दल मीना सांगत होती.   

              "रोहन आणि त्याच्या साथीदारांना मला शिक्षा द्यायचीच होती म्हणून सगळं केलं मी. मला अजिबात गम नाही. जे केलं ते मी योग्यच केलं." मीना बोलत होती

               "समीरला विष कसं दिलस? आणि काचेवर रवीचे फिंगर प्रिंट्स कसे आले?" इन्स्पेटर राणे

                "हुह्ह... विष मी नाही महादुने टाकलं होत, समीरच्या ग्लासमध्ये.... महादू... माझे वडील. मिळून केलं आम्ही सगळं... मी, माझी आई... आणि माझे वडील. रवी राहत असलेल्या खोलीची काच काढून अगोदरच माझ्या आईने दिली होती. तीच मी बाथरूममध्ये असताना डोक्यात पाडली होती.  माझे वडील आणि आई बंगल्यात वर्षांपूर्वी कामाला लागले. भुताटकीचा सारा प्रकार त्यांनीच केला आणि त्याची अफवाही तेच पसरवीत होते. सगळं ठरल्याप्रमाणे आम्ही करीत होतो.”  मीना

                 "आणि तू रवीला कसं मारलस...?" इन्स्पेटर राणे

                 "महादूने आधीच गिझर लीक केला होता; आणि हो तुम्ही विचारायच्या आधीच सांगते… रोहनला मी माझ्या हातानं जाळून मारलंss…. आजच्या जेवणात केसांचा पुंजका नाही तर गुंगीच औषध टाकलं होत. बेशुद्ध झाल्यावर त्याच्यावर सुराने वार केले. त्याला बांधून, तोंडात बोळा कोंबून, आग लावली आणि माझी सुडेची आग विझवली. त्या दिवशी रात्री १२ ला त्यानं रीनाला जाळून मारलं, अन आज १२ वाजताच त्याचासुद्धा शेवट झाला.

                                       क्षणभर सगळीकडे शांतता पसरली. १२ तर केव्हाच वाजले होते, तरीही घड्याळ वाजलं नव्हतं. ते बंद पडलं होत. त्याचा खेळ आता थांबला होता. इन्स्पेक्टर राणेंनी एक मोठा श्वास घेऊन... सोडला. “काय केलं या पोरीनेs...” असच त्यांना भासलं.

                              "सुडाने तू इतकी पेटली होतीस की तू लावलेल्या आगीत तुझच आयुष्य होरपळून गेलं... पोरी…" इन्स्पेटर राणे

              "त्याची मला फिकीर नाही... एका रीनावर अत्याचार झाला की,  दुसरी मीना पेटून उठेल... हेच या नराधमांना कळायला हवं. एका अबला शक्तीवर हात टाकला तर दुसरी रणरागिणी रणांगणात उतरून तो हात छाटून टाकेल." मीनाच ते रौद्ररूप अगदी पाहण्याजोगी झालं होत. 

             

               "तरीही मीना... आरोपीला शिक्षा देण्याचा हक्क तुला कोणी दिला...? त्यासाठी कायदा होता मीना...?" इन्स्पेटर राणे

               "गरिबाला कुठे असतो साहेब.. कायदाs..?" मीना

               "कायदा सगळ्यांना समान असतो मीना. तू जे केलस ते चुकीचं केलस...? कायदा हातात घ्यायला नको होतस मीना..." इन्स्पेटर राणे.

            

             मीनाला पोलीस घेऊन गेले. तिला पुढच्या परिणामाची पर्वा नव्हती. आज मीनाने आपल्या लाडक्या बहिणीला न्याय मिळवून दिला होता. पण आता मीनाला न्याय मिळेल का? कथा आपली इथेच संपत आहे.

              अन्यायाला वाचा फोडणारी नारी शक्ती आजही जागरूक आहे. कायदा त्यांचे रक्षण करणारच, पण आपण स्वतःही स्वरक्षणासाठी सदैव तत्पर रहा, जागरूक रहा. दुसऱ्या महिलेच्या मदतीला धावून जा. आपल्याही मदतीला असच कोणीतरी धावून येईल. लहानपणी आपण शिकलेलं एकीचे बळ वाढवू. महिलेला म्हणजेच स्वतःलाच मदत करू; त्यात आपल्या दादा, भाऊ, दीर, वडील, काका, मामा, मुलगा इ. यांची मदत घेऊयात.    

                कथा आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि इच्छुक असल्यास कथा नावासहीत शेअर करा. साहित्यचोरी हा कायद्यानं गुन्हा आहे. या काल्पनिक कथेबद्दलचे सर्व हक्क लेखिकेने स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत. आशा आहे कथा तुम्हाला आवडली असेल. तुमचा असलेला प्रतिसाद लेखनाला नवीन उमेदी देतो. कथेत उत्सुकता वाढावी यासाठी बऱ्याच न पटणाऱ्याही गोष्टी टाकल्या गेल्या असाव्या, चूक भूल माफ असावी. खूप खूप आभार.

                              

                       कथा वाचल्याबद्दल धन्यवाद.

0

🎭 Series Post

View all