Login

  रात्रीचे १२ एक रहस्य कथा भाग 2

I am Lawyer by Profession but writer by heart. I used to write mainly articles, poems, stories, letters etc.on social and legal topics. By my writing, I am always in struggle to throw spot light on various social issues which needs discussion with ch

           समीरचा मृत्यू हा अपघात की खून याची उकल अजून झाली नव्हती. आज पाहूया तुमचे उत्तर बरोबर आहे का ते. आता पुढे....

          इन्स्पेक्टर राणेंनी समीरची बॉडी ताब्यात घेतली. पुढील तपासासाठी काचेचे तुकडे, ब्लड  सॅम्पल्स आणि इतरही वस्तू ताब्यात घेतल्या. त्यांनी आता निरोप घेतला. 

         "साहेबs.. आम्हीही येतो सोबत", रोहन.

         "नाही नको आत्ता त्याची गरज नाही, तुम्ही सकाळी या; आणि हो समीरच्या घरच्यांना कळवलं का?" इन्स्पेक्टर राणे.  

         "नाही अजून..., तेच मोठं आव्हान आहे साहेब. काय सांगू न  कसं सांगू त्यांना...?" रोहनला रडू आवरत नव्हतं. 

         "सावरा स्वतःला, कोण असत समीरच्या घरी आणि कोठे असतात ते", इन्स्पेक्टर राणे.

         "नाशिकला असतात त्याचे आई वडील, विवाहित बहीण आहे पुण्यात, मोहन तिचे पती", रोहन. 

        "अच्छा!  बरं...  आम्ही निघतो, काही लागलंच तर कळवितो", इन्स्पेक्टर राणे.

        इन्स्पेक्टर राणे आणि इतर सहकारी पोलीस स्टेशनच्या दिशेने  निघू लागले. 

        "साहेब एक बोलू का?" पाटील कॉन्स्टेबल.

        "बोला की पाटील", इन्स्पेक्टर राणे 

         "मला नाही वाटत केसमध्ये काही धागेदोरे सापडतील!", पाटील 

         "का असं का वाटत तुम्हाला", इन्स्पेक्टर राणे 

         "अहो साहेब, मी या बंगल्याच्या दोन गल्ल्या सोडून मागे राहतो. काहीतरी भुताटकीच्या प्रकार आहे बंगल्यात!" पाटील. 

         "हम्म.." मिश्किल हसत राणे. "बरं मग?," इन्स्पेक्टर राणे 

         "नाही पण साहेब खरंय हे, कोण नोकर माणसं पण टिकत नाही म्हणे बंगल्यात. काही ना काही होत असत बंगल्यात. किस्से ऐकायला येतात बरेच", पाटील.
   
        "मी तर म्हणतो, हा अपघात १००% भुताटकीच आहे'', पाटील 

        "अहो पाटील, आपल्या सारख्या माणसांनी इतकं तडकाफडकी अनुमान नसत काढायचं", इन्स्पेक्टर राणे.

        "काही चुकलं का साहेब, सॉरी सॉरी..., जे ऐकून होतो ते बोललो", पाटील 

        "तसं नाही पाटील, आपण पोलीस माणसं, कायद्याचे जाणकार, सगळ्या गोष्टी कायद्यानेच पाहिल्या पाहिजे ना?," "आणि हा काही अपघात नाही; हा खूनच आहे'',इन्स्पेक्टर राणे.

        "कशावरून साहेब?" पाटील.

        "समजेल लवकरच", इन्स्पेक्टर राणे. 

       

         इकडे रोहनच्या घरी, उरलेसुरले पाहुणेही निघून गेले. वातावरण जरी मावळ असलं तरी रोहनच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं  होत. झाल्या प्रकरणात रात्र तर केव्हाच उलटून गेली होती. मीना कशीबशी सावरली होती. कमलाताई, रोहनची आई मीनाला त्यांच्या खोलीत झोपायला घेऊन गेल्या. रोहन आणि रवी हॉल मध्ये होते. काय बोलावं तेच समजत नव्हतं. 

     "रोहन अरे समीरच्या घरी कळवायला हवं", रवी.

