"ए आ ना इधर..."
"अरे दो सौ मे काम कर देती हू, फिर चलेगा?"
"कल का पैसा दिया नहि बे तुने, किधर जाता है हरामखोर.."
हे आवाज ऐकून कल्पना अजून घाबरली, आता आपल्याला या धंद्यात बसवता की काय अशी भीती तिला वाटू लागलेली.. कांताबाई तिला धीर देत म्हणाल्या..
"घाबरू नकोस, तुझ्या मनात काय चाललंय हे समजतंय मला..तुला तुझ्या घरी सुखरूप पोचवू आम्ही.."
"नाही, नाही...एकवेळ मी मरून जाईन पण घरी जाणार नाही...ती माणसं, माझ्या जीवावर उठलीत..माझं शरीर फाडून टाकतील ते.."
कल्पना गयावया करू लागली,कांताबाईला समजलं की प्रकरण काहीतरी गंभीर आहे..
"ठीक आहे नको जाऊ घरी, पण काय झालंय ते तरी नीट सांग.."
कल्पना शांत झाली, सगळं एकदाचं सांगून मन मोकळं करायचं होतं तिला..मनातली सगळी भडास ओकायची होती..
"मी कल्पना, शिरपूर मध्ये माझा जन्म झाला. जन्मापासून घरात गरिबी पाचवीला पुजलेली. माझ्या पाठी चार बहिणी, आधीच गरिबी अन त्यात आम्हा मुलींचं लग्न. आई कधीच सोडून गेली, बापाने जे स्थळ येईल त्याला अक्षरशः मुली विकून टाकल्या.शहरातून माझ्यासाठी एक स्थळ आलं, श्रीमंत माणसं होती. लग्न काढून देतील आणि वर माझ्या वडिलांना पैसेही देतील असं ठरलं आणि बाप आनंदाने नाचू लागला. मीही संसाराची स्वप्न रंगवू लागले. लग्न करून शहरात आले, लग्न झालं तसं बापाने ढुंकून पाहिलं नाही. कधी विचारलं नाही कशी आहेस म्हणून, कारण त्याला फक्त मोकळं व्हायचं होतं सगळ्या मुलींची लग्न करून..मीही सोडून दिलं, सासरच्या माणसांना जवळ करायचं असं ठरवलं. पण तिथे काहीतरी भलतंच दिसत होतं. ज्यांना मी सासूबाई म्हणायचे त्या माझ्या सासूबाई नव्हत्याच..त्या नवऱ्याच्या बिझनेस पार्टनर होत्या. नवऱ्याला विचारावं तर तो मुस्काट बंद ठेवायचं एवढंच बोलत असे. एके दिवशी त्याचं बोलणं मी चोरून ऐकलं..तो म्हणत होता की दुसरं एक सावज हाताशी आलंय, पुढच्या आठवड्यात लग्न करायचं आहे..
माझ्या लग्नाला पंधरा दिवसही होत नाही तोच नवरा दुसरं लग्न करतोय? मी कोसळले, मग हळूहळू समजू लागलं.. हा माणूस अश्या कुणीही वाली नसलेल्या मुलींना शोधून त्यांच्याशी लग्न करतो, त्यांना इकडे आणतो आणि....
पुढचं बोलायला कल्पनाच्या तोंडून शब्द फुटेना..
"बोल पोरी, आणि काय करतो?"
"आणि शरीर फाडतो... एका डॉक्टरच्या मदतीने शरीराचे एकेक अवयव वेगळे करतो आणि परदेशात ऑर्गन विकतो...खूप मोठी साखळी आहे ही...काल माझ्यासोबत हेच होणार होतं, पण मला आधीच शंका आल्याने मी तिथून पळ काढला..
हे ऐकून स्वीटीच्या अंगावर काटाच उभा राहिला..
"हे राम, म्हणजे असे हातपाय पण विकले जातात?" - स्वीटी
"हातपाय नाही बाई, डोळे, हृदय, किडनी असं विकतात.." - कांताबाई
"ऐकावं ते नवलच.." - स्वीटी
"बरं आता तू काय करणार आहेस? काय ठरवलं?"
"मी...मी शहरतुन बाहेर पडेन, काहितरी कामधंदा बघेन आणि एकटी राहीन..माहेरी गेले तर बाप असंही हाकलून देईल.."
कांताबाई हसून तिच्याकडे बघत राहिल्या. स्वीटीला अवघडल्यासारखं झालं, कल्पना तिचं दुःखं सांगतेय आणि कांताबाई का असं हसताय! तिने न राहवून हळू आवाजात विचारलं,
"कांताबाई, काय झालं?"
"काही नाही, पोरीची जिद्द दिसतेय..एखाद्या बाईने मरण पत्करलं असतं हे सगळं भोगून. पण हिला बघा.."
"जीव द्यायचाच होता तर मी तिथे थांबले असते, त्या लोकांनी जीव घेतला काय अन मी स्वतःहून दिला काय.. सगळी माणसं सारखी नसतात, काहीजण जीवनाला कंटाळून मरण पत्करतात. दुःखावर मरण वरचढ असतं त्यांना, काहीही म्हणा पण ती लोकं खरी हिम्मतवाली असतात..ती हिम्मत प्रत्येकात नसते.."
"काहीही बरळू लागलीय तू आता...डोक्यावर परिणाम झालाय वाटतं.." स्वीटी म्हणाली..
"हे बघ पोरी, तू म्हणतेस बाहेर जाईन, नोकरी करेन..पण हे इतकं सोपं नाहीये... एकट्या बाईला हे जग जगू देणार नाही..सोपं नसेल ते.."
"मग काय करू? तुम्ही मला तुमच्या या धंद्यात येऊ म्हणत तर नाहीये ना?"
"घ्या...ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं.." - स्वीटी
"नाही पोरी, इथे कुणालाही बळजबरीने आणलं जात नाही. स्वखुशीने इथे बायका येतात. आणि तुला इथे राहायचं असेल तर माझ्याकडे एक काम आहे, ते कर.."
"इथे आणि कसलं आलंय काम.."
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा