Login

वाचाल तर वाचाल....

If You Read You Will Achieve Your Success

एकविसाव्या शतकात जिथे तंत्रज्ञानाने प्रगती केली तिथे अनेक परंपरागत चांगल्या सवयींना अगदी पूर्णविराम लावला..त्यातलीच एक सवय म्हणजे वाचन आणि लिखाण.. अगदी सुरुवाती पासून अभ्यास आणि इतर महत्वाच्या कामाची पद्धत ही पूर्णपणे लेखी म्हणजे पेन आणि कागदावर असायची. मौखिक आणि लेखन हे एकमेकांचे सोबती शिक्षणाला सोपे बनवायचे. आता ती जागा टायपिंगने घेतली आहे. संगणक ,मोबाईल यांनी पेन आणि कागदांची जागा घेतली आहे. आणि यामुळे लिखाणाची सवय ही दुर्मिळ होत चाललेली दिसते.
त्यामुळे मर्यादितपणे अभ्यास आणि इतर कामे तंत्रज्ञानाच्या मदतीने सोपी होत असली तरीही त्यांवर ऑनलाइन पद्धतीने अभ्यास आणि काम करायला वीट येतो. त्यामुळे केवळ गरज म्हणून काम केले जाते. त्यामधला आनंद हा लुप्त होत आहे. ऑनलाइन पद्धतीमुळे वाचनालयामध्ये पुस्तक वाचण्याऱ्यांची संख्या आता बोटांवर मोजण्याइतकी राहिली आहे.आता पुस्तकांची जागा ही एकतर वाचनालयात किंवा घरात असणाऱ्या बुकशेल्फ मध्ये एक शोभेची वस्तू म्हणून राहिली आहे. हीच खरी खंत आहे.तंत्रज्ञानाने आपली बरीच कामे सोपी केली. कार्यालयीन कामे सुरक्षित ठेवली. पण ज्ञानाचा अथांग सागर असणाऱ्या पुस्तकांना मात्र अडगळीचा मार्ग दाखवला... पुस्तक म्हणजे अखंड ज्ञान जपणारा एक स्त्रोत आहे.जो फक्त ज्ञान देत राहणे हे आपले काम कोणत्याही तक्रारीविना करतो.
पुस्तकं केवळ ज्ञान देत नाही तर अनुभवही देतं. जसं पु. ल. देशपांडे म्हणतात, "पुस्तकासारखा दुसरा जिवलग मित्र नाही. त्याला तुम्ही जेवढे आपलंसं कराल,त्यापेक्षा कित्येक पटीने पुस्तक तुम्हांला आपलंसं करतं. पुस्तक हा असा मित्र आहे जो आपली साथ कधीच सोडत नाही." भले एकदा वाचून तुम्ही पुस्तकं ठेवून देता, पण ते वाचत असतांना त्यामधले अनुभव,परिस्थिती, प्रसंग,कथा या तुम्हांला विचार करायला भाग पाडतात. आणि हेच विचार तुम्हांला तुमच्या जीवनात उपयोगी पडतात. आज सद्यपरिस्थितीत लोकांना वाचनाची सवय ही नाहीच असं म्हणायला हरकत नाही. आपण जेव्हा कोणती पाहतो तेव्हा त्या गोष्टीची छाप आपल्या डोळ्यांवर पडते. आणि ती गोष्ट कायमस्वरूपी लक्षात राहते.तसंच आपण वाचलेली गोष्ट ही कायमची आपल्या लक्षात राहते,कारण आपण आधी डोळ्यांनी वाचतो, मग त्यावर विचेचन करतो.त्यामुळे वाचलेल्या गोष्टी कधीच वाया जात नाहीत. तर त्या जीवनात आपल्याला प्रगल्भ व्हायला मदत करतात.आपण जेवढ्या यशस्वी लोकांच्या मुलाखती पहिल्या आहेत त्यांमध्ये आपण ही गोष्ट नेहमीच ऐकली आहे की,अभ्यासाबरोबरच इतर पुस्तकांचेही त्यांनी वाचन केले आहे. आणि यामुळे त्यांना आयुष्यात वेळप्रसंगी कसे वागायचे कसे हे शिकवले.. खरंतर पुस्तकांनी आणि वाचनाने अनेकांना घडवले आहे.
वाचन ही एक तपस्या आहे. ज्यातून फक्त ज्ञान रुपी साधना प्राप्त होते. पुस्तके चांगले संस्कार करत असतात.जे ज्ञान आपल्याला कोणत्याही शाळेत, कोचिंग सेंटरमध्ये किवा अशा कोणत्याही जागी मिळणार नाही ते ज्ञान आपल्याला आपल्या वाचनातून मिळते. असं म्हणलं जात की,"अनुभव हा सर्वांत मोठा गुरु असतो. "पण पुस्तके ही अनुभवांचे स्वरूप असतात. जितके सार यांमध्ये आहे ते तितकेच खरे असते. आजमितीला तुम्ही प्रेरणादायी भाषणं ऐकता. ती भाषणं केवळ आणि केवळ त्या वक्त्याच्या वाचन आणि अनुभवातून आलेले शब्द असतात. म्हणूनच जर तुम्हांला चांगला वक्ता,चांगला माणूस म्हणून जगायचे असेल तर पुस्तकांचा हात धरा.. कारण पुस्तके ही एकमेव अशी गोष्ट आहे जी कधीही आपली साथ सोडणार नाहीत. आज लोकांना संभाषणात देखील खूप अडचणी येतात. याला कारण त्यांचा अपुरा शब्दसाठा.. आपला शब्दसंच हा तेंव्हाच वाढू शकतो जेव्हा आपण ती वाचू .कारण चांगले बोलणाऱ्या माणसांनाच केवळ या स्पर्धेच्या जगात थारा आहे. अन्यथा आपण केवळ एक अतिसामान्य मनुष्य म्हणून राहून जातो.कारण म्हणतात ना,"जो बोलतो त्याचं जवस पण विकलं जात पण न बोलणाऱ्याचं सोनं कुणी पाहतही नाही.."
आपण जसे आपल्या मुलांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून देतो, तसेच आपल्या जुन्या वाचन परंपरेचीही ओळख आपणंच करून दिली पाहिजे..
आजच्या या इलेक्ट्रॉनिक मिडीयामुळे लोकांनी वाचनालयात जाणे बंद केले आहे.हा पुस्तके ऑनलाइन मिळतात. पण त्यामुळे डोळ्यांचे आजार बळवतात.ज्यामुळे अनेकांना कमी वयात चष्म्याचा आधार घ्यावा लागतो. वाचनालये देश घडवण्यात आपले योगदान देत आली आहेत.पण त्यांचे अस्तित्व आज धोक्यात आले आहे.ज्यांनी समृद्ध देश घडवला तेच आज मातीमोल होत आहेत. आज फार कमी युवक युवती वाचनालयांचा वापर करतात .आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्नांत कार्यरतही आहेत. आपणही जर वाचनप्रेमी असाल तर नक्की आपल्या जवळच्या वाचनालयांचा वापर करा..आणि वाचन संस्कृती जपण्यात आपला हातभार लावा..
-@vishwajavidhya
0

🎭 Series Post

View all