"हो हो.. तिला काही प्रश्न नाहीये... फक्त.." मोठ्या आई सांगता सांगता जराश्या अडखळल्या..
" फक्त काय?"
"फक्त.. म्हणजे मुलगी छानच आहे.. वय ही फारसे नाही.. पण.."
"पण काय मोठी आई.. लंगडी, लुळी आहे का? कारण ती आणि तिच्या घरचे फक्त फोटो पाहून तयार आहेत म्हटल्यावर तिच्या तही काहीतरी कमी असेलच.."
" हं... फोटो पाहून नाही.. त्यांनी पाहिले आहे तुला.. म्हणून तयार झालेत.. आणि तू म्हणतोस तसे व्यंग नाही काही.. पण.. पण मुलीला बोलता येत नाही.."
" म्ह.. म्हणजे?"
" म्हणजे मुकी आहे मुलगी...!"
" काय? मोठी आई.. अग.. अशी मुलगी कस घर सांभाळेल? " अनु ला धक्का बसला हे ऐकून..
"अनु.. बाळा.. ती मुकी आहे, यात तिचा काय दोष? आपल्याला देवाने धड धाकट शरीर दिले त्याचे खूप खूप आभार... पण विचार कर.. जर तिच्या जागी जर आपण असतो तर..?" मोठी आई असं म्हणाल्यावर अनु ने मान खाली घातली.. खरचं तर होत? ती मुकी होती यात तिचा काय दोष? आपल्याला असं छान आयुष्य दिले, आपण दुसऱ्यांना कमी नाही लेखू शकत.. तिचेही काही स्वप्न असतील.. तिलाही वाटतं असेल, नॉर्मल लोकांसारखे जगावे..
"सॉरी मोठी आई..."
"बाळा.. तुझ्यापेक्षा दोन तीन वर्षांनी च मोठी असेल ती.. सुंदर आहे दिसायला.. बघून कोणी म्हणणार ही नाही, की हिला बोलता येत नाही.. शिकलेली आहे.. तिच्यासारखी मुक्या मुलांची स्थळ आली तिला.. पण तिच्या बाबांचा हट्ट. की तीचे लग्न नॉर्मल मुलाशी करून द्यावे.. भले तो गरीब असला तरी चालेल.." रमा ताई अर्जून कडे बघत म्हणाल्या.. तो विचारात गुंग होता..
"मोठी आई.. ती मुलगी तयार आहे का या लग्नाला..? म्हणजे तिच्या बाबांनी तिला आपल्या परिस्थिती ची, आपल्या घराची, कल्पना दिलीय का??"
" हो.. आणि तुझा फोटो ही दाखवलाय.."
" तरीही तीने मला , आपल्या घराला प्रत्यक्ष पाहून होकार द्यावा.."
"म्हणजे दादा? तू.. तू तयार आहेस तिच्यासोबत लग्न करायला..?" अनु ला आश्चर्य वाटले..
"हो अनु,..."
"पण दादा? ती.. ती बोलू शकत नाही.."
"चांगलेच आहे ना मग! ती भांडणार तरी नाही...?" तो जरासा हसून म्हणाला.. आवाजात ठामपणा होता..
आता अजून आईला मुलींसाठी पाय झिजवायला लावणे पटत नव्हते त्याला..कदाचित हिच्या सोबतच गाठ बांधली असेल देवाने..असे म्हणत त्याने तिच्या सोबत लग्न करायचे पक्के केले..अनु ला पटत नव्हते.. पण अशी ही कोणी मुलगी तयार नव्हती.. मग ही स्वतः हून तयार आहे, यातच आनंद मानत तीने मनातले नकारार्थी विचार काढून टाकले..
पडत्या फळाची आज्ञा समजून मोठया आईंनी लगेच मोठया बाबांच्या कानावर घातले.. पुढच्या घडामोडी जरा वेगातच घडल्या..
दोनच दिवसांनी ती मुलगी विभा, तीचे आई बाबा, भाऊ सगळे येऊन घर, दुकान पाहून आले.. मुलगी खरेच सुरेख होती.. एक मुकेपण सोडले तर नाव ठेवायला एवढीशी ही जागा नव्हती.. शिवाय आर्थिक परिस्थिती ही अर्जून पेक्षा चांगली होती.. बस तिच्या बाबांना तिच्या साठी कोणतेही व्यंग नसलेला मुलगा हवा होता. म्हणून इतके दिवस तीचे लग्न जमत नव्हते..
दोघांनी ही एकमेकांशी बोलण्याचे काहीच प्रयोजन नव्हते.. तिला तर काय, येतच नव्हते बोलता.. हां... काही विशिष्ट आवाज आणि हुंकार मात्र द्यायची... आणि तो तर तसा अबोलच होता... त्यात तिच्याशी कसे बोलावे हा ही प्रश्न होता.. चोरून नजरा नजर होत होती.. तीचे डोळे आणि चेहऱ्यावरचे भाव मात्र प्रचंड बोलके होतें.. जणू काही देव वाचा द्यायला विसरला होता. ती उणीव डोळ्यांनी भरून काढली होती..
तसे अर्जून चे मोठे बाबा आणि तिच्या बाबांची ओळख होती बऱ्यापैकी.. अर्जुनच्या मोठ्या बाबांना गावात मान होता.. अतिशय साधे आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. आणि त्यांच्याच घरात आपली मुलगी द्यायची, म्हणून ते तयार झाले होते..
*"*"*"*
काल लग्न आटोपून आज सत्यनारायणाची पूजा संपन्न झाली होती.. लग्नात कोणतीच कसूर ठेवली नव्हती नवरी कडच्यांनी.... आता ही पूजेला येताना सगळ्यांना आहेर घेऊन आले होते.. आता परत जायला निघाले होते. तर पाय आणि मन दोन्ही भरून आले होते त्यांचे..
आणि ती..ती विभा.. नवी नवरी अगदीं गळ्यात पडून रडत होती आपल्या बाबांच्या.. आज पर्यंत कधी त्यांना सोडून एकटी राहिली नव्हती.. काल ही लग्न होवून आली, तेंव्हां पाठ राखीण म्हणून चुलत बहिण आली होती तिच्या सोबत.. दोन्हीं ही लहान पणापासून एकत्र वाढल्या होत्या.. ती सोबत असल्यामुळे काल एवढे जाणवले नाही.. पण आता इथे एकटीचा कसा निभाव लागेल याचा विचार करून च भीती वाटत होती..
आई बाबा, भाऊ, चुलत बहिण, काका, काकी सर्वांना सवय असल्यामुळे खुणेने बोलण व्हायचं त्यांच्याशी.. तिची खुणेची भाषा त्यांना ही कळायची.. पण इथे कसा संवाद साधायचा? ही लोक समजून घेतील का आपल्याला? बोलता येत नाही म्हणून तुच्छ तर लेखणार नाहीं? आणि तो.. ज्याच्याशी लग्न झालेय? ज्याच्या सोबत आयुष्य काढायचं आहे, तो कसा असेल? कसा वागेल? एक ना अनेक शंका... मनात च संवाद चालू होता..
काल लग्न झाल्या पासून ते आता पर्यंत जेंव्हा जेंव्हा तो समोर आला होता.. तेंव्हा एका नजरेच्या कटाक्षा पलीकडे संवाद नव्हता दोघांचाही...
"सांभाळा आमच्या मुलीला.. बोलता येत नसले तरी खूप हुशार आहे ती.. घरातील सर्व कामे येतात.. अभ्यासात ही हुशार आहे... तुमचं घर छान सांभाळेल..."
"काळजी करू नका.. आता ती तुमची नाही आमची मुलगी आहे.. लक्ष्मी आहे आमच्या घरची.. आमची अनु आणि ती.. दोघीही सारख्या आहेत आम्हाला.. तुम्ही निश्चिंत रहा..." सगळ्यांच्या वतीने अर्जुनच्या मोठ्या आईने, रमा ताईंनी आश्वस्त केले त्यांना..
"तिला कदाचीत काही गोष्टी सांगता येणार नाहीत.. समजून देता येणार नाही.. रागवू नका.. खूप गोड आहे हो माझी लेक.." विभाची आई रडत रडत म्हणाली.. तसे सर्वांनाच भरून आले..
अर्जून ने नजरेनेच, 'मी आहे तीच्या सोबत', धीर दिला.. विभा तर अनु च्या गळ्यात पडून रडत होती.. काल आल्या पासूनच अनु ने तिला एकटीला सोडले नव्हते.. काही झाले तरी ती आता आपली वहिनी आहे. आपल्या दादाचे सुख तीच्या सोबत आहे.. हे पटल्यामुळे अनु तिची काळजी घेत होती.. बाकीची मंडळी वयाने मोठी होती. या दोन्ही समवयस्क असल्यामुळे विभा लाही तिचा आधार वाटतं होता..
क्रमशः