     "माझं नाही रे धाडस होणार, तूच सांग ना. किती विश्वास आहे अरे काका काकूंचा माझ्यावर, नेहमी म्हणायचे हा रोहन अगदी लहान भावासारखा जपतो समीरला", रोहन ढसाढसा रडू लागला. 

     "रोहन सावर रे स्वतःला. मी करतो फोन नाशिकला", रवी.

     रवी (फोनवर बोलून झाल्यावर) : "समीर झालंय माझं बोलणं. सकाळपर्यंत पोहचतील सगळे. त्यांना फक्त तात्काळ बोलवून घेतलय आणि समीरच्या दाजीला (मोहन) सगळी कल्पना दिली आहे मी. आपल्यालाही मोहनच्या घरी सकाळी जावं लागेल, आणि तूही जरा शांत पड आता". 

     "हम्म ....", रोहन.

      *तितक्यात समीर धावत पळत आरडा ओरडा करीत रोहनच्या बंगल्यात घुसला. घाबरलेला समीर ओरडू लागला, "रोहनss अरे रोssहन मला वाचव. ती आली.... ती आली..... ती परत आली. ती माझा जीव घेईल आणि तुझाही, रोहन मला वाचव ती आपल्या तिघांनाही संपवणार. अरे ती बघ, ती बघsss, आलीss अरे आली".  

      रोहन: "अरेsss कोण आलं...काय झालं...?"  

      घाबरलेला समीर ओरडत होता, "मला वाचव... मला वाचव.. आsss आई.. मेलोsss.....!!!  समीरच्या मागून येणाऱ्या बाईने समीरवर " सपा ...सप...." वार केले आणि ती रोहनच्या दिशेने धावून आली. रोहनच्या गळ्यावर  सुरा लावला. लालभडक डोळ्यांची एक क्रूर नजर तिनं रोहनवर टाकली आणि म्हणाली आज माझा बदला पूर्ण होणार आणि गळ्यावरून सर्रकन  सुरा ओढला.* 
 
       "नाही नको...मला नको मारुस..!" रोहन ओरडू लागला. तसा तो खडबडून जागा झाला.

       "अरे रोहन, काय झालं...का ओरडतोयस तू. इथे कोणी नाही मारायला तुला. इकडे माझ्याकडे बघ, मी रवी, का इतका घाबरलाय मित्रा तू? काय वाईट स्वप्न पाहिलस काss? : रवी चिंतेने विचारात होता. 

        "मला झोप लागली होती का आपण बोलता बोलता..?" रोहनने चौकशी केली. 

        "हो..आणि तू झोपेतच ओरडत होतास मला नको मारू असं काहीतरी!", रवी.

        "अरे समीर आला, असं स्वप्न पडलं मला". रोहन 

        "किती रे त्रास करून घेतोस. सावर स्वतःला. तूच असा धीर सोडल्यास तर समीरच्या आई बाबांना कोण धीर देणार?": रवी.

        "हम्म..." रोहन.

         "जा आवरून घे, पहाट झाली केव्हाची, आपल्याला जायचंय इन्स्पेक्टर राणेंकडे". रवी 

         "मला पहाटे पडलं स्वप्न. हे सगळं खरं तर नाही न होणार....?" रोहन स्वतःशीस  पुटपुटला. 

         "अगं आई तू आराम करायचा होतास जरा. का उठलीस तू?" : रोहन

         "नाही रे बाळ, काल एक लेकरू गमावलं. कसा लागलं अरे डोळ्याला डोळा. समीरचे आई बाबा कुठपर्यंत आलेत?, कमलाताई. 

         "पोहोचतील इतक्यात, तिकडेच निघूया आपणही आता पण त्याआधी मी आणि रवी पोलीस स्टेशनला जाऊन येतो. तू  आणि मीना तयार रहा", रोहन
  
          "मीना कुठे आहे. कशी आहे ती आता": रोहन  

          "आहे खोलीत, येईल इतक्यात. हे बघ आलीच", कमलाताई  मीनाकडे पाहून म्हणाल्या. 
   
          "मी आलोच", रोहन खोलीत आवरण्यासाठी गेला.

