रायगडाची वाट.

एका अपूर्व सोहळ्याचे साक्षीदार होणाऱ्या सामान्य रयतेची गोष्ट.

सुमारे चारशे वर्षांपूर्वी रायगडावर शिवराज्याभिषेक झाला. तो अपूर्व सोहळा पाहायला त्या काळातील रयत रायगडाची वाट चालत होती. त्या काळातील रयतेची शिवबा राजांवर असलेली अतूट श्रद्धा आणि स्वराज्यासाठी असलेला अभिमान मांडणारी एक काल्पनिक कथा आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त लिहीत आहे. सदर कथा संपूर्ण काल्पनिक असून त्यात कोणतेही ऐतिहासिक सत्य सांगण्याचा दावा नाही.



ताम्हिणी घाटातून जाणारी पायवाट गजबजली होती. ऐन उन्हाळ्यात कोकणात उतरायची कसली गजबज होती याचा अंदाज सगळ्या मवाळ खोऱ्याला आला होता. रायगडावर राज्याभिषेकाची तयारी चालू होती. सगळीकडून रयत रायगडाची वाट चालत होती. घाटाच्या पायथ्याला असलेल्या त्या छोट्याश्या खेडेगावात पावसाळा यायच्या आधीची कामे उरकायची लगबग चालू होती.


लवकर कुणबिकीची कामे आवरून रायगड गाठायचा होता. सगळा गाव त्याच गडबडीत होता. सात महिन्यांची गरोदर तुळसा तिच्या दोन जावा आणि सासूबाई सगळी गडबड बघत होत्या. पाटलांच्या घरातील सगळे पुरुष महाराजांच्या मोहिमेत होते. तिथूनच ते रायगडावर जाणार असा निरोप आला होता.


" आत्या, आता काय करायच? आमासनी रायगडावर जायचं हाय." थोरली पुतळा सासूला विचारीत होती.


" व्हय पोरी,पर आता हित तुळसा आशी अवघडलेली हाय,तिला सोसल व्हय समद?"
कौसाबाई असे म्हणाल्या परंतु त्यांनाही रायगडावर माथा टेकायला जायचे होते.


उजाड झालेल गाव परत वसले आणि पाटीलकी परत आली ती स्वराज्यात याची जाणीव त्या माऊलीला होती.


" आत्या,समदा गाव जाणार हाय. म्या आबासनी निरोप धाडू काय?" धाकटी जना परत म्हणाली.


" जने, तुम्ही दोघी पोरी व्हा फूड. म्या तुळशीला घिऊन हित रहाते." म्हातारी म्हणाली.


" आत्याबाय,आव म्या चालल की हळूहळू. आताशी सातवा लागला हाय. ह्यांनी मला सांगितलं व्हत तुला रायगडावर घिऊन जाईल." तुळसा डोळ्यात पाणी आणून म्हणाली.


म्हातारी कौसा क्षणभर गप्प झाली.


" पोरी,आता पाऊस सुरू व्हईल,कोकणात ह्ये पाऊस येतोय. कसं करायचं त्वा सांग?" तुळसा डोळ्यात आलेले पाणी तसेच थांबवून शांत राहिली.


थोड्या वेळाने ती म्हणाली," पुतळाबाई आन जनीला जाऊ द्या आत्या."


थोरली पुतळा म्हणाली," तुळसा पोटुशी बाईची इच्छा मारू न्हाय."


" बाई,आव तुमचा ल्योक तकड हाय. पंधरा वरीस झाल आन पिराजी बापामाग गेला. तुम्ही जा." तुळसाने समजूत काढली.


शेवटी दोन दिवसांनी बघू असे म्हणून सगळ्या आपापल्या कामाला लागल्या.


" हैबतीकाका रायगडाकड निघायचं नव्हं?" दौलत पाटलांनी विचारले.


" व्हय, उद्याला निगायच." हैबतराव म्हणाले.


दौलत पाटील आनंदाने आपल्या राहुटित परतले. आपल्या तीन मुले आणि एका नातवाला घेऊन गेले चार महिने ते बाहेर होते.


" पिराजी,उद्याला गडाकड कूच करायचं हाय." दौलत पाटील मिशीवर ताव देत म्हणाले.


" आबा पर घराकड जायच नव्ह?" मधला खंडोजी हळूच म्हणाला.


" खंडोजी, तुळसा पोटूशी हाय. पर घराकड गेलो तर गडावरचा सोहळा नाय घावायचा." दौलत पाटील समजावत होते.


" आबा, तुळसाला रायगड बगायच डवाळ लागल व्हत. म्या तिला गडावर ..." खंडोजी गप्प बसला.


" खंडू,आर सातवा लागल तिला आता. बैलगाडीत जायचं झेपल व्हय तिला." थोरला मल्हारी समजावू लागला.


शेवटी बाळ झाल्यावर तुळसाला घेऊन जायचे ठरले. उद्या गडाकडे जायला निघायचे होते. आज दिवसभर छावणी आवराआवर करणार होती. तेवढ्यात बहुरूपी आल्याची बातमी आली. थकले भागले सैनिक तिकडे धावले.



हुमाण घालून सोंग ओळखायला सांगण्याचा खेळ रंगात आला. सगळे हसत असताना खंडोजी दूर उदास बसला होता. थोड्या वेळाने बहुरूपी आपला खेळ संपवून थांबला. त्यातील एक साथीदार खंडोजीजवळ आला.


" पाटील उलिशी तंबाकू मिळलं काय? लई तलफ झाली बघा." त्याने शेजारी बैठक जमवली.


" आर तसल काय खात न्हाय म्या. हाणम्या,आर हिकड ये. उलशी तंबाकू दे पावण्याला." खंडोजी म्हणाला.


" पाटील येक इचारू का?" चंची सोडत बहुरूपी म्हणाला.


" अय छावणी बद्दल इचारतो काय?" खंडोजी चिडला.


" पाटील आव म्या काय हेर नव्ह. तुमि लांब उदास बसून व्हता. कसली चिंता हाय व्हय?" बहुरूपी कान धरत बोलला.


" माझी आस्तुरी पोटूशी हाय." खंडोजी लाजत म्हणाला.


" ग्वाड खबर हाय की मग आस त्वांड पाडून का बसलाय?" त्याने परत विचारले.


"काय सांगू मामा,माझ्या तुळसाला रायगडावर जायचं व्हत. पोटात बाळ असताना फकस्त रायगड दावा म्हणली. पर आता ते काय व्हईल आस वाटत न्हाय." खंडोजी म्हणाला.


" पाटील, खंडेरायाच्या किरपेन समद नीट व्हईल." नंतर नाव गाव विचारून बहुरूपी निघून गेला.


दुसऱ्या दिवशी छावणी हलली. आठ दिवसात रायगड गाठायचा होता.


रायगडावर नुसती धांदल उडाली होती. ज्याला त्याला ह्या मंगल सोहळ्याचा भाग व्हायचे होते. बारा मावळ खोऱ्यातून रयत येत होती. त्यांच्या राहण्याची चोख व्यवस्था केली जात होती. खुद्द आऊसाहेब याबाबत लक्ष घालत होत्या. इकडे अतिशय वेगाने चार पाच वासुदेव रायगडी पोहोचले. त्यांना दारावर पहारेकऱ्यांनी अडवले.


" कंच गाव म्हणायचं पावण तुमचं?" सैनिक पुढे झाला.


" आर समद जग आमच गाव. कोणत नाव घिऊ?" त्यातील एकजण हसत म्हणाला.


" अय उगा मस्करी करू नग. नाव गाव सांगितलं तरच गडाव जाता यील." सैनिक चिडले.


तेवढ्यात एका सुभेदाराने सैनिकाच्या कानात सांगितलं," आऊसाब म्हणल्यात रयतेला अडवू नगा. ह्यासनी म्या आत घिउन जातो. तकड चवकशी व्हईलच."


शेवटी त्या चारही वासुदेवांना घेऊन तो सुभेदार निघाला आणि समोरच दस्तुरखुद्द तान्हाजी मालुसरे दिसले.


त्यांनी हाक मारली," कुठ निगाली टोळी?"


सगळेजण जागीच थांबले.

" सुभेदार आव टोळी चोरांची आसती. आमी देवाच सेवक."


सुभेदार जवळ चालत आले आणि त्यांनी उत्तर देणाऱ्याला कडकडुन मिठी मारली.


" नाईक वळीखल म्या आज तुमासनी." असे म्हणताच सगळेजण हसू लागले.


" बोला नाईक काय सेवा करू?" सुभेदार म्हणाले.


" एक काम हाय पर हित नग तुमासनी आत जाऊन सांगतो." असे म्हणून सगळेजण आत निघून गेले.


इकडे कौसा म्हातारी पेचात सापडली.


" तूळसा जाणार न्हाय तर आमीबी जात न्हाय." अस दोन्ही सूना म्हणाल्या.


म्हातारी त्यांना विणवत होती पण त्या काही ऐकत नव्हत्या. सगळा गाव वेशीजवळ जमा होऊ लागला. ह्या चारही बायका आणि त्यांचा विश्वासू नोकर बजाजी मात्र घरातच थांबून होते. आपला राजा गादीवर बसणार. एवढा आनंदाचा सोहळा बघता येणार नव्हता. अजून पाच दिवसांनी राजे गादीवर बसणार होते.



खंडोजीला दुरून रायगड दिसू लागला आणि तुळसाची आठवण यायला लागली.


" आबा,अजून पाच दिस हाये. म्या घरी जाऊन तुळसाला आणू का?" खंडोजी म्हणाला.


" खंडू आर आपल्याकड मेणा आसता तर आमी चौघ आलो आसतो. बैलगाडीत पोटूशी पोर एवढ्या लांब न्यायला नग."

दौलत पाटील समजावत म्हणाले. खंडोजी नाईलाज होऊन पुढे चालू लागला.



धाकटी जना बाहेर तुळशीला पाणी घालत होती आणि अचानक एक शाही मेणा दारात थांबला.


" आत्या,आत्या बाहिर या लवकर." कौसाबाई बाहेर आली.


" जने, आस वरडू न्हाई. आता पोरसोर रहायली का तू?" असे म्हणत असताना तिने समोर मेणा पाहिला.


भोई आणि सोबत चार मावळे होते. त्यातील एकजण पुढे झाला.


" आक्का,गडावरून आलोय." त्याने खलिता वाचायला सुरुवात केली.


" कौसाक्का पाटील यांनी बहिर्जी नाईक यांनी पाठवलेला मेण्यातून त्यांच्या गरोदर सुनबाईस घेऊन गडावर यावे. "


असा हुकूम ऐकताच म्हातारीच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या.


" जसं राज तसच त्यांचं शिलेदार. पोरीनो चला बिगिबिगी आवरा." म्हातारीने आवाज दिला.


" आत्याबाय ह्या दादासनी ताट वाढते. दोन घास खाऊन निघू."

मेणा रायगडाची वाट चालू लागला. तुळसा आणि तिचे होणारे बाळ एका अपूर्व सोहळ्याचे साक्षीदार होणार होते.


रायगडावर अभिषेक,मंत्रविधी सुरू झाले. दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणार होता.

" खंडू, कायबी म्हण हे समद बघायला पुतळा, तुळसा,जनी आणि आई पायजे व्हती बघ.". मल्हारी म्हणाला.


" दादा,आता हितली माती घे संग. तेवढ त्यांना दर्शन." दोघे पाठमोरी बोलत होते.


" हे चांगल हाय धनी. तुमि हकड राजांना बघणार आण आमी फक्त मातीच डोयी लावू व्हय."

"तुळसा? " खंडोजी गरकन मागे वळला.


आपली गरोदरपणात चेहऱ्यावर तेज आलेली बायको बघून त्याला नवल वाटले.


" यळकोट यळकोट जय मल्हार. पाटील खंडेराया पावला नव्ह?" मागून चालत येणारा एक रुबाबदार इसम खंडोजीला विचारत होता.


खंडोजी आणि मल्हारी दोघांनी नीट निरखून बघितले.


" दादा आर हा त्योच बहुरूपी हाय नव्ह?" खंडोजी म्हणाला.


" पोरांनो आर मुजरा करा. नाईक हायेत ते." दौलत पाटील लगबगीने म्हणाले.


" पाटील मुजरा करायचा तो राजांना. कौसाक्का,तुमची आणि सगळ्या बहिणींची सोय केली आहे. तुम्हाला निवांत सोहळा बघता येईल."
एवढे बोलून नाईक निघून गेले.


ह्या चारही स्त्रियांनी नाईकांच्या पायाचा ठसा उमटलेली माती कपाळी लावली.


" नुसता राजाचं न्हाय तर त्याची समदी माणसं सोन हायेत." कौसाबाई म्हणाली. सगळेजण एका अपूर्व सोहळ्यासाठी सज्ज झाले.


महाराज जसे रयतेची काळजी घेत तेवढीच काळजी त्यांचे शिलेदारदेखील घेत. राजांच्या मुशीत तयार झालेली माणसे होती ती. सदर कथेतून फक्त रयतेचे प्रेम आणि आदर दाखवायचा प्रयत्न केला आहे. राजांना गादीवर बसलेले बघायला आजही चारशे वर्षांनी देखील रयत रायगडाची वाट चालू लागते. त्यासाठी म्हणावेसे वाटते,


बारामावळ खोऱ्या मधुनी रयत चालली पुढे.
पाय चालती वाट वनाची, नजर रायगडाकडे.


भाकर तुकडा दारी ओवाळून, कुळंबीन म्हातारी बोलते.
शिवबा राजा धन्य लेकरा,नजर इथून काढिते.


कुलीन सगळ्या लेकीसुनांनी तबक सजविले हाती.
शिवबा आमुचा राजा जाहला,नाही कुणाची भीती.


रायगडाच्या भूमीवर तो,जनसागर उसळला
सिंहासनावर पाहून शिवबा,धन्य मावळा झाला.


महाराजांच्या चरणावर दंडवत घालून थांबतो.

©® प्रशांत कुंजीर.