Login

रेड लाईट 12

Marathi Story
राजेश कल्पनाजवळ भावनिक आधारासाठी यायचा, मनातलं सगळं सांगायचा.. कल्पना औषधांमुळे बधिर झालेली असायची त्यामुळे राजेश कितीही वेळ बडबड करत बसला तरीही ती मुकाटपणे ऐकत असायची..

त्या बोगस डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती कांताबाईला समजली तसं तिने कल्पनाच्या गोळ्या बंद करून टाकल्या. हळूहळू गोळ्यांचा असर उतरू लागला..कल्पना पूर्वपदावर येऊ लागली..आता ती भान विसरत नसे, मनात दुःखं होतं पण चारचौघात माणसासारखी वागायची..राजेशचं तिच्याजवळ येणं तिने गांभीर्याने घेतलं..आतापर्यंत फक्त राजेश बोलत असायचा आणि ती ऐकत असायची..पण आता कल्पनाही त्याला चार गोष्टी सांगू लागली, शिकवू लागली..राजेशला तिची सवय झाली..रोज कधी जाऊन एकदा कल्पनाला भेटतो असं त्याला व्हायचं..पण इतक्या महिन्यात त्याने तिला एकदाही स्पर्श केला नाही आणि हीच गोष्ट कल्पनाला आवडायची.. एका बंद खोलीत पैसे देऊन पुरुष आलेला असेल तर त्याला शारीरिक सुखाव्यतिरिक्त काय हवं असतं? पण राजेशला हवं होतं, शरीरसुखाहून वेगळं असं काहीतरी..

एक दिवशी राजेशने कल्पनाला त्याच्या घरी बोलावलं..खरं तर ती त्याची कोण होती हे नातं सांगणं कठीण होतं.. राजेश रोज एका वेश्येजवळ जायचा तिला स्पर्श न करता..काय म्हणावं या नात्याला? मैत्री, माणुसकी की प्रेम? या नात्याला नाव देणं खरोखरच कठीण होतं. कल्पनाला खूप संकोच वाटत होता, आज तिची जी ओळख होती ती सोबत घेऊन एखाद्या सभ्य माणसाच्या घरी जाणं तिला चुकीचं वाटू लागलेलं... पण राजेशने काहीएक ऐकलं नाही..मग कल्पना त्याच्या घरी गेली. सभ्य माणसाचं घर ते..जागोजागी त्याच्या पहिल्या बायकोच्या खुणा दिसत होत्या..बाहेर सुंदरशी बाग, साधारण खोल्या पण छोट्या छोट्या गोष्टींनी सजवलेल्या..टापटीपपणा, वस्तूंची ठेवण..राजेश या प्रत्येक वस्तूकडे बघून तिची किती आठवण काढत असेल याची जाणीव कल्पनाला झाली..सोबतच तिच्या डोळ्यात अश्रू तरळले..तिचंही असंच एक घर होतं..तीही अशीच कुणाची तरी बायको होती, सून होती..इतर सवाष्णप्रमाणे सर्व धार्मिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करायला तिला आत्यंतिक समाधान वाटे..पण नियतीपुढे कुणाचं चालतं..

त्याच घरात राजेशने पहिल्यांदा तिला स्पर्श केला...त्यांच्या या पवित्र नात्याला त्याला शांतीपेठेत तडीस न्यायचं नव्हतं..त्यांच्यातल्या प्रेमाला आज वेगळाच सुगंध चढलेला.. मनाची अंतरं त्यांनी कधीच पार केली होती..आज शरीराचीही पार झाली..दोघेही एकमेकांशी एकरूप झाले..

राजेशने पुन्हा आपलं आयुष्य पूर्वीप्रमाणे जगायला सुरवात केली..नोकरीत लक्ष देऊ लागला, कामात लक्ष घालू लागला..मग एके दिवशी त्याला कामानिमित्त सहा महिने बाहेरगावी जावं लागलं..कल्पनापासून इतका दुरावा त्याच्यासाठी अवघड होता पण पोटासाठी जाणं भाग होतं.

सहा महिन्यांनी तो परत येऊन पाहतो तर काय, कल्पना गर्भवती होती..कुणाचं मूल आहे याला काही अर्थ नव्हता..कित्येक पुरुष आले नि गेले...कुणाकुणाला विचारत फिरणार? राजेश भेदरला..काय करावं त्याला काही सुचेना, कल्पनासोबत संसाराची स्वप्न तो बघत होता..पण आता...

राजेशने कल्पनाकडे येणं बंद केलं...कल्पनाला वाईट वाटलं..पण मूल होऊ देण्याचा निर्णय तिचाच होता..स्त्रीला मिळालेलं मातृत्वाचं वरदान तिला आजमवायचं होतं..या काळात राजेश आणि कल्पना पूर्णपणे वेगळे झाले, एकमेकांशी असलेला संबंध त्यांनी पूर्णपणे तोडला..कल्पनाने सत्य स्वीकारलं पण राजेश नुकताच दुःखातून बाहेर आलेला असता अचानक दुसरा धक्का पचवणं त्याला अवघड गेलं...

कल्पनानेही समजून घेतलं की राजेश मला अश्या अवस्थेत कसा स्वीकारेल? तिने बाळाला वाढवायचा निर्णय घेतला. शांतीपेठेत कुणाच्या बाबतीत असं झालं की लगेच ते पाप साफ करण्यात यायचं, पण कल्पनाला ते नको होतं. कांताबाईने तिला मदत केली, तिचे लाडकोड पुरवले, डोहाळे पुरवले.. या नऊ महिन्यात तिला वेगळ्या खोलीत ठेवलं जेणेकरून पुरुषांची नजर तिच्यावर जाणार नाही..

तिचं बाळंतपण झालं..तिला मुलगी झाली. शांतीपेठेत त्या इवल्याश्या जीवाने सर्वांना लळा लावला होता. तिचे बोबडे बोल, तिचं गोड हसणं.. शांतीपेठेत आता तिचाच हुकूम चाले. आजूबाजूला असलेल्या सगळ्या मावश्या नुसते लाड करत. कुणी तिला खाऊ आणे, कुणी नवनवीन कपडे, कुणी नवनवीन खेळण्या... अगदी लाडोबा बनली होती ती..कल्पनाने तिचं नाव शारदा ठेवलं. तिला तिच्या मुलीला चांगलं शिकवायचं होतं, मोठं करायचं होतं..

शारदा सात वर्षाची असेल, एकदा खेळत खेळत ती शांतीपेठेतल्या आवारात समोर आली आणि काही माणसांची तिच्यावर नजर पडली.. विकृत माणसांची नाजूक स्त्रीदेहवर नजर पडली आणि ते बोली लावू लागले. कल्पनाने हे पाहिलं आणि तिच्या पोटात गोळाच उठला. आपल्या पोटच्या गोळ्यावर ही माणसं पाशवी अत्याचार करणार ही कल्पनाही तिला सहन झाली नाही.तिचे हातपाय लटलटू लागले, कपाळावर घाम जमला, छातीची धडधड वाढू लागली...तिने पटकन तिचा हात पकडला आणि तिला खोलीत घेऊन गेली..

त्या दिवसानंतर तिने एक मोठा निर्णय घेतला..शारदाला दूर होस्टेलवर ठेवायचं..इथे राहिली तर नकळतपणे का असेना तिच्यावर तेच संस्कार होतील...

क्रमशः
0

🎭 Series Post

View all