©®विवेक चंद्रकांत.....
1) तो CA आहे. त्याची स्वतःची फर्म आहे. इतरवेळी तो बऱ्यापैकी लवकर घरी येतो. पण tax भरणे रिटर्न भरणे याची मुदत जवळ आली की त्याला रात्री यायला फार उशीर होतो.
अशावेळी तो घरी आला की कपडे बदलून,फ्रेश होऊन अन्न गरम करतो, दोन ताट काढून त्यात वाढून घेतो आणि थकून झोपलेल्या आईला जेवणासाठी उठवतो.
कारण त्याला माहित असते कितीही उशीर झाला तरी आई त्यांच्याशिवाय जेवत नाही... तो अगदी लहान असल्यापासून...
2) तो डॉक्टर आहे. रात्री घरी येण्याची त्याची वेळ निश्चित नाही. कधीकधी खूप उशीर होतो. तो रात्री घरी आला की अर्धवट झोपेत असलेली त्याची बायको चेहऱ्यावर पाणी मारते आणि अन्न गरम करायला घेते दोघांचे.
"अगं तुला आतापर्यंत हजार वेळा सांगितले की कशाला माझी वाट पाहते? वेळच्यावेळी जेवणं करून झोपून जात जा. मी घेऊन घेत जाईल हाताने." तो म्हणतो.
ती नेहमीप्रमाणे हसते आणि म्हणते " उद्यापासून "
त्याला माहिती असते हा उद्या कधीच उगवत नसतो.
3) त्याची फिरस्तीची नोकरीं. मार्केटिंग. त्याला घरी यायला नेहमीच उशीर होतो खूप. वयाची पन्नाशी ओलांडल्यावर
खूप उशिरा खाल्लेलं पचत नाही म्हणून त्याने रात्रीचे जेवणं बंद केले. तेव्हापासून त्याची कोणी वाट पाहत नाही.
खूप उशिरा खाल्लेलं पचत नाही म्हणून त्याने रात्रीचे जेवणं बंद केले. तेव्हापासून त्याची कोणी वाट पाहत नाही.
तरीही रात्री आला की तो फ्रिजमधून दुधाचे भांडे काढतो. त्यातले दूध एका ग्लासमध्ये घेतो. साखर टाकून चमच्याने ढवळून पितो आणि तो उष्टा ग्लास चमच्यासकट सिंकजवळ ठेवून देतो.
कारण त्याला माहिती असते सकाळी तो ग्लास आणि फ्रिजमधले कमी झालेले दूध दिसलें नाही तर त्याची बायको आणि आई त्याला फाडून खातील.
©®विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार.
©®विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा