Login

वाचन - छंद की गरज ?

About Reading


वाचन -  छंद की गरज ? 


\"वाचाल तर वाचाल\" डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खरचं किती मोलाचा संदेश दिला आहे. डॉ. आंबेडकर एक थोर विचारवंत, कायदेपंडित,लेखक होते. ते स्वतः खूप वाचन करीत असत. वाचन आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे असते , हे त्यांनी अनुभवले आणि त्यांनी लोकांना वाचन करण्यास सांगितले.
वाचनाने विचार समृद्ध होतात,विचारशक्ती, कल्पनाशक्ती वाढते. मनुष्य चिंतनशील बनतो.
वाचनाने मनुष्य ज्ञानी होतो. ते ज्ञान म्हणजे मौल्यवान संपत्तीच ! संत तुकाराम म्हणतात, "आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने." म्हणजेच ग्रंथरूपी ज्ञानाला ते संपत्ती समजतात आणि ह्या संपत्तीची बरोबरी सोने,रूपे, किंवा हिऱ्यांनी होत नाही. असे त्यांचे म्हणणे होते.

आपल्या जवळील पैसा,सोने अशा या संपत्तीची चोरी होऊ शकते पण आपण वाचनातून मिळवलेल्या ज्ञानरूपी संपत्तीची चोरी होऊ शकत नाही. आणि पैसा वगैरे ही संपत्ती इतरांना दिल्यानंतर कमी होते पण ज्ञानरूपी संपत्ती इतरांना दिल्याने कमी होण्याऐवजी वाढतचं जाते.

पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त मुलांनी इतर अनेक पुस्तके वाचली पाहिजेत. लहानपणापासूनच वाचनाची गोडी लागली तर वाचनामुळे विविध विषयांचे ज्ञान वाढत जाते. आकलनशक्तीचा विकास होत जातो. मुलांचा बौद्धिक व मानसिक विकास होत जातो. ज्या मुलांना वाचनाची आवड असते ते पाठ्यपुस्तकांचे वाचन तर करतातच पण अवांतर वाचनामुळे ते निबंध,वक्तृत्व, वादविवाद अशा स्पर्धांमध्ये यश मिळवतात. ते ज्या प्रकारचे साहित्य वाचतात त्याप्रमाणे त्यांचे आचार, विचार व जीवनाचे ध्येय ठरत असते.

मन व बुद्धी यांची मशागत करण्याचे सामर्थ्य वाचनात असते. वाचन केल्याने आपल्या सभोवतालच्या जगापलिकडील जग, संस्कृती समजते.आध्यात्मिक पुस्तके वाचून जीवनात आध्यात्माचे महत्त्व कळते. ऐतिहासिक पुस्तकांतून इतिहासातील घटना, महान लोकांनी केलेल्या कार्यातून रचलेला इतिहास समजतो. थोर व महान व्यक्तिंचे चरित्रे वाचली की, त्यांच्यापासून प्रेरणा मिळते. त्यांचे जीवन आपल्यासाठी मार्गदर्शक ठरते.
कथा ,कादंबऱ्या वाचून कल्पनेला व बुद्धीला चालना मिळते.

वाचनाची आवड प्रत्येकालाच असते. असे नाही. पण ज्या व्यक्तिंना वाचनाची आवड असते. ते जीवनात नक्कीच यशस्वी होतात. ज्ञान पाहिजे असेल तर वाचन करावेच लागते आणि वाचन असेल तर ज्ञान प्राप्त होतेच. ज्ञान आणि वाचन या गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी आपल्याला ज्ञान मिळवावे लागते आणि ज्ञान मिळवण्यासाठी भरपूर वाचनाची गरज भासते.

स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परिक्षेत यश मिळविण्यासाठी भरपूर वाचन हा उत्तम मार्ग असतो.

'कौन बनेगा करोडपती', 'कोण होईल करोडपती' यासारख्या ज्ञानवर्धक कार्यक्रमात जे बक्षिसे जिंकतात, त्यांना त्यांच्या सफलतेचे कारण विचारले तर ते 'वाचन' हेचं सांगतात.
जेव्हा त्यांना एखादा प्रश्न अवघड वाटतो पण त्यांनी कुठेतरी वाचलेले असते आणि त्या आत्मविश्वासावर त्या प्रश्नाचे उत्तर देतात ...यशस्वी होतात. तेव्हा त्यांनी केलेले वाचनच कामात येते.
वाचन हा गुण अंगी असेल तर आपल्याला एकटेपणा वाटणार नाही.
जीवनात नैराश्य येत नाही. वाचनातून जगण्याची नवसंजीवनी मिळत असते. त्यामुळे वाचनवेडे लोक पुस्तकांनाच आपले मित्र समजतात.
' वाचनाशी जिथे असते मैत्री ,
आनंद,यश मिळण्याची असते तेथे खात्री.'

वाचनामुळे आपल्याला बोलण्याची आवड निर्माण होते. आपले विचार, मुद्दे इतरांना व्यवस्थित स्पष्टपणे समजून सांगण्याचे ज्ञान मिळते. संवाद साधताना कसे बोलावे, आपली मते कशी पटवून द्यावी. याचे आकलन वाचनामुळे होते. वाचनामुळे शब्दसंपत्ती वाढते.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्या क्षेत्रात नोकरी किंवा व्यवसाय करत असतो.तेथेही आपल्याला ज्ञानाची गरज असते आणि ते ज्ञान वाचनातून मिळत असते.डॉक्टरांना आपले ज्ञान वाढविण्यासाठी वैद्यकशास्त्रातील विविध पुस्तके वाचावी लागतात. वकिलांनाही केस जिंकण्यासाठी कायद्याची अनेक पुस्तके वाचावी लागतात. शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यापूर्वी त्या विषयाचे पूर्ण ज्ञान असण्यासाठी संबंधित पुस्तके वाचावी लागतात.

\"चांगला लेखक हा अगोदर चांगला वाचक असतो.\" असे म्हणतात.
एखाद्या वक्त्यांला श्रोत्यांसमोर छान बोलण्यासाठी वाचन करावेच लागते.

'वाचनाने मिळते ज्ञान,
संपते जीवनातील अज्ञान'

वाचन केल्याने, ज्ञानाच्या प्रकाशाने अज्ञानरूपी अंधाराचा नाश होतो.

अज्ञानाच्या किनाऱ्यावरून ज्ञानाच्या किनाऱ्यावर जाण्यासाठी वाचनरुपी नौकेचा चांगला उपयोग होत असतो.

वाचन म्हणजे ज्ञानसाधन विकासाचे वरदानच !

लहान मुलं वाचतात आणि मोठी माणसेही वाचतात. आवड,छंद म्हणून वाचतात आणि एखादा संशोधक, साहित्यिक, समीक्षक, बुद्धिवंत,विचारवंत वाचतो ते वाचन एकचं नसतं.. प्रत्येकाचा वाचन करण्याचा हेतू व वाचण्याची क्रिया ही वेगवेगळी असते.

आपण वेळ घालविण्यासाठी वाचतो की काहीतरी चांगल्या गोष्टीसाठी वाचतो हे महत्त्वाचे!

रूढ अर्थाने ज्यास आपण वाचन म्हणतो, त्याचे स्वरूप भिन्न असल्याने वाचनास अनेक शब्दांनी ओळखले जाते.
पठन,पाठन,अभ्यास, उच्चारण,परिभाषण,
आकलन,अन्वय, संदर्भ, चाळणे,पाहणे,भाषांतर ,दृष्टीक्षेप इ. शब्द वाचन क्रिया सूचित करतात.

विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी आपल्या \"निबंधमाला\" पुस्तकातील वाचनशीर्षक निबंधात वाचनाचा अर्थ \"बोलावणे\" सांगितला आहे. बोलावणे म्हणजे पुस्तक वाचते करणे,वाचणे होय.

वाचन ही एक कृती आहे की कला, ते विज्ञान आहे की प्रक्रिया, याबाबत अभ्यासक, संशोधक यांच्यामध्ये मतभिन्नता दिसून येते.

लिखित मजकुराचे मूक वा प्रगट उच्चारण म्हणजे वाचन !

वाचन अभिरुची काही जणांत ती उपजत असते, तर काहींमध्ये प्रयत्नांनी, प्रेरणेतून विकसित करावी लागते किंवा होते.

वाचन हे सकारात्मक व्यसन म्हटले तरी ते विधायकच म्हणायला हवे ना ?

पण \"अती तेथे माती\" याप्रमाणे कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा,कुवतीपेक्षा जास्त झाली तर त्रास होतो. वाचन करणे तर जरूरीचे पण डोळ्यांवर ताण पडेल, शरीराला त्रास होईल , काम नको करायला म्हणून  वाचत बसणे. हे चुकीचे असते.

वाचन हा एका अर्थाने जाणिवांचा विकास होय.

कोणालाही आपला आवडता छंद विचारले तर अनेकांचा वाचन हाच छंद असतो.
छंदामुळे आनंद तर मिळतोच.पण जीवन जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टींची गरज असतेच तसेच वाचन ही सुद्धा एक गरज आहे.

\"Reading is to the mind what exercise is to the body \"

असे जोसेफ एडिसन ने वाचनाचे महत्त्व सांगितले आहे.

शरीराला सुदृढ बनविण्यासाठी जशी व्यायामाची गरज असते तशीच मनाला सशक्त बनविण्याचे काम वाचन करत असते.

वाचन हे जगणे सुंदर करणारे साधन होय.

वाचन करण्यापूर्वी आपण जे असतो,ते वाचनानंतर दुसरे बनतो, नवे होऊन जातो, खरे ना ?

दुःखी असताना छान विनोदी वाचले तर मन प्रसन्न होऊन जाते. आयुष्यात जेव्हा अपयश येते , तेव्हा प्रेरणादायी पुस्तके आपल्याला यशाचा मार्ग दाखवितात.

वाचनामुळे आपण अगोदरपेक्षा अधिक सुज्ञ, समजदार व सुजाण बनतो.
वाचन ही मन व मेंदू, भावना व विचार, शरीर व मन यांची संयुक्त क्रिया होय.

आपण का वाचतो ? असे विचारले तर ...प्रत्येकाचे उत्तर वेगळे असेल . कारण प्रत्येक जण अनेक उद्देश, हेतू मनात ठेवून वाचत असतो. शिवाय वय, मानसिक स्थिती आणि गरज या गोष्टींवरूनही वाचन कोणते व का ? हे ठरत असते.

चार्ल्स ई.टी. जोन्स म्हणतात, \" तुम्हांला दोनच गोष्टी बदलतात . एक भेटणारी माणसे आणि दुसरी म्हणजे वाचलेली पुस्तके.\"

लेखक अच्युत गोडबोले म्हणतात,\" ज्या घरात मी खूप पुस्तके पाहतो ते घर मला खूप आवडते.\"
त्यांनी विविध विषयांवरील पुस्तके लिहीली आहेत. त्यासाठी त्यांनी अगोदर त्या क्षेत्रातील अनेक पुस्तकांचा अभ्यास केला,भरपूर वाचन केले आणि वाचनामुळेच त्यांनी त्या क्षेत्रात प्राविण्य मिळविले.

डॉ. कलाम नेहमी म्हणत असत की,
\"एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते.\"
त्यांनी आपल्या विचारांतून,लेखनातून अनेकांना जगण्याची, विकास करण्याची प्रेरणा दिली. त्यांचे आचार,विचार, लेखन हे सर्वांसाठी स्फूर्तिदायी, प्रेरणादायी आहे.त्यामुळे 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस \"वाचन प्रेरणा दिवस\" म्हणून साजरा करण्यात येतो.
शाळा,महाविद्यालयात विविध उपक्रम राबविले जातात. ज्यामुळे मुलांमध्ये वाचनाची आवड,ओढ निर्माण होते. वाचनाचे महत्त्व कळते. आणि वाचन संस्कृतीचा विकास होतो.
आपणही आपल्या परीने वाचन संस्कृतीचा विकास करू या ...स्वतः वाचन करून आणि इतरांनाही वाचनाचे महत्त्व पटवून देवून.