Login

रेड लाईट 14

Marathi Story


वरद त्याच्या कामासाठी बाहेरगावी निघून गेला. शारदाला त्याच्याशिवाय आता करमेना..आता तर दोघांनी एकमेकांसोबत प्रेमाची कबुली दिली होती, त्यामुळे आता जास्तच ओढ वाटत होती. परत एकदा फोन खणाणला..कांताबाईचा फोन..

"हॅलो.."

"हॅलो, पोरी या महिन्यात येतेस असं म्हणालीस..कधी येतेय सांग.."

"मी...उद्याच.."

"काय? उद्या? ये ये.."

कांताबाईच्या आनंदाला पारावार उरला नाही, पटापट सर्व बायकांना तिने कामाला लावलं. तिला जातांना काय काय द्यायचं याची सगळी लिस्ट तयार केली आणि एकेकीला बाजारात पाठवून आणायला लावलं..गोडधोड पदार्थ बनवायला सांगितले, दाराशी तोरण लावायला लावलं..इतकं सगळं करूनही कांताबाईला कमीच वाटत होतं..ज्या इवल्याश्या जीवाने शांतीपेठेला वेड लावलं होतं ती पावलं आज परतताय..याहून मोठा आनंद नव्हता..

शारदाकडे गत्यंतर नव्हतं, एक तर कांताबाईला हो सांगितलं आणि वरदही इथे नव्हता, एक चक्कर मारून यायला हरकत नाही या विचाराने ती दुसऱ्या दिवशी शांतीपेठेत जायला निघाली..

जसजसं शांतीपेठ जवळ येत होतं तसतसं तिच्या बालपणीच्या आठवणी जाग्या होत होत्या. पेठेत सर्व मावश्यांनी तिचे केलेले लाड तिला आठवत होते..पण दुसरीकडे आपल्याला कुणी बघत तर नाहीये ना ही खंतही सलू लागली. कारण ती आता इज्जतदार समाजात सन्मानाचं जीणं जगत होती.

शांतीपेठेच्या गेटवर तिने स्कार्फ तोंडाला बांधला आणि ती आत शिरली. आजूबाजूला बघत होती. तिथे नुकतेच काही तरुण आले होते. तिथल्या बायकांशी ते बोलत होते.. ती नजर लपवत आत जाऊ लागली तेव्हा त्या तरुणांमध्ये तिला एक चेहरा ओळखीचा वाटू लागला..तिने नीट पाहिलं..आणि जे पाहिलं त्यावर तिचा विश्वासच बसेना..!!!

"वरद?? आणि इथे??"

तिच्या डोक्यात एकच संताप उसळला, जो मुलगा आपल्यासोबत चांगुलपणाचा इतका दिखावा करत होता तो इथे? आपली भूक भागवायला? आपल्याशी खोटं बोलला तो???

हा धक्का पचवत नाही तोवर समोर कांताबाई उभ्या, त्यांनी आवाज देऊन सर्वांना बोलावलं..दारापाशी कांताबाईने तिची दृष्ट काढली..तिला आत घेतलं आणि तिच्या खोलीत बसवलं. पण हे सगळं अनुभवण्याच्या मनस्थितीत ती नव्हतीच..!!! काही वेळाने तिने स्वतःवर नियंत्रण आणलं आणि आहे त्या क्षणात जगायचं ठरवलं..कांताबाईला तिने मिठी मारली, लहानपणी ओळखीच्या असलेल्या मवाश्यांना भेटली..आज तिला यांच्याबद्दल प्रेम वाटू लागलेलं..ज्याला जीवापाड प्रेम केलं तो असा निघाला, मग या सर्व बायका काय वाईट? आपली माणसं ही शेवटी आपली असतात याची तिला जाणीव झाली..

कांताबाईसकट सर्व बायका तिच्या खोलीत जमल्या, लहानपणीच्या शारदाला आठवून सर्वजणी तिच्याकडे डोळे भरून पहात होत्या. तिच्या लहानपणीच्या आठवणींना सर्वजणी उजाळा देत होत्या. शारदा भारावून गेली होती. शांतीपेठेत जे चालतं त्याच्यावरून इथल्या बायकांना जज करतात, पण त्यापलीकडे जाऊन या बायकांनाही सामान्य जनतेला माणसासारखं मन आहे, भावना आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे याचा कुणी विचारच करत नाही..इतके दिवस आपण या माणसांपासून दूर राहिलो याचा तिला पश्चात्ताप झाला..एकीकडे ज्याला आपलं मानलं त्याचं खरं रूप आपण पाहिलं आणि ज्यांना झिडकारलं त्यांनी इतकी माया केली. आईला भेटावं असही तिच्या मनात यायचं, पण आईने दुसरं लग्न केलं हे तिला आठवताच सगळं प्रेम खल्लास होई..

शारदाला संध्याकाळी निघायचं होतं. कांताबाईने तिला जायच्या आधी छानपैकी जेवू घातलं.. कितीतरी पदार्थ ताटात वाढले होते. पाच प्रकारच्या भाज्या, श्रीखंड, पुरी, गुलाबजाम, कढी, बासुंदी, पापड..अहाहा..!!! त्या जेवणात शारदाने मायेचा स्पर्श अनुभवला..आज तिला तिचं घर खऱ्या अर्थाने अनुभवायला मिळालं.

तिची निघायची वेळ झाली तशी सर्वांना हुरहूर लागली..परत यायच्या बोलीवर सर्वजणी तिला निरोप देऊ लागले. निघतांना शारदाला वरद पुन्हा दिसला, दिवसभर तो तिथेच होता. यावेळी दुसऱ्या काही बायकांसोबत बोलत होता..शारदाने ठरवलं, या मुलाशी संबंध पूर्णपणे तोडायचा..ती नजर चुकवून तिथून निघाली पण वरदने नेमकं तिला पाहिलं.. त्याच्यासाठी सुद्धा हा एक धक्काच होता, शारदा आणि इथे? काय काम असेल तिचं? काय संबंध तिचा शांतीपेठेशी?

त्याने तिला आवाज दिला पण ती थांबली नाही, सरळ चालत गेली.. शेवटी तो तिच्या मागे मागे पळत गेला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला..शारदा सोबत कांताबाई सुद्धा तिला सोडायला बाहेर आलेल्या...वरदने खांद्यावर ठेवलेला हात तिने झिडकारला आणि पुढे चालू लागली..कांताबाई वरदकडे वळल्या,

"तुम्ही ओळखता का हिला?"

"हो, चांगली ओळख आहे आमची, पण ही दुर्लक्ष का करतेय माझ्याकडे?? शारदा...अगं ए शारदा.."

कांताबाई पुढे निघून गेलेल्या शारदाकडे जातात आणि म्हणतात,

"अगं तो मुलगा तुला ओळखतो, त्याला ओळख का दाखवत नाहीयेस??"

"कोण? तो? मी नाही ओळखत त्याला.."

"मग तो कसा ओळखतो तुला? बरं एकदा बघ तर खरं काय म्हणतो ते..फार गुणी मुलगा आहे, इथे आमच्या सारख्या बायकांना वैद्यकीय सेवा मिळाव्यात म्हणून धडपड करतोय, प्रत्येकीला ताई ताई म्हणत आदर देतोय..खरंच मन भरून आलं गं.. इतका मान आजवर कुणी दिला नव्हता.."

शारदाचे पाय तिथेच थबकतात.. तिला आठवतं, वरद एका वस्तीत सेवाकार्यासाठी जातोय म्हणून म्हंटला होता..ते म्हणजे हे होतं काय...अरे देवा, किती मोठा गैरसमज करून बसले मी..ती पटकन वळली आणि वरदला म्हणाली,

"वरद..तू इथे?"

"नाटकं करू नकोस, तू इथे मला 2-3 वेळा पाहिलं तरी ओळख दाखवली नाहीस.."

"अरे मला वाटलेलं की तू इथे.."

शारदा तिथेच अडखळते.. कांताबाई आणि वरदला समजतं तिला काय म्हणायचं आहे ते...कांताबाई हसू लागतात, वरद रागीट कटाक्षाने तिच्याकडे बघतो...

"काय वाटलेलं तुला??"

"काही नाही, बरं तू येतोय का माझ्यासोबत?"

"पण एक मिनिट, तू इथे कशी?"

ज्याची काळजी होती तेच घडलं, वरदला आता सगळा भूतकाळ सांगणं भाग होतं.. पण, ते ऐकल्यावर काय वाटेल त्याला? मी इथे वाढलीये हे ऐकून तो स्वीकारेल मला?

"सांगते नंतर, तू चल.."

शारदाने विषय तिथेच तोडला, कांताबाईला समजलं की दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे, तिला आनंद झाला..वरद सारखा मुलगा शारदाला जोडीदार मिळाला तर...

क्रमशः
0

🎭 Series Post

View all