"आजकाल इंटरनेटवर फोन नंबर देतात अन प्रोफाइल का काय ते बनवतात म्हणे, मला नाही जमत ते...ते बघशील का तू? म्हणजे तिथून मोठया मोठ्या घरातली गिऱ्हाईक मिळतात म्हणे.."
"शी... असलं काम नाही जमणार आपल्याला.."
"बरं बाई, तुझी ईच्छा.."
असं म्हणत कांताबाई आणि स्वीटी त्यांच्या कामाला निघून गेल्या. कल्पना विचार करत बसली, काय करायचं पुढे? कांताबाई म्हटल्या तेही खोटं नाही..या जगात एकट्या बाईला जगणं सोपं नाही...पण इथे राहणं त्याहून वाईट. ती ताबडतोब तिथून उठली, सोबत काहीच नव्हतं, अंगावर फक्त काही सोन्याचे दागिने होते.
कल्पना तिथून उठली आणि बाहेर जायला लागली, अंगात गाऊन तसाच. आजूबाजूला बायका माणसांना आपल्या इशारा करून बोलावत होत्या. माणसं सुद्धा अश्लील भाषेत बोलत होते, ते बघून कल्पनाची अजूनच धडधड वाढली. ती अजूनही शांतीपेठेच्या आवारातच होती, तिला पाहून दोन माणसं तिच्या जवळ आली..
"तीन सौ... चलेगा?"
कल्पना त्यांच्याकडे लक्ष न देता चालू लागली, ती माणसं तिचा पाठलाग करू लागली. एकाने तिच्यापुढे जाऊन पटकन तिचा हात पकडला, ती हात सोडवायचा प्रयत्न करू लागली..
"सोड मला..मी यांच्यातली नाहीये..सोड.."
ही झटापट चालू असतानाच कांताबाईंनी मागून आवाज दिला..
"ए भडव्या... सोड तिला.."
कांताबाईला पाहताच ती माणसं तिथून पसार झाली, कांताबाई कल्पनाच्या जवळ आल्या..
"न सांगताच पळून जायचा विचार होता का? आम्ही काही धरून ठेवलं नव्हतं तुला.."
कल्पना भेदरली, तोंड लपवत बाहेर पडली तरी कांताबाईंच्या तावडीत ती सापडलीच. कांताबाईंनी ब्लाउज मधून त्यांचं छोटसं चमकीचं पाकीट काढलं आणि त्यातून दोनशे रुपये काढून तिच्या समोर धरले. कल्पनाचा हात सरसावेना..मग कांताबाईने बळजबरीने तिचा हात खेचत त्यावर पैसे ठेवले. कल्पनाने पाठ फिरवली अन चालायला लागली, मनावरचं एक मळभ दूर झालेलं, दोन पावलं चालताच तिने पुन्हा मागे वळून पाहिलं, कांताबाई तिथेच उभ्या होत्या..तिचे हात नकळत जोडले गेले, लांबूनच तिने नमस्कार केला अन ती चालायला लागली..
"कांताबाई...ओ कांताबाई...हे घ्या की, आजचे पैसे, सातशे रुपये.."
रेश्माने पैसे पुढ्यात धरले तेव्हा कांताबाई भानावर आल्या, रजिस्टर मधून कल्पनाचं लिहिलेलं नाव नजरेस पडलं की त्यांना कायम ती आठवे...पण गोष्ट तेवढीच नव्हती, ती परत आलेली...कशी? केव्हा? समजेलच पुढे...!!!
____
शारदा आज ऑफिसनधून लवकर घरी आलेली, दोन पोळ्या आणि भाजी बनवून तिने जेवून घेतलं आणि ती लवकर झोपी गेलेली. रात्रीचे साडेबारा वाजले, शारदाच्या खोलीचा दरवाजा जोरजोराने वाजू लागला. शारदा आवाजाने जागी झाली, घड्याळात पाहिलं आणि ती पुन्हा झोपी गेली. रात्री अपरात्री अश्या दार वाजवण्याची तिला सवयच झाली होती, इतकं भयानक वास्तव तिने पाहिलं होतं की आता भय नावाचा प्रकार तिच्यात उरलाच नव्हता. दरवाजा बराच वेळ वाजत होता, 10 मिनिटांनी आवाज थांबला.
शारदा तिच्या नोकरीच्या गावी एका इमारतीत भाड्याने खोली घेऊन रहात होती. तिच्या पगारात 1 bhk तिला परवडणार होता. खोलीत पार्टनर म्हणून बऱ्याच मैत्रिणींची तिने चौकशी केली होती पण ऑफिसमध्ये असलेल्या सगळ्या मुली त्या शहरात स्थायिक होत्या, आणि बाहेरगावहुन आलेल्या मुली आपापल्या नातेवाईकांकडे तरी रहात होत्या नाहीतर आपल्या नवऱ्यासोबत तरी..
इमारत नवीनच होती, फार मोजक्या फ्लॅट्स मध्ये माणसं होती. बाकी रिकामीच. शारदाला या आयुष्याचा वैताग आलेला. सणासुदीला ऑफिसमधले कलीग बॉस कडे सुट्टी मागायचे, सुट्टी साठी जीव तोडून विनंती करायचे, कुटुंबासोबत फिरायला जायचं असेल तर रजा घ्यायचे..पण सुट्टी मिळू नये असं वाटणारी शारदा एकमेव होती. काय करणार होती ती घरी राहून? घर कसलं, खोलीच ती फक्त...एकटं बसलं की जुन्या आठवणी खायला उठत. सण उत्सव तरी तिला कुठे माहीत होते? कुणासाठी साजरे करेन?
अश्याच एका सणाला ऑफिसला सुट्टी दिली गेलेली, सर्वजण खुश होते, पण शारदाला संकट पडलं, काय करणार त्या दिवशी? ऑफिसमध्ये कामात आणि इतर व्यक्तीत वेळ निघून जात असे..वर खोलीला कुलूप नसेल तर विकृत माणसं पुन्हा दिवसाढवळ्या दार ठोठावत बसायची. आता लवकरात लवकर मुलगा पाहून लग्न करून घ्यावं असा विचार तिच्या मनात आलेला.
गणेश चतुर्थीची सुट्टी होती, आजूबाजूच्या गणपती मिरवणूक, डीजे चा आवाज सुरू होता. "गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया" चा आवाज दुमदुमत होता. होस्टेलवर असताना सगळं काही शारदाच करत असे, कारण बाकी मुली सुट्टीमुळे घरी जात..हिला घर कुठे होतं? जिथे वास्तव्य तेच तिचं घर, मग होस्टेलवर कामाला असलेले कर्मचारी आणि काही मुली मिळून गणपती बसवत.
हे सगळं सुरु असताना तिला खुप रडू येत होतं. पण अचानक तिच्या मनात काय आलं कुणास ठाऊक, ती किचनमध्ये गेली..कणिक मळलं, त्याचा छानपैकी छोटासा गणपती बनवला, त्यावर हळद भुरभुरली..छोटाशी पण सुंदर अशी गणपतीची मूर्ती तयार झाली. तिने पटापट टेबल वरची जागा साफ केली, त्यावर तिच्या एका नवीन ड्रेसची ओढणी पसरवली, थोडे तांदूळ काढून आणले, ते ओढणीवर चौकोनाकृती पसरवले आणि त्यावर मूर्ती विराजमान केली. घरात पूजेचं साहित्यही नव्हतं. पण शारदाच्या मनात आज त्या खोलीत एक छोटंसं घर साकारण्याचं मनात आलं.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा