Login

दसरा स्पेशल घारगे

Ghaarge is a traditional sweet prepared mostly in Maharashtrian households especially during festivals.

खेड्यात जवळपास प्रत्येकाच्या परसदारी ही वेलवर्गीय भाजी असते. याची भाजी खाताना लहान मुले नाक मुरडतात पण याची गोष्ट ऐकताना मात्र तल्लीन होऊन ऐकतात. ही गोष्ट आहे लाल भोपळ्याची, " चल रे भोपळ्या टुनुक टुनुक म्हणत भोपळ्यात बसून लेकीकडे जाणाऱ्या आजीबाईचा भोपळा तोच हा लाल भोपळा.
मुलं जरी भोपळ्याची भाजी खायला नाक मुरडत असली तरी क जीवनसत्त्वे, कॅल्शियम आणि फायबर, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारा भोपळा आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे मुलांच्या पोटात बेमालूमपणे कसा घालायचा हे त्यांच्या आयांना चांगलेच माहीत असते. मग त्या बनवतात भोपळ्याचे घारगे. मुले आवडीने खातात तेव्हा त्यांना कळत देखील नाही की यात भोपळा आहे. एवढा तो स्वादिष्ट बनतो.

नवरात्री दरम्यान भोपळे पिवळे जर्द होऊन तयार होतात. त्यामुळे काही ठिकाणी लाल भोपळा नवरात्रीच्या उपवासला ही खातात. भोपळ्याच्या लहान फोडी करून त्या उकडतात, दहा मिनिटांत तयार होतात. या उकडलेल्या फोडी अशाच खातात. खूप छान लागतात. आमच्या लहानपणी आम्ही खाल्या आहेत. याशिवाय दसऱ्याला भोपळ्याचे घारगे बनवतात त्याची रेसिपी येथे देते.

साहित्य
  • दोन वाट्या भोपळ्याचा किस
  • गहू पीठ
  • तांदळाचे पीठ अर्धी वाटी
  • बारीक रवा एक छोटा चहाचा चमचा
  • मीठ चिमूटभर
  • तूप दोन चमचे
  • तेल दोन वाट्या
  • खसखस दोन छोटे चहाचे चमचे
कृती
प्रथम कढई तापल्यावर दोन चमचे तूप घालावे त्यावर भोपळ्याचा किस घालून परतावे,
किस चांगला परतल्यावर त्यात गुळ घालावा व मंद आचेवर शिजवावे. शिजवत असताना मध्ये मध्ये ढवळत रहावे. म्हणजे गुळ वितळून सात ते आठ मिनिटांत किस शिजतो.

मिश्रण थंड झाल्यावर त्यात तांदळाचे पीठ, बेसन आणि त्यात मावेल एवढे गव्हाचे पीठ घालावे. वेलची, जायफळ पूड, चवीसाठी चिमूटभर मीठ आणि एक चमचा खसखस घालून पीठ त्या मिश्रणात पाणी न घालता घट्ट मळावे.
मळलेला गोळा पंधरा मिनिटे ठेवून द्यावा.
नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करावे आणि पुरीच्या आकारा एवढे थोडे जाडसर लाटून घ्यावे.
एकसारखा आकार हवा असेल तर वाटीने छाप पाडावा.
नंतर कढईत तेल टाकून मध्यम आचेवर तळून घ्यावे.
हे घारगे खूप छान लागतात आणि पंधरा दिवस सहज टिकतात. प्रवासात नेण्यासाठी अतिशय उत्तम असा पोट भरण्याचा अतिशय उत्तम पदार्थ आहे.
नक्की करून बघा.....

टीप
यात गुळाचे प्रमाण कमी करून मधुमेहींसाठी घारगे बनवू शकता, कमी गोडीचे ही छान लागतात.
© सौ. सुप्रिया जाधव
७/९/२०२४