           रात्र सरली होती. नवीन सुरुवात झाली होती. लगीन घर होत, पण घरात मात्र भयाण शांतता पसरली होती. कालची ती माजलेली रात्र निघून गेली होती. पण पुन्हा पुन्हा ती रात्र हाच इशारा देत होती मी पुन्हा येणार आहे. ती रात्र तिची  काळी सावली सोडून गेली होती. कोणीच काही बोलत नव्हतं. एकमेकाकडे नजर टाकून परत आपापली काम करीत होते. तेवढ्यात.....
 

          "आई...मेलो ..मेलो...आsss...ईsss...!" रोहनच्या ओरडण्याचा आवाज झाला. 

          मीना आणि रवी धावतच रोहनच्या खोलीत गेले.         

          "अहो..अहो...! कुठे आहात..." मीना घाबरून ओरडू लागली.

          रोहन बाथरूममध्ये पडला होता. त्याच्या डोक्यातून रक्त येत होत. कसाबसा तो उठत होता. रोहनला चक्कर येऊ लागली होती. मीनाने रोहनला बाहेर आणलं आणि बेडवर बसवलं.  

          "अहो काय झालं.. किती रक्त येतंय... अरे देवा..!", "आई अहो लवकर या." मीना 

          "अगं घाबरू नकोस मीना थोडच लागलय मला, पाय घसरला गं." रोहन 

          "अरे थोडं काय बरंच लागलेले दिसतंय रे", मीना आणि रवीच्या मागोमाग आलेल्या कमलाताई म्हणाल्या. 

          "आई अगं नको काळजी वाटून घेऊस. फार नाही जखम झाली, सावरलं मी मला. थोडक्यात निभावलं नाहीतर आज काही खरं नव्हतं, समीरसारखं मी पण आज...!", रोहन.

          "ए.... काही काय बोलतो रे गप्प रहा.'' रवी ओरडला.
     
           "आपण डॉक्टरांकडे जाउ", मीना. 

           "नाही, त्याची गरज नाही. फार थोडं आहे हे, मी ठीक आहे. मीना, कपाटात औषधांचा बॉक्स आहे घेतेस का जरा?" रोहन     
 
           "रोहन तू जरा आराम कर मी एकटाच जाऊन येतो स्टेशनला येऊन, मग तुम्हा सगळ्यांना घ्यायला येतो, आपण सोबत जाऊ मोहनकडे", रवी  

           "बरं..", रोहन. रवी निघाला.

           "मीही निघते, बाकी आवरून घेते". कमलाताईही रवीच्या मागोमाग निघाल्या. 

           "फार दुखतंय का हो" मीनाने रडवेल तोंड केलं होत.

           "नाही गss नको उगाच काळजी करुस. तू जा आईला मदत कर. मी येतो खाली थोडा वेळातच," रोहन.
 
           "बरंss आराम करा मी जाते". मीना गेली. 
 
           काय चाललं होत घरात काही कळायला मार्ग नव्हता. रोहनच  डोकं तर बंदच पडलं होतं. डोकं जाम  दुखू लागलं होत. त्यानं दोन्ही हातात डोकं घट्ट दाबून धरलं होत आणि डोळे बंद केले होते.  तितक्यात...
   
           "रवी ..... रवीsss बाजूला हो....! रवी वाचव स्वतःलाsss" आईचा आवाज ऐकून रोहनला धडकीच भरली. आता अजून काय पहायला मिळणार होत देव जाणो.. 

           रोहनचे डोकं दुखत होत, तो तसाच उठून खाली जाऊ लागला. "आई अगं काय झालं....आई कुठे आहेस तू. रवी अरे रवी...." हॉल मध्ये तर कोणीच दिसत नव्हतं. आता रवीला काय झालं नसेल ना? तो बरा असेल का? आई का अशी ओरडत होती? एक ना अनेक प्रश्नांनी रोहनचे पाय थरथरू लागले होते.

                          
          आजचा भाग जरी इथे संपला असला तरी तुमचा प्रश्न मात्र सुरु झाला आहे. काय झालं असेल रवीला रवीच्या जीवाला काय बरं वाईट तर झालं नसेल ना? आता रोहनला अजून एक मित्र गमवावा लागणार का? पाहुयात सगळ्या प्रश्नाची उत्तरे पुढील भागात. 


साहित्यचोरी हा कायद्यानं गुन्हा आहे. कथा आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका. 

0

🎭 Series Post

View all