Login

रेड लाईट 15

Marathi Story


वरद आणि शारदा दोघेही एकत्र फ्लॅट वर पोचतात. प्रवासात शारदा पूर्णवेळ याच विचारात असते की वरदच्या प्रश्नांना काय उत्तरं द्यायची. वरदलाही प्रश्न पडलेले असतात, पण शारदाच्या मनातली घालमेल तो ओळखतो. फ्लॅट वर गेल्यानंतर शारदा पार्सल मागवते दोघांसाठी..

"वरद मी पार्सल मागवलं आहे, फ्रेश होऊन ये माझ्याकडे, सोबतच जेवू.."

वरद त्याच्या फ्लॅट वर जाऊन फ्रेश होऊन अर्ध्या तासाने खाली येतो. शारदा पार्सल काढून ताटात वाढते आणि दोघेही जेवण उरकून घेतात.

"ए शारदा तुला सांगायचंच राहिलं.. उद्या माझे आई वडील येताय इकडे..तुझी भेट घालून देईन त्यांच्याशी..सोबतच मावशी, आत्या आणि मामाही येणारे मला भेटायला..मला वाटतं हीच योग्य वेळ आहे आपल्या बद्दल सगळं सांगायची.मला ते नाही म्हणणारच नाही..."

शारदा आनंदून जाते, इतके दिवस जी संसाराची स्वप्न पाहिली होती ती आता पूर्णत्वास जाणार होती..ती दिवसा ढवळ्या स्वप्नात हरवून जाते..

"आणि हो, तुझ्या घरी पण सांग लवकर.."

शारदा इतक्या गहन स्वप्नात अडकते की हे वाक्य ती ऐकतच नाही..उद्या वरदचे आई बाबा येणार..मलाही एक कुटुंब मिळेल..काय घालू मी उद्या? साडी नेसू का? की ड्रेसच घालू?

उद्याच्या उत्सुकतेने तिला रात्री लवकर झोपच लागत नाही.

दुसरा दिवस उजाडतो.. शारदा तयारी करत असताना जिन्यात पावलांचा आवाज येतो..

"सगळे आले वाटतं. लवकर आवरायला हवं..वरदने मेसेज केला की लगेच जाईन मी.."

काही वेळाने वरदचा मेसेज येतो आणि शारदा लगबगीने वर जाते..दारातूनच ती सगळं बघते..वरदचे आई वडील हसतखेळत त्याच्याशी गप्पा मारत असतात, वरदची आई तिथे एक छानशी कृष्णाची मूर्ती ठेवते आणि तिला नमस्कार करते..आत्या, मामा सगळे बसलेले तिला दिसतात..त्यांच्या पेहरावावरून ते सर्वजण खूप धार्मिक दिसत होते. शारदा आत पाऊल टाकायला जाणार तोच मागे घेते..कसलातरी विचार तिला सलू लागतो..ती चटकन माघारी वळते आणि बिल्डिंग आवाराच्या बाहेर जाते..

वरद तिला फोन करून करून थकतो पण ती काही उचलत नाही..संध्याकाळी सर्वजण घरी गेल्यानंतर वरद शारदाच्या फ्लॅट वर जातो, ती अजून आलेली नसते..तो माघारी वळणार तोच जिन्यात ती पावलं टाकताना दिसते..

"शारदा.. कुठे गेलेलीस? सर्वजण विचारत होते तुझ्याबद्दल.. अशी मधेच गायब कशी झालीस? काय महत्वाचं काम निघालं इतकं??"

शारदा शांततेत लॉक उघडते आणि आत जाते. वरदही तिच्या मागे मागे जातो..

"काय गं मी काय विचारतोय?"

शारदा अजूनही गप..

"बोल..सांग मला..काहीतरी विचारतोय मी, तुझ्या या विचित्र वागण्याचं काय समजू मी??"

"वरद...मला माफ कर, पण मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही.."

वरद मटकन खाली बसतो, त्याच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता....

"वरद... माझं तुझ्यावर जिवापाड प्रेम आहे, म्हणूनच माझ्या भूतकाळाची सावली तुझ्या कुटुंबाला त्रासदायक ठरावी असं मला नाही वाटत.."

"काय बोलतेय तू? कसला भूतकाळ? कसली सावली?"

"आजवर मी तुला माझ्या घरच्यांबद्दल काही सांगितलं नाही, काय सांगू मी? की मी एक नाजायज संतती आहे ते? माझ्या वडिलांचा मला पत्ता नाही..मी एका वेश्येची मुलगी.. मला ना कुटुंब माहीत ना घर..शांतीपेठेत असणाऱ्या एका वेश्येच्या पोटी मी जन्माला आले, बालपण तिथेच गेलं आणि शिक्षणासाठी बाहेर पडले..अश्या वस्तीत वाढलेल्या मुलीबद्दल समाज काय विचार करेल?? तुझ्या घरातलं वातावरण पाहिलं मी, तुझे आई वडील मामा आत्या...किती सात्विक आणि इज्जतदार माणसं आहेत ते...अश्या लोकांमधे जाऊन त्यांच्या सात्विकतेला झळ कशी पोचवू मी? तू एका घरंदाज, शुद्ध आणि खानदानी मुलगी डिजर्व करतोस, माझ्यासारखी वेश्येची मुलगी नाही .. त्या शांतीपेठेत मी वाढले, तिथल्या बायकांनी मला वाढवलं आणि म्हणूनच त्यांना भेटायला गेलेले मी..शांतीपेठ हेच माझं घर...तर असा सगळा भूतकाळ आहे माझा...मी तुला विनंती करते की तुझ्या कुटुंबासाठी, त्यांची सात्विकता जपण्यासाठी माझ्यासारखी घाण घरात येऊ देऊ नकोस...प्लिज.."

वरद जेव्हा हे ऐकतो तेव्हा त्याला धक्काच बसतो. शारदाचा भूतकाळ ऐकून तो आश्चर्यचकित होतो..हे इतकं सगळं असूनही शारदा मला एक शब्दही बोलली नाही..

"शारदा हे तू आत्ता सांगतेय?"

"सॉरी, माझं चुकलं..आधीच सांगायला हवं होतं मी.."

"यासाठी नाही की आपलं प्रेम पुढे गेलं म्हणून..यासाठी की माझ्यावर प्रेम असतानाही स्वतःचं दुःखं तू लपवून ठेवलस.. आणि तुझा हा भूतकाळ ऐकून मी तुला सोडून देईल असं वाटलं तुला? ते शक्य नाही...जे काही घडलं त्यात तुझी काय चूक होती??"

"मला माहित होतं तू हेच बोलशील.. तरीही आता आपण हा विचार सोडून देऊया..कारण मी फक्त तुझ्याशी नाही तर तुझ्या कुटुंबाशी जोडली जाणार आहे..तुझं कुटुंब एक प्रतिष्ठित घर आहे, तुझ्या माणसांना समाजात मान आहे, घरात सात्विक वातावरण आहे...पण उद्या माझ्या भूतकाळामुळे तुझ्या कुटुंबाच्या लोकांना त्रास झाला तर? समाजात इतकं मोठं स्थान मिळवण्यासाठी त्यांनी किती कष्ट घेतले असतील, ते धुळीस मिळतील...आज त्यांच्याकडे पाहून मी हा विचार सोडून देतेय."

तेवढ्यात दारामागून काही लोकं आत येतात..

"जी मुलगी कुटुंबाचा इतका विचार करते, प्रतिष्ठेचा इतका विचार करते ती जर आमची सून झाली नाही तर ते आमचं दुर्भाग्य.."

"आई, पप्पा, मामा? तुम्ही?"

"हो बाळा, आमची एक पिशवी राहिलेली ती घ्यायला मागे वळलो आणि हे सगळं दिसलं..शारदा बाळा, किती वाट पाहिली आम्ही तुझी? आणि तू मात्र गायब..आता बाकी कसला विचार करू नकोस...तुझ्यामुळे आमची प्रतिष्ठा कमी नाही होणार उलट चार पटीने ती वाढेल.."

शारदा हे ऐकून गारच पडते..हे सगळं अनाकलनीय होतं.. लोकांनी चांगलं असावं, पण इतकं?? वरदलाही आनंद झाला, त्याचे आई वडील समजून घेतील याची त्याला खात्री होती..

शारदाच्या मनातलं मळभ दूर झालं... आत्तापर्यंत पेलत असलेला सगळा भार उतरल्या सारखं तिला वाटलं ..तोच वरदची आई म्हणाली,

"यात तुझ्या आईचाही दोष नाही, त्यांना बोलाव भेटायला."

आता मात्र शारदा पुन्हा बुचकळ्यात पडली..आईशी गेले कित्येक वर्षे संबंध तोडला होता..आणि अजूनही आईबद्दल फारशी चांगली भावना मनात नव्हती, आईने मला सोडून दुसरं लग्न केलं हे तिच्या पचनी पडलं नव्हतं..

क्रमशः
0

🎭 Series Post

View all