Login

रेड लाईट 7

Marathi Story


शारदाचं नाव ऐकताच कल्पनाला धस्स झालं, आपल्या लेकीला विसरण्याचा प्रयत्न ती रोज करत असे, तिच्या काळजीने कल्पनाचा जीव जायची वेळ येई, पण..काहितरी कारण होतंच की, ज्यामुळे कल्पना शारदाला दूर ठेवत होती...

____

शारदा ऑफिसमधून घरी येत होती, येताना तिने बाप्पा साठी प्रसाद आणि काही फुलं घेतली, आपल्या खोलीत आता आपण एकटे नाहीत तर बाप्पाही आपल्या सोबत आहेत असा समज तिने पक्का केलेला. तेवढंच एक समाधान, एकटेपणावर तेवढाच काय तो एक मलम. ती फुलबाजारात गेली, नानाविध फुलांचा सुगंध प्रसन्न करून जात होता, तुम्ही कितीही महागडे अत्तर लावा पण निसर्गाने बहाल केलेला नैसर्गिक सुगंध आत्म्यापर्यंत पोहोचतो हेच खरं ! सुगंधी आणि ताजी फुलं ती बघत होती, एका ठिकाणी थांबून तिने काही फुलं घेतली. सोबत कापडी पिशवी तिने नेलेली, प्लास्टिकच्या पिशवीला तिने नकार दिला आणि तिच्या पिशवीत ती फुलं टाकू लागली, ते करत असताना चुकून एक फूल पिशवीच्या बाहेर गेलं आणि शेजारी असलेल्या एका व्यक्तीच्या पायावर पडलं..आता हे फुल देवाला कसं चालणार, म्हणून ती ते तसंच सोडून चालायला लागली.

"Excuse me.."

ज्या व्यक्तीच्या पायावर ते फुल पडलं त्याने आवाज दिला..शारदाला आवाज ओळखीचा वाटला...तिने वळून पाहिलं, समोर वरद उभा ! त्याला पाहून शारदाला तर आनंदाच्या उकळ्याच फुटू लागल्या, मागच्या काही दिवसांपासून याला भेटायला आसुसले होते, आणि हा असा भेटला, अचानक...अनपेक्षित..!!!

"काय मॅडम? आज इकडे कुठे?"

"बाप्पा साठी फुलं आणायला आलेले...तू बोल, कसा आहेस?"

"मी आणखी कसा असणार, मजेत...as usual..बरं संध्याकाळी कॉफी साठी येशील का सोबत? कसं आहे की मला इथलं काही माहीत नाही, म्हणून.."

शारदा अवाक झाली, किती सहजपणे बोलतोय हा..किती निरागसपणे विचारतोय. अगदी शुद्ध मनाने, विकृतीचा लवलेशही नाही या मुलात..ती विचार करत बसली आणि वरद उत्तराची वाट पाहू लागला..मग वरद स्वतःच जीभ चावून म्हणाला. ..

"सॉरी..सॉरी..सॉरी..मी असं एकदम तुला कॉफी साठी बोलावलं, योग्य नाहीये हे..नाही का? मी तुला त्या दिवशी मदत केली आणि त्या उपकाराच्या ओझ्याखाली तूला इच्छा नसताना हो म्हणावं लागेल..किती वेडा आहे मी पण..सॉरी हा पुन्हा..पण खरंच झालं असं की.."

"अरे बस बस, किती बोलशील? आणि कोण म्हटलं मला ईच्छा नाही म्हणून? आवडेल मला तुझ्यासोबत कॉफी घ्यायला..."

"मग frineds??"

वरद ने हात पुढे केला..शारदानेही वाट न बघता त्याच्या हातात हात दिला..

"घरी जातेय ना? चल सोबत जाऊया.."

दोघेही सोबत निघाले. शारदाला खूप सुरक्षित वाटत होतं त्याच्यासोबत. असं वाटत होतं की त्याचा हात हातात घ्यावा आणि लांबपर्यंत चालतच रहावं. थोडं पुढे गेल्यावर एक बाई तिथे आली, तिच्याकडे गजरे विकायला होते.. असं जोडपं पाहिलं की ती हमखास समोर येई.

"दादा गजरा घ्या की..ताई गजरा.."

गजरा पाहिला आणि शारदाचा स्वतःवरचा ताबा सुटला..

"नकोय गजरा...अजिबात नकोय, जा इथून.."

आजूबाजूची 2-3 माणसं पाहायला लागली इतकी ती आवेशाने बोलली होती. वरदलाही आश्चर्य वाटलं, हिला गजरा पाहून इतकं काय झालं?

गजरा...शांतीपेठेत या गजऱ्याला लागलेला विकृतीचा सुगंध तिने अनुभवला होता...7 वर्षाची असेल ती तेव्हा...शांतीपेठेत पुरुष यायचे, एखाद्या वेश्येसोबत अनेक रात्री घालवल्यानंतर त्यांचं चांगलं सूत जमे, मग काहीजण त्यांच्याकडून अपेक्षापूर्ती करून घेण्यासाठी गजरा घेऊन येत..काहिजन मनगटाला बांधून त्याचा सुगंध घेऊन उत्तेजित होत असायचे..शारदा लहान होती, पेठेत नुकतीच एक तरुण बाई सामील झालेली, तिची आज पहिलीच वेळ होती. एक गिऱ्हाईक तिच्या खोलीत गजरा घेऊन गेला आणि दार बंद करून घेतलं. कल्पना नेमकी बाहेर गेलेली त्यामुळे शारदा चाळीत इतरत्र फिरत होती, नाहीतर कल्पना असायची तेव्हा शारदाला खोलीतून बाहेर येऊ द्यायची नाही...शारदा सगळं बघत होती, तिला कळेना काय चाललंय ते...खोलीतून किंचाळण्याचे आवाज येऊ लागले, शारदा घाबरली...इतर बायका ते ऐकून हसत होत्या, पण आतून त्या बाईचा आवाज म्हणजे वेदनेचा फुत्कार होता. त्या पुरुषी पशूने अनैसर्गिकपणे पैसे देऊन अत्याचार केलेला..पैसे दिले म्हणजे आपल्याला हवं तसं आणि हवं त्या पद्धतीने ओरबाडायचं तसलाच प्रकार...!!! काही वेळाने तो माणूस बाहेर आला, शारदा खांबामागे लपली, त्याने हातातला गजरा खाली टाकला आणि त्यावर पाय देऊन त्याचा पार चुरगळा केला..एका नाजूक देहाला त्याने कुस्करून टाकलं हेच तो त्यातून सांगत होता. पुढे होस्टेलमध्ये गेल्यानंतर जसजशी शारदा मोठी होऊ लागलेली तसतसं तिला या सगळ्याचा अर्थ उमजू लागलेला...ते आठवून आज तिला असह्य झालं आणि म्हणून तिचा स्वतःवर ताबा राहिला नाही...

वरद काही वेळ शांत राहिला, शारदाला त्याने नॉर्मल होऊ दिलं आणि मग हळूच विचारलं,

"काय गं? इतकी का चिडलीस?"

शारदा त्याच्या प्रश्नाने भानावर आली, पण त्याला खरं सांगू शकणार नव्हती...आपण शांतीपेठेत वाढलो हे त्याला कळलं तर आमची मैत्रीही संकटात येईल अशी तिला भीती होती.

" काही नाही रे...ही वस्तू विकणारी लोकं इतकी अंगलट येतात ना म्हणून राग आला.."

"हम्म...मला माहितीये तू का चिडलीस ते.."

शारदाने चालणं थांबवलं, ती चालता चालता एकाच जागी स्तब्ध झाली..याला खरंच माहितीये का? मी कुठून आलीये हे समजलंय की काय याला??
वरद पुढे म्हणाला..
"त्या दिवशी माणसं तुझ्या अंगलट आली तोच राग आहे ना तुझ्या मनात..?"

"ह...हो..हो बरोबर.."

शारदाने हो ला हो लावला आणि तिचा जीव भांड्यात पडला..

"तू एकटी राहतेस, समाजात काय काय ऐकायला येतं आजकाल..दरवेळी मी नसेन ना, तुला स्वतःला सक्षम व्हायला हवं...सेल्फ डिफेन्स शिकून घ्यायला हवा..."

"तू कुठे जाणारेस? माझ्या वरतीच तर राहतोस, एक हाक दिली तर येशील की लगेच.."

"पण मी कायमचा थोडी असेन? गांभीर्याने याचा विचार कर आणि आत्मनिर्भर हो..."

"बरं बरं... तू देशील का मला सेल्फ डिफेन्स चे धडे?"

"मी?"

"मग दुसरं कोण, तू एका वेळी 3-3 माणसांना पळवून लावलंस..तूच शिकव की मला.."

"आयडिया छान आहे...चल, उद्यापासून तुझा क्लास सुरू..पण तुला माझ्या खोलीवर यावं लागेल बरं का..."

"का? तूच ये की माझ्याकडे?"

"वा रे वा...एक तर फी देणार नाहीच तू..वर home delivery?? अजिबात नाही, self सर्व्हिस घ्यायची.."

त्याची ही वाक्य ऐकून शारदाला जोरजोरात हसायला येऊ लागलं.. home डिलिव्हरी काय, सेल्फ सर्व्हिस काय..कितीतरी दिवसांनी शारदा अशी मोकळी हसत होती...

0

🎭 Series Post

View all