रवीला नेमकं काय झालं होत? आवाज तर फक्त आईचाच येत होता. रवी कुठे होता? पाहुयात सगळ्या प्रश्नांची उत्तरे पुढे...
रोहनने हॉलमध्ये सगळीकडे नजर टाकली. तो खाली आला. किचनमध्ये गेला घरात कोणीच नव्हतं. त्यानं बंगल्याच्या बाहेर दारात डोकावलं आणि सुटकेचा नि:श्वास सोडला. रवी दारात बसला होता. कमलाताई एकदा रवीला आणि एकदा आजूबाजूला पाहत होत्या.
"आई अगं का ओरडलीस तू? काय झालं? अगं मी किती घाबरलो...!" रोहन जड आवाजाने बोलत होता.
"अरे मी निघालो होतो. बूट घालीत होतो. वरून विजेची तार तुटून खाली पडली. थोडक्यात बचावलो. काकूंनी पाहिलं नाहीतर...?" रवीचा श्वास अजूनही जोरजोरात चालू होता. छाती धडधडत होती.
"काय..! अशी कशी तुटली? तू ठीक आहेस ना?" रोहन काळजीनं विचारत होता.
"हो, मी ठीक आहे." रवी आता सावका झाला होता.
"काही नाही रे, निव्वळ योगायोग होता. मी येतो जाऊन स्टेशनला." रवी
"नाही थांब दोघे जाऊ सोबत. मी पण बरा आहे आता." रोहनने रवीला विनवणी केली.
"आई आम्ही आलोच जाऊन", रोहन.
रोहन आणि रवी पोलीस स्टेशनला पोहोचले.
"या या रोहनराव, तुमचीच वाट पाहत होतो. ९ वाजता चार्ज बदलतो. बरं झालं लवकर आलात." इन्स्पेटर राणे
"साहेब, का बोलवलं होत? काही भलतीच भानगड तर नाही ना?" रोहन.
"भानगडss... खून झालाय घरात तुमच्या?" इन्स्पेटर राणे
"काय खून...?" रोहन आश्चर्यचकित होऊन विचारत होता.
"इतकं नवल काय वाटायचं कारण?" इन्स्पेटर राणे.
"खून केलाय, तोही जवळच्या व्यक्तीने!" राणे जरा भुवया उडवून रवी आणि रोहनच्या पूर्ण हालचालींवर लक्ष ठेवून सांगत होते.
"ते कसं शक्य आहे साहेब? असं नाही होऊ शकत...!" रोहनला दरदरून घाम फुटला होता.
"समीर आणि तुमचे खूप वाद चालू होते. समीरला त्याचा योग्य तो मोबदला मिळत नव्हता. त्याला वेगळे क्लासेस काढायचे होते आणि तुम्हाला ते नको होत. अत्यंत हुशार असा समीर होता. त्याने वेगळे क्लासेस काढले तर तुमची गोची झाली असती नव्हे तुमचे क्लासेसही बंद पडले असते. आणि हो तुम्ही खूप समजावूनही समीर ऐकत नव्हता. खरं आहे ना हे?. इन्स्पेटर राणे.
"होय साहेब खरंयs.." रोहन आणि रवीची आता दमछाक झाली होती.
"हा आणि म्हणून तुम्ही....." इन्स्पेटर राणे
"नाही साहेब आम्ही काही नाही केलंय. अहो सख्य्या भावासारख जपलं होत मी त्याला. मी असं कसं करेल. कॉलेजपासूनचे मित्र आम्ही. आज १४ वर्षे झाले सोबत राहत होतो. असा विचार सुद्धा करणार नाही साहेब. वाद झाले होते हे खरंय. पण इतक्या टोकाला जाणार नाही. विश्वास ठेवा." रोहन गयावया करीत होता.
"ठीक आहे. ठेवतो विश्वास, तात्पुरता..! पुरावे लवकरच लागतील हाती. मग कळेनच खरा आरोपी कोण ते आणि किती दिवस तो लपतो ते. आणि हो परवानगीशिवाय शहराबाहेर जायचं नाही,'' राणे जरा चिडून आणि आवाज वाढवून बोलत होते.
"साहेब, आम्हाला तर वाटत. जर समीरचा खूनच झाला असेल तर आरोपी लवकरात लवकर सापडावा." रवी
"त्याची काळजी सोडा. आरोपी सापडणारच. काचेचे तुकडे जे जमा केलेत त्यावर बोटांचे ठशे सापडलेत." इन्स्पेटर राणे
"ठशे...! कोणाचे ठशे..?" रोहन
"होय. या आणि आता तुम्ही. आणि हो बोलावलं की यायचं स्टेशनला लगेच." इन्स्पेटर राणे.
"हो साहेब. येतो साहेब." रोहन
"निघुयात आपण", रोहन रवीला म्हणाला. रोहन आणि रवी स्टेशनच्या बाहेर पडतात. गाडीत बसतात.
''काय रे रवी कसल्या विचारात पडलास?" रोहन
" तुला काय वाटत रोहन. राणे साहेब जे बोलत होते त्यांच्या बोलण्यात काही तथ्य असेल का? अरे कोण करेल समीरचा खून? त्याची तर कोणाशीच दुष्मनी नव्हती?" रवी स्तब्ध होऊन बोलत होता. रवी पुरता गार पडला होता.
"काही कळत नाही रे आणि घरात तर सगळी आपलीच माणसं होती. राणे साहेबांना काहीतरी गैरसमज झाला असणार. अरे पोलीस माणसं ती. त्यांना सगळ्या गोष्टी गुन्हागारीतच दिसतात." रोहन रवीला समजावीत होता पण स्वतः मात्र विचारांत गुंतला.
"कदाचित..! असो निघुयात आपण; काकू वाट पाहत असतील." रवी
''हम्म... " रोहन अजूनही विचारातच गुंतला होता. तितक्यात रोहनचा फोन वाजला.
"हॅलो.. हा आई बोल.." रोहन
"अरे बाळा कुठं आहेस? तू लवकर घरी ये." कमलाताई
"आई अगं ५ मिनटात पोहोचतोय. पण तू अशी घाबरलीस का? काय झालं आई? सगळं ठीक आहे ना?
"तू घरी ये आधी, मग बोलते." कमलाताईंनी फोन ठेवला.
"काय रे काय झालं? काय म्हणत होत्या काकू?" रवी
"काही बोलली नाही रे ती, पण नक्कीच काहीतरी भानगड आहे, घाबरलेली वाटली मला ती." रोहन
"हे बघ पोचलो आपण. तू जा, बघ जा काय झालं ते; मी आलो कार लावून." रवी
"आई अगं काय झालं. तू असं घाबरून का केला होतास फोन?" रोहन
"चल तू... बघ इथे..." कमलाताईंनी बागेतल्या झाडाखाली बोट दाखवलं.
"काय हे सगळं? इथं कस आलं हे?" रोहन पाहत होता. काळ्या बाहुलीला खिळे मारून झाडाला रोवलं होत. बाहुलीच्या आजूबाजूला १७ खिळे रोवलेले होते.
"मला तर भीती वाटायला लागली रोहन..., खरंच कोना भुताचा तर वावर नाहीना रे बंगल्यात?" कमलाताई पुरत्या घाबरल्या होत्या.
"ए आईss , अगं काही काय बडबडते तू. असं काही नसत. मी करतो सगळं साफ. तू नको घाबरू. जा तू आत." रोहन
"मला काय वाटत आपण मांत्रिकाला बोलवावं का?" कमलाताई रोहनकडे पाहत बोलत होत्या.
"काही कोणाला बोलवायचं नाही. असल्या गोष्टींवर माझा विश्वास नाही आणि तुही ठेवू नकोस. ढोंगी असतात अगं ते आणि भूत वैगेरे काही नसत गं." रोहन जरा चिडूनच बोलत होता.
"अहो, आई म्हणत आहेत इतकं तर... काय हरकत आहे?" मीना
"मीना अगं तू तरी नको असलं बोलूस? तू कसा असा विचार करू शकतेस?" रोहन
"अहो आपल्या घरावर बाधा आली की ती जाण्यासाठी स्त्री कोणतेही पर्याय करायला तयार असते." मीना रोहनला पूर्णपणे समजावण्याचा प्रयत्न करीत होती.
"तुम्हाला हवं ते करा; मला नाही पडायचं त्यात." रोहन चिडून निघून गेला.
"रवी अरे तू तरी समजून घे आम्हाला." कमलाताई
''काकू बोलतो मी त्याच्याशी; काकू मला मोहनचा फोन येतोय, चला आटपा लवकर. निघायला हवं. पोहोचले वाटत सगळे." रवी
"मीना तू नवी नवरी आहेस बाळ. तू नाही यायचं. आपली ती रीत आहे. खरं तर रोहनने पण नाही आलं पाहिजे पण समीर अगदी घरातलाच होता गं त्यामुळे त्याला जाण भागच आहे." कमलाताई मीनाला बोलत होत्या.
"बर आई.." मीना
"खरं तर जे घडतंय त्यात तुला एकटीला ठेवून जाण्याचं धाडस होत नाही." कमलाताई
"आई नका काळजी करू, जा तुम्ही; आणि मला काय वाटलं तर फोन करेलच की मी. तसही खूप लांब पण नाही मोहन भाऊजींचं घरं." मीना
"मी येईल लगेच. कडू घास काढावा लागलं. त्यासाठी येईल आधी. रोहन थांबेल तिथेच." कमलाताई
"मीना आम्ही येतो. काळजी घे." असं म्हणून कमलाताई, रोहन आणि रवी गाडीत बसले.
रवी पार्किंगमधून कार काढत होता. रवीने रिवर्स गिअर टाकला. तो हळूहळू गाडी मागे घेऊ लागला.
"रवी ब्रेक मार...ब्रेक... ब्रेक... अग आई गं." रोहन ओरडला. तो खाली उतरला. मागोमाग रवीही उतरला.
कारच्या मागच्या चाकाखाली एक मांजरीचं काळ पिल्लू आलं होत. त्यानं अचानकच उडी मारली होती आणि ते गाडीखाली सापडलं होत. त्याचा पुरता चेंदामेंदा झाला होता.
"अरे मी खूप हळू चालवत होतो." रवी
"मेल ते अरे." रोहन
"मीनाss ए मीनाss ... बाहेर ये. हे बघ मांजराचं पिल्लू चुकून गाडी खाली आलं होत. आपल्याकडे महादू आणि त्याची बायको दुपारी तासभर साफसफाईला येतात त्यांच्याकडून करून घे साफ आणि पिल्लू टाक बाहेर" रोहन ने मीनाला सुनावलं आणि तो निघाला.
"अग आई गं..." मीना त्या मांजराच्या पिल्लाकडे बघतच राहिली. "असं कस आलं हे गाडीखाली आणि इतकं कस दिसलं नाही याना हे." ती स्वतःशीस पुट्पुट करीत होती.
मीना एकटीच घरी होती. महादू आणि त्याची बायको काम करून लागले.
"ताई या मांजराच्या पिल्लाचं काय करायचं." महादू
"महादू त्याला आपण बागेच्या मागच्या आवारात गाडू आणि हो आई नाहीत घरात आज. त्या येईपर्यंत तुमच्या बायकोला जरा माझ्या सोबतीला थांबू द्या." तुम्ही तिला घ्यायला याला तेव्हा थोडा खड्डा खोदून द्या मला तेवढा त्या पिल्लासाठी." मीना बोलत होती.
दुपारची वेळ झाली होती. कमलाताई आल्या मोहनच्या घरी कडू घासच जेवण पाठवायचं होत.
डबा घेऊन त्या लागलीच निघाल्या.
मोहनच्या घरी सगळ्या विधी पार पडल्या होत्या. इतका वेळ थैमान घातलेल्या त्या रडण्याच्या आवाजानं आता अबोला धरला होता. समीरच अचानक जाणं..! आणि तो आता नाही..! हा विचार समीरच्या घरच्यांना असह्य करणारा होता. समीरची आई तर शुद्धीतच नव्हती. सगळ्यांच्या मनात दुःख होत तरी ते अश्रुंचा आवंडा गिळून एकमेकांना समजावीत होते, धीर देते होते. कमलाताईंनी आणलेला डबा समीरच्या मावशीकडे दिला. मावशीने डबा उघडला. डबा बघून किचनमध्ये असलेल्या समीरच्या इतर नातेवाईकांची कुजबुज चालू झाली.
"कमलाताई हा काय प्रकार आहे..?" समीरची मावशी कमलाताईंना तिरसटपणे विचारत होती.
"'काय झालं ताई ? हे असं आणतात का तुमच्यात जेवण. अहो झालेल्या प्रकारचं जरा तरी भान ठेवा." समीरची मावशी.
"अहो ताई, पण झालं काय? काही चुकलं का?" कमलताई.
"बघा तुम्हीच...." मावशीनं डबा कमलाताईंसमोर धरला.
"अहो... मला नाही माहीत कस आलं हे...!" कमलाताई घाबरल्या होत्या.
"असं कस माहित नाही...! भला मोठा केसांचा पुंजका वरणात आहे आणि भातात शर्टाची ७ बटन आणि सातू..! नको तो डबा. फेकून द्या; आणि हो चुकून जाण्यासारख्या वस्तू नाहीत या." मावशी बोलत होत्या.
"खरंच सांगते, मी नाही काय टाकलंय. मला नाही माहीत कस आलं हे" कमलाताई.
"ताई तुम्ही या आता प्लीज..! विषय वाढायला नको. बाहेर माणसं आहेत सगळी." मावशी.
कमलाताईंना रडू आवरत नव्हतं. असं कस झालं. याचाच त्या विचार करीत होत्या. त्यांनी आता मनाशी पक्क केलं होत की मांत्रिकाला आता बोलवायचच. तोच एक पर्याय आहे. कमलाताई काहीच न बोलता रोहनच्या बाजूला जाऊन उभ्या राहिल्या. तेवढ्यात रवी तिथं आला.
"रोहन अरे तुझा फोन लागत नाही. मीना वाहिनी तुला किती फोन करत होत्या.मला केला शेवटी."
रवी चिंतेने ग्रासलेला होता.
" बापरे १२ मिसकॉल..! अरे फोन सायलेंट मोडवर होता. इतकं काय झालं पण." रोहन
"आपल्याला ताबडतोब निघायला हवं." रवी
"अरे पण झालं काय?" रोहन
"ते सगळं घरी घेल्यावरच कळेन रोहन" रवी.
रोहनच्या बंगल्यात पोलीस आले होते. बंगल्याच्या मागच्या आवारात गर्दी झाली होती. मीनाने पोलीस बोलावले होते. महादू मांजराच्या पिल्लासाठी खोदत असलेल्या खड्यात काहीतरी अनपेक्षित असं सापडलं होत. पोलीस अजून खोलवर खड्डा खोदत होते. रोहन आणि रवीच्या तोंडच पाणी पळालं होत.
"हा सगळं काय प्रकार आहे? काय करताय तुम्ही लोक इथं? रोहन पोलिसांना विचारत होता.
"मागे थांबा. खूप वर्षांपूर्वी पुरलेले प्रेत सापडलय." इन्स्पेटर राणे.
"सगळ्यांना ताब्यात घ्या पाटील." इन्स्पेटर राणे.
सगळ्यांचीच बोलती बंद झाली होती. कोणाचं प्रेत होत ते. प्रेत कसलं आता नुसता सापळा राहिला होता हाडांचाss...! रोहनच्या घरच्यांचा आणि त्या प्रेताचा काय संबंध असेल का? काय वाटत तुम्हाला? लवकर कळवा? थांबा थांबा अजून एक, साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा आहे. कथेबद्दलचे सगळे हक्क लेखिकेने स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत. कथा आवडल्यास नावासहित नक्की शेअर करा. कथा वाचल्याबद्दल खूप खूप आभार.